अध्याय २ रा - श्लोक ३७ ते ३८

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रृण्वन् गृणन्संस्मरयंश्च चिन्तयन्नामानि रूपाणि च मङ्गलानि ते ।
क्रियासु यस्त्वच्चरणारविन्दयोराविष्टचेता न भवाय कल्पते ॥३७॥

भजनें तरती सळीं भोळीं । भजनीं तत्पर चंद्रमौळी । ब्रह्मादिकांचिये मौळीं । पादधुळी भक्तांची ॥२१॥
तो भक्त म्हणसी कैसा । कोण्या योगें कर्मफांसा । तोडूनि पावला स्वप्रकाशा । श्रीपरेशा तें ऐका ॥२२॥
हरिगुणांचिये श्रवणीं । समाधान पावोनिया मनीं । स्वर्गसुखाची वाळणी । करूनि कीर्तनीं रंगती ॥२३॥
शुक म्हणे गा परीक्षिति । श्रवणनिष्ठा तुझ्या चित्तीं । श्रवणसुखाची विश्रांति । तें तूं मूर्त्ति नरेंद्रा ॥२४॥
हरिकीर्त्तनश्रवणापुढें । अमृत कायसें बापुडें । अमरपदासहित उडे । कीर्त्तनपाडें ते न तुके ॥७२५॥
शमदमादिसाधनयुक्त । श्रवणसुखासी आसक्त । हरिप्रेमें स्वानंदभरित । नित्यमुक्त पैं झाले ॥२६॥
श्रवणसुखाचे विश्रांती - । पुढें मोक्षाची गणना किती । आज्ञाधारक भगवन्भूर्त्ति । ऐशी ख्याति श्रवणाची ॥२७॥
हरि तेथेंचि हरिवल्लभा । ब्रह्मा आला जिचिया गर्भा । ते हरिभक्ताचिया वालभा । न वचे क्षोभा आढ्यत्वें ॥२८॥
तेथ इतर वैभवें किती । जीं हरिगुणश्रवणीं साम्य होती । भक्त पावले विश्रांति । अनुग्रहिती सात्त्विका ॥२९॥
हरिगुणांची नेणे चवी । तो विषयसुखामाजीं गोंवी । जैशी मानिजे निर्दैवीं । नीच पदवी उच्चत्वें ॥७३०॥
यालागीं हरिसुखें निवाले । हरिगुणश्रवणें पूर्ण धाले । जैसे कल्पतरू फळले । भाग्यें ओळले सदैव ॥३१॥
कीं भगवद्भाग्यें सभाग्य पूर्ण । भवभणगाचें दुःखदैन्य । फेडूनि करिती सुखसंपन्न । भगवद्रुण अनुग्रहें ॥३२॥
तृषार्त्त धुंडितां मृगजळ । पावला मानस निर्मळ । आणिका बोधूनि दीनदयाळ । वारी तळमळ तृष्णेची ॥३३॥
तैसा हरिगुणीं निवाला । संसारसंताप विसरला । अंतरीं कळवळा उपजला । जन बोधिला निजतोषें ॥३४॥
मायाभ्रमें संसारसुख । मानूनि पूर्वीं भोगिलें दुःख । तैसें देखोनि आंधळे मूर्ख । त्यांसि स्वसुख अनुग्रही ॥७३५॥
अज्ञान अंधकूपीं पडतां । पूर्ण कृपा दाटोनि चित्ता । सांगे निजसुखाची वार्त्ता । यथार्थता हरिभजन ॥३६॥
जंववरी आंगीं बाळपण । तंववरी खेळींच रंगे मन । तरुण म्हणती त्या अज्ञान । वयसा ज्ञान यथार्थ ॥३७॥
कायाकांचनकांताप्रेम । तारुण्यकाळीं खवळे काम । अहोरात्र भोगवी श्रम । सुखविश्राम अंतरला ॥३८॥
वृत्तिक्षेत्रममता वाढे । मान्यतेचा गर्व चढे । अष्टमदें आपणापुढें । दुजें नावडे आथिलें ॥३९॥
तंव प्रारब्धाची विपरीत गति । इच्छेसारिखीं फळें न होती । केले कष्ट वृथा जाती । दुःखावर्तीं मग पडे ॥७४०॥
कैसें भाग्य विपरीत झालें । शत्रूचे मनोरथ पुरले । लोकीं हीनत्व अंगा आलें । ऐसा आहाळे विषादें ॥४१॥
लोक सभाग्य सर्वकामीं । आम्हां क्षोभला कुलस्वामी । म्हणोनि प्रवर्त्ते अभिचारकर्मी । नाना नेमीं सक्लेश ॥४२॥
तंव वार्द्धक्य खवळे अंगीं । रोम उठती सर्वांगीं । अधीर अशक्त नेमा भंगी । पावे जगीं अपकीर्ति ॥४३॥
द्वेष अंतरींचा न विसरे । क्रोधें संतप्त होऊनि मरे । अंतकाळीं वैरें स्मरे । जन्मांतरें साधावया ॥४४॥
ऐसे अज्ञानें बुडतां भवीं । त्यांसी भजन कांसे लावी । श्रवणकीर्तननेमें गोंवी । विश्रांति दावी स्वसुखाची ॥७४५॥
स्मरणनिष्ठेचा अमृतझरा । लावूनि दावी अनुभव खरा । स्मरणें विसरवी विसरा । कदा निदसुरा न वसोंदे ॥४६॥
अहोरात्र स्मरवी नाम श्रवणकीर्तनीं तेणें प्रेम । हृदयीं प्रकटे मेघश्याम ।जो निष्काम सुखसिंधु ॥४७॥
अनंत अवतार अनंत रूपें । अनंतनामें गुणप्रतापें । मंगळ उमाणती मापें । शिवस्वरूपें सुसेव्यें ॥४८॥
कल्याणकल्पद्रुमाचीं बीजें । कां मंगलसूर्याचीं सुतेजें । कैवल्यभद्रासनाचीं राज्यें । अमरपूज्यें प्रसवती ॥४९॥
वाचेसि सप्रेम नामस्मरण । हृदयीं कोंदलें सगुण ध्यान । भजनानंदीं गुंतलें मन । संसारभान मावलळें ॥७५०॥
विश्वीं कोंदला अनंत । भजनापुरता आपण्भक्त । तेणें इंद्रियां एकांत । स्वानंदभरित सर्वदा ॥५१॥
ऐसें विनटतां चरणसेवे । निमाले शत्रूंचे मेळावे । संसार नाहीं ठावें । केलें आघवें हरिभजन ॥५२॥
सर्वभूतीं दिसे देव । सहज वंदनीं सद्भाव । अर्चनविधीचा गौरव । अवंचकत्व परिचर्या ॥५३॥
अहित वारूनि हितोपदेश । सख्यभजन हें निर्दोष । आत्मनिवेदनाचें यश । भेद निःशेष नासतां ॥५४॥
ऐसा सर्वांपरी भक्त । भेदभ्रमाची विसरला मात । ज्याचें भजनाविष्ट चित्त । नित्य निर्मुक्त तो झाला ॥७५५॥
कैंचा संसार पुढती तया । मोक्षा न वचे आना ठायां । मनें वाचासहित काया । अनामया समरसला ॥५६॥
तो स्वयेंचि झाला सर्वगत । सबाह्य हारपलें द्वैत । नुरेची संसाराची मात । आविष्तचित्त यालागीं ॥५७॥
जळ गोठोनि गार झाली । अनादिभ्रमें चक्रीं पडिली । दैवें सागरीं प्रवेशली । न वचे निवडली कल्पांतीं ॥५८॥
ऐसे अनंत अवतार धरून । केलें स्वधर्मसंस्थापन । कृष्ण केवळ ब्रह्म पूर्ण तोषें सुरगण नाचती ॥५९॥
ज्याचे प्राप्तीसि योगयाग । करितां साधनांनीं लाग । तो हा प्रत्यक्ष श्रीरंग । आमुचें भाग्य सफळित ॥७६०॥
भजनभाग्याचें जें फळ । तो हा कृष्णजन्म केवळ । देवकीचें भाग्य सफळ श्रीगुपाळ जोपोटीं ॥६१॥

दिष्ट्या हेर‍स्या भवतः पदो भुवो भारोऽपनीतस्तव जन्मनेशितुः ।
दिष्ट्याऽङ्कितां त्वत्पदकैः सुशोभनैर्द्रक्ष्याम गां द्यां च तवानुकम्पिताम् ॥३८॥

तुज ईश्वराचें स्थानभूत । देवकी झाली हें परमाद्भुत । भाग्य म्हणोनि देव स्तवित । त्रिजगीं ख्यात मंगळ ॥६२॥
हरिसी भूमंडळींचा भार । म्हणोनि हरिसंबोधनें सुरवर । समस्त करिती जयजयकार । स्तवनीं तत्पर होऊनि ॥६३॥
तुझिया जन्ममात्रेंकरून । झालें भूभारनिरसन । भाग्यें आमुचे देखती नयन । श्रीपदचिन्ह दिवि भुवि ॥६४॥
ध्वजवज्रांकुशादि चिन्हें । यवाब्जऊर्ध्वरेखालांछनें । अनंतगुणीं सुशोभनें । स्पर्श पावणें सुरमर्त्यें ॥७६५॥
तुवां अनुकंपेंकरून । स्वर्ग मर्त्य उभय भुवन । रक्षिलें अशांतें देखोन । परम धन्य पैं आम्हीं ॥६६॥
झणें तूं म्हणसी रमारमणा । जन्म धरूनि भूभारहरणा । केलें म्हणोनि वाखाणां । तरी मी जन्म अमरणा पावे कीं ॥६७॥
मजहि संसार जीवापरी । तरी स्तवावयाची कोण थोरी । ऐसें न म्हणावें श्रीहरि । तूं निर्विकारी परब्रह्म ॥६८॥


References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP