अध्याय २ रा - श्लोक ३१ ते ३२
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
स्वयं समुत्तीर्त्य सुदुस्तरं द्युमन् भवार्णवं भीममदभ्रसौहृदाः
भवत्पदाम्भोरुहनावमत्र ते निधाय याताः सदनुग्रहो भवान् ॥३१॥
देवी म्हणती स्वप्रकाशा । भवार्णवीं तुझिया दासां । तुझिया चरणाचा भरवंसा । कृतमानसां निस्तरणा ॥४४॥
चरणप्रभेच्या उजियेडें । भवार्णवाचें भानचि उडे । निस्तरणाचेंकाय कोडें । गोष्पदपाडें न गणिती ॥५४५॥
ऐसा तुच्छ अतिहळवट । तया निस्तरणीं काय संकट । भवसिंधूचा भरिला घोंट । महिमा उद्भट चरणाचा ॥४६॥
ऐशा श्रीचरणप्रसादें । भव निस्तरला संतवृंदें । पुढें तारावयासि मुग्धें । नौका विनोदें स्थापिली ॥४७॥
संप्रदायपरंपरा । नवविध भजनाचिया आधारा धरोनि तरती भवसागरा । अति दुस्तरामाजिवडे ॥४८॥
भवार्णव भयंकर । तेथ भज्जती सुरासुर । खोलियेचा न कळे पार । चराचर बुडालें ॥४९॥
स्वयें तरोनि गेले संत । जे काम अपार करुणावंत । ज्याम्चे दयेचा ब्रह्मांडभरित । सुहृद्भाव कोंदला ॥५५०॥
भूतमात्रीं आत्मप्रेम । जेथ नुदैजे भाव विषम । भाविकांचे कल्पद्रुम । आत्माराम जगदात्मे ॥५१॥
ते तरोनि गेले भवाब्धिपार । हरिपदनौकेचा उतार । केला मागिलां आधार । भव दुस्तर तरावया ॥५२॥
तव पदभजननौकापथ । जेथें तरोनि गेले संत । मागें निरविले तुज भक्त । त्यां तूं अनंत अनुग्रहीता ॥५३॥
संतीं निरविलें भक्तां । म्हणोनि वाहसी त्यांची चिंता । नाना संकटीं संरक्षिता । सदनुग्रहता रक्षावया ॥५४॥
संती निरविलें भक्तां । म्हणोनि धरिसी सापत्नता । प्रकटूणियां एकात्मता द्वैतवार्ता नुरविसी ॥५५५॥
म्हणसी भक्तीचें कारण काय । अनेक असती साधनोपाय । योगयागतपें काय । प्राप्त होय परम पद ॥५६॥
शास्त्राभ्यासाचा आधार । करूनि कित्येके चतुर । मुक्तपणें स्वेच्छाचार । विधिकिंकर न हों म्हणती ॥५७॥
तरी ऐकें गा अरविंदनेत्रा । त्यांची निष्फल देहयात्रा । ज्ञानाभिमानें भरिलें गात्रा । भजनसूत्रा भंगविलें ॥५८॥
येऽन्येऽरविन्दाक्ष विमुक्तमानिनस्त्वय्यस्तभावादविशुद्धबुद्धयः ।
आरुह्य कृच्छ्रेण परं पदं ततः पतन्त्यधोऽनादृतयुष्मदङ्घ्रयः ॥३२॥
ते म्हणसी कोण गा जरी । जे श्रीपदभक्ति अनादरी । पूर्वपक्षें भरले भरीं । कर्कशाचारी कर्मठ ॥५९॥
पठण करूनि वेदशास्त्र । आपणा मानूनि देहमात्र । तो देह करावया पवित्र । करिती कृच्छ्र चांद्रायणें ॥५६०॥
करिती अनेक कर्कश तपें । त्या तपाभिमानाचेनि जल्पें । मानिती तीन्हीं भुवनें अल्पें । नानाविकल्पें जल्पती ॥६१॥
एथ परीक्षिति आशंका करी । जें तप विधीसि बोधी हरि । त्या तपें हे अनधिकारी । त्या तपामाझारीं काय विघ्न ॥६२॥
शुक म्हणे गा सौभद्रसुता । जंव न जोडे अंतर्मुखता । तंववरी घाली विघ्नावर्ता । करी अधःपाता वरपडे ॥६३॥
अंतर्मुखतेचें हेंचि वर्म । सर्वभूतीं आत्माराम । त्याच्याठायीं उपजे प्रेम । देहसंभ्रम नाठवे ॥६४॥
विवर्त्ताचें विसरे भान । न धरी देहाचा अभिमान । करी विध्यक्त कर्माचरण । जैसें जीवन जळगा रे ॥५६५॥
बाह्य सत्कर्में झिजवी काया । अंतरीं भरिली भूतदया । वसती गेला भजनालया । म्हणावें तया अंतर्मुख ॥६६॥
नातरी धोधां महापुरीं । बुडवितां उफळोनि ये बाहेरी । तैसा देहाभिमानें करी । कव्र्में शरीरीं बहिर्मुख ॥६७॥
अंतरीं दयेचा नाहीं शेष । भूतद्रोहें न मानी त्रास । देहबुद्धि पाहे गुणदोष । फलाभिलाष मानसीं ॥६८॥
ध्यानीं निश्चळ नोहे मन । बाहेर धांवे निर्बुजोन । न रुचे स्वरूपानुसंधान । विषयभान विसरेना ॥६९॥
भक्तिसुखीं गोंवितां बळें । बळेंचि बाहेर उफाळे । लौकिकगजबजेचेनि मेळे । धरी आगळें वालभ ॥५७०॥
मरतां तृषेनें ब्राह्मण । नेदी शौचाचें जीवन । करी चरणप्रक्षाळण । मृदालेपनपूर्वक ॥७१॥
क्षुधेनें बालक मुके प्राणा । तया नेदी अन्नजीवना । अनुच्छिष्ट भंगूं देना । करुणा येना मानसीं ॥७२॥
कृतनेमाचा होतां भंग । क्रोधें खवळे जैसा मांग । तेणें सुकृता होय भ्म्ग । हें अव्यंग उमजेना ॥७३॥
सकाम कर्माचिया आवडीं । परोपकारीं नच सुटे काडी । विषयलोभें वेंची कोडी । स्वार्थें मोडी परकार्य ॥७४॥
लोकीं रूढवी आपुली ख्याति । मानी सन्मानें विश्रांति । न मानितां मानी खंती । जैशी वोखती सुखदुःखीं ॥५७५॥
जातिकुलशीलधन - । विद्यावयस्वरूपसंपन्न । अंगवळाचा अभिमान । मुसमुसी पूर्ण मदाष्टकें ॥७६॥
दुजा मान्य देखोनि पुढां । जैसा पेटला उकरडा । तैसा धुपधुपी आंतुली कडां । दर्पें कडकडां कढों लागें ॥७७॥
पूर्ण स्वहिताची सामग्री । जेथ भरावी अंतरीं । तेथ भरिले साही वैरी । बाह्यशरीरीं कर्मठ ॥७८॥
पुंश्चळीचें पातिव्रत्य । त्र्यक्षरीचें बोलणें सत्य । तैसें जयाचें बाह्य कृत्य । तें औद्धत्य गुणांचें ॥७९॥
शरीर शोषूनि नाना तर्पी । देवता आराधी साक्षेपीं । र्पसन्न करूनि शास्त्रजल्पीं । सिद्धि कल्पी प्रज्ञेची ॥५८०॥
तये क्षुद्रा सिद्धिबळें । भोगी मुक्तत्वसोहाळे । कोठें न माये तोंडवळें । लोक भोळे भांबावी ॥८१॥
मुक्तपणाचा अभिमान । करिती देहाचें मंडन । चामरें छत्रें सूर्यपर्णें । सिंहासनप्रतिष्ठा ॥८२॥
मिलवूनि शिष्यमांदी । स्वार्थोपयोगें त्यांसि बोधी । यथेष्टाचरण प्रतिपादी । न मानी अविधि अभिचार ॥८३॥
शम दम निरूपी वैखरीं । षड्रिपु नांदवी अभ्य़ंतरीं । बोले अमानित्वकुसरी । दंभाचारी मुक्तत्वें ॥८४॥
देव म्हणती कमलनयना । ऐसा मानूनि मुक्तपणा । विमुख झाले तुझिया भजना । असद्भावना रूढविली ॥५८५॥
विश्वव्यापक परमात्मा । तत्प्राप्तीचा भजनप्रेमा । मावळोनिया झाली अमा । रूपनामा भुलले ॥८६॥
आत्मा अस्ति भाति प्रिय नामरूप मायामय । तेंही मानी केवळ विषय । भक्तिसोय लोपली ॥८७॥
म्हणाल काम पां लोपली भक्ति । तरी चित्तशुद्दि केली नव्हती । बाह्यकर्माची व्युत्पत्ति । तेणें महती वाढली ॥८८॥
पडिला लौकिकाचा भार । रूढ केला दंभाचार । दर्शना येती थोर थोर । त्यांचा आदर वाढला ॥८९॥
न्यून पूर्ण सांभाळावें । बरें वाईट संपादावें । चित्त भरलें येचि हावें । नाहीं ठीवें निजहित ॥५९०॥
अनेक वस्तु मिळवाव्या । प्रयत्नपूर्वक संरक्षाव्या । परस्परें द्याव्या घ्याव्या । वाढवाव्या स्फीतिलोभें ॥९१॥
आपणा वेगळी न हाले काडी । ऐशी लोकीं झाली रूढी । पायीं पडली प्रपंचबेडी । नेणें आवडी स्वहिताची ॥९२॥
लोहाचेचि तवे आरिसे । तवां प्रतिबिंब न भासे । आरिशामाजीं स्वच्छ दिसे । मळविनाशें ज्यापरी ॥९३॥
नाहीं झाली चित्तशुद्धि । अस्त पावली आतिक्यबुद्धि । परोक्षज्ञानें शब्दवादी । बाह्योपाधि वाढवी ॥९४॥
बहुतां कष्टीं मनुष्ययोनि । तेथहि अग्रजन्म पावोनि । बैसोनिया दुंगासनीं । मुक्तपणीं मिरवले ॥९९५॥
एथूनि आतां सायुज्यपदीं । समरसावें भजनसिद्धि । ज्ञानें निरसूनि उपाधि । पूर्ण बोधीं मिळावें ॥९६॥
परंतु अनादरिले हरिगुरुचरण । तेणें अस्त पावलें ज्ञान । मुक्तपणें यथेष्टाचरण । तेणें अधःपतन पावले ॥९७॥
तैसे न पावतचि ते पतन । जे काम तुझिया चरणा शरण । त्यांच्या स्मरणें पळे विघ्न । तेंचि सुरगण बोलती ॥९८॥
N/A
References : N/A
Last Updated : April 25, 2017
TOP