अध्याय २ रा - श्लोक २७

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


एकायनोऽसौ द्विफलस्त्रिमूलश्चतूरसः पश्चविधः षडात्मा ।
सप्तत्वगष्टविटयो नवाक्षो दशच्छदी द्विखगो ह्यादिवृक्षः ॥२७॥

वृक्श ब्रह्मभूमिके निर्मळे । गुणसाम्यप्रकृतीचें आळें । तेथ गुणत्रयाचीं मूळें । कर्मजळें बळावलीं ॥३४५॥
अष्टधा प्रकृति खांद्या अष्ट । षड्विकार स्वभाव स्पष्ट । सप्तधातु त्वचा काष्ठ । वेष्टूनि श्रेष्ठ वाढला ॥४६॥
दशप्राणपत्रीं हाले । नवां छिद्रांची खूण वाळे । चतुर्विध पुरुषार्थ रसाळें । द्विविध फळें लगटलीं ॥४७॥
फलास्वादप्रकार पांच । तेचि पांच विषय साच । दोन्ही पक्षी उंच नीच । ये वृक्षींच राहिले ॥४८॥
ऐसा प्रपंच आदिवृक्ष । साद्यंत आवघाचि परोक्ष । एथ आत्मा तूं अपरोक्ष । जो अलक्ष अगोचर ॥४९॥
आतां शुद्धभूमीं केवळ । कैसें निर्माण झालें आळें । तेथें दृढावलीं कैशीं मूळें । हें परिसा कळे त्या रीतीं ॥३५०॥
अचळ अमळ शुद्ध बुद्ध । अलक्ष्य अव्यय स्वतःसिद्ध । अपार अमूप अगाध । स्वसंवेद्य सन्मात्र ॥५१॥
श्रुति जयाचें आंगण । पाहोनि करिती आंगवण । जें पूर्णाचेंही परिपूर्ण । ज्ञानाज्ञान अस्पष्ट ॥५२॥
जें होऊनि जें पहावें । जें होऊनि जेथ रहावें । जें होऊनि जें भोगावें । द्वैत न शिवे जे ठायीं ॥५३॥
जया न संभवे अधोर्ध्व । जया नातळे शुद्धाशुद्ध । जेथ द्वैतबुद्धिबोध । हा निरोध जे ठायीं ॥५४॥
जये ठायीं सत्ता इतुकी । ऐसें कथूनि शारदा मुकी । सूर्यासि ज्याची अनोळखी । व्योमा चुकी व्याप्तीची ॥३५५॥
ऐसें जें कां केवळ ब्रह्म । तये भूमीसि प्रपंचद्रुम । थावला त्याचा अनुक्रम । मुनिसत्तम निरूपी ॥५६॥
अद्वैतभूमि द्वैत आळें । म्हणतां सरस्वती पांगुळे । अनिर्वाच्य म्हणते वेळे । केवीं कळे अवलांसी ॥५७॥
हें तों अनिर्वचनीय खरें । यासारिखें कैचें दुसरें । दृष्टांत दीजे त्या आधारें । कीं एथ पुरे उपमेसी ॥५८॥
जेथ द्वैताचा ठावचि नाहीं । अनंत सृष्टि तेचि भुई । लगडोनि पिकती हे नवाई । अपूर्व काय बोलावी ॥५९॥
व्योमें व्योमचि व्यापिलें । पवनें पवना चंचळ केलें । तेजें तेजा प्रकाशिलें । जीवनें जीवविलें जीवनातें ॥३६०॥
तैसें आपणामाजीं आपण । जितकें स्फुरे अहंस्फुरण । तितुकें महद्ब्रह्म जाण । दीर्घ स्वप्न मायिक ॥६१॥
तरंगीं आवरे जितका सिंधु । तितकाचि तरंगाबबोधु । येर उरला जो अगाधू । तो स्वतःसिद्ध संचला ॥६२॥
जागृतीमाजीं जें चैतन्य । तेंचि जैसें देखे स्वप्न । एवं कार्यकारण अभिन्न । अनिर्वचन या हेतु ॥६३॥
ऐशी अनिर्वचनीय माया । अंगीकारेंवीण बोलावया । निलाग म्हणोनि या उपाया । प्रवर्त्तलीया श्रुतिस्मृति ॥६४॥
एर्‍हवीं शब्दाशीं हें कानडें । सर्व साधनांसि कोडें । विचार राहे एकीकडे । ज्ञान बापुडें तें काय ॥३६५॥
एथ एकचि उपाय । ईश्वरकृपा सद्गुरुपाय । अनन्यभावें सेवूनि ठाय । त्यासि जाय उपभोगा ॥६६॥
येर अवघीच व्युत्पत्ति । मुखें बडबड हातीं पोथी । संकल्पसन्निपात भरला चित्तीं । तेणें वसति भ्रमाची ॥६७॥
भ्रमिष्टें भ्रमिष्टा उपजवणें । अंधा अंधें चालवणें । काळें काजळें निर्मळ धुणें । तैशी देहाभिमानें व्युत्पत्ति ॥६८॥
ईश्वरप्रसादें सद्गुरुप्राप्ति । तरीच तेथ अनन्यभक्ति । तेथेंचि घडे चित्सुखावाप्ति । येर व्युत्पत्ति आंधळी ॥६९॥
गुरुशिष्य घरोघरीं । अनन्यभक्तीपासूनि दूरी । यालागीं उभयतां बाजारीं । दे - घे करी दुकानीं ॥३७०॥
सृष्टि अवघी दंपत्यवंत । पतिव्रतांची वाण बहुत । अनसूया अरूंधती विख्यात । लोपामुद्रा इत्यादि ॥७१॥
असो किती हा विस्तार । परिसें न पालटे खापर । तो धोंडा हा मृद्विकार । अनधिकार परस्परें ॥७२॥
श्रुतीचा इतुका उपकार । वेदांतशास्त्रें पाखंडभार । खंडोनि केला साक्षात्कार । परात्परतर वस्तूचा ॥७३॥
अनन्यसद्गुरुभक्तिबळें । श्रुतिप्रणीतप्रमेय कळे । स्वसंवेद्य ज्ञान उजळे । हृदय खोळे आतौतें ॥७४॥
तत्स्वयं योगसंसिद्ध इति । कालेनात्मनि विंदति । ऐसें बोलिला श्रीपति । गीता चतुर्थाध्यायीं ॥३७५॥
असो अद्वैतीं नसतां माया । अनिर्वाच्या अंगीकारूनिया । श्रुति प्रवर्त्तल्या प्रबोधकार्या । तेंचि राया शुक सांगे ॥७६॥
लटिका व्योमीं नीळिमा मळ । लटिका भ्रमाचा वेताळ । लटिका लेंकुराचा खेळ । तैशी टवाळ हे माया ॥७७॥
मी ब्रह्म हें नाथिलें स्फुरण । हेंचि प्रकृतिआळें जाण । तेथें आदिप्रपंचाभिवर्धन । तेंहि कथन अवधारा ॥७८॥
जैशी लटुपटु कहाणी । ऐकिजे हूंहूं म्हणोनि । तैशी अद्वैतीं द्वैतकथनी । कोणीं कानीं न काढावी ॥७९॥
जें अद्वैत प्रसिद्ध । तेथ प्रणववीजाचा कंद । प्रपंचाकारें झाला विशद । तो अनुवाद वृक्षाचा ॥३८०॥
वृद्धिक्षयरूपें इय । दो अक्षरीं व्याख्या होय । कथिली श्रुतीनें नामसोय । प्रपंचमय हा वृक्ष ॥८१॥
विपरीतज्ञानें वृद्धि होय । वास्तवज्ञानें पावे क्षय । वृश्च्यत इति इति वृक्ष व्याकरणसोय । दाविली स्वयें श्रीधरें ॥८२॥
अहं ब्रह्मास्मि हें स्फुरण । तया कंदाचें संजीवन । तोचि शुद्ध सत्त्वगुण । ओल्हावून टवटविला ॥८३॥
तेथूनि त्रिगुणांचीं मूळें । आळां पांजरोनि झालीं सबळें । अहंस्तंभाच्या रसाळ नळें । फुटले डहाळे अष्टधा ॥८४॥
ते महत्तत्वाचे खोडी सदटे । अहंकाराचा कोंब फुटे । तो त्रिविध तिहीं ठायीं वाटे । तीन्ही फांटे त्रिलोकीं ॥३८५॥
तमोमूळाचे नीरस उफाडे । तामस फांटा लांब वाढे । अधोमुखची तो वावडे । अजडा जडें जडत्व ॥८६॥
तेथें प्रथम फांटा शून्यरूप । त्यासि आकाश ऐसा जल्प । त्याहूनि चंचळ जड अमूप । वायुस्वरूप पांजरला ॥८७॥
वायूहूनि दशगुणी जड । सतेज शाखेचा झडाड । त्याही दशगुणी जड अवघड । धांवे घडघड जळशाखा ॥८८॥
जळाही दशगुणी घनवट । सर्व शाखांचा तळवट । ते भूमिशाखा ज्याची स्पष्ट । ऐसे अष्ट विटप हे ॥८९॥
एवें सत्त्वमूळें रसाळें । याचि शाखांत वेगळे । पारंब्यांत फुटती डहाळे । ते मोकळे अनुवादूं ॥३९०॥
अंतःकरणनामें शाखा । व्योमशाखेसि अंतर्मुखा । वाढोनि मुळींची भूमिका । लांब देखा कवळावया ॥९१॥
दुसरी पवनशाखेसी फुटे । संकल्पविकल्पाचे तिसी फांटे । परमचंचळ वावटे । मन हें घटे ती नांव ॥९२॥
तिसरी तेजशाखेची फांदी । रसाल निश्चया प्रतिपादी । सत्त्वमूळरसाची वृद्धि । नामें वृद्धि जे म्हणिजे ॥९३॥
चौथा जळशाखेचा डहाळा । अनुसंधानात्मक कोंवळा । चित्तनामें ज्याची कळा । वृक्षा सकळा शोभवी ॥९४॥
भूमिशाखेचा सबळ बांड । अहंकारनामें जो सदृढ । शोभें शोभवी ब्रह्मांडपिंड । जेणें झाड लसलसित ॥३९५॥
आतां रजाच्या मूळरसें । फांटे वाढले ते कैसे । तेंचि ऐका सावकाशें । होती तैसे निरोपूं ॥९६॥
अध उर्ध्व आणि मध्य । फांटे पांजरले त्रिविध । चेष्टा ज्ञान क्रिया बोध । शुद्धबद्ध संमिश्र ॥९७॥
व्यान समान उदान । प्राण आणि पांचवा अपान । हें पंचविध पूर्ण जाण । स्पष्ट रुणझुण हालती ॥९८॥
नाग कूर्म कृकलास । देवदत्त धनंजय विशेष । हे गुप्तपत्रें गर्भकोश । वेष्टूनि अग्रांश वाढविती ॥९९॥
वाम दक्षिण आणि मध्य । जैशीं पळसाचीं पत्रें विविध । तैशींच प्रपंचतरूचीं दशविध । मुनि प्रसिद्ध बोलिला ॥४००॥
या वृक्षाचे चारी रस । ते विवळ राया परिस । दृष्टांतद्वारा तव मानस । हा विशेष उमजेल ॥१॥
जैसें कोमळ रसाळ फळ । तिक्त सदोष केवळ । तेंच वाढतां सबळ । कपायशील संमिश्र ॥२॥
लवणरायीरामठमेळें । रुचिदायक तें सदोष केवळ । तेंच फळ जैं निवर झालें स्वादें अम्लें परिणमे ॥३॥
तेव्हां लवण मिरीं आणि गुड । यांच्या योगें विशेष गोड । केवल परिपक्क तैं सुरवाड । पीयूषपडिपाड गोडिचा ॥४॥
तैसें भवतरूचे रस चारी । चारी पुरुषार्थ अवधारीं । इंद्रियांच्या पंचप्रकारीं । तेचि परी रसाची ॥४०५॥
ज्ञानेंद्रियांचे विविध धर्म । तैसेंचि कर्मेंद्रियांचें कर्म । ते विषयपरचि संभ्रम । तैं रसाळतम मूळरसें ॥६॥
तें संपादाया विषगोडी । अन्यायार्जित अर्थ जोडी । ते अकीर्तिरसपरवडी । तमोवाढी भवद्रुमीं ॥७॥
अनर्थ अर्थें वाढे काम । तैं काम्यकर्माचा संभ्रम । भूतप्रेतार्चनें वाम । चाळी नेम तमोमूळें ॥८॥
तुटोनि विधींचें बंधन । स्वेच्छारसे यथेष्टाचरण । उच्छृंखल मुक्तपण । हा मोक्ष जाण तामस ॥९॥
ऐसे तमात्मक चारी रस । तमोशाखींचे विशेष । हेचि रजाचे असोस । शाखारस भववृक्षीं ॥४१०॥
तेव्हां कर्मशास्त्राचे आवडी । भवद्रुमाची रसाळ गोडी । पुण्यप्रकारपरवडी । वाढे जोडि सर्वस्वें ॥११॥
नाना व्रतें तपें तीव्रें । इहामुत्ररसें मधुरें । पूर्वमीमांसा यज्ञाधारें । इष्टपूत रसाळ ॥१२॥
दुसरा राजस रस अर्थ । स्वधर्में जोडिजे यज्ञार्थ । तिसरा स्वर्गकामाचा स्वार्थ । यज्ञें कृतार्थ तो चौथा ॥१३॥
इंद्रादिदेवतासायुज्य । शास्त्रें मानूनि होईजे पूज्य । राजस मोक्षाचें हें भोज्य । या चहूंही रज रसाळ ॥१४॥
भवद्रुमाचे चार्‍ही रस । आतां सत्त्वशाखांचे हे परिस । वाळे भवद्रुमची अशेष परिपक्कास रस येतां ॥४१५॥
समष्टि हें सगळें झाड । व्यष्टि वेगळाले मोड । चहूंकडे लगडले घड । एवं अवघड अवघाची ॥१६॥
सात्त्विक प्रथम रस तो धर्म । जें यथोक्त निष्काम कर्म । दैवोपलब्ध अर्थ परम । मोक्षकाम निरपेक्ष ॥१७॥
ब्रह्मावबोधें अपरोक्ष । तोचि सात्त्विकरस चौथा मोक्ष पांच प्रकार प्रत्यक्ष । याचे दक्ष जाणती ॥१८॥
श्रवणें तामसरसप्रकार । आत्मस्तुतीचा आदर । तें तामसमुख मुहुर । फळ निंदा दुःखतर कडवट ॥१९॥
त्वचा - फळीं दुसरी गोडी । स्वैर स्त्रीस्पर्शीं आवडी । स्रक् चंदन वस्त्रें कोडी । हे परवडी सुखफळीं ॥४२०॥
तेथ शीतोष्णादि कंटक खडे । कठोरस्पर्शें देह अवघडे । त्वगिंद्रयद्वारा दुःखें रडे । हा प्रकार घडे दुःखफळीं ॥२१॥
ऐसा द्विविध त्वग्विचार । सुखदुःखफळीं प्रकार । अवघा पंचेंद्रियविस्तार । त्रिगुणाकार सुखदुःखें ॥२२॥
नेत्रेंद्रियप्रकार तिसरा । गोडी अनेक श्रृंगारा । वनितारत्नवस्त्रभांगारा । रसगोडी या सुखफळीं ॥२३॥
व्याघ्र वृश्चिक सर्प राक्षस । घोर तस्कर रण कर्कश । नेत्रद्वारा उपजे त्रास । दुःखफळास हे गोडी ॥२४॥
जिव्हेंद्रियाची परवडी । षड्रसांची सुरस गोडी । ती या सुखफळाचे पडिपाडीं । कीजे कुरवंडी इतरांची ॥४२५॥
तेथची विषादि मारक । जैसें वज्र सदा मस्त अर्क । गातकरेचकादि वमक । हेचि दुःखफळगोडी ॥२६॥
पांचवा प्रकार घ्राणेंद्रिय । चंद्रकाश्मीरादि आमोद सोय । नाना प्रसूनपरागें सोय । रसाळता ये सुखफळा ॥२७॥
लिहितां त्रिगुणात्मक अशेष । तरी ग्रंथ वाधेल विशेष । हा उल्लेख श्रोतयांस । फळमूळांश दाविला ॥२८॥
दोन्ही कंटक बदरीझाडा । एक सरळ एक वांकुडा । तैसाचि इया प्रपंचझाडा । फळांचा जॊडा द्विविध हा ॥२९॥
सुखदुःखात्मकें विविध फळें । चहूं पुरुषार्थरसीं रसाळें । पंचेंद्रियांचे मोकळे । प्रकार कथिले पंचविध ॥४३०॥
स्वभावासि आत्मा म्हणती । या वृक्षाचे स्वभाव किती । तेहि ऐकावे यथामति । निरूपिजती साकल्यें ॥३१॥
कंद असतांचि निघे मोड । पुढें याचेंचि वाढे झाड । पुढें विकारें कडू गोड । मिश्र सदृढ मृद्वादि ॥३२॥
अपक्षयें वोझडे वाळे । नाशही पावे यथाकाळें । ऐसे षड्विकारमेळे । वाखाणिले षडात्मक ॥३३॥
एक षट्कोषप्रकारभाव । षडात्मा ऐसें ठेविती नांव । एक षडूर्मीचा प्रादुर्भाव । म्हणते एभव षडात्मा ॥३४॥
त्वग्मांसास्थिस्नायुमज्जा । रुधिरें सहित स्वेदबीजा । सप्त त्वचा या महाराजा । उत्तरात्मजा अवधारीं ॥४३५॥
त्यासि सप्त अंतरसाली । ते सप्तधातूंची व्युत्पत्ति केली । दोहों पक्ष्यांचीं आंविसाळीं । हे बोली अवधारा ॥३६॥
समष्टिअभिमान करूनि घर । राहे पक्षी तो ईश्वर । व्यष्ठि अभिमान नीडकर । राहे अपर जीवपक्षी ॥३७॥
यथाविधीच्या वातवर्षें । पुण्यकर्मांचे अंगवसें । फळें लगडती संतोषें । तीं निर्दोषें सुखात्मकें ॥३८॥
अविधिअसत्कर्मभरें । अथवा तामसें अभिचारें । वृक्षीं झगटे वृष्टिवारें । तैं पापाग्रें दुःखें फळती ॥३९॥
त्या सुखदुःखांचा भोक्ता । एक जीवपक्षी तत्त्वता । तेणें अत्यंत पावे व्यथा । उन्मादकता भ्रमशील ॥४४०॥
तेणें भ्रमे खांदोखांदिइं । चढे उतरे उर्ध्वीं अधीं । ऐसा भ्रमे वृक्षसंधीं । आधिव्याधि भोगित ॥४१॥
दुसरा पक्षी राहे खोडीं । तो फळाची न चाखे गोडी । नेणे भ्रमाची भोंवंडी । जाणे आवडी स्वसुखाची ॥४२॥
त्रिगुणात्मकां फळां आरोगी । म्हणोनि जीवपक्षी हा भवरोगी । नाथिली अहंता वाहे अंगीं । स्थानें भोगी क्षणिकत्वें ॥४३॥
सत्त्वात्मकें फळें खाय । तेणें स्वर्गशाखा कवळोनि ठाय । निर्मळ ज्ञानें मधुर गाय । अहंसुखीये म्हणोनि ॥४४॥
रजात्मकें सेवी फळें । तैं मर्त्यशाखांवरी घोंटाळे । सत्त्वफळांचे रसाळें । तोंडीं लाळ घोटीत ॥४४५॥
तमात्मकें फळें सेवी । तैं तिर्यक्शाखांची भ्रांति गोंवी । निद्रा तंद्रा तो तोष भावी । गुर्मी आघवी प्रमादीं ॥४६॥
एवं अवघा हा भववृक्ष । आम्ही तेथील पक्षिविशेष । तूं प्रकृतीचा परेश । आदिपुरुष परमात्मा ॥४७॥
म्हणूनि आपुली साम्यता । आम्हां न मानावी अनंता । आम्ही आपुलिया अभयोर्जिता । शरण तत्त्वतां पातलों ॥४८॥
ऐसा अफाट हा भवतरु । द्वैत जयाचा विस्तारु । अनादि आघवा असाचारू । कोणा निर्धारु न करवे ॥४९॥
एकीं अनेकतेचा भ्रम । पडोनि वाढला हा द्रुम । हेमीम मिथ्यारूप नाम । जैसें जन्म नगांचें ॥४५०॥


References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP