अध्याय २ रा - श्लोक २८
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
त्वमेक एवास्य सतः प्रसूतिस्त्वं सन्निधानं त्वमनुग्रहश्च ।
त्वन्मायया संवृतचेतसस्त्वां पश्यन्ति नाना न विपश्चितो ये ॥२८॥
ऐसा भवतरु हा शाश्वत । याची प्रसूति तूं अनंत । अनुग्राहक तूंचि एथ । अंतीं सांठवत तुजमाजीं ॥५१॥
शाश्वत कैसा जरी हा म्हणसी । तरी लटका नीळिमा आकाशीं । परंतु आकाशाचे सरसीं । शाश्वत होऊनि राहिला ॥५२॥
समुद्रीं आकाशाची छाया । लटकी परंतु न वचे लया । जंववरी सिंधु तंववरी तया । दोहींचेंही आस्तिक्य ॥५३॥
जैसे सुवर्णाचे झाले नग । तेथ सुवर्णचि अभंग । तैसें स्वस्वरूपीं मिथ्या जग । परी तें अव्यंग सद्रूप ॥५४॥
लटका नामरूपाचा आळ । प्रपंच कल्पना केवळ । सत्य एक तूं गोपाळ । न शिवे मळ द्वैताचा ॥४५५॥
एवं प्रपंचासि मूळ । तूं सन्मात्र केवळ । जैसा जागताच देखे टवाल । स्वप्नजाळ ज्यापरी ॥५६॥
कारण सन्मात्र जेव्हां होय । तेव्हां कार्यही सन्मय । याचे उत्पात्तीचा ठाय । तूं अव्यय प्रसूति ॥५७॥
तूंचि अनुग्रह याचा । अर्थ ऐसा या पदांचा । जो आळमात्र प्रपंचाचा । तूंचि तैसा स्थितिकाळीं ॥५८॥
स्वप्नीं देखे अनेकता । ते तो एकलाचि देखता । स्वभावासि वश होतां । नानाकारता अनुभवी ॥५९॥
सृष्टि नाना रंगीं रंजित । परी देखतां रंगातीत । उपनेत्रस्थानीं शास्त्रजनित । ज्ञान समस्त आविद्यक ॥४६०॥
अंधासि घातले उपनेत्र । परी तो न देखे अणुमात्र । तैसें चित्प्रकाशेंवीण स्वतंत्र । भवचरित्र केंवि उमटे ॥६१॥
जैसा नाना यातीचे दगड । तैसे उपनेत्रही अचेत जड । परंतु असतां प्रकाश करिती वाडः । म्हणोनि चाड तयांची ॥६२॥
जैशीं आणिक पार्थिवें जडें । ओढविलीं या नेत्राआडें । दृष्टि रोधूनि गडद पडे । तैसें कुडे शाब्दिक ॥६३॥
वेदांमाजीं उपनिषद्भाग । केवळ वेदांचें उत्तमांग । तेंहि शाब्दचि परी उपेग । उपनेत्रांगासारिखा ॥६४॥
जड अष्ट्धा बाह्यकारी । जीवरूपा तिये अंतरीं । दोन्ही मिळोनि चराचरीं । आगंतुकेंशीं रूढवण ॥४६५॥
जीवरूपातें विपरीत ज्ञान । कल्पनेसि अधिष्ठान । देहावच्छिन्न चैतन्य । जीवाभिधान तयासी ॥६६॥
पंचभूतात्मक जड। अन्नरसें ओतला पिंड । अन्नाशनें पोसे वाढ दृश्य सदृढ ते अष्टधा ॥६७॥
आतां आगंतुकीचें लक्षण । पिंड जन्मतां सचेतन । तैं नेणे बाह्य व्यवहार जाण । नेणे भान आगंतुक ॥६८॥
पुढें मोहाचें शिकवणें । करिती आत्पत्वें शहाणें । माझें तुझें घेणें देणें । बैसे ठाणें शत्रूचें ॥६९॥
कामक्रोधशोकमोह । दंभलोभांचा समुदाव । मूळ वास्तव झालें वाव । पडे प्रवाह दुःखाचा ॥४७०॥
स्त्रीपुत्रधनादिकांचा लोभ । येणेंचि भवदुःखाचा क्षोभ । वाढवी विषयांचें वालभ । परी हें अशुभ न वाटेची ॥७१॥
जैसा कार्पास शुद्ध शुभ्र । तद्विकार तें श्वेतवस्त्र । आगंतुक रंग चित्रविचित्र । तैशी संसारपरिभाषा ॥७२॥
परोक्षज्ञान म्हणती ज्यासी । इंद्रियद्वारा ये अभ्यासीं । अष्टमदें अभिमानासी । देहबुद्धीसी वाढावी ॥७३॥
बाह्य शिकोनि आणिलें ज्ञान । तेणें भवद्रुमाचें छेदन । करूं म्हणती जे सज्ञान । ते व्युत्पन्न स्वप्नींचे ॥७४॥
मन बुद्धि चित्त अहंकार । इहीं इंद्रियव्यापारचतुर । तिहीं अभ्यासिला संसार । तो परपार केवीं दावी ॥४७५॥
सकळ शास्त्रांचा अभ्यास । नाना साधनांचा सोस । तो अवघाचि होय फोस । भवद्रुमास वर्धक ॥७६॥
एथ आशंका धराल ऐशी । तरी कां भजावें शास्त्रज्ञासी । शास्त्र धरिलें तिहीं कुशीं । म्हणूनि त्यासी पूज्यता ॥७७॥
पुषें गुंफूनि तृणांकुरीं । तो तुरा तुरंबिजे श्रीमंतनरीं । कां तंतु ओवितां रत्नहरीं । भूषणापरी मानिती ॥७८॥
तैशीं वेदशास्त्रांचीं भाजनें । ईश्वरें निर्मिली द्विजरत्नें । म्हणोनि त्यांचिया पूजनें । रिद्धिसिद्धि साधती ॥७९॥
पूजकांचे पुरती काम । आणि शास्त्रज्ञांचा न फिटे भ्रम । जैसें दीपातळवटीचें तम । दीपोत्तम निरसीना ॥४८०॥
म्हणोनि आगंतुक ज्ञानें । कैसेनि भवाब्धि निस्तरणें । मुक्त म्हणतां बद्ध होणें । येणें गुणें शास्त्रज्ञीं ॥८१॥
एवं कल्पनेची गोंवी । त्रिविध अविद्याचि आघवी । एक चिन्मात्रचि हें मिरवी । रूपीं नांवीं नाथिला ॥८२॥
कनकबीजाची भुली । ते अचेतनीं वायां गेली । सचेतनामुखीं घातली । नाचों लागली विकारें ॥८३॥
तैसें मायाजाळ तुवां अनंतें । अवलोकिल्या साचार वर्ते । त्वदनुग्रह याचि अर्थें । बोलिजे तो जगदीशा ॥८४॥
आतां याचें सन्निधान । तो तूं एकचि श्रीबह्गवान । जागतियामाजीं स्वप्न । लया जाय ज्यापरी ॥४८५॥
स्वरूपोन्मुख स्फुरण मुरे । तेव्हां भवाभास हा कोठोनि उरे । दृष्टि झांकितां विश्वाकारें । हारपिजे ज्यापरी ॥८६॥
कां ध्याननिष्ठ उपासक । होऊनिया अंतर्मुख । पूजाविस्तार काल्पनिक । करी सम्यक् उत्साह ॥८७॥
पुन्हा विसजीं जेव्हां ध्यान । तैं देवपरिवार उपकरण । त्या सर्वांची साठवण । उरे आपण एकला ॥८८॥
सम्यक् म्हणजे बरव्या परी । नितरां म्हणजे विशेषाकारी । धीयते म्हणजे तुजमाझारीं । सांठवण पैं याची ॥८९॥
एथ म्हणएसे तूं मुरारि । तुम्हीं ब्रह्मादि हरहरीं । सृष्टिस्थितिलयांची परी । निजाधिकारीं चाळिजे ॥४९०॥
ऐसें न म्हणावें जगत्पति । तुझिये मायेची ही व्याप्ति । प्रसवूनि गुणत्रयाच्या मूर्ति । नाना विभूती रूढविल्या ॥९१॥
मायाआवरण पडिलें चित्ता । ते सत्य मानिती अनेकता । तुझी अद्वैत एकात्मता । तयां भ्रांता उमजेना ॥९२॥
तुझेनि भजनें अभेदभक्त । पूर्णज्ञानी विपश्चित । मायामोहें नव्हती भ्रांत । मायातीत तव प्रेमें ॥९३॥
शुक म्हणे गा परीक्षिति । भजनेंचि मायेची निवृत्ति । व्यासें कथिली महाभारतीं । तें तूं सुमति परियेसीं ॥९४॥
‘ मामेव ये प्रपद्यंते । मायामेतां तरंति ते ’ । ऐसेंचि अर्जुना भगवद्गीते । श्रीअनंतें बोधिलें ॥४९५॥
देव म्हणती जी गोपाळा । म्हणसी देवकीचिया मज बाळा । कां पां स्तवितां वेळोवेळां । तरी घननीळा हें न म्हणा ॥९६॥
N/A
References : N/A
Last Updated : April 25, 2017
TOP