अध्याय १६ वा - आरंभ

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीकृष्णपरमात्मने नमः ।
गोविंद सद्गुरु सुखनिधाना । तव पदभजनें सुखें नाना । लाहोनि वरिती नाना स्थाना । त्या संपूर्णा तुज नमो ॥१॥
गोशब्दें बोलिजे मही । तवास्तिक्य तीच्या ठायीं । म्हणोनि आधार विश्वाधेयीं । झाली पाहीं पटुतर ॥२॥
“ गामाविश्य च भूतानि । धरितो स्वतेजें करूनी ” । ऐसें अर्जुनालागोनी । तूं निजवचनीं बोधिसी ॥३॥
“ पुण्यो गंधः पृथिव्यां च ” । ऐसें तुझेनि वदनें वाच्य । तेव्हां जगदाधार तूं हें साच । येर नटनाच आधेय ॥४॥
येर्‍हवीं पांसूची ढेपुळी । केंवि राहे अंतराळीं । गोलाध्यायीं हें प्रांजळी । दैवशाली जाणिती ॥५॥
जगदाधारत्वें संप्राप्त । म्हणोनि भूभर्ता गोविंद सत्य । जगद्रूप हा विवर्त । करीं भ्रांत नसतांही ॥६॥
विवर्ताचा करूनि बोध । सन्मात्र बोधिसी एवंविध । यालागीं सद्गुरु स्वतःसिद्ध । म्हणती प्रबुद्ध श्रुतिशास्त्रें ॥७॥
जें कां सच्चित्सुख केवळ । अक्षय तत्प्राप्तीचें स्थळ । तें स्वामीचें चरणकमळ । भजनशीळ सेविती ॥८॥
देहाध्यासें विषयाभास । भ्रमवी जीवचैतन्यास । ते ते ठायीं तुझे दास । सुख निर्दोष भोगिती ॥९॥
मरुदेशीं ग्रीष्मकाळ । तृषे जाकळी प्राणी सकळ । तेथ चातकां सुख सकळ । स्वेच्छा शीतळ जलपानें ॥१०॥
फळाभिलाषें मीमांसकें । इहामुष्मिकें विषयसुखें । कल्पनिकें पृथक् पृथकें । ती आसिकीं तव चरणीं ॥११॥
तुझेनि पादाब्जसेवनें । चित्सुख भोगिजे भोक्तेपणें । इये त्रिपुटीचेनि मरणें । सुखचि होणें तव कृपा ॥१२॥
मानसपूजेचा सोहळा । दिव्योपचार देखिले डोळां । तरी द्वैताच्या विटाळा । पासूनि वेगळा स्वलाभें ॥१३॥
तैसें भज्य भजता आणि भजन । केलें स्वामीनें अभिन्न । तथापि चरणीं पडकलें मन । तें येऊ मुरडून द्वैतासी ॥१४॥
श्रीपादकमलाच्या न्याहाळीं । लाभे सुखाची नव्हाळी । तेथ कैवल्यप्राप्ति न तुळे सगळी । मा कैंचीं आगळीं येर सुखें ॥१५॥
साधक दृश्यावरूनि दृष्टि । काढूनि मुरडिती उफराटी । त्रिकूटीं श्रीहठीं गोल्हांटीं । औटपीठीं थांबविती ॥१६॥
ते मज वाटती करंटवाणें । जेंवि खद्योतें स्वपुच्छगुणें । सूर्यप्रभे अंतरणें । तेंवि नाडणें पदसेवे - ॥१७॥
अनेक प्रतिमा व्रतें हवनें । मुद्रा लक्ष्यें विविधें ध्यानें । स्तनभावना चर्म चोखणें । सद्गुरुभजनें विण तैशीं ॥१८॥
सगस्रदळादि सर्वांदेहीं । गुरुकृपेविण असोनि नाहीं । दास्य सोडूनि तें साधिलें जिहीं । ते नरदेहीं वंचले ॥१९॥
यालागीं श्रीपादभजनप्रेमा । कृपावरें वोपिजे आम्हां । यदर्थ मम मना सकामा । कल्पद्रुमा गुरुवर्या ॥२०॥
ऐसें ऐकोनि आर्तवचन । सद्गुरु म्हणती सावधान । सगुण निर्गुण उभय भजन । हें अवतरणें प्रेमाचें ॥२१॥
उद्यममिसें धनें धन । जेंवि पावे अभिवर्धन । तेंवि तुझें सप्रेम स्तवन । वरद होऊनि तोषवी ॥२२॥
दशमस्कंधींचा सोळावा । अध्याय भाषा वाखाणावा । आज्ञापालन हेचि सेवा । ठाव नेदावा अहंते ॥२३॥
योगयुक्तीमाजि जें सार । तें हें स्वामीचें वरदोत्तर । चंद्रामृतें तोषे चकोर । आज्ञाधर तन्न्यायें ॥२४॥
पंचदशीं धेनुक-हनन । करूनि सुसेव्य तालवन । विषोदकें गोगोपगण । मरतां श्रीकृष्णें जीवविले ॥२५॥
षोडशाध्यायीं कालियदमन । तत्पत्नींचें ऐकोनि स्तवन । कालियाचे रक्षिले प्राण । अनुग्रहून श्रीकृष्णें ॥२६॥
योगपति कौरवपति । जे कां श्रीशुक परीक्षिति । श्रोते वक्ते विशालमति । ते आजि पंक्तीं श्रोतयां ॥२७॥
जैसा गौतमीचा ओघ । गंगाद्वारीं गौतमायोग्य । तेणेंचि पाडें पातकभंग । करी अव्यंग सेवितां ॥२८॥
तैशीच हेही श्रीकृष्णकथा । भावें एके सभाग्य श्रोता । परीक्षितीसमान तो परमार्था । पावे अनर्था खंडूनी ॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP