अध्याय १६ वा - श्लोक ८ ते १०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
तस्मिन् ह्रदे विहरतो भुजदंडधूर्णवार्घोषमंगवरवारणविक्रमस्य ।
आश्रुत्य तत्स्वसदनाभिभवं निरीक्ष्य चक्षुःश्रवाः समसरत्तदमृष्यमाणः ॥८॥
जैसा क्षीराब्धीच्या मथनीं । मंदराचळाचे संघर्षणीं । ऐरावत डहुळी पाणी । चक्रपाणि तेवीं ह्रदीं ॥४॥
वरवारणविक्रम हरि । तया महाह्रदामाझारीं । स्वेच्छें विचरे बाहुप्रहारीं । क्षोभवी वारि प्रतापें ॥१०५॥
प्रचंड बाहूचीं ताडणें । जळ आंदोळे ह्रदींच तेणें । शंखमथनीं वेदोद्धरणें । सिंधु डहुळणें ज्यापरी ॥६॥
दधि शोधूनि भरिलें भांड । मथनीं कालवे भाण्डीं मंड । तेवीं बाहुताडनें प्रचंड । ह्रद उदंड डहुळला ॥७॥
कुक्षीं खबाडीं सखोल चोढें । तेथ आदळती प्रचंड । जेंवि मेरूचे खचती कडे । तेणें पाडें जळ आदळे ॥८॥
तळील रेंदा बहु जुनाट । डहुळोनि डोहीं झाला बरट । हेलावतां जळाचे लोट । ह्रदाचे कांठ ढांसळले ॥९॥
तेणें पाणी झालें समळ । माजीं सर्पांचें दुःसह गरळ । गगनगर्भीं उठती ज्वाळ । ग्रहमंडळपर्यंत ॥११०॥
काळे निळे हिरवे पिंवळे । ज्वाळा भासती नभपोकले । चंद्रमंदळ जाहलें काळें । संतापलें रविवलय ॥११॥
ऐसा श्रीकृष्ण महाबाहो । बाहुताडनें क्षोभवी डोहो । तेणें खवळला सर्पसमूह । आणि दुःसह कालिया ॥१२॥
बाहुताडनें प्रचंड ध्वनि । चक्षुःश्रवा ऐकोनि नयनीं । विघ्न उदेलें आपुले भुवनीं । ऐसें देखोनि क्षोभला ॥१३॥
तामसयोनि सर्पयाति । विषोल्बण सक्रोधवृत्ति । केवळ असहिष्णुतेची मूर्ति । दुर्लभ शांति जयातें ॥१४॥
दारुयंत्रीं अग्नि भेटे । भडका उठे कडकडाटें । परोत्कर्षासरिसा नेटें । तेंवि फुंपाटे स्वभावें ॥११५॥
कृष्णबाहूच्या प्रचंडप्रवाहें । जल ताडितां घोषगर्जरें । तें न साहोनिया सत्वरें । क्षोभें थोरें खवळला ॥१६॥
आपुला सांडुनिया ठाव । कृष्णावरी घातले एकव । जैशी विद्युल्लतेची धांव । सक्रोध जव त्याहूनी ॥१७॥
लवणार्णवाचें शोषण । करावया श्रीरामबाण । तैसा क्रोधें प्रज्वळोन । आला धांवोन कालिया ॥१८॥
ज्याचे वाफे ग्रहमंडळें । करपती ऐसे प्रदीप्त डोळे । फूत्काराच्या प्रळयानळें । गगनीं उसळें ह्रदवारि ॥१९॥
प्रावॄट्कुहूमाजि चपळा । दाऊनि लपवी दिग्मंडळा । निमेषोन्मेष तैसे डोळां । दावी काळा अहि डोहीं ॥१२०॥
विषकदर्में समळ जळ । विशेष प्रचंड काळा व्याळ । तथापि नेत्रांचे बंबाळ । प्रळयानळ उजळिती ॥२१॥
तं प्रेक्षणीयसुकुमारघनावदातं श्रीवत्सपीतवसनं स्मितसुंदरास्यम् ।
क्रीडंतमप्रतिभयं कमलोदरांघ्रिं संदश्य मर्मसु रुषा भुजया चछाद ॥९॥
ऐसा कालियाचा यांवा । येऊनि कवळी वासुदेवा । तये मूर्तीच्या अवयवां । कुरुपुंगवा परियेसीं ॥२२॥
कृष्ण प्रेक्षणीय म्हणाल कैसा । ज्याच्या दृष्टींत भरल्या ठसा । पुन्हा न देखे विश्वाभासा । पावे समरसा हरिरूपीं ॥२३॥
चक्षुहूनि मृदुलपणें । विश्वनयनीं ज्या नांदणें । परंतु कोणा खुपों नेणे । सुकुमारपणें श्रीकृष्ण ॥२४॥
व्योमगर्भींचें पोकळपण । त्यामाजीं नांदे जो कां सघन । तेणें रंगे जो चिद्घन । सुखनिधान सन्मूर्ति ॥१२५॥
ज्ञानशक्तीचें सोज्वळपण । तेंचि हृदयीं श्रीवत्सचिह्न । भूतदयेचें पीतवसन । शोभायमान सर्वत्र ॥२६॥
आनंदाचें अधिष्ठान । श्रीकृष्णाचें स्मितानन । सर्वात्मकत्वें निर्भय पूर्ण । ज्याचें क्रीडन अभेदें ॥२७॥
प्रेमळाचें हृदयकमळ । त्याच्या उदराहूनि कोमळ । श्रीकृष्णाचें चरणतळ । जेथ अळिउळ सनकादिक ॥२८॥
जेथींचा आमोद आस्वादितां । उडोनि जाती चारी अवस्था । पुन्हा भेद नुघवी माथा । एकात्मता सहजेंची ॥२९॥
ऐसा लावण्याचा राशि । पाहों आवडे डोळ्यांसी । मेघश्याम सुंदरवेशी । कोमलांगेंशीं सुकुमार ॥१३०॥
मेघश्याम राजीवनेत्र । वक्षीं श्रीवत्सचिह्न पवित्र । कांसे मिरवे पीतांबर । स्मितसुंदर मुखकमळ ॥३१॥
आजानुबाहु मृदुल चरण । कमलगर्भींचें सकुमारपण । कृष्णचरणांतें देखोन । तेंही लाजोन राहिलें ॥३२॥
सुरवारण मंदाकिनी - । माजीं क्रीडे पंकजवनीं । डोहीं तैसा चक्रपाणि । निर्भयपणीं क्रीडतसे ॥३३॥
अप्रतिमल्ल श्रीकृष्ण एक । तो कोणाचा वाहेल धाक । ऐशियातें कृष्णपन्नक । वर्मीं सम्यक झोंबला ॥३४॥
कंठनाळीं हृदयकमळीं । अंगुष्ठसंधीं बाहुमूळीं । नाभिदेशीं पादयुगळीं । डंखी तत्काळीं सक्रोधें ॥१३५॥
क्षोभे ऐसा शतशा वक्त्रीं । कृष्ण डंखिला सर्व गात्रीं । मथनीं मंथा गुंडिती सूत्रीं । कृष्ण त्यापरी अहिभोगें ॥३६॥
भयांगुष्ठापासूनि कंठ - । पर्यंत गुंडिला कंबुकंठ । कालियशरीर तें कर्कोट । तेणें उद्भट कर्षिला ॥३७॥
तया अगाध ह्रदाकाशीं । विश्वाह्लादक कृष्णशशी । कालियराहु बळें ग्रासी । वदनकलेसि उरलासे ॥३८॥
तं नागभोगपरिवीतमदृष्टचेष्टमालोक्य तत्प्रियसखाः पशुपा भृशार्ताः ।
कृष्णेऽर्पितात्मसुहृदर्थकलत्रकामा दुःखानुशोकभयमूढधियो निपेतुः ॥१०॥
नागभोगें वेष्टिलें गात्र । निश्चेष्टित दिसे वक्त्र । विवर्ण न हालती नेत्र । देखोनि मित्र गजवजिले ॥३९॥
देखोनि कृष्णातें अचेष्ट । प्राणप्रिय जे पशुप इष्ट । त्यांसि झाले परम कष्ट । ते न स्पष्ट बोलवती ॥१४०॥
तो श्रीकृष्ण करूनि सखा । जे विटले विषयसुखा । कृष्णविरहें त्यांचिया दुःखा । आकल्प लेखा न करवे ॥४१॥
कृष्णीं होऊनि आत्मार्पण । सुहृद्भावें भजले कृष्ण । कृष्णा वेगळा अर्थ कोण । अणुप्रमाण नेणती ॥४२॥
कृष्णीं मिनले कलत्रभावें । जें कां आत्मनिवेदन नववें । पात्र झाले ते ये सेवे । काम आघवे हरिरूपीं ॥४३॥
पशु म्हणिजे इंद्रियगण । जे रक्षिती सांवरून । कृष्णविरहें ते पशुप जाण । विगतप्राण जाहले ॥४४॥
आत्महानि येसणें दुःख । तदनुलक्षें करोती शोक । पोटीं भयाचा भरला धाक । धाकें विवेक हारपला ॥१४५॥
अविवेकें ग्रासिली बुद्धि । नोहे आपुली आपणा शुद्धि । भुलोनि स्वविसरें उपाधि । गाढमूढ जाहले ॥४६॥
स्मृतिभ्रंशें गाढमूढ । अवघे होऊनि पडिले दगड । अग्नि कोळसोनि होय गूढ । तैसे रूढ शव जाले ॥४७॥
संवगड्यांची हे अवस्था । व्रजीं कथावी कोणें वार्ता । आतां गोधनाची कैशी कथा । ते नृपनाथा ॥४८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 01, 2017
TOP