अध्याय १६ वा - श्लोक २८ ते ३१
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
यद्यच्छिरो न नमतेंऽग शतैकशीर्ष्णस्तत्तन्ममर्द खरदंडधरोंऽध्रिपातैः ।
क्षीणायुषो भ्रमत उल्बणमास्यतोऽसङ्नस्तो वमन् परमकश्मलमाप नागः ॥२८॥
शतैक फणांचें जुंबाड । ऐसा कालिय मोठें धूड । हरिपदविन्यास पडतां दृढ । झालें अवघड त्यालगीं ॥४८॥
क्षीण झाली विक्रमशक्ति । प्राणप्रवाहीं विकळ गति । ऐसा क्षीणायु दुर्मति । पुढती पुढती उफाळे ॥४९॥
अद्यापिही सर्पजाति । मारूनि टाकिल्याही क्षितीं । वायु पिऊनि पुन्हां उठती । वैर चित्तीं स्मरोनी ॥३५०॥
यालागीं मारितां भुजंगम । मौळकुट्टन मुख्य वर्म । हें जाणोनि मेघश्याम । दावी संभ्रम नृत्याचा ॥५१॥
कालियफणांचें कुट्टन । संगीतसंमत नाट्यनतन । ऐसें अघटित ज्याचें घटन । यास्तव सुरगण ओळघती ॥५२॥
भक्त सद्भावें सेविती चरण । तेणें त्यांचें मदापहरन । विमुख दुर्मदें दुर्जन । ते श्रीचरण न भजती ॥५३॥
त्यांचे उद्धरणीं तत्पर । तो कृष्ण खळदंडधर । निजांघ्रिभजनीं करी तत्पर । पदव्यापारनर्तनें ॥५४॥
क्रोध दावूनि भीषण । इच्छूनि शिशूचें कल्याण । औषध देतां करी ताडन । तैसें कुट्टन फणांचें ॥३५५॥
सात्त्विक क्षमस्वी प्रेमळ । राजस विरहें ध्यानशील । तामस द्वेषें पोटीं कुटिळ । तारी गोपाळ विरोधें ॥५६॥
क्षीणायुषही झालिया सर्प । तरी न सांडी स्वजातिदर्प । एवढा मांडल्या प्राणकल्प । फणा अल्प न नमवी ॥५७॥
जो जो नम्र नव्हे माथा । त्यावरी नाचे मन्मथजनिता । पादप्रहाराच्या निघाता । वज्रपातासम ओपी ॥५८॥
नृत्यच्छळें भुलवी सुरां । पदीं लववी सर्पशिरां । तेव्हां सर्वांगीं भेदरा । झाला घाबरा फणिवर्य ॥५९॥
फणावरी पडतां पादप्रहार । कालिय वदनें वमी रुधिर । नाकीं सुटले रक्तपाझर । दुःख दुर्धर पावला ॥३६०॥
परम वैक्लव्य पावला नाग । अनावर क्रोधोमींचा वेग । तेणें पुन्हा उत्तमांग । उचली सवेग झोंबावया ॥६१॥
तस्याक्षिभिर्गरलमुद्वमतः शिरःसु यद्यत्समुन्नमति निश्वसतो रुषोच्चैः ।
नृत्यन्पदाऽनुनमयन् दमयांबभूव पुष्पैः प्रपूजित इवेह पुमान् पुराणः ॥२९॥
उच्छ्वासोनि रोषावेशें । नेत्रद्वारें वमित विषें । भग्नपराक्रमाचेनि शोषें । ज्वाला मुखें सांडित ॥६२॥
जीं जीं ऊर्ध्व उभारी मौळें । त्यांच्या ठायीं नर्तनच्छळें । पादप्रहाराच्या सुताळें । बळें गोपाळें नमविलीं ॥६३॥
निजकारणीं संघटे मीठ । तेव्हां काठिन्याचा धरी वीट । तैसा विश्वकारण वैकुंठ । करी सपाट फणिदर्प ॥६४॥
पदीं ठेंचूनि सर्पमुखें । स्वेच्छा नाचतां आदिपुरुषें । तेव्हां सुरगणीं संतोषें । अर्चाविशेषें पूजिला ॥३६५॥
यमुना पयोब्धिसमान । कालियमाथां श्रीभगवान । आदिपुरुष शेषासम । जाणोनि सुरगण तोषले ॥६६॥
आदिपुरुष शेषावरी । तैसा यशोदातनय हरि । देवीं जाणोनि निजकैवारी । सर्वोपचारीं पूजिला ॥६७॥
कीं गंधर्वादि निर्जरवरीं । पूजिला पुष्पादि दिव्योपचारीं । वृद्ध पुराण गोपनिकरीं । पुरुषापरी लक्षिला ॥६८॥
गर्गवाक्याच्या संस्मरणें । आदिपुरुष अंतःकरणें । देखोनि स्वानंदभरित करणें । पूजोपकरणें अर्चिला ॥६९॥
नाना वाद्यांचे करूनि गजर । पुष्पें वर्षती सुरवर । आपादमाळा दिव्योपहार । सुरीं श्रीधर अर्चिला ॥३७०॥
ऐसा अर्चिलियाचेच परी । प्रसन्न होत्साता श्रीहरि । सर्पदमनें सर्वां परी । होय हितकारी सर्वात्मा ॥७१॥
तच्चित्रतांडवविरुग्णफणातपत्रो रक्तं मुखैरुरु वमन्नृप भग्नगात्रः ।
स्मृत्वा चराचरगुरुं पुरुषं पुराणं नारायणं तमरणं मनसा जगाम ॥३०॥
थरक चाचरी भवरी तिरप । खांडव वोडव गिरडी झंप । विचित्र तांडवाचें रूप । मन्मथबाप दावितां ॥७२॥
तया चित्रतांडवेंकरून । फणातपत्रें झालीं विशीर्ण । मूर्च्छा पावे जैसें रुग्ण । तैसा क्षीण फणी झाला ॥७३॥
भग्न झालीं सकळ गात्रें । रुधिरें वमिती अवघीं वक्त्रें । विसंज्ञ पडतां सुकृततंत्रें । स्मरणसूत्रें योजिला ॥७४॥
योनिसंकटापासूनि सुटे । विसंज्ञ गाढ मूर्च्छा दाटे । सोऽहंस्मरण पूर्वील आटे । कोऽहं उमटे ज्यापरी ॥३७५॥
तैशी हरीच्या पादप्रहारीं । तमोयोनीची दुर्दर्प लहरि । भंगोनि पडिला विकलगात्रीं । मूर्च्छा शरीरीं प्राणांत ॥७६॥
मूर्च्छेमाजींही दैवागळा । म्हणोनि सुकृतें आलीं फळां । तेणें स्मरणाचा जिव्हाळा । उदया आला ते काळीं ॥७७॥
कीं हरीचा श्रीपादमहिमा । तेणें छेदून रजस्तमा । पात्र करूनि स्मरणधर्मा । पुरुषोत्तमा स्मरविलें ॥७८॥
जेथूनि जन्म स्थिरजंगमा । चराचरगुरु जो चिदात्मा । तो आठवला भुजंगमा । स्मरणधर्मामाजिवडा ॥७९॥
स्मरोनि आदिपुरुष पुराण । चराचरगुरु नारायण । कालिय जाता झाला शरण । मनेंकरून ते काळीं ॥३८०॥
नेत्रीं मूर्च्छेची झांपडी । अनुघडी मुद्रा पडिली तोंडीं । वळली देहाची मुरकुंडी । विसंज्ञ तांडीं करणांचीं ॥८१॥
लिंगदेहीं श्रीभगवान । स्मरोनि जाता झाला शरण । देखोनि येसणें निर्वाण । नागिणीगण घाबिरला ॥८२॥
कृष्णस्य गर्भजगतोऽतिभरावसन्नं पार्ष्णिप्रहारपरिरुग्ण फणातपत्रम् ।
दृष्ट्वाहिमाद्यमुपसेदुरमुष्य पत्न्य आर्ताः श्लथद्वसनभूषणकेशबंधाः ॥३१॥
ज्याचे उदरीं अवघें जग । त्याचे गरिष्ठ पार्ष्णिभाग । लागतां सर्पाचें उत्तमांग । झालें सर्वांग विशीर्ण ॥८३॥
आतपत्रप्राय फणी । वरी नाचतां चक्रपाणि गुरुतर टांचांच्या कुट्टनीं । प्राणहानि ओढवली ॥८४॥
ऐशिया मूर्च्छिता सर्पातें । देखोनि त्याचिया पत्न्या तेथें । आश्रयिती श्रीकृष्णातें । आर्तचित्तें विह्वळा ॥३८५॥
देखोनि पतीचें निर्वाण । मूर्च्छातग विकलप्राण । तेणें झाला कंपायमान । गेली उतरोन तनुपुष्टि ॥८६॥
वस्त्रें भूषणें झालीं शिथिल । गळालें आंगींचें धैर्यबळ । पुष्पग्रथित होतें मौळ । तेंही केवळ विखुरलें ॥८७॥
देखोनि पतीची निर्वाण व्यथा । ऐशिया उद्विग्न नागवनिता । आदिपुरुषा श्रीकृष्णनाथा । शरण जात्या जाहल्या ॥८८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 01, 2017
TOP