अध्याय १६ वा - श्लोक २५ ते २७
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
तं जिह्वया द्विशिखया परिलेलिहानं द्वे सृक्किणी ह्यतिकरालविपाग्निदृष्टिम् ।
क्रीडन्नयुं परिससार यथा खगेंद्रो बभ्राम सोऽप्यवसरं प्रसमीक्षमाणः ॥२५॥
अतिकराल भयंकर । विषाग्नीचे प्रलयांगार । तैसे प्रज्वलित ज्याचे नेत्र । तो विखर धुधुवत् ॥४॥
लळलळा लाळी जिह्वा तिखा । एकएकीतें दोन शिखा । जैशा सरळ शस्त्रांच्या झाडिती शिखा । तैशा प्रतिमुखा माझारीं ॥३०५॥
कीं विद्युल्लता प्रलयघनीं । तैशिया जिह्वाद्वय सृक्किणी । आवाळीं चाटिती चपळपणीं । फूत्कारोनि सरोंख ॥६॥
त्या ऐशिया सर्पाप्रति । खगेंद्राचिये विक्रमगति । मूर्ध्नि वलघोनि श्रीपति । भ्रमराकृति क्रीडत ॥७॥
जये मूर्ध्नीसि हाणी चरण । तेथ शतशा धांवती वदनें । लघिमासिद्धिचपळपणें । करी नर्तनें श्रीकृष्ण ॥८॥
सर्प पाहे प्रतीकारसंधि । तंव तो श्रीकृष्ण विशाळबुद्धि । क्रीडा करी नर्तनविधि । जो कलानिधि जगदात्मा ॥९॥
श्रीकृष्ण काळियाचे मूर्ध्नि । चढोनि प्रवर्ते जंव नर्तनीं । तेव्हां जयशब्द त्रिभुवनीं । केला सुरगणीं आनंदें ॥३१०॥
शतशः मुखें डंखूं धांवे । गरला वमी सक्रोध हांवे । चपळांगेंशीं वेष्टूं पावे । परी नागवे श्रीचरण ॥११॥
एवं परिभ्रमहतौजसमुन्नतांसमानम्य तत्पृथुशिरः स्वधिरूढ आद्यः ।
तन्मूर्धरत्ननिकरस्पर्शातिताम्रपादांबुजोऽखिलकलादिगुरुर्ननर्त ॥२६॥
ऐशियापरी कालियमाथां । नृत्य करितां श्रीकृष्णनाथा । चमत्कारें परिभ्रमतां । परम व्यथा फणी पावे ॥१२॥
पदविन्यास तालबद्ध । तांडवमंडित श्रीमुकुंद । भ्रमरी देतां फणावृंद । दुःसह खेद पावला ॥१३॥
ऐसा कालिय हतौजस । जों जों उच्च उभारी अंश । तों तों वळघोनि आदिपुरुष । लववूनि त्रास पाववी ॥१४॥
विशाळ चंचळ फणापृष्ठ । लववी नाचोनि वैकुंठ । तेणें सर्पासि होती कष्ट । अतिगरिष्ठपदप्रहारें ॥३१५॥
त्रासें फणा लववी सर्प । अन्य उभारी जंव सदर्प । तेही वळघोनि कंदर्पबाप । दर्प अमूप लोपवी ॥१६॥
म्हणाल कालिय महाव्याळ । कृष्ण सहा वर्षांचें बाळ । त्याचेनि भारें लववी मौळ । हें प्रांजळ न बोधे ॥१७॥
वक्ता श्रीशुक याचिसाठीं । हेतु देऊनि सांगे गोठी । आद्य जो कां श्रीजगजेठी । सर्पा मुकुटीं वळघला ॥१८॥
ब्रह्मांडकोटि रोमविवरीं । अखिलैश्वर्यकलाधारी । आद्यपुरुष तो मुरारि । नाचे शिरीं सर्पाचे ॥१९॥
तेजःपुंज अमूल्यमणि - । मंडित कालियाचे फणी - । वरी नाचतां यदुकुलतरणि । जडला चरणीं मणिरंग ॥३२०॥
फणिमणींची अरुणप्रभा । चरणीं जडली पंकजनाभा । बालार्काच्या अंतरगार्भा । तुळितां शोभा ते न पवे ॥२१॥
म्हणाल फणिमणिंचा स्पर्शरंग । श्रीकृष्णचरणींचा सुरंग । अरूप अमल तो अव्यंग । हा चरित्रभाग भक्तांचा ॥२२॥
नामरूपक्रियागुण । भक्तीं लेवविले संपूर्ण । कालियमौळें रंगले चरण । हें कां गौण मानावें ॥२३॥
पूतनास्तनींएं गरल प्याला । काळकूटें त्या काळा झाला । कीं तृणावर्तें गगना नेला । तैंहूनि झाला घनतनु ॥२४॥
क्षुधित मातेच्या वत्सल्यप्रेमें । विह्वळ गोपींच्या सकामकामें । तैशीं रंगविलीं पादपद्में । भुजगोत्तमें निजमौळीं ॥३२५॥
तालबाध फणारंगीं । कैसा नाचे तो शार्ङ्गी । तरळ वदन गरलआगी । झगटे सर्वांगीं दुःसह ॥२६॥
तेणें झाली तनु सांवळी ।फणिमाणिक्यें पादतळीं । अरुणरंगी प्रभा झाली । भक्तीं धरिली जे हृदयीं ॥२७॥
पूर्वीं कमलाकुचकुंकुमें । मर्दितां रंगलीं पादपद्में । एथ कालियाच्या भक्तिप्रेमें । मौळरत्नीं रंगलीं ॥२८॥
म्हणाल फणीचा फणामेळ । क्रोधें विह्वळ अतिचंचळ । त्यावरी सहा वर्षांचा बाळ । केवी सुताल हरि नाचे ॥२९॥
तरी तो अखिलकलागुरु । ब्रह्मादिकां उपदेष्टारु । जेथूनि वक्तृत्वविचारु । भारतीचा प्रवर्ते ॥३३०॥
तयासि हें अवघड काय । फणिमणीवरी ठेऊनि पाय । करी नाचोनि आनंदमय । लोकत्रय निजसत्ता ॥३१॥
श्रीप्रभूच्या इच्छामात्रें । तया नृत्याचीं सर्व तंत्रें । वीणामुरजादि विचित्रें । जाले स्वतंत्रें तें ऐका ॥३२॥
तं नर्तुमुद्यतमवेक्ष्य तदा तदीयगंधर्वसिद्धसुरचारणदेववध्वः ।
प्रीत्या मृदंगपणवानकवाद्यगीतपुष्पोपहारनुतिभिः सहसोपसेदुः ॥२७॥
नृत्याकारणें श्रीकृष्णातें । देखोनि उद्योगवंत तेथें । त्याचे किंकर वोळगते । आले तेथें तें ऐका ॥३३॥
जाणोनि रायाचें चेष्टित । घेऊनि उपकरणें तदुचित । उपचारसामग्री समवेत । येती धांवत अनुयायी ॥३४॥
तैसें जाणोनि हरिचें नटन । हरीचे जे किंकरगण । गंधर्वादि सिद्धचारण । आले धांवोन सवेग ॥३३५॥
सुरनरकिन्नरपन्नग । वसुसाध्यादित्यप्रमुख । लोकपाळांचें अष्टक । एकेंएक पातले ॥३६॥
देवांगना लास्यकुशला । सप्तस्वरीं रागमाला । गीत संगीतनाट्यकला । धरिती ताला सांवरूनि ॥३७॥
कृष्णप्रेमें आकर्षिलीं । आत्मप्रियत्वें सप्रेमभुली । कृष्णमोहरीं मोहरलीं । नाचों लागलीं तच्छंदें ॥३८॥
मृदंग होऊनि पुरंदर । स्वयेंचि होय वादनपर । तालबद्ध घनगंभीर सप्तस्वर वाजवी ॥३९॥
वल्लकी होऊनि मृडानी । वाजवी स्वयें मधुरध्वनीं । अलौकि कृष्णनर्तनीं । तालाभ्यसनीं प्रवर्ते ॥३४०॥
डमरुढांकारे डमरेश्वर । लोकपाल सुतालधर । सामसवनें ब्रह्मकुमार । तारमंद्र विवळिती ॥४१॥
षड्ज ऋषभ गांधार । मध्यम पंचम धैवत स्वर । निषादादिसारिगमपर । देवकिन्नर आळविती ॥४२॥
पनव आनक कांसोळ घन । इत्यादि वाद्यें वाद्यप्रवीण । मूर्च्छनाकुशल सुपर्वाण । संगीतज्ञ हरिरंगीं ॥४३॥
नंदनोद्भवें प्रसूनें भलीं । कुसुमाकरें संसारिलीं । अमरीं सप्रेम आणिलीं । कृष्णपाउलीं अर्पावया ॥४४॥
आपादमाळा सुमनहार । सुगंध द्रव्यांचे प्रकार । अमृतोमय फलोपाहर । पूजोपचार स्तुति नुति ॥३४५॥
युक्त इत्यादि उपचारीं । सिद्धचारणगंधर्वसुरीं । येऊनि सेविला श्रीहरी । नाचतां शिरीं सर्पाचे ॥४६॥
जे कां अपूर्व नृत्यरीति । तेणें मिषें दुर्मदशांति । सर्प पावला उपहति । ते तूं नृपति अवधारीं ॥४७॥
N/A
References : N/A
Last Updated : May 01, 2017
TOP