अध्याय १६ वा - श्लोक ५ ते ७

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


विप्रुष्मता विषोदार्मिमारुतेनाभिमर्शिताः । म्रियंते तीरगा यस्य प्राणिनः स्थिरजंगमाः ॥५॥

विषोदकाचे तरंग । स्पर्शोनि पसरे मारुतवेग । त्याच्या स्पर्शें भवंते दांग । पावे भंग आहळोनी ॥६३॥
वृक्ष वल्ली लता गुल्म । जंतु श्वापदें विविधनाम । पवनस्पर्शें होती भस्म । मही निर्लोम या हेतु ॥६४॥
यमुने न वाहे कां कालिया । निरूपिलें या अभिप्राया । विष न जाळी तीरवासियां । हेंही राया निवेदिलें ॥६५॥
ह्रदासभोंवते जीव । स्थावर जंगम जंतु सर्व । जळोनि पडती हें अपूर्व । विषवैभव तुज कथिलें ॥६६॥
त्यातें कैसा निग्रह कृष्ण । ऐसा केला जो त्वां प्रश्न । तेंचि आतां निरूपण । सावधान परियेसीं ॥६७॥

तं चंडवेगविषवीर्यमवेक्ष्य तेन दुष्टां नदीं च खलसंयमनावतारः ।
कृष्णः कदंबमधिरुह्य ततोऽतितुंगमास्फोट्य गाढरसनो न्यपतद्विषोदे ॥६॥

गाई वत्सें आणि गोप । पिऊनि ह्रदींचें सविष आप । प्रेतें पडलीं त्यां सकृप । पूतनागरप वांचवी ॥६८॥
सामान्य सर्प झोंबे चरणीं । दों चौं घटिका व्यापी मूर्ध्निं । तैसा नोहे कालियफणी । धांवे गगनीं विषवेग ॥६९॥
चंडकिरण रवीचें नांव । चंडधन्वा श्रीराघव । चंडविषवेग हा काद्रव । वीर्यगौरव हें ज्याचें ॥७०॥
चंडवेग जो विषाचा । तोचि वीर्यप्रताप ज्याचा । तेणें सदोष कालिंदीचा । प्रवाह कृष्णें देखिला ॥७१॥
खळांचा करावया निग्रह । ज्याचा एथ प्रादुर्भाव । तो मी कृष्ण यदूद्वह । निःसंदेह अवतरलों ॥७२॥
कालियाचें निग्रहण । त्यासि ओपूनि अभयदान । रमणकद्वीपा प्रति गमन । यमुनाजीवन सुसेव्य ॥७३॥
इतुकीं कार्यें वक्ष्यमाण । लक्षूनियां श्रीभगवान । चंडावेश अवलंबून । वेंघे आपण कदंबीं ॥७४॥
परम उच्च कदंबावरी । स्वयें वेंघोनि श्रीमुरारि । कटिमेखळा दृढ सांवरी । पीतांबरीं गोऊनी ॥७५॥
डावा बाहु उजव्या करें । ठोकूनि गर्जना केली निकरें । विषोदकीं आवेशें थोरें । उडी सत्वर टाकिली ॥७६॥

सर्पह्रदः पुरुषसारनिपातवेगसंक्षोभितोरगविषोच्छ्वसितांबुराशिः ।
पर्यक्प्लुतो विषकषायबिभीषणोर्मिर्धावन्धनुःशतमनंतबलस्य किं तत् ॥७॥

अनंत ब्रह्मांडें रोमविवरीं । ज्याचे तो हा श्रीमुरारि । अखिलगरिष्ठतेची सामग्री । गोपशरीरीं जयाचे ॥७७॥
तो पुरुषसारात्मा श्रीकृष्ण । सर्पह्रदीं पडतां जाण । निपातवेगें आंदोळण । झालें संपूर्णह्रदाचें ॥७८॥
डोहीं पडतां पुरुषश्रेष्ठ । शब्द उठिला कडकडाट । प्रलयमेघाचा बोभाट । तैसा अचाट भीकर ॥७९॥
तेणें दणाणिलीं पर्वतशिखरें । दर्‍या दरकुटें गिरिकंदरें । वनें अटव्यें कांतारें । भूचरें खेचरें बुझालीं ॥८०॥
गाधोदकीं पाषाण पडे । तेणें तें डहुळे चहूकडे । कालियह्रद तेणेंचि पाडें । दुर्जरक्ष्वेडें कालवला ॥८१॥
अगाध ह्रदींचें सगर वारि । माजी पडतां कैटभारि । कढों लागलें तैला परी । तळींचें वरी कालवलें ॥८२॥
असंख्य सर्प होते जळीं । विषउल्बण जे महाबळी । ते क्षोभले तये काळीं । विषकल्लोळ वर्षती ॥८३॥
उडी पडतां हेलावले । सर्प संक्षोभें उचंबळले । गरळ तापें उतों आले । जळ पसरलें सभोंवतें ॥८४॥
काळे निळे हिरवे पिवळे । विचित्र विषोर्मि उमाळे । भोंवते धांवती रानोमाळें । उचंबळे ह्रद तेव्हां ॥८५॥
शतधनुष्यें भवंतें वारि । तीरीं धांविलें पडतां हरि । नवल नव्हे कीं हें भारी । विश्वशरीरिपडिपाडें ॥८६॥
सुरनरांसि दुर्जर प्रबळ । परी श्रीकृष्ण तो अनंतबळ । तेथ कायसा कालिय खळ । केउतें गरळ त्यापुढें ॥८७॥
इतुकें करूनि निरूपण । श्रोतयांचें जाणोनि मन । सिंहावलोकनें शंकाहरण । करी सज्ञान शुकवक्ता ॥८८॥
ह्रदासभोंवतीं गरळें । स्थावरजंगमें जळालीं समूळें । कदंब केंवि ह्रदा जवळे । वांचला म्हणाल तरी ऐका ॥८९॥
महापुरीं लंघूनि पुलिन । ह्रदीं कालवे यमुनाजीवन । तैं गरळप्रवाहीं तीरींए जन । काय म्हणोन वांचती ॥९०॥
तरी सिंधुगर्भीं वडवानळ । विझवूं न शके समुद्रजळ । मारुति केवळ गोळांगुळ । परी त्या काळ नाकळी ॥९१॥
नळाहातेंचि तरल्या शिळा । ते काय वानरा आंगींची कळा । जें जें करणें विश्वपाळा । त्या त्या खेळा विस्तारी ॥९२॥
तैसा कालियमथनासाठीं । कृष्ण अवतरेल जगजेठी । यास्तव अमृतरूप यमुनेकांठीं । रची परमेष्ठी कदंब ॥९३॥
दुष्ट सर्पांच्या विषापहरणीं । जैसे निर्मिले अमोघ मणि । तमा नागवे जैसा तरणि । प्रकटे किरणीं तम नाशे ॥९४॥
ह्रदासमीप कदंब तैसा । असोनि नागवे कालियविषा । प्रवाहमिश्रित विषदोषा । पवनस्पर्शें निवारी ॥९५॥
तप्ततैलीं मलयागर । पडतां होय तें शीतलतर । तैसें प्रवाहमिश्रित गर । कदंबसमीरसंस्पर्शें ॥९६॥
तेणें यमुनातीरींचे जन । निर्भय विषबाधेपासून । कां भावी कृष्णस्पर्शन । हें दृढ चिंतन कदंबा ॥९७॥
कृष्णचिंतन जागे हृदयीं । तरी विषबाधा ते बाधील कायी । कालसर्पाची बाधा नाहीं । तेथ कालिय कायी सामान्य ॥९८॥
आणिक इतिहासपुराणीं । गरुडें अमृत स्वर्गींहूनी । आणितां बैसला कदंबमूर्ध्निं । तैं सुधा द्रवोनि वरि पडिली ॥९९॥
आणि गरुडाचें सन्निधान । तेणें धर्में भिजला पूर्ण । यालागीं विषाग्नीपासून । निर्भय जाण कदंब ॥१००॥
ऐशिया योगाची सामग्री । कदंबा आंगीं होती पुरी । त्यावरी कित्येक काळांतरीं । ह्रदाभीतरीं फणी आला ॥१॥
प्रवाह निर्विष कदंबवातें । निर्विष न करी कां ह्रदातें । तरी नित्य नूतन गरल तेथें । उत्पन्न होत म्हणूं नोहे ॥२॥
ऐसें शंकानिरसन केलें । पुढें व्याख्यान आदरिलें । कृष्णप्रतापें उचंबळलें । शतधनुष्यें जळ भंवतें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP