अध्याय १६ वा - श्लोक ६२ ते ६७
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
योऽस्मिन्स्नात्वा मदाक्रीडे देवादींस्तर्पयेज्जलैः । उपोप्य मां स्मरन्नर्च्चेत्सर्वपापैः प्रमुच्यते ॥६२॥
इये माझिये क्रीडास्थानीं । स्नान करूनि जो जो प्राणी । ये ह्रदींच्या जलेंकरूनी । पितरांलागूनि संतर्पी ॥६९५॥
देवऋषिमनुष्यगण । यथोक्त करूनि संतर्पण । तीर्थविधीसि उपोषण । माझें स्मरणपूर्वक ॥९६॥
विप्रार्चन सुरार्चन । सदर्चन मदर्चन । करितां कल्मषापासून । मुक्त होऊन उद्धरती ॥९७॥
ऐसा वर देऊनि हरि । पुन्हा सर्पाचें भय हरी । अभय देऊनि वरोत्तरीं । पुन्हा श्रीमुरारि गौरवी ॥९८॥
द्वीपं रमणकं हित्वा ह्रदमेतमुपाश्रितः । यद्भयात्स सुपर्णस्त्वां नाद्यान्मत्पादलांछितम् ॥६३॥
तूं आपुलें पूर्वस्थान । रमणकद्वीप सांडून । ज्याच्या भयें पलायन । केलें उद्विग्न होउनी ॥९९॥
निर्भय जाणोनि यमुनाह्रद । एथ वससी सांडूनि खेद । ज्याच्या भयें तो न करी द्वंद्व । तुजशीं विषद मद्वरें ॥७००॥
माझे चरणांचें लांछन । तुझे मस्तकीं देखोनि पूर्ण । गरुड न भक्षी तुम्हांसि जाण । हें वरदान पैं माझें ॥१॥
ध्वजवज्रादिलांछितपदें । तुझे मस्तकीं देखोनि विषदें । गरुड विसरोनि पूर्वद्वंद्वें । आप्तवादें तोषेल ॥२॥
ऐसें ऐकोनि प्रभूचें वचन । कालिय सहितपत्नीगण । गरुड निर्वैर जाणोन । सुखसंपन्न हृत्कमळीं ॥३॥
आपुलीं सांडूनि वृत्तिनिलयें । एथें क्रमितां नष्टचर्यें । आजि निःशल्य झालीं हृदयें । हें साधलें कार्य हरिकृपें ॥४॥
मत्पादलांछन देखोनि नेत्रीं । गरुड तुम्हांशीं करील मैत्री । ऐसें निघतां श्रीकृष्णवक्त्रीं । चक्षुःश्रोत्रीं ऐकिलें ॥७०५॥
दुःख हरोनि देइजे सुख । कीं विष वर्जूनि पाजिजे पीयूख । तैसा सर्पासि संतोख । श्रीहरिवाक्य परिसोनी ॥६॥
श्रीशुक उवाच - एवमुक्तो भगवता कृष्णेनाद्भुतकर्मणा । तं पूजयामास मुदा नागपत्न्यश्च सादरम् ॥६४॥
षड्गुणैश्वर्यपरिपूर्ण । यालागिं अद्भुतकर्मा कृष्ण । तेणें सर्प बोधितां जाण । सुखसंपन हृतकमळीं ॥७॥
तुटलें गरुडाचें अनादि वैर । लाधला श्रीकृष्ण अभयंकर । स्वपदलाभाचा जीर्णोद्धार । आनंदनिर्भर कालिया ॥८॥
तेणें आनंदें उचंबळोन । श्रीकृष्णाचें करी पूजन । अत्यादरें नागिणी पूर्ण । प्रेमें श्रीकृष्ण पूजिती ॥९॥
दिव्यांबरस्रड्मणिभिः परार्ध्यैरपि भूषणैः । दिव्यगंधानुलेपैश्च महत्योत्पलमालया ॥६५॥
दिव्यरूप धरूनि फणी । तैशाचि दिव्यरूपा पद्मिनी । यथोपचारीं चक्रपाणि । दिव्याभरणीं पूजिती ॥७१०॥
पूजापूर्वांग संपादून । दिव्यांबरें केलीं अर्पण । अमूल्य रत्नमणिसुवर्ण । देदीप्यमान निजतेजें ॥११॥
जया मणींच्या किरणांपुढें । दिसे चंडकिरण बापुडें । ऐसे रत्नमणींचे कोडें । हार निवाडें अर्पिले ॥१२॥
पदभूषणें कटिमेखळा । वरी फांकती रत्नकिळा । अमोघतेजाचा उमाळा । शिरीं सोज्वळा तो मुकुट ॥१३॥
दिव्य कुंडलें मकराकृति । कंठीं कौस्तुभ श्रीवत्सपंक्ति । अनर्घ्यरत्नें ओप देती । बाहीं मिरवती अंगदें ॥१४॥
कीर्तिमुखें वाहुवटीं । वीरकंकणें श्रीमणगटीं । दशांगुळीं मुद्रिकादाटी । क्षुद्रघंटिका कांचीतें ॥७१५॥
ऐशीं भूषणें अर्धातीत । तिहीं भूषिला श्रीभगवंत । दिव्यसुगंधें मघमघित । पन्नगनाथ समर्पी ॥१६॥
निढळीं रेखूनि त्रिपुंड्रटिळा । सुरंग अक्षतमाणिक्यकिळा । चंदन चर्चूनि सुपरिमळा । सुगंधरोळा उधळिला ॥१७॥
भोगिभुवनींचीं दिव्य सुमनें । कल्पतरु लाजती जेणें । तीं अर्पूनि कद्रुनंदनें । उत्पलमाला अर्पिली ॥१८॥
जये उत्पलमाळेतळीं । प्रियतम वनमाळा लोपली । वैजयंती लाजोनि ठेली । प्रेमबहळीं मघमघित ॥१९॥
महती म्हणिजे महत्त्वा योग्य । ब्रह्मादि लघुत्वें अयोग्य । तें अर्पूनियां श्रीरंग । पूजिला साङ्ग फणिनाथें ॥७२०॥
अपि या अव्ययाचा अर्थ । नैवेद्य फलताम्बूलसहित । सर्वोपचारी जगन्नाथ । सप्रेमभरित पूजिला ॥२१॥
पूजयित्वा जगन्नाथं प्रसाद्य गरुडध्वजम् । ततः प्रीतोऽभ्यनुज्ञातः परिक्रम्याभिवंद्य तम् ॥६६॥
पत्नींसहित कालियफणी । ऐसा पूजूनि चक्रपाणि । प्रदक्षिणाअभिवंदनीं । नम्र होऊनि तोषविला ॥२२॥
जो या अखिल जगाचा नाथ । गरुडध्वज श्रीसमर्थ । कालिय त्यातें होऊनि विनत । आज्ञा घेत प्रयाणीं ॥२३॥
देखोनि तयाचा शुद्ध भाव । संतोषोनि वैकुंठराव । आज्ञा देऊनियां स्वयमेव । पूर्वस्थाना पाठविला ॥२४॥
हरीची आज्ञा लाहोनि फणी । माथा ठेऊनि कृष्णचरणीं । कुटुंबेंशीं तत्क्षणीं । सव्य घेऊनि निघाला ॥७२५॥
सकलत्रसुहृत्पुत्रो द्वीपमब्धेर्जगाम ह । तदैव साऽमृतजला यमुना निर्विषाऽभवत् ।
अनुग्रहाद्भगवतःक्रीडामानुषरूपिणः ॥६७॥
मनुष्यदेहाची घेतली बुंथी । परी तो भगवान् विश्वपति । तदनुग्रहें निर्भय चित्तीं । द्वीपाप्रति चालिला ॥२६॥
पुत्र कलत्र सोयरे सकळ । निःशेष घेऊनि अवघें कुळ । यमुनाजलमार्गें तत्काळ । आनंदबहळ चालिला ॥२७॥
बळीच्या संग्रामीं निर्जरीं । सांडूनियां अमरपुरी । कालक्षेप गिरिकंदरीं । केला ज्यापरी संकटीं ॥२८॥
पुन्हा विष्णूच्या पक्षपातें । बळीशीं सख्य जोडूनि निरुतें । सिंधु मथूनि ऐश्वर्यातें । लाहोनि स्वर्गातें सेविलें ॥२९॥
तैसाचि गरुडभयें फणी । यमुनाह्रदीं होता लपोनी । कृष्णवरें आनंदोनी । पुढती सदनीं प्रवेशे ॥७३०॥
सिंधुगर्भीं द्वीप रमणक । त्यामाजि सकुटुंब पन्नक । झाला प्रवेशता निःशंक । लाहोनि पदांक कृष्णाचा ॥३१॥
गुह्य सांगे स्वजातीसी । पशु अथवा मनुष्यासीं । सहसा न डंखिजे कोणासी । कृष्णवरासि स्मरोनी ॥३२॥
मनुष्यां अथवा चतुष्पादां । तुमचें विष न चढे कदा । ऐशा श्रीकृष्णवरदा । सर्वीं सर्वदा जाणावें ॥३३॥
तैंहूनि विरोळियांच्या जाति । जळीं निर्विष न डंखिती । कृष्णवराची हे ख्याति । जगीं जाणती सर्वज्ञ ॥३४॥
कालिय रमणकद्वीपा गेला । यमुनाप्रवाह निर्विष झाला । अम्रुता ऐसा स्वाद आला । त्या उदकाला हरिवरें ॥७३५॥
कालिय जातांचि तत्काळ । यमुना झाली अमृतजळ । हरली विषाची हळहळ । वाहे निर्मळ सुसेव्य ॥३६॥
पशुपक्ष्यादि सर्व जाति । यमुना स्वइच्छा सेविती । ऐशी श्रीकृषाण्ची ख्याति । ऐके परीक्षिति शुकमुखें ॥३७॥
तें हें श्रीमद्भागवत । महापुराण श्रीव्यासोक्त । वैयासकि नृपा कथित । स्कंध त्यांत दशम हा ॥३८॥
त्याही माजि कालियामथन । हा अध्याय सोळावा ऐकोन । पुन्हा सप्तदशीं करील प्रश्न । तें सज्जन परिसोत ॥३९॥
द्वीप नामें जें रमणक । तें कां कालियपन्नक । टाकूनि लपला साशंक । यमुनाह्रदीं चिरकाळ ॥७४०॥
या प्रश्नाचें निरूपण । करील व्यासाचा नंदन । सप्तदशीं हें कथाश्रवण । सभाग्य श्रवण करीतील ॥४१॥
श्रीजनार्दनस्वाधिष्ठानीं । सत्ता सन्मात्र सिंहासनीं । एकनाथ अद्वयभुवनीं । पूर्णपणें म्राजिष्ट ॥४२॥
चिदानंदचरनसेवे । स्वानंदसाम्राज्यगौरवें । गोविंदनामस्मरणदैवें । वैष्णव आघवे सभाग्य ॥४३॥
त्यांचिया पादप्रक्षालनीं । दयार्णवाचें प्रज्ञापाणी । लागतां पदरजांच्या श्रेणि । सुकृतखाणी जोडल्या ॥४४॥
तया सुकृताचेनि बळें । वरदव्याख्यान भाषामेळें । श्रोतयांचीं हृदयकमळें । प्रेमकल्लोळें निववीत ॥७४५॥
भरला केवळ दयार्णव । तो हा ग्रंथ सद्गुरुराव । भवभ्रमाचीं बुडवूनि नाव । वाढे अथवा स्वानंदें ॥४६॥
निरपेक्ष विरक्त सद्गुरुभक्त । तो येथ रिघावया समर्थ । रिघोनि शेषशायी पर्यंत । त्यासि एकांत फावेल ॥४७॥
दयार्णवाची हे विनवणी । सद्भाव धरितां येथींच्या श्रवणि । स्वयें तुष्टोनि चक्रपाणि । योग्यता आणि न मागतां ॥४८॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरविरचितायां कालिय - निर्यापणं नाम षोडशोऽध्यायः ॥१६॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥६७॥ टीकाओवी ॥७४८॥ एवं संख्या ॥८१५॥ ( सोळावा अध्याय मिळून ओवीसंख्या ९८१७ )
सोळावा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : May 01, 2017
TOP