अध्याय ४१ वा - श्लोक १ ते ५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
स्तुवतस्तस्य भगवान्दर्शयित्वा जले वपुः । भूयः समाहरत्कृष्णो नटो नाट्यमिवात्मनः ॥१॥
शुक म्हणे गा कुरुभूवरा । इरालावण्यसशृंगारा । धर्मपौत्रा स्वधर्मचतुरा । हरिचरित्रा परियेसीं ॥१५॥
अखिलैश्वर्यसंपन्न । तो जगदात्मा श्रीभगवान । तेणें स्वरूप सगुण निर्गुण । जळीं संपूर्ण दावूनियां ॥१६॥
अक्रूर स्तवीत असतां पुढती । उपसंहरिलें निजात्मशक्ति । आपुली अवगणी करी परती । नट नाट्यान्तीं ज्यापरी ॥१७॥
सगुण निर्गुण कैसें काय । निखिलगुणात्मकविराटमय । सगुण श्रीकृष्ण रोहिणीतनय । मूर्तिद्वय मनोहर ॥१८॥
हें दावूनि लपविलें पुढती । बाणली अक्रूरा प्रतीति । तोही विस्मित होऊनि चित्तीं । पूर्वस्थिति अवलोकी ॥१९॥
सोऽपि चांतर्हितं वीक्ष्य जलादुन्मज्ज्य सत्त्वरः । कृत्वा चावश्यकं सर्वं विस्मितो रथमागमत् ॥२॥
निमज्जनींच हें अद्भुत । होऊनि लोपलें पैं समस्त । मग उन्मज्जूनि त्वरान्वित । मध्याह्नकृत्य संपविलें ॥२०॥
स्नान वसन तिलकधारण । संध्या अर्ध्य उपस्थान । जप तर्पण देवार्चन । माध्याह्नविधान संपविलें ॥२१॥
कर्मसमाप्तीपर्यंत । हृदयीं होत्साता विस्मित । तैसाचि रथापाशीं त्वरित । विस्मयभरित पातला ॥२२॥
नेत्र वक्त्र तनु इंगितें । त्याचीं लक्षूनि श्रीभगवंतें । काय पुसतां झाला त्यातें । तें रायातें शुक सांगे ॥२३॥
तमपृच्छद्धृषीकेशः किं ते दृष्टमिवाद्भुतम् । भूमौ वियति तोये वा तथा त्वां लक्षयामहे ॥३॥
अक्रूरातें करणपति । पुसता झाला भ्रूसंकेतीं । परम विस्मय तुझ्या चित्तीं । कोणे रीतीं दाटला ॥२४॥
पूर्ण विस्मयें भरला ऐसा । तुझा दिसतसे आकृतिठसा । जळीं स्थळीं कीं विहायसा । नवलाव कैसा तो सांगें ॥२५॥
हें ऐकोनि भगवद्वचन । अक्रूराचें हृष्ट मन । काय वदला तें सज्जन । सावधान परिसोत ॥२६॥
अक्रूर उवाच - अद्भुतानीह यावंति भूमौ वियति वा जले । त्वयि विश्वात्मके तानि किं मेऽदृष्टं विपश्यतः ॥४॥
अक्रूर म्हणे कमळापति । जितुकीं अद्भुतें येथ असती । गगनीं जीवनीं आणि क्षितीं । तितुकी वर्तती तुजमाजी ॥२७॥
विश्वात्मा तूं श्रीभगवंत । तुज मी पाहत असतां येथ । कोणतें न पाहिलें अद्भुत । एवं समस्त पाहिलीं म्यां ॥२८॥
जरी तूं म्हणसी श्रीअनंता । माझे प्राप्तीपूर्वीं तत्त्वता । तुज मी झालों उपलक्षिता । विस्मितवदनीं चमत्कृत ॥२९॥
यास्तव भूजलगगनामाजी । कांहीं आश्चर्य नेत्रकंजीं । देखिलें म्हणोनि सांग पां सहजीं । प्रश्न केला कौतुकें ॥३०॥
यत्राद्भुतानि सर्वाणि भूमौ वियति वा जले । तं त्वानुपश्यतो ब्रह्मन्किं मे दृष्टमिहाद्भुतम् ॥५॥
जरि तुझ्या ठायीं सर्वाद्भुतें । पाहत असतां मी त्या तूतें । निश्चळ स्थळजळाआंतौतें । अद्भुत मातें काय गमें ॥३१॥
परब्रह्म तूं परमेश्वर । तुजमाजी पाहतां चराचर । जळीं स्थळीं गगनीं अपर । विस्मयकर उरलेंसे ॥३२॥
अद्भुत देखिल्यापरी मातें । अवलोकिलें श्रीअनंतें । हेंचि परमाद्भुत येथें । याहूनि परतें नान्यत्र ॥३३॥
ऐसें म्हणोनि नमिलें चरणा । अक्रूर वळघला मग स्यंदना । वैयासकि कुरुभूषणा । सादर श्रवण करीं म्हणे ॥३४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 07, 2017
TOP