अध्याय ४१ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ऊचुः पौरा अहो गोप्यस्तपः किमचरन्महत् । या ह्येतावन्पश्यंति नरलोकमहोत्सवौ ॥३१॥

परस्परें नरनारी । बोलती मानूनि आश्चर्य भारी । केवढी गोपींची तपःसामग्री । कोणे विचारीं तर्केना ॥६७॥
महत् म्हणिजे परमश्रेष्ठ । कोण तप यांचे उत्कट । जया पुण्यें रामवैकुंठ । पाहती यथेष्ट अनुदिनीं ॥६८॥
प्रभाते कानना नेतां गायी । भोगिती लावण्यसुखनवायी । मध्याह्नें गोधनें आणितां साई । येती त्या ठायीं जलव्याजें ॥६९॥
सायंकाळीं परततां धेनु । रामकृष्ण वाहती वेणु । त्या नादाचें होतां श्रवण । येती धांवोन सामोर्‍या ॥२७०॥
नयनचकोरें परम तृषितें । प्राशिती वदनचंद्रामृतें । अनुदिनीं धनी फावली त्यांतें । महत्सुकृतें कोण तपें ॥७१॥
ज्याच्या दर्शनमात्रें अभिनव । नरलोकांसी महोत्सव । तें गोपीनयनीं फावलें दैव । जे रामकेशव लावण्य ॥७२॥
संपलें पुरवधूप्रकरण । पुढें जातां श्रीभगवान । केलें दुर्मदरजकहनन । तें व्याख्यान अवधारा ॥७३॥

रजकं कंचिदायांतं रंगकारं गदाग्रजः । दृष्ट्वायाचत वासांसि धौतान्यत्युत्तमानि च ॥३२॥

जो गदाचा अग्रज बन्धु । भगवान श्रीकृष्ण गोविंदु । तो रजकातें देखोनि शब्दु । करोनि विनोदु बोलिला ॥७४॥
मथुरापुरी महाथोर । रजकही बहुत तदनुसार । त्यां माजी कोणी एक क्षालनचतुर । रंगकार नृपदूत ॥२७५॥
क्षालनीं वसनें विगतरंग । तियें यथापूर्व रंगवी सांग । यास्तव रंगकार हें नामलिंग । येर्‍हवीं चांग रजकचि ॥७६॥
त्यातें म्हणे जगदीश्वर । अन्य वसनें प्राकृत नर । लेती त्यांहूनि उत्तमतर । अंबरें सुंदर दे आम्हां ॥७७॥
परम विशुद्ध प्रक्षाळिलीं । विविधा रंगीं रंगाथिलीं । आम्हां उभयतां शोभती भलीं । तीं देईं वहिलीं संतोषें ॥७८॥

देह्यावयोः समुचितान्यंग वासांसि चार्हतोः । भविष्यति परं श्रेयो दातुस्ते नात्र संशयः ॥३३॥

अंगशब्दें संबोधून । रजका म्हणे श्रीभगवान । गौरश्याम तनु जाणोन । उचित वसनें अर्पावीं ॥७९॥
आम्हां यथोचित वस्त्रें देसी । तरी परम श्रेय तुज दातयासी । होईल आणि निश्चयेंसीं । संशय मानसीं न धरावा ॥२८०॥
स्वातीचेनि विशुद्ध जळें । सिंधुशुक्तिके मुक्ताफळें । तो बिंधु तप्ततैलीं मिळे । तरी प्रज्वळे आश्रयभुक् ॥८१॥
किम्वा पयाज्य तनुपोषक । नवज्वरिता तेंचि विख । तेंवि मधुर भगवद्वाक्य । क्षोभवी रजक तें ऐका ॥८२॥

स याचितो भगवता परिपूर्णेन सर्वतः । साक्षेपं रुषितः प्राह भृत्यो राज्ञः सुदुर्मदः ॥३४॥

नीचा उच्चत्वें सम्मान । तोचि त्यातें क्षोभक पूर्ण । अजाकंठीं गजभूषण । घंटाबंधन गतिरोधी ॥८३॥
तैसा षड्गुणैश्वर्यसंपत्ति । सर्वस्त्र पूर्णता ज्यातें पुरती । तेणें वसनें याचितां प्रीती । रजक दुर्मति क्षोभला ॥८४॥
म्हणाल षड्गुणैश्वर्यसंपन्न । भूतभविष्यत्रिकालज्ञ । असतां कां नाहीं समजला कृष्ण । अंतःकरण रजकाचें ॥२८५॥
तरी तो सर्वज्ञ श्रीभगवंत । जाणोनि तयाचें दुष्ट चित्त । याञ्चाछळें निजकार्यार्थ । प्रकटी समर्थ तो ऐका ॥८६॥
शकुना लागीं शत्रु नगरीं । सुमनें वसनें बलात्कारीं । हरूनि करावी मारामारी । महाद्वारीं प्रतापें ॥८७॥
परिमळद्रव्यें गोरस गंधें । खाद्य शर्करा फळें विविधें । लुंठन करूनि खवळिजे क्रोधें । तैं शत्रु विरोधें समरा ये ॥८८॥
ऐसा नीतिशास्त्रींचा विध । दुश्चित न कीजे शत्रुवध । यालागीं स्वप्रताप प्रसिद्ध । दावी मुकुन्द रजकवधें ॥८९॥
कंस दैत्यांश केवळ । जरी तो झाला मथुरापाळ । तरी जाणे श्रीगोपाळ । मथुरा निर्मळ निजनगरी ॥२९०॥
कृष्ण सर्वांचा अंटरसाक्षी । रजक जाणोनि कंसपक्षी । याञ्चाछळें वसनापेक्षी । जाला निरपेक्षी परिपूर्ण ॥९१॥
संकल्पमात्रें सर्व संपत्ति । ज्यातें सर्वत्रसर्वदा पुरती । तोही रजकाची दुर्मति । जाणोनि प्रार्थी शकुनार्थ ॥९२॥
रजकें ऐकोनि हरीचा शब्द । स्निग्धद्रव्यें जातवेद । क्षोभे तैसा खळ दुर्मद । अति सक्रोध प्रज्वळिला ॥९३॥
वत्सनाभीसि अहिफेन । राजसेवेच्या स्नेहें करून । बाचटलिया गरळाहून । मारकपण स्वयें मिरवी ॥९४॥
तैसा साक्षेपें क्षोभला । कटु दुरुक्ति बोलता झाला । अमृतपानें राहु मेला । तेंवि रजकाला हरियाञ्चा ॥२९५॥

ईदृशान्यवे वासांसि नित्यं गिरिवनेचराः । परिधत्त किमुद्वृत्ता राजद्रव्याण्यभीप्स्सथ ॥३५॥

उद्वृत्त म्हणिजे उद्वृत्तवृत्त । चोरवाटपाडे उत्पथ । गिरिकाननीं राहतां नित्य । तें न चले येथ नृपनगरीं ॥९६॥
नित्य ऐसींच उत्तमवसनें । तुम्ही घेतसां पथभंजनें । येथ राजद्रव्यांचीं हरणें । तेणेंचि गुणें करूं इच्छा ॥९७॥
तोंडापुरता घेईजे ग्रास । शक्तिसारिखेचि हव्यास । दीप ग्रासितां पतंगास । जेंवि नाश तेंवि तुम्हां ॥९८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP