अध्याय ४१ वा - श्लोक ३६ ते ४०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
याताशु बालिशा मैवं प्रार्थ्यं यदि जिजीविषा । बध्नन्ति घ्नन्ति लुम्पन्ति दृप्तं राजकुलानि वै ॥३६॥
जरी वांचावयाची धराल इच्छा । तरी या गोष्टी न बोला कुत्सा । जीवें सोडिलें तुम्हां तुच्छां । पळा वसनेच्छा सांडूनी ॥९९॥
मूर्ख हो नेणां नृपशासना । ऐसी करूं नका प्रार्थना । शीघ्र करा रे पलायना । जरी निज प्राणां वांचवणें ॥३००॥
डोंगरीं वनीं पाहतां जैसे । येथ मोकळें नाहीं तैसें । तीव्र नृपाचें शासन असे । बोलतां कैसें उद्धत ॥१॥
राजवर्गी येचि क्षणीं । दृढ बांधिती करकरोनी । तादन करिती निष्ठुरपणीं । घेती लुंठुनि सर्वस्व ॥२॥
दस्यु म्हणोनि करिती वध । ऐसिया रजकोक्ति विरुद्ध । ऐकोनि कोपला मुकुंद । तत्कर्म विशद अवधारा ॥३॥
एवं विकत्थमानस्य कुपितो देवकीसुतः । रजकस्य कराग्रेण शिरः कायादपातयत् ॥३७॥
ऐसी आगळी वल्गना वाचे । करितां देवकीतनय त्याचे । नखाग्रें कृंतन मस्तकाचें । करितां झाला सकोप ॥४॥
लीलाकमळ खंडी बाळ । तयाचि परी श्रीगोपाळ । सकोप रजकाचें सिसाळ । खंडी तत्काळ कराग्रें ॥३०५॥
तस्यानुजीविनः सर्वे वासःकोशान्विसृज्य वै । दुद्रुवुः सर्वतो मार्गं वासांसि जगृहेऽच्युतः ॥३८॥
कायेपासूनि रजकशिर । हरितां रजकाचे किंकर । सर्व पळाले सत्वर । वस्त्रसंभार टाकूनी ॥६॥
राजसेव्यें धौतांबरें । रंगाथिलीं विचित्रें शुभ्रें । टाकोनि झडझडां पेटारे । रजककिंकरें पळालीं ॥७॥
पळतां न सांवरिती आंगें । न वचती एकमेकां मागें । प्राणशाकें अतिलगबगें । दिग्विभागें विखुरलीं ॥८॥
आम्ही अनाथें किंकरवृत्ति । वांचवी म्हणोनि वोसणती । एकें अडखळोनियां पडती । तोंडीं माती विमुखत्वें ॥९॥
आराधनीं कां विरोधनीं । धैर्य नाहीं ज्यां लागोनी । ऐसी तयांची भंगाणी । जाली म्हणोनि सुचविली ॥३१०॥
ज्याचें ऐश्वर्य अविच्युत । यालागीं नामें तो अच्युत । वसनसंभार अव्याहत । घेता झाला स्वइच्छा ॥११॥
वसित्वात्मप्रिये वस्त्रे कृष्णः संकर्षणस्तथा । शेषाण्यादत्त गोपेभ्यो विसृज्य भुवि कानिचित् ॥३९॥
आपुले कांतिप्रीत्यनुसार । दिव्यवस्त्रें उभय सोदर । देवकीतनय कृष्ण बलभद्र । लेते झाले यथेष्ट ॥१२॥
शेष गोपाळां वांटिलीं । उरलीं भूमीवरी विखुरलीं । राजवस्त्रांची लुटी केली । पुरप्रवेशीं शकुनार्थ ॥१३॥
पुरप्रवेशकाळीं प्रथम । बळिप्रदानीं रजकाधम । देऊनि कंसा पराक्रम । विदित केला परस्परें ॥१४॥
गगनवाणीचा विश्वास । मानूनि पितरां दिधला त्रास । उग्रसेनादि यादवांस । द्वेषिलें विशेष ज्यासाठीं ॥३१५॥
जयासाठीं बाळकहनना । प्रेरिली भूमंडळीं पूतना । अघबकादि तावक प्राणां । जयासाठीं मूकले ॥१६॥
नारदवचनें व्रजीं कळलें । अक्रूर धाडूनि आणविले । रामकृष्ण ते मथुरे आले । हें जाणविलें रजकवधें ॥१७॥
प्राचीन लोकवदंती ऐसी । रजकें दूषिलें श्रीरामासी । रामें निष्पापें जानकीसी । त्यजिलें वनासी अपवादें ॥१८॥
ये अवतारीं तैंचें उसणें । रजक मारूनि घेतलें कृष्णें । ऐसें कित्येक ध्वनितवचनें । कर्णोपकर्णें भ्रमविती ॥१९॥
मंथरा तेचि कुब्जा म्हणती । पूतना कैकेयी झाली होती । व्याधजन्मीं वाळीचें अन्तीं । उसिणें दिधलें श्रीकृष्णें ॥३२०॥
राम जन्मोनि कृष्ण झाला । त्यासही कर्मभोग लागला । ऐसा लौकिक जो गलबला । बालिशांला भ्रामक ॥२१॥
मुनीनें शापितां अंबरीष । आपण त्याचे गर्भवास । स्वयें सोसी श्रीपरेश । या वचनास ते आश्रयिती ॥२२॥
तरी मत्स्य अद्यापि सिंधुजळीं । कूर्म अद्यापि पृथ्वीतळीं । सिंह दैत्यवधें तत्काळीं । अंतराळीं तिरोहित ॥२३॥
वामन अद्यापि बळीचे द्वारीं । चिरंजीव परशुधारी । श्रीराम गेला सशरीरीं । अयोध्यानगरी घेऊनी ॥२४॥
यामाजी कोण केव्हां मेला । कोण्या कर्में तो बांधला । कोठें उसिणें देऊं आला । कैसा घडला कोण भोग ॥३२५॥
दैत्य स्वसुता शासन करी । निरपराध हरि त्या मारी । त्याचें उसिणें कैं नरहरि । कोणे अवतारीं फेडिलें ॥२६॥
म्हणाल शरणागतासाठीं । नृसिंहें फोडिली दैत्यघांटी । तरी वाळिवधाची विरुद्ध गोठी । कां वाक्पुटीं बोलावी ॥२७॥
अवताराचें जन्ममरण । न चुके ऐसें जरी प्रमाण । तरी दासाचें भवबंधन । काय म्हणोन परिहरे ॥२८॥
कल्पतरुचि दुकळें मरे । तेथ कल्पित्याची कें क्षुधा हरे । यालागीं ऐसी विरुद्धोत्तरें । ऐकोनि चौत्रें न भ्रमिजे ॥२९॥
वसुदेवदेवकीप्रति हरि । स्वमुखें म्हणे मी जन्मांतरीं । सुतपापृश्नीचिये उदरीं । प्रुश्निगर्भ जन्मलों ॥३३०॥
कश्यपअदितिपोटीं द्वितीय । तुमचे पोटीं जन्म तृतीय । एवं वरदोत्तीर्णसोय । जन्मत्रयें सुचविली ॥३१॥
परंतु कर्मफळ भोगावया । कीं मरूनि उसिणें फेडावया । जन्मणें नाहीं जगदात्मया । या निश्चया जाणावें ॥३२॥
देवकीउदरीं ज्या नवमास । घडला नाहींच गर्भवास । योनिसंकट कैचें त्यास । केंवि कर्मास तो भोगी ॥३३॥
म्हणाल प्राचीन कवींच्या उक्ति । ते रोचनार्था फळश्रुति । कर्म न सुटे देवांप्रति । मां जीवांप्रति केंवि सुटे ॥३४॥
ऐशा मीमांसाप्रतिपादका । पूर्वपक्षींच्या श्रुति अनेका । तदनुसार याही वाक्या । देखोनि शंका न धरावी ॥३३५॥
एवं करूनि रजकहनन । राजवस्त्रांचें लुंठन । पुढें कैसा चालिला कृष्ण । तें व्याख्यान अवधारा ॥३६॥
तततु वायकः प्रीतस्तयोर्वेषमकल्पयत् । विचित्रवर्णैश्चैलेयैराकल्पैरनुरूपतः ॥४०॥
शृंगाटकीं कैटभारि । हर्षें चालतां वयस्यभारीं । तंव कोणी एक वायक हरी । यथादरीं भजिन्नला ॥३७॥
वायक म्हणिजे सिंपीयाति । तेणें स्वकौशल्यें आपुल्या हातीं । रामकृष्णांच्या उभयमूर्ति । यथा निगुती अलंकारिल्या ॥३८॥
वस्त्रांचेचि अलंकार । करूनि शृंगारिले सुंदर । विविध रंगांचे प्रकार । मुकुटप्रवर आभरणें ॥३९॥
श्वेतश्याम अंगकांति । तयांसि अनुरूप जे शोभती । तैसे वेश तयांप्रति । वस्त्रसंपत्ती शोभविले ॥२४०॥
N/A
References : N/A
Last Updated : May 07, 2017
TOP