अध्याय ४१ वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


नानालक्षणवेषाभ्यां कृष्णरामौ विरेजतुः । स्वलंकृतौ बालगजौ पर्वणीव सितेतरौ ॥४१॥

आधींच त्रिजगाचें लावण्य । वरी नानालक्षणी अलंकरण । वेषें करूनि रामकृष्ण विराजमान देदीप्य ॥४१॥
ऐरावताचे सहोदर । शुक्ल कृष्ण बालकुंजर । पर्वोत्सवीं सालंकार । जेंवि श्रृंगार मिरवती ॥४२॥
तंतुवायकाचा भाव । देखोनि प्रसन्न वासुदेव । त्यातें ओपी वर अपूर्व । तें तूं स्वमेव अवधारीं ॥४३॥

तस्य प्रसन्नो भगवान्प्रादात्सारूप्यमात्मनः । श्रियं च परमां लोके बलैश्वर्यस्मृतींद्रियम् ॥४२॥

षड्गुणैश्वर्यसंपन्न । अचिंत्यलीला प्रकाशून । स्वस्वरूपमुक्ति पूर्ण । वायका लागोन वोपिली ॥४४॥
आणि इहलोकाच्या ठायीं । परमलक्ष्मी जे अक्षयी । बलप्रताप पुरता पाहीं । सर्वेंद्रियीं पटुतरता ॥३४५॥
आणि अजस्र निजात्मस्मरण । जेथ नुमटे विवर्तस्फुरण । इत्यादि वरें गौरवून । तेथून गमन आदरिलें ॥४६॥
पुढें मालाकारसदना । जाता झाला त्रैलोक्यराणा । शुक निरूपी कुरुभूषणा । त्या व्याख्याना अवधारा ॥४७॥

ततःस उदाम्नो भवनं मालाकारस्य जग्मतुः । तौ दृष्ट्वा स समुत्थाय ननाम शिरसा भुवि ॥४३॥

तंतुवायका देऊनि वर । सुदामा नामक मालाकार । त्याच्या भवना जगदीश्वर । जाते झाले बलकृष्ण ॥४८॥
तेणें अंतरें देखोनि हरि । उठोनि धाविन्नला सामोरीं । भावें साष्टांग नमस्कारी । श्रीपाद शिरीं स्पर्शोनी ॥४९॥

तयोरासनमानीय पाद्यं चाथार्हणादिभिः । पूजां सानुगयोश्चक्रे स्रक्ताम्बूलानुलेपनैः ॥४४॥

दिव्यासनें उभयांप्रति । अर्पूनियां पूर्णभक्ती । पाद्य अर्पी यथानिगुती । जेंवि सुरपति हरिहरां ॥३५०॥
देऊनि सर्वांसि रम्यासनें । आसनीं बैसविले सम्मानें । करूनि पादप्रक्षाळणें । अनुलेपनें चर्चिलीं ॥५१॥
केशरतिलक रेखिले भाळीं । अक्षता माणिक्य सुढाळ ढाळीं । मलयजचंदनउटी पातळी । त्यावरी उधळी सौरभ्य ॥५२॥
सुमनमाळा घालूनि कंठीं । दशांगधूप हव्यवाटीं । दिव्य एकारती गोमटी । धरूनि बोटीं उजळली ॥५३॥
पयाज्यशर्कराखाद्यखण्ड । आर्द्रनारिकेळोद्भव उदंड । पक्कखर्जूरी द्राक्षाघड । रसाळपाड कदळादि ॥५४॥
उत्तमत्रयोदशद्रव्यमेळ । अर्पण केले दिव्य तांबूळ । उपायनें यथानुकूळ । कर्पूरसोज्वळ नीराजन ॥३५५॥
पुष्पांजळि अर्पूनि शिरीं । सर्वां प्रदक्षिणा करी । वारंवार नमस्कारी । जोडले करीं प्रार्थितसे ॥५६॥

प्राह नः सार्थकं जन्म पावितं च कुलं प्रभो । पितृदेवर्षयो मह्यं तुष्टा ह्यागमनेन वाम् ॥४५॥

हर्षोत्कर्षें जयजय म्हणे । आजि सार्थक आमुचें जिणें । जन्म सफळ जाला जाणें । चरणागमनें स्वामीच्या ॥५७॥
भो भो समर्था गोपाळा । पवित्र केलें आमुच्या कुळा । आजि पितृगणांचा मेळा । भोगी सोहळा ब्रह्मपदीं ॥५८॥
देव पितर आणि ऋषि । तुमच्या आगमनें आम्हांसी । पूर्ण तुष्टले हृषीकेशी । प्रतीत ऐसी दृढ झाली ॥५९॥
काय्म्हणोनि म्हणसी जरी । तरी तूं परब्रह्म श्रीमुरारि । लीलागोपविग्रहधारी । तें अवधारीं कारण तूं ॥३६०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP