अध्याय ४१ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


सौवर्णश्रृंगाटकहर्म्यनिष्कुटैः श्रेणीसभाभिर्भवनैरुपस्कृताम् ।
वैदूर्यवज्रामलनीलविद्रुमैर्मुक्ताहरिद्भिर्वलभीषु वेदिषु ॥२१॥

सुवर्णचतुष्पथ चैत्यद्रुम । धनिकवेव्हारे सभाग्यपरम । त्यांच्या सदनश्रेणी रम्य । हेमहर्म्यमंडिता ॥१३०॥
सदनोसदनीं उचित आराम । फळपुष्पाढ्य शोभती द्रुम । विराव करिती विहंगम । हे शोभा उत्तम पुरगर्भीं ॥३१॥
सहस्रेंसहस्र एकैक जाती । वार्धुषांच्या दुकानपंक्ति । सभाशब्दें त्या बोलिजती । जडित शोभती हाटवटिया ॥३२॥
रत्नमणींचे बंबाळ । रात्रौ तेजःपुंज बहळ । वर्जिततैलवसनानळ । दिवट्या केवळ त्या गमती ॥३३॥
वणिक् वराटवसनक्रयी । हेमतारताम्रक्रयी । विविधधातुमुद्राक्रयी । पणनिष्कादि घडमोडी ॥३४॥
पत्रारूढधनप्रेक्षक । शुल्बकांस्यादिभाजनक्रयिक । स्वर्णस्तेयपांचाळप्रमुख । अनेक शिल्पिकसदनश्रेणी ॥१३५॥
धान्यविक्रयी अपार । शाकाफलौघपुष्पनिकर । नागवल्लीपर्णकार । तांबूलकार ज्या नाम ॥३६॥
महामौल्य शरचापकार । खङ्गादि अनेक शस्त्रकार । गजाश्वादि पल्याणकर । स्यंदनकर शिबिकादि ॥३७॥
तंतुवायक माल्यकार । परिमळद्रव्यक्रयी अपार । नानारंगीं रंगकार । बहु विकर हेमादि ॥३८॥
अनेक रत्नक्रयविक्रयी । घृतैलादिरसक्रयी । पयाज्यशर्कराविकारक्रयी । आणि समवायी औपकरणी ॥३९॥
कारुक भिषक कैवर्तक । और्णतार्णपटक्रयिक । इंधनतृणक्रयी चर्मक । आणि अल्पक कार्त्रिमी ॥१४०॥
ऐसिया वार्धुषसभाश्रेणी । हेमहर्म्या कलशाभरणी । निवेशनीं ससोपानीं । ध्वजातोरणीं विराजती ॥४१॥
तदनुकूल त्यांचीं भवनें । चतुःशालात्मकविस्तीर्णें । जडित रत्नें विचित्र किरणें । शुद्धकांचन लखलखिती ॥४२॥
पंचसप्तनवैकादश । त्रयोदश पंचदश सप्तदश । एवमादि ताळें तेतिस । उच्चता विशेष नभोगर्भीं ॥४३॥
कलशावरते वैडूर्यमणि । जेथ दुनवटिजे रविकरणीं । भासती जनपदांच्या नयनीं । अनेक तरणि प्रकाशले ॥४४॥
माजी मंदिरांची रचना । स्फटिकवेदिकातळवटीं जाणा । मरकत सूदलें स्तंभासना । कोरीव सुमना समसाम्य ॥१४५॥
इंद्रनीळाचे वरती स्तंभ । उथाळीं हिर्‍याचीं स्वयंभ । पीठप्रभा विद्युन्निभ । पुष्कराजांच्या फांकती ॥४६॥
खगेंद्ररत्नाचे तुळवट । गोमेदाचे कासवट । माणिकाचे पिधानपाट । कनकें निघोंट घोंटिले ॥४७॥
वलभीशब्दें ज्या मोहटिया । प्रवाळमुक्ताफळीं सजिलिया । तेथ वेदिका निर्मिलिया । तेथ पक्षियां सुखवसती ॥४८॥
उत्तरभागीं यमुनावनें । संतुष्ट शोभती द्विजवरभुवनें । पूर्वप्रदेशीं क्षत्रियसदनें । नृपोपकरणें मिरविती ॥४९॥
पश्चिमभागीं वैश्यवाट । वीथी चतुष्पथ निघोंट । राजमार्ग घडघडाट । ज्यांतें शृंगाट बोलिजे ॥१५०॥
शूद्रप्रमुख अवर जाती । दक्षिणभागीं त्यांची वसती । अनुलोमविलोम जे संतति । ते नांदती तदाश्रयें ॥५१॥
देवसदनासमीप देखा । पूजकमाल्यकगायकप्रमुखां । वसती अष्टविध सेवकां । अष्टभूमिप्रदेशीं ॥५२॥
दिवाकीर्ति कौळिक रजक । घडसी नटक मद्योत्पादक । किरात धीवर वागुरिक । याम्यें पृथक तल्पल्ली ॥५३॥
याहूनि दुरी दूरतर । म्लेच्छ चांडाळ डोंब डोहर । श्वपच पुल्कस हिंसक पामर । मळापहार परपल्लिका ॥५४॥
दो श्लोकीं हे नगररचना । निरोपूनियां योगिराणा । यावरी निरोपी सौभाग्यचिह्ना । नगराभरणा दो श्लोकीं ॥१५५॥

जेष्टेषु जालामुखरंध्रकुट्टीमेष्वाविष्टपारावतबर्हिनादिताम् ।
संसिक्तरथ्यापनमार्गचत्वरां प्रकीर्णमाल्यांकुरलाजतंडुलाम् ॥२२॥

गृहाग्रभागीं ज्या वलभिया । मदालसांवरी आच्छादिलिया । स्वर्णवेदी तेथ केलिया । मुक्ताप्रवाळीं मणिबद्धा ॥५६॥
चित्रांबरासारिखीं छिद्रें । पद्में स्वस्तिकें सर्वतोभद्रें । तियें गवाक्षें जालरंध्रें । सूक्ष्में सुन्दरें रत्नमयें ॥५७॥
आंतून पाहतां बाहरी दिसे । बाह्य जनातें आंत न दिसे । जालरंध्रें त्या म्हणिजेत असें । शोभा विशेष सदनाची ॥५८॥
तेथ पक्षी बसावया । रत्नकुट्टिमें निर्मिलीं राया । शुक सारिका रम्य चिडिया । शब्द करिती ते ठायीं ॥५९॥
मयूर पारावत चातक । हंस सारस चक्रवाक । चकोर खंजरीट लावक । पिक पंचमस्वर गाती ॥१६०॥
तेणें नादित मथुरापुरी । पाहता झाला कैटभारि । सालंकृता कवणे परी । तें अवधारीं कुरुभूपा ॥६१॥
वीथीशब्दें राजपथ । हाठवीथीसी पण्यसंकेत । चौकचौबारे चतुष्पथ । प्रांगणपंक्ती गृहश्रेणी ॥६२॥
देवालयादि रंगभूमि । नगरीमाजी सर्वसद्मीं । केशरचंदनमिश्रितकर्दमीं । संमार्जनें सर्वत्र ॥६३॥
सुगंधद्रव्योदकें प्रोक्षिलीं । मुक्ताफळांच्या रंगवल्ली । दिव्यसुमनें वरी विखुरलीं । तंडुललाज सुमंगळ ॥६४॥
गृहश्रेण्यादि प्रांगणवीथी । सालंकृता ऐसिया रीती । त्यावरी द्वारार्चनाची निगुती । ते शुकोक्ति श्रोतीं परिसावी ॥१६५॥

आपूर्णकुंभैर्दधिचंदनोक्षितैः प्रसोनदीपावलिभिः सपल्लवैः ।
सवृंदरंभाक्रमुकैः सकेतुभिः स्वलंकृतद्वारगृहां सपट्टिकैः ॥२३॥

उंबरवटाकोटिप्रदेशीं । करूनि भूवरी तंडुलराशि । शुद्धोदकें पूर्ण कलशीं । भरूनि त्यांवरी स्थापिती ॥६६॥
पटकुलपट्टिका कलशां गळां । वरी शोभती सुमनमाळा । तळीं पुश्पावळी वर्तुळा । च्म्दन प्रोक्षिला दधियुक्त ॥६७॥
आम्रपल्लव कलशां वदनीं । त्यांवरी हेमपात्रें स्थापूनी । दीपावळी अभ्यर्चूनी । देदीप्यमाना प्रज्वळिता ॥६८॥
कलशांनिकटी रंभास्तंभा । फळगुच्छेंसीं वरिष्ठ शोभा । कदळें क्रमुक तोरणप्रभा । आम्रपत्रें खाद्यादि ॥६९॥
क्रमुकस्तंभ उच्चतर । त्यांवरी पताका चित्रविचित्र । गगनीं तरळती भासुर । अमरनगरा लाजविती ॥१७०॥
ऐसीं समस्तां सदनद्वारीं । शोभा समसाम्य साजिरी । मंगळरूपा वृद्धाचारीं । शुकवैखरी ते वदली ॥७१॥
नगरगर्भीं पूर्वापार । ऐसी शोभा निरंतर । आला जाणोनि कमलावर । पुरी अपार हरिखेली ॥७२॥
पूर्वदेहींच पतिव्रता । प्रफुल्लितांगी आलिया भर्ता । तैसी मथुरा आनंदभरिता । अवलोकितां निजनाथें ॥७३॥
किंवा जैसी पूर्विलाहुनी । शोभा दुनवटे वसंतें वनीं । किंवा उदया येतां तरणि । जेंवि पद्मिनी प्रोल्लसिता ॥७४॥
ऐसी लावण्यलक्ष्मी पाहीं । प्रफुल्लित पुरीच्या ठायीं । पाहता झाला शेषशायी । ते हे नवायी मुनि वदला ॥१७५॥
समासें केलें पुरीवर्णन । येथून संपलें हें प्रकरण । यावरी कृष्णसंकर्षण - । प्रवेशकथन अवधारा ॥७६॥

तां संप्रविष्टौ वसुदेवनंदनौ वृतौ वयस्यैर्नरदेववर्त्मना ।
द्रष्टुं समीयुस्त्वरिताः पुरस्त्रियो हर्म्याणि चैवारुरुहुर्नृपोत्सुकाः ॥२४॥

उत्तरजठरार्णवसंभूता । हरिगुणश्रवणभूषणमुक्ता । ऐकें परीक्षिति जीवन्मुक्ता । सभाग्य श्रोता मीनलासी ॥७७॥
राया ऐसिये मथुरेप्रति । वयस्यवेष्टित रामश्रीपति । राजमार्गें प्रवेश करिती । तें ऐकोनि युवती मथुरेच्या ॥७८॥
त्यांतें देखावया कारणें । परम उत्सुका अंतःकरणें । सवेग आल्या उत्सुकचिह्नें । सकारणें अवधारा ॥७९॥
औत्सुक्यासी कारण काय । जे नारदवचनें कंसराय । रामकृष्ण वसुदेवतनय । जाणोनि उपाय तद्धननीं ॥१८०॥
अक्रूरासी अळोचून । येथ आणिले व्रजा धाडून । आतां वधील हे गुणगुण । पुरींचें जन गुजगुजती ॥८१॥
हें ऐकूनि नगरनारी । प्रवेशतां राममुरारी । लावण्य पाहों डोळेभरी । ऐशा अंतरीं उत्सुका ॥८२॥
कानीं पडतांचि हर्यागमन । वस्तुसामर्थ्यें वेधे मन । होवोनि ठेलें पैं उन्मन । प्रवृत्तिभान पारुषलें ॥८३॥
आले ऐकूनि राममुरारी । एकी चढलिया माडियांवरी । एकी वळघल्या गोपुरीं । प्रासादशिखरीं पैं एकी ॥८४॥
एकी भिंतीवरी ओळघल्या । एकी अटालियांवरी चढल्या । जालरंध्रीं पहात ठेल्या । एकी धांवल्या नृपमार्गें ॥१८५॥
राजमार्गाच्या प्रांगणीं । उच्चस्थानीं गृहांगणीं । स्त्रीपुरुषादि मुंडपघसणी । ज्ञाती कोणी न स्मरती ॥८६॥
औत्सुक्यविस्मृतिलक्षणें । श्लोकयुग्में बादरायणें । वाखाणीलीं तीं परिसूनि मनें । निर्भर होणें सज्जनीं ॥८७॥

काश्चिद्विपर्यग्धृतवस्त्रभूषणा विस्मृत्य चैकं युगलेष्वथापराः ।
कृतैकपत्रश्रवणैकनूपुरा नांक्त्वा द्वितीयं त्वपराश्च लोचनम् ॥२५॥

एकी नेसल्या विपरीत वसनें । केलीं उत्तरीयें परिधानें । नेसणीं करूनियां प्रावरणें । निःशंकमनें धाविन्नल्या ॥८८॥
पदर पांघुरते नेसल्या । नेसते पदर पांघुरल्या । प्रौढा परवंटे नेसोनि आल्या । निरिया खोंविल्या पाठीसीं ॥८९॥
एकी नेसल्या कंचुकिया । शिरीं घेती साडिया घडिया । आंगें धांवती उघडिया । झाल्या वेडिया हरिवेधें ॥१९०॥
विपरीत भूषणें लेइल्या एकी । कर्णभूषणें घातलीं नाकीं । नासिकाभरणें एकी मस्तकीं । लेत्या झाल्या लगबगां ॥९१॥
एकी मेखळा घालिती गळां । कटी वेष्टूनि कंठमाळा । गळा सांडूनि मोकळा । दंडीं बांधिल्या गळसर्‍या ॥९२॥
वाळे वांकी एके पायी । दुसरे चरणीं लेइल्या नाहीं । तैशाच धांवती लवलाहीं । न थरे देहीं देहस्मृति ॥९३॥
जडित चुडा एके हस्तीं । दुसरा बुचा कर न स्मरती । बाहुभूषणें एके हातीं । दुजे बांधिती पैं निढळीं ॥९४॥
पंखे बाळ्या एके कर्णीं । लेइल्या तांटडी करूनी । दुजा मोकळा न स्मरोनी । गजगामिनी धांवती ॥१९५॥
एके श्रवणीं तानवडा । दुसरा विसरल्या श्रवणमुडा । सर्‍या चितांक बाणले दंडा । कंठीं गोंडा वेणीचा ॥९६॥
काजळ सूदलें एका नयना । दुजा तैसाच विसरोनि सुणा । सवेग धांवती मृगलोचना । जना आपणा नोळखती ॥९७॥
व्याही जांवई मेहुणे । श्वशुर देवर भर्ता पिशुनें । नेणती विस्मृत वस्त्राभरणें । निःशंकमनें धांवती ॥९८॥
वसनाभरणें अस्ताव्यस्तें । तियें निरूपिलीं संकेतें । आतां करितां राहिलीं कृत्यें । तीं तूं समस्तें अवधारी ॥९९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP