वेदस्तुति - श्लोक १५
' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे.
बृहदुपलब्धमेतदवयत्यवशेषतया यत उदयास्तमयौ विकृतेर्मृदिवाऽविकृतात् ॥
अत ऋषयो दधुस्त्वयि मनोवचनाचरितं कथमयथा भवति भुवि दत्तपदानि नृणाम् ॥१५॥
॥टीका ॥ व्यतिरेकक्रमें कृतनिरास ॥
विवर्त निरसल्या नि:शेष ॥
वास्तव उरें जें अवशेष ॥
ह्मणिजे त्यास बृहद्ब्रह्म ॥११॥
तेणें अवशिष्यमाणपणें ॥
द्रुहिणा-ग्रिरविन्द्रादिकां कारणें ॥
निमेषोन्मेषीं होणे जाणें ॥
तें तव बृहत्व कोणें अवगमिजे ॥१२॥
ह्मण्सी बृहतापासून ॥
या सर्वांचे उदयास्तमान ॥
तस्मात् ब्रह्म उपादान ॥
सर्वांलागून झालें कीं ॥१३॥
मठघटशरावकुडायादिकां ॥
मृव्दिकारां हेतुमृत्तिका ॥
कीं हेमविकारां कुंडलां कटकां ॥
जेंवि कनका उपादानता ॥१४॥
तैसेंच ब्रह्म विकारवंत ॥
ऐसी शंका न कीजे येथ ॥
अविकृत ब्रह्म सदोदित ॥
विवर्तवत् विकारता ॥१५॥
सूर्य अविकार जैसा तैसा ॥
कारण विवर्ता विश्वाभासा ॥
तेंवि अविकृता तुज परेशा ॥
विवर्तरुपें विकारता ॥१६॥
अधिष्ठानत्वें तूं अविकारी ॥
विकार प्रकटिशी विवर्तापरी ॥
इव शब्दार्थे श्रुति निर्धारीं ॥
उपमे धरित्री उपमिली ॥१७॥
घटमठादिविकारां कृत्स्नां ॥
अधिष्ठानत्वें अविकृत मृत्स्ना ॥
घटमठांच्या उदयास्तमाना ॥
न हौनि प्रकटी विवर्तवत् ॥१८॥
वाचारंभणमात्र विकार ॥
मृत्तिका सत्यत्वें अविकार ॥
तेंवि बृहत्वें निर्विकार ॥
विश्वाकार विवर्तवत् ॥१९॥
अखिल ब्रह्मचि ऐशा श्रुति ॥
तुज एकातें प्रतिपादिती ॥
यास्तव तुझ्या ठायीं धरिती ॥
वाड्मनस प्रवृत्ति मुनिवर्य ॥२०॥
मज अद्वैतामीजी मुनी ॥
देखिलें कैं कोणी कोठुनु ॥
तरी ते मंत्रच ॠषीवरगणीं ॥
द्रष्टे ह्यणोनि जाणावें ॥२१॥
तिहीं वाड्मनसाचरित ॥
ठेविलें तव धामीं निश्चित ॥
तेंहि ऎकें इत्थंभूत ॥
वदती स्पष्टार्थ उभयांचा ॥२२॥
मनें करुनी आचरित ॥
तें तव धामचि निश्चित ॥
वचनाचरितें प्रबोधामॄत ॥
वदती संतत तव महिमा ॥२३॥
जैसें आत्यंतिक कॄपण ॥
जीवें प्राणेंसी धरी द्रविण ॥
तैसें तव धाम आणि तव गुण ॥
निर्धारुन दॄढ धरिती ॥२४॥
किंबहुना नामरुपात्मक विश्व ॥
त्यामाजी पॄथग्नामाकॄति सर्व ॥
तेथ धरिति तुझाचि भाव ॥
निरसोनि माव निजबोधें ॥२५॥
परि विश्वाभास पृथग्विकार ॥
सहसा न मनिती साचार ॥
बॄहद्ब्रह्य तूं विश्वाकार ॥
कॄतनिर्धार मोडतां ॥२६॥
येचि अर्थीं उदाहरण ॥
हेंचि श्रुति वदली जाण ॥
जे मनुष्यां भूचरां लागून ॥
भूमि सांडोन न बसवे ॥२७॥
मनुज बैसलाहि वॄक्षाग्रीं ।
तरी तो निश्चयें भूमीच वरी ॥
स्थळजळ यांनीं पुरगोपुरीं ॥
भूम्याधारी तथापि तो ॥२८॥
बहुतीं अंतराळीं ॥
त्रिमाळिकीं चतुरीं कुशळीं ॥
पदें ठेवितांही चिरकाळीं ॥
अचुक भूतळीं असेचि कीं ॥२९॥
भूम्याधारें भौतिकां असणें ॥
तेंवि ब्रह्यचि ब्रम्हेन्द्रपणें ॥
विश्वाकारें अविकार जाणे ॥
ऎसे बोलणें श्रुत्यर्थीं ॥३०॥
सर्व ब्रह्यचि ऎसें निगमीं ॥
तूतें देखिले मुनिसत्तमीं ॥
तयाची प्रवॄत्ति व्याख्यानधर्मीं ॥
वदोनि श्रुत्यर्थ दॄढावी ॥३१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2017
TOP