॥प्रकरण॥ १०१
एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.
॥श्रीरामसमर्थ॥
॥पद॥ (निर्गुणरुपी मी०॥) राममय मानस जालें । चिंतनीं चित्त निवालें ॥धृ०॥ हर अपरांपर त्याचे हि अंतर । ज्याचेनि नामें निवाले ॥१॥
निरंजनी मन पाहतां शोधुन । अद्वैतीं द्वैत बुडालें ॥२॥
रामदासीं ध्यान हें चि हें साधन । मीपण रामीं बुडालें ॥३॥
॥वोवी॥ सकळ साधनीं सार साधन । जेणें भवाचें होय निर्शन । जन्मसाफल्या हें चि कारण । जाणिजे ध्यान रामाचें ॥१॥
देखण्यावरी जडतां देखणें । न उरे चि तेथें देखणेंपण । सर्वा पाहत तें पाहतां पर्तोन । मीतूंपणविण राम चि ॥२॥
श्रीराममय चि भासे सर्व । तेणें मनाची खुंटे धांव । न दिसे चि विषयो कल्पनीक माव । वावरूं ठाव न उरे चि ॥३॥
ह्मणाल श्रोते हो मन हे दुर्घट । भलेभल्यांला छळितसे हटें । केवि मानस तें येकवट । होऊनि स्वरुपीं रमेल ॥४॥
अहो तांबडे कांडाचें नदिकुलतृण । करितां जोपातें मळ्यांत पेरुन । द्वादशाब्दवरी फळतां प्रयत्न । युक्ष होती रसभरित ॥५॥
डोरल्यास पेरुन देतां उदक । सप्त वरुषें राखण करितां निक । पालटोन होती चांग वृंताक । तैसे चि सेंदण्या मिष्ट होती ॥६॥
कां अंश तयाचे होय ह्मणोन । मूळरुप धरिती करितां प्रयत्न । मा अंश आत्म्याचा होय कीं मन । कां रमेना स्वरुपीं साध्य करितां ॥७॥
शाहाणपण सिकवितां मुलें रडती । ते चि प्रबुत्धीं सुखास वानिती । तारुण्यीं न विसंबे पुरुषा सती । तेवि वळतां मानस वस्तु चिंती ॥८॥
॥अभंग॥ काययेक काम न फळे साधनें । परी तो प्रयत्न नीट कीजे ॥१॥
संसार लटिका केवळ असार ॥ तो होतो साजिरा कष्टल्याने ॥२॥
साधितां सोमल वचनाभी जिरेल । सर्पाचे गरळ गोड वाटे ॥३॥
मा तो परमार्थ सदां मिष्ट आहे । मन वश्य होय लाभे ॥४॥
आत्मारामदेव भाळोन साधकां । आर्त पुरवी सखा होऊनीयां ॥५॥
॥वोवी॥ ऐसें जयाचें वळलें मन । धन्य तयाचें योग्य महिमान । मन चि उपासना सद्गतिकारणे । गुरुकृपें खूण बिंबल्यां ॥९॥
सोडवितां येक ते विषयवोढी । मग स्वरुपांवरी साधी उडी । न मायीक रसाची गोडी । सत्ता धरी कैसी ऐका ते ॥१०॥
॥श्लोक॥ मनन मन करीतें धारणा ही धरीतें । स्वहितगति वरीतें निर्गुणा वीवरीतें । भवजळ उतरीतें लीन ही होत जातें । अचपळ प्रणवाते उन्मनी मुक्तिदातें ॥१॥
॥वोवी॥ तें जैं विलोकी आपणा मन । न दिसे चि आपणु जाय विरोन । चित्त निवालें चिंतनेवीण । चिंतन होठेलें श्रीरामीं ॥११॥
येकजिनसी जिकडे तिकडे । जगदीश स्वयें भरोन वावडे । तेणें मनाचें मनपण उडे । ध्यानीं पवाडे ध्यान चि ॥१२॥
॥पद॥ (राग केदार, धाट-हरिविण) सकळघटीं जगदीश येकला ॥धृ०॥ शिव कळेना शक्ति कळेना । भक्ति कळेना विभक्ति कळेना ॥१॥
चालवितो तो दिसत नाहीं । तीक्ष्णबुद्धि विचारुनि पाहीं ॥२॥
दास ह्मणे तो चंचळ आहे । तेणे करुन निरंजन पाहें ॥३॥
॥वोवी॥ ध्यान हें घडतां अखंडित । निरंजनाचा पावे प्रांत । चंचळपणाचा नुरोन हेत । होय निवांत निजीं निज ॥१३॥
बुडालें द्वैताद्वैत अद्वैतीं । विश्रांतीं विश्रांत घे विश्रांति । ते रामनामध्यानें पार्वतीपति । निवोन अंतर सुखावला ॥१४॥
॥अभंग॥ धन्य हें रामाचें ध्यान सौख्यकारी । ठाव निर्विकारी मिळतसे ॥१॥
निवाला तो शंभु बहुतां हा लाभु । घडाया विलंबु नलगे चि ॥२॥
ध्यानाचें महिमान जाणती जो योगी । विकल्पाच्या धगीं न पडती ॥३॥
आत्माराम स्वयें ध्यानरुप आहे । हें जाणती सोय भक्तजन ॥४॥
॥अभंग॥ धन्य हें रामाचें ध्यान सौख्यकारी । ठाव निर्विकारी मिळतसे ॥१॥
निवाला तो शंभु बहुतां हा लाभु । घडाया विलंबु नलगे चि ॥२॥
ध्यानाचें महिमान जाणती जो योगी । विकल्पाच्या धगीं न पडती ॥३॥
आत्माराम स्वयें ध्यानरुप आहे । हें जाणती सोय भक्तजन ॥४॥
॥वोवी॥ दावीत यापरीं भाविका उपाव । वोपीत कृपेनें स्वानंदठाव । दास सर्वज्ञ महानुभाव । सज्जनगिरिवरी राहिले ॥१५॥
साधुजनाचा मिळाला स्तोम । साह्येसी पातले श्रीराम भीम । अपेक्षित भक्ताच पुरती काम । कल्पद्रुम प्रसन्नपण वाक्यें ॥१६॥
येक्या अवसरीं विप्र सोनाजी । संशयो धरिला मनामाजीं । कारण तयाचें संतसमाजीं । भिडोन बैसतो भल्यापरीं ॥१७॥
युक्तिप्रयुक्ति बोलका मोठा । चित्तीं आहे तो न दावी ताठा । सत्वांश बहु दावी रजाचा साठा । खेळे मन निंद्य शोधावया ॥१८॥
नेमनिष्ठा तो बहुत चि करी । पोथी पढतसे जपमाळ करीं । आपण चि कथितो कथनें बहुपरीं । अवघड प्रश्नातें सांचितु ॥१९॥
जंव पातला सज्जनगडावरी । देखोन बेजमी निकियापरी । संतोष तयाचे जाला अंतरी । येकदां असतां संतमेळीं ॥२०॥
बोलती संतांनीं संतोषयुक्त । श्रीराम आणि रामदासांत । भिन्न करणी ते नसे किंचित । रामराज्यसौख्य फांकले ॥२१॥
श्रीरामें नेली पुरी वैकुंठा । यांनी केलें हो ते बारा वाटा । जे असे स्थानमानरहित प्रतिष्ठा । ते पदप्राप्ति यांचेनि ॥२२॥
अनुमान वाटलें तैं तयाच्या जीवीं । भावितु कोठें पां रामराज्यपदवी । उगे चि वानिती महानुभावी । मान्यता पाऊं सभेंत ॥२३॥
परब्रह्म तो श्रीरामराणा । पुरविली सर्व हि मनकामना । नृपाचेनि येथ हे सर्व रचना । भीड तुटेना भिक्षुकासी ॥२४॥
हे चि आलोचनीं असतां निमग्न । अधिक चि त्रासला ऐका कारण । कीर्तनीं दासाचे सिष्य प्रवीण । इह रामराज्य वानिलें ॥२५॥
लीळा परमार्थी करुनि समेळ । रघुनाथाचा जाला कौल । हा अभंग दासाचा वदतां प्रेमळ । क्षोभला अंतरीं सुण्यापरी ॥२६॥
भावितु भूमि हे हिरण्मय । दिसतां ह्मणेन रामराज्य हें । वरकड असो तें बहुत चि आहे । वैकुंठसौभाग्य होत ते ॥२७॥
प्रस्तुत कळी तो राज्य करिताहे । करामत दावो कां तिळप्राय । हे नुन्य बोल मारुतिराया न साहे । तारूं विंदाण मांडिलें ॥२८॥
जिकडे तयाची फांके दृष्टि । सुवर्णमये चि भासे सृष्टि । बंधान कपट हें भावितु पोटीं । सत्य जरि जवळी दिसाव ॥२९॥
तो येकांतीं परसाकडे बैसला । सोनगुंडधडा दृष्टीस पडला । संसार आतां करीन चांगला । ह्मणोन धांवला धरावया ॥३०॥
भ्रमोन विसरला शौच्यकर्मविधी । उडउडों धरुं धावे आशाबत्धी । अप्राप्त दिसलें तैं देहशुत्धि । बरी येऊनि परतला ॥३१॥
निंदों च लागला बहु मनामाजीं । ह्मणे कापटय हें दगाबाजी । मग शुत्ध होऊनि संतसमाजीं । आला तों हासों लागले ॥३२॥
पुसती देखिलें कीं रामराज्यसौरस । तैं कोण यापरी धरिली आस । धिग धिग मूढा रे महिमा विशेष । नेणोन निंदा केलासी ॥३३॥
येक सर्वज्ञु बोलिला ऐस । तुटेल दुराशा जैं नि:शेष । तैं रत्न स्वर्णमये भासेल त्यास । भक्ता वैकुंठपद जवळी ॥३४॥
येक ह्मणे तूं जाणसी येक । रामराज्यीं कोठें पां हा रंककळंक । येक ह्मणे हा असे मूर्ख । अहंकारडोहीं बुडाला ॥३५॥
येक ह्मणे हो नसोन प्रपंच । केवढी सोन्याची धरिली लालुच । येक ह्मणे साधुमहिमा नेणे च । देखत ऐकत असोन संगीं ॥३६॥
ऐकोन बहुतीं निष्ठुर बोलणें । घाबरोन लाजला करी रुदन । तंव करुनि स्वामींनीं समाधान । बहुमान देऊन बैसविलें ॥३७॥
लागोन पदाला करुणा भाकितां । सवर्मै तारुं तया गुरुदाता । आज्ञापिलें कल्याणविरक्ता । मनोगतानुसार बोलिला तैं ॥३८॥
॥श्लोक॥ खासिल लेसिल घेसिल तें चि खरें तुज भोगें । काळ चपेट लपेटित लाटित दाटित तें नव्हती तुजजोगें । कर्कश हाकुन झोकुन टाकुन मारिति रे मनुजा तुज धोगें । दास ह्मणे हरिदास करी तरि धृव जसा न चळे वरि तो गे ॥१॥
॥अभंग॥ प्रस्ता०पं०॥ लक्षुनी आहे रे चंचळ । ईस जातां नाहीं वेळ ॥१॥
सत्य मानावें उत्तर । देव नित्य निरंतर ॥ध्रु०॥ नाना वैभव समस्त । येती जाती अकस्मात ॥२॥
ह्मणे रामीरामदास । काय देहाचा ॥३॥१॥
नाना वेथा उद्भवती । प्राणी अकस्मात जाती ॥१॥
मृत्य बांधला पदरीं । होते आयुष्याचे भरीं ॥ध्रु०॥ काळ सन्निधीं । येक घडीं लागों नेदी ॥२॥
रामदास सांगे खूण । भेद जाणे विलक्षण ॥३॥२॥
नदी मर्यादा सांडिती । ऊष्णकाळी वोसाविती॥१॥
तैसा तारूण्याचा भर । सवें होतसे उतार ॥ध्रु०॥
भाग्य चढे लागवेगें । सवें च प्राणी भीक मागे ॥२॥
रामदास ह्मणे काळ । दोनी दिवस पर्वकाळ ॥३॥३॥
पान नं. ७९९ --
पान नं. ७९९ --
पुरें पट्टणे वसती । येक वेळ वोस होती ॥१॥
तसिसे वैभव हें सकळ । येतां जातां नाही वेळ ॥धृ.॥
बहुत सृष्टीची रचना । होय जाये क्षणक्षणा । दास ह्मणे सांगो किती । आले गेले चक्रवती ॥३॥४॥
सेवकास भाग्य चढे । त्याआधेन होणें घडे ॥१॥
देव करील तें साहावें । काय होईल तें पाहावें ॥ध्रु०॥
वर्तमान घडे जैसें । तै उगें चि व्हावें तैसें ॥२॥
दास ह्मणे वेळ कैसी । राज्य जाहलें कळेसी ॥३॥५॥
कामक्रोधे खवळले । मदमछर मातले ॥१॥
त्या आधेन लागे होणें । ऐसें केलें नारायणें ॥ध्रु०॥लोभ दंभ अनावर । जाला गर्व अहंकार ॥२॥
दास ह्मणे सांगों किती । पडिली ऐशाची संगती ॥३॥६॥
॥वोवी॥ हें ऐकोन तयाचें वळलें चित्त । कृपादृष्टीनें पाहोन समर्थ । पाहें पां ह्मणतिले विश्वासयुक्त । रामराज्य आहे तुजपासीं ॥१॥
तो स्वदेहाकडे । परतोन पाहे । सुवर्णमय चि जालें आहे । धरुनि सदृढें सद्गुरुपाय । अनुग्रहपात्र होठेला ॥४०॥
संतजन वदती भला बा आतां. । योग्य जालासि बहु परमार्था । ऐसियापरी वर्तली हे कथा । पुढें श्रोतेनो अवधारा ॥४१॥
गडावरी जे होती चरित । कितेका ते नसती विदित । काय काय बोलती ते नेणवे संत । कोण कोण तरती कवण्यापरीं ॥४२॥
उपदेशाचा जाला सुकाळ । महंतीस जाती सत्शिष्य प्रेमळ । सद्वृंददाटणी सर्वकाळ । सकळ विदित होय केवि ऐका ॥४३॥
॥अभंग॥ धन्य रामदास संत । सुकाळला परमार्थ ॥१॥
राम भीम साह्ये जेथें । सत्य करीती हो मात ॥२॥
बोध भजन अखंड । जेथें न सिरे पाषांड ॥३॥
भक्तजन सुखावती । चहुकडें फाके कीर्ति ॥४॥
स्वात्मानंदु जेथें खेळे । मोक्ष बारा वाटीं लोळे ॥५॥
॥वोवी॥ श्रोते हो जयाची अपार लीळा । वानूं न होये शक्ति मंदाला । अनुवाद संताचा आडवा केला । वेधून पैलाड विलोका ॥४४॥
॥श्लोक सं०॥ सांग: संन्निगमो मोहोदधिरयं बुधिर्नगोमन्दर: । सर्पैकाधिपति विंवेकचरितं श्रीदासबोधोऽमृतम् । संसारानलतप्तसज्जन
जगज्जन्मादिविच्छित्तये । संपूर्णैकदयानिधि: प्रथमिता श्रीरामदासोहरि: ॥१॥
॥वोवी॥ दासमहाराज पुण्य़प्रतापी । दर्शनें चि किंवा राहतां समीपीं । दृष्टी नीट पडतां ज्याचे स्वरुपीं । होती अनुतापी बहु जन ॥४५॥
हुमापक्षीची पडतां छाया । जेवि रंकत्व जाय विलया । श्रीमाधवाला उपजतां दया । वैकुंठा जाऊं श्रम नसे ॥४६॥
कामदुघा दुभूं नलगे कष्ट । भय नसे ताक तें होईल अंबट । तेवि गुरुमुखीचें वचन गोमट । ऐकतां परमार्थ सुल्लभ ॥४७॥
नीरदा देखोन नाचे मयोर । चंद्रोदईं हरुषे चकोर । तेवि गुरुराजया देखोनि थोर । साधु महाजन सुखावती ॥४८॥
धन्य दासाचें तप तेजोमय । सन्मुखीं यावया जनासी भये । मा टिकोन बोलाया कायसें धैर्य । कारण सत्संग न ठावा ॥४९॥
कोणी संसारामाजीं राबते । कोणी ठकाच्या खालीं वागते । परस्परें सांगते ऐकते । प्रपंचकर्ते बोलके ॥५०॥
॥अभंग॥ ऐका ठकपण क्रियाहीनापासीं । संसार मानसीं जडलासे ॥१॥
सिंतरु अतीता वैराग्य चि बोले । साधुपासीं डोले देऊं टाळा ॥२॥
करिती कवन कथा ब्रह्मचर्चा । मान गुरुत्वाचा बनो भावी ॥३॥
होईन संन्यासी परि भार्या पुत्र । असतां पवित्र भीड हे चि ॥४॥
संता जें पुसाव मज सर्व ठावा । प्रपंच आघवा ब्रह्मरुप ॥५॥
कासया विरक्ति भजन वंदन । सर्वसौख्य जाण तनुपूजा ॥६॥
हा मूर्ख पढत केवळ तो मूर्ख । ह्मणे तें सद्वाक्य भ्रांतकारी ॥७॥
पतित चांडाळ दुर्जन अधम । आत्माराम धिकारिती ॥८॥
॥वोवी॥ स्त्रीलुब्धका न तोडवे भीड । धनपुत्रलोभी असे लिगाड । वृत्तीसींव कजिया आढयता आड । लपोन गुर्गुरु करणारे ॥५१॥
येकासी पेंचला असे साहु । पुराणिकांनीं गोविला बहु । कुळगुरु गुरु मागत्या गुरुभाऊ । भय दाऊन उगे दाबिती ॥५२॥
मत्ताभिमान तो न सुटे कदा । सोयरे धायरे हिणविती सदा । दरिद्रत्व ताठा निशाच्या धुंदा । माजीं कितेकीं पडियेले ॥५३॥
बागबगीच्या हव्यास भारी । व्यसन सिकारीं जडला अंतरीं । जाले भ्रमिष्टु आडरानभरी । परमार्थसोये न जाणती ॥५४॥
हे भवीं बुडाले कुबुत्धी । ऐकोन स्वामीचा परमार्थविधि । टाकून आपुल्याल्या पूर्वोपाधी । श्रीरामभजनीं विनटले ॥५५॥
धन्य स्वामीचा पुण्यप्रताप । कीर्तिसह होठेला जगद्व्याप्य । नि:शेष हरपले क्लेश पाप ताप । मुमुक्षुधर्म प्रबळला ॥५६॥
भेटीस संताच्या येती साधक । सित्धपुरुष देतसे नाभी हाक । भजन भाव भक्ति प्रेम लीन सौख्य । वावरती चहुंकडे निर्भय ॥५७॥
होऊनि अवघ्यांचें येकमत । समर्थापासीं येती शोधित । झुगारिती मायामोहातें । परमार्थनिजधन पाहुनियां ॥५८॥
येऊनि अबळा माहेरासी । न पडे सासुरवाडअध्यासीं । हरपली वृत्ति ते येतां करासीं । जेवि सोडून न जाववे ॥५९॥
गणेशचतुर्थी दुसरे दिनीं । शशिवदन पाहतां भय नसे मनीं । चालोन पावतां स्वस्थ ठिकाणीं । वोहळ येईल भय नसे ॥६०॥
तीर्थक्षेत्रविधाना सरल्यावरी । पुरोहिता न लेखीं लुब्ध संसारी । लाजाहोम होतां निबर्या अंतरीं । फिरवितील नवरी हे शंका नसे ॥६१॥
रंकास गवसतां घरीं च धनघड । कां सोयर्याच्या सोयर्या वासील तोंड । तेवि प्रपंच हा कळतां लबाड । परमार्थलोभ न त्यजिती ॥६२॥
सज्जनगडाला धावोन येती । सद्गुरुरायाची कृपा लाहती । यद्यपि जावोन प्रपंचीं वर्तती । होऊनि परमार्थी दृढतर ॥६३॥
पद्मपत्रा न भिजवी उदक । कुंभारीस न लागे कर्दमकळंक । तेवि नि:संगी ते संसारिक । धन्य सुखदायक गुरुदाता ॥६४॥
॥पद॥ धन्य तो येक तारक । वाटी निजजना सौख्य ॥धृ०॥ पापतापातें करि शांत । दावी हित परमार्थ ॥१॥
चिंता उद्वेग उबग । हरुनि करी नि:संग ॥२॥
स्वात्मानंदासी सुखरासी । वाटुनि दे भोळ्यांसी ॥३॥
॥अभंग॥ धन्य तो चि प्राणी जन्मासी येउनी । स्वहित साधुनी सुखावला ॥१॥
संसार हा गोड किंवा वीखभीड । न मनी होय पुढें परमार्थासी ॥२॥
मरोनि उरला न लिंपे कर्मात । हाणितली लात भ्रमत्वासी ॥३॥
कायावाचामन सद्गुरुसेवेसी । होय अहर्निशी सानकूळ ॥४॥
आत्मारामभक्ति जयाचें जीवन । धन्य होती जन त्याचे पाई ॥५॥
॥वोवी॥ हें असो सज्जनगडीं भाविक । मिळाले जन्माचें करुं सार्थक । आणि उत्साह विलोकूं अलोलिक । दाटले लोक सुखावती ॥६५॥
कितेका मानसीं जडला भाव । समर्थ चि आमुचा सद्गुरुदेव । सन्मुखी पुसाया वाटे भेव । नांव चि घेतां पुरे ह्मणती ॥६६॥
येकास येकांनीं पुसतां क्रम । सांगती घेती दासाचें नाम । भजन हि गुरुचें करिती संभ्रमे । मुक्त चि जालों निर्धारिती ॥६७॥
सांगती दुसर्याला नीति संसारीं । कष्टाल किती हो परता झडकरी । त्यांनीं हि निर्धार करिती अंतरीं । समर्थ आमुचा गुरुराज ॥६८॥
धन्य तपाची ऐसी कमाई । हो कां कोणाचे निष्ठ सांप्रदाई । अंकित स्वामीचे दिसती सर्व हि । लीळानवाई वानिती ॥६९॥
एवं सद्गुरुकृपाप्रतापें । बहुता जनाला झोंबला अनुताप । संसारसुख वाटे उपव्द्याप । अनुतापें तप्त होताती ॥७०॥
ऐसा तयाच्या मानसीं निश्चय । समर्थ आमुचा होय गुरुराय । तारितील विश्वासलों धरिलों पाय । बहुत काय आतां कशाला ॥७१॥
भोळेभाळयाला न सुचे युक्ति । सन्निधीं येऊं लाजती भीतीं । दुरोन पाहती स्तविती नमिती । करुणा भाकिती मनांत ॥७२॥
न देती अधिकारेंविण उपदेश । लाऊन कसवटी पाहती मानस । निस्पृही मोठे केवि होती वश्य । हें भावोन भावना आश्रयिले ॥७३॥
तेणें कळवळला पवनपुत्र । भोळे जनांला करुं उत्धार । श्रीरामभक्ति होऊं विस्तार । सानकूळ जाला दासासी ॥७४॥
न बाहतां प्रगटोन वनारि । वदे मित्रा रे गोष्ट अवधारीं । भक्त बहु जाले आपुल्या अंतरीं । नेमून गुरुत्व तुजकडे ॥७५॥
संकल्प ऐसा कीं त्यांचे मानसीं । विदित मनींचें सर्वज्ञासी । भक्तिभावना वळखोन आह्मांसी । तारावें तारिती निश्चय ॥७६॥
ते शिष्य ह्मणावे तों उपदेश नाहीं । नव्हे तरि विश्वासु जडलासे हृदईं । आतां न पाहतां योग्यता कांहीं । तारिजे ह्मणतां शरणमात्रें ॥७७॥
चिंता सर्वाची श्रीरामराया । ब्रीदास्तव पावन करिती तया । कृपणत्व आह्मीं कीजे कासया । वर हि दिधलासे पूर्वी च ॥७८॥
कथितां यापरीं हितगुज गोष्टी । अवश्य ह्मणतिलें जोडूनि करपुटी । अंतर्धान पावला भीम जगजेठी । जाले दासांनीं साबडे ॥७९॥
स्नाननेमादि प्रहरपरियंत । सारुन येकांतीं बैसती समर्थ । पूजन कराया येती तयांतें । न्याहाळून कृपेनें उपदेशिती ॥८०॥
कोणी येवो कां कांही न पुसतां । अनुग्रह करिती सकृपें दाता । नैवेद्यादि होऊन भोजनासी बाहतां । संक्षेपूनियां ऊठती ॥८१॥
असो कां नसो पूजासाहित्य । धनदक्षणेचें नसे अगत्य । न श्रमतां आणिल्या भक्तिवंतें । अंगिकारिती परी तंटा नसे ॥८२॥
आईत ताह्माण जीवन सुमन । पुरोहित किं शिष्यें करवीती पूजन । सुकाळ कराया श्रीरामभजन । गुरुदयाधन भाळलासे ॥८३॥
उपदेशूनियां रामंत्रजप । सांगती तुह्मी च आहां स्वरुप । साहकारी आमुचा वान्नराधिप । आत्म श्रीरामउपासना ॥८४॥
मग सायंकाळी नेमादि सारुनि । होइजे हो प्रहर येक यामिनी । शूद्रक्षेत्रियाला उपदेश देउनी । मग कथारंगणीं बैसती ॥८५॥
दिवसा उपदेशिती ब्राह्मणांला । रात्रौ काळीं अन्य यातीला । कल्याण सत्शिष्यु योग्य जे त्यांला । नेम ग्रंथ सांगतो वोपितो ॥८६॥
समसाम्य लाडके मित्र जे संत । पुसती महाराजा करुणा बहुत । उपजली अधिकार न पाहतां किंचित । तारुं लागला उदार ॥८७॥
येरुं ह्मणतिलें जाणोन पुसतां । तरि हे हरीची सर्व हि सत्ता । ज्याची तयाला असे हो चिंता । युक्त हें आतांच्या प्रकरणीं ॥८८॥
अवघे चि अधिकारी असती पूर्ण । आडवा आलासे शुन्याभिमान । ते सर्वाभिमानु करुं निवारण । श्रीराम गुरुदाता सित्ध असे ॥८९॥
मग श्रीरामभीमांनीं कथिल्यापरीं । तयांप्रति कथिलें भवारि । समजोन अर्थ तो ठेवा अंतरीं । अवतारकृत्य तें संपादिलें ॥९०॥
॥अभंग॥ बद्धाचा मुमुक्ष प्रबोध करावा । मग उद्धरावा ज्ञानमार्गे ॥१॥
ज्ञानमार्गे घ्यावे सत्य समाधान । तरी मग जन पाठी लागे ॥२॥
पाठी लागे त्याचें अंतर जाणावें । आपुलें ह्मणावें दास ह्मणे ॥३॥
पतित हे जन करांवे पावन । तेथें अनुमान करुं नये ॥१॥
करुं नये गुणदोष उठाठेवी । विवेकें लावावी बुद्धि जाण ॥२॥
बुत्धि सांगे जना त्या नांव सज्ञान । पतितपावन दास ह्मणे ॥३॥
पतित ह्मणीजे वेगळा पडिला । पावन तो जाला ये०च॥०४॥
॥वोवी॥ ऐसें ऐकतां हितगुह्यगोष्टी । डोलले संतांनीं सुखसंतुष्टीं । परि हें इतराच्या नव्हे राहटी । हें भूषण साधे हो सित्धासी ॥९१॥
आपण तरला ती येऊनि प्रचित । उर्वरित भक्तीनें साह्य भगवंत । परोपकाराचा उरल्यां हेत । कीजें हें कृत्य मुक्तांनीं ॥९२॥
नि:शेष हरपला ज्याचा संदेह । सकळ हि होठेले स्वरुपमय । न दिसे नरनारी भ्रम तमविषय । त्याचें हें कार्य जाणावें ॥९३॥
भक्ति ज्ञान वैराग्य ध्यान । आदिकरुनि जेथ भरण । मुख्य विषयाचें ज्या नसे भान । अंगिकार कीजे सगट त्यांनीं ॥९४॥
॥अभंग॥ ज्याचे दृष्टीं न पडे पापताप । पाठिराखे सर्वदा रामभूप ॥१॥
उपासना वाढली चहुंकडे । श्रवणमनन सर्वदां जेथ घडे ॥२॥
प्रतिष्ठिलें साधन शुत्धमार्ग । आपेंआप हातासि चढती योग ॥३॥
त्यांनीं कीजे सर्वांसि अंगिकार । आत्मारामा भजोन पडती पार ॥४॥
॥वोवी॥ बोल हा जाणोन नवलपरी । श्रोते हो संशय नाणा अंतरीं । अयोग्य अधिकारी येकसरीं । कां केले समर्थ ह्मणोनी अंतरीं ॥९५॥
परमार्थ देवाल्या क्रमाकारण । कोरुन अधिकारी कींजे पाषाण । कळसास येऊं काम संपूर्ण । बहु साहित्य साबडें मेळविजे ॥९६॥
ढकलिजे पायाभरतीस बंडे । दिसावा ठेविजे योग्य जे धोंडे । पोटीं सामाविजे चिखुल चीप गुंडे । एवं देऊळ येक सर्व ॥९७॥
अधिकारी जे सत्सिष्यराजे । ते वाहिलें उपासना गुरुत्ववोझें । भोळेभाविकी राहिले सहजें । सेवा कराया सहवासी ॥९८॥
अधिकारी ते सद्य चि तरले । करुन कमाई बहुतां तारिलें । इतर हि निजठाया येऊनि पोहंचले । करीत मोकाम जन्मांतर ॥९९॥
शरण जे आले सद्गुरुराया । कोणी न जाती त्यांतून वाया । घालमेल केल्यां हि न सोडी तया । तारिल्याविण वरवाक्यें ॥१००॥
मिळोन येकदां पंडित वैदिक । आलोचिती जाले हो बहु शिष्यलोक । येकमेकांचें न पाहती मुख । मंत्र सांगितल्यावरी पुन्हा ॥१॥
नांव चि बहुतांचें न होय ठाऊक । कोठिले न ठावा ना नसे वोळख । तरि नमोन भक्तवत मृदुतरवाक्यें । अंत घ्यावा हो दासाचा ॥२॥
ह्मणोन निघाले हटीं कुचेष्टीं । कापटयभावना वसविली पोटीं । देखोन दासांनीं येतां निकटीं । सन्मानूनियां बैसविलें ॥३॥
आश्चिर्यता पा हो केवढी । जेथें मोक्षाची उभोन गुढी । न देखती जाले अंध पाषांडी । जेवि घुगर्यांत चोरदाणा ॥४॥
तपतेजप्रतापसुदंताखाले । ते पिष्टपावन होतील भले । प्रस्तुत छळाया सन्निधीं आले । भावार्थ वळखिले वैष्णवें ॥५॥
कल्याणाप्रती बोलिले गाण । गडावरी जाले जे शिष्य नूतन । तयां सर्वत्रां प्रसाद वाटणें । आहे तरी झोळीचा आणी पां ॥६॥
तैसे चि आणोनि ठेवितां पुढें । पाहिलें कृपेनें वदनाकडे । बोलाऊन येकेका आणी इकडे । नांव घेत जाईन तयाला ॥७॥
वदोन तथास्तु इछितु आज्ञा । मग नांव उपनांव ठावठिकाणा । सांगसांगोन श्रीगुरुराणा । बोलवाऊन प्रसाद दिधले ॥८॥
निंदक लोकांच्या उपकारबळें । आर्व्ह प्रसादा जाले सकळ । तपतपोन श्रमतां बहुतकाळ । लाभ तों घडणें दुर्लभ ॥९॥
तंव पाषांडियांचा हरला गर्व । स्तवोन पदाब्जीं मागतां ठाव । प्रसन्न जाले हो श्रीगुरुराव । ते हि परमार्थी होठेले ॥११०॥
जे छळाया येती ते होती पावन । धन्य दासाचें हें महिमान । येरवीं लोकांचें ऐका लक्षण । सामर्थ्येविण सिणतो ॥११॥
॥अभंग॥ क्रियेसहित ज्ञान तें चि सुलक्षण । गुरु शिष्य पूर्ण सुखावती ॥१॥
नाहीं तरी व्यर्थ गुरु तो गुर्गुरी । शिष्य तो अघोरीं तोंड काढी ॥२॥
साधन ह्मणतां अंगावरी उठे । करिती तंटे फंटे पंचायती ॥३॥
बहु शिष्य जाले वोळखी नसे चि । आज्ञा ते गुरुची वीट मानी ॥४॥
नोकूनियां क्रमा शिष्य जाला पापी । दापी गुरु कोपी भेवी दुषी ॥५॥
जालें उभयांचें जगीं धिग जिणें । नेणती च खूण आत्मयाची ॥६॥
॥वोवी॥ धन्य दास दासाचे आप्त भक्त शिष्य । यावश्चंद्र दिवाकरौ नर्क क्लेश । शिष्यपाप गुरोरपि हा दुर्दोष । नसे चि मान्य क्रम सर्व हि ॥१२॥
हें असो आतां तरले बहु जन । नाना परीनें जालें पावन । येकदां येकांतीं असतां सज्जन । तिकडे सत्पुरुष मिळाले ॥१३॥
इकडे कराया कथा श्रवण । येऊनि मिळाले भाविकजन । जाणोन गुरुमना शिष्य प्रवीण । केलें कीर्तन जें युक्त ॥१४॥
संतृप्तीवरी बोलिले तितुकें । न बोलवे ऐका एक दोन वाक्यें । जेणें बहु जालें संतुष्ट भाविक । तें अनुभवा सौख्य तुह्मी हि ॥१५॥
॥अभंग॥ उपा०पंचक॥ नित्य कैचें निरुपण । ज्ञान होतसे मळीण ॥१॥
ह्मणोनीं सगूणी भजावें । ज्ञानगर्वासी त्यजावें ॥ध्रु०॥ मोडे मनाची कल्पना । कल्पूं जातां त्या निर्गुणा ॥२॥
मी च ब्रह्म हें धारिष्ट । तेथें संदेह वरिष्ठ ॥३॥
देहबुद्धि हे सुटेना । द्वैतकल्पना तुटेना ॥४॥
रामीरामदास ह्मणे । उपासना याकारणें ॥५॥
ज्ञानगर्वे जो मातला । देव आव्हाटीं घातला ॥१॥
त्यासी नावडे सगुण । गेलें मीपणें निर्गुण ॥२॥
दोहीकडे अंतरला । थोर वेवादीं दादुला ॥ध्रु०॥ देव सांडुनियां पुढें । नानाछंद करी वेडें ॥३॥
जेथें तेथें ज्ञान काढी । भांड जाहाला पाषांडी ॥४॥
रामीरामदास ह्मणे । मूर्ख दोहीकडे उणें ॥५॥
नाहीं येक उपासना । कैंची भक्तीची भावना ॥१॥
नाहीं निश्चये अंतरीं । मन फिरे दारोदारीं ॥ध्रु०॥
ज्यास नाहीं येक देव । सातापाचा ठाई भाव ॥२॥
दृढ धरी निश्चयेंसी । मूर्खपणें येकदेसी ॥३॥
नानाकारें जालें मन । कैंचे निष्ठेचें भजन ॥४॥
रामीरामदास ह्मणे । निष्ठेविणें काळ सुणें ॥५॥
पाहें दासाचिया सुता । कोण जाणे कोण पिता ॥१॥
येकनिष्ठ नाहीं भाव । त्यासी कैंचा देव ॥ध्रु०॥
नृत्यांगना जाली सती । कोण जाणे कोण पति ॥१॥
निष्ठेविण जैसा पशु । भोग भोगी बहुवसु ॥३॥
होती कुळवंत सुदरी । भ्रष्ट जाली बहुता घरीं ॥४॥
रामीरामदास ह्मणे । जळो बहुचकाचें जिणें ॥५॥
ज्ञातेपणें सखी पोसीं । तेव्हां नव्हे येकदेशी ॥१॥
येकनिष्ठ उपासना । न ये अभक्ताच्या मना ॥ध्रु०॥
करितां आपुला संसार । धरी जीवेंसी जोजार ॥२॥
नाना कष्टीं जोडी अर्थ । अर्थाकारणें अनर्थ ॥३॥
पोत्यासाठीं रातीं जागे । रागें स्वानासाठी लागे ॥४॥
रामीरामदास ह्मणे । ऐसी मूर्खाचीं लक्षणें ॥५॥
॥पद॥ (चाल संसारीं संतोष वाटिला ॥) येई येई रे स्वामी माझ्या प्राणसखया । जीव जाला उदास । वाट मी पाहतां शिणलों बहु कष्टलों । लागली थोर आस ॥ध्रु०॥
संसारी मी माझें ह्मणतां अर्थ जुडितां । जन्म गेले अपार । दारूण दु:ख जन्मांतरी मातेउदरीं । ऐसा हिंडलों फार । बहुत पुण्याची निजठेवी जन्म मानवी । पाववी पैलपार । काळमुखींहुनि सुटावें सुख लुटावें । मध्यें आडताळा थोर ॥१॥
संतसंगें भाग्यें जोडला भाव जडला । परि सवें चि जाये । प्रपंचलालुची सुटेना लोभ तुटेना । यासि करुं मी काये । काम क्रोध मद मछर ये तिरस्कार । कांही केल्यां न जाये । विवेक समयीं येइना शांति होइना । यासी न चले उपाये ॥२॥
सिद्धपण आंगीं जडविलें तेणें बुडविलें । क्रिया पालटवेना । आधार घेत हें मानस देहाची आस । लागली हे सुटेना । जाणिवेचा फुंज न बरें येतें काविरें । संशयो हि तुटेना ॥ दास ह्मणे आह्मी अज्ञान आह्मा स्वामीनें । कदा विसंभवेना ॥३॥
॥श्लोक॥ प्रत्यावृत्ति मनासि कृत्य करणें भृत्य ऐसें कथावें । नाना नृत्य विवेक धृत्य चुकवी मृत्य ऐसें मथावें । सर्वां मान्य नव्हे जघन्य रुप तें धन्य चित्तीं धरावें । अन्या अन्य तजूनि पुण्य प्रबळे तें स्वभावें करावें ॥१॥
॥बीजेवीण अंकूर निर्माण जाला । दुजेवीण तो येकला तो चि गेला । नरेंवीण छाया भ्रमेंवीण माया । जळेंवीण तारुं विवेकें तराया ॥१॥
॥युग्माननाचें वास्तव्य जेथें । जळबिंदु रत्नें निर्माण तेथें । अखंड बंदीं परि नाम मुक्तें । तैसें चि जाणा क्रियाचळातें ॥१॥
॥पद॥ (राग कानडा, धाटी-कष्ट करिती) हरि आनंद मंदला । कोण पुसे इतराला ध्रु०॥ गोप गोपिका गोवळवछे । समूहा फूटला ॥१॥
गोवर्धन वृंदावन मथुरा । सकळ रंगरस गेला ॥२॥
कौरव पांडव यादव गेले । न पुसत हि कोण्हाला ॥३॥
धन्य द्वारकागोकुळसंपति । आभर जाला ॥४॥
कोण वैभव कोण संपदा । दास ह्मणे सकळांला ॥५॥
॥वोवी॥ कोणी पदाचा सांगती अर्थ । बिरुदावळी गाती नाचत । आणिती अनुभवा प्रत्ययांत । करविती गजर नामटाळी ॥१६॥
कोणी अभंगामाजील सौख्य । आणिती सादृश्या दृष्टांत मुखें बहुसुखी जाले तेणें भाविक । कीर्ति वाखाणिती दासाची ॥१७॥
इकडे संतांनीं देहातीत । होऊनि अनुवादती निजैक्यमात । न दिसे चि जयाला द्वैत अद्वैत । अनुभवीकपंथ या नांव ॥१८॥
न होऊन कांहीं व्यवहार करिती । जैसे आहेति ते तैसे चि असती । गजर ऐकोन चला हो ह्मणती । कथांतीं आरती कराया ॥१९॥
ऐकोन संतोषले शेष निजमात । मग आरती गाइल यथाविध्युक्त । पावोन स्वस्थानीं रमले स्वस्थ । ऐका चरित्र पुढारी ॥१२०॥
मुख्य जे स्थळीं कांहीं संशय । वाटो कोणा हि सद्गुरुराय । परिहारुन दाविती सद्गति सोय । धन्य प्रसन्नता या नांव ॥२१॥
॥अभंग॥ समर्थ तो स्वयें श्रीमार्तांडराय । सांग चालताहे उपासना ॥१॥
मुमुक्षु नवस तत्काळ पुरती । आनंदी करिती मोहत्छाव ॥२॥
दु:सह दुर्मदु मल्ल ते लोपले । भक्त ऋषी जाले बहु सुखी ॥३॥
भर्पूर भंडार उधळिलें फार । जाला सुगजर महावाक्य ॥४॥
येश कीर्ति वाघे मुर्ली ते शोभती । स्वान आरडती भोळें प्रेम ॥५॥
सत्शांति उन्मनी ह्माळसा बाणाई । दृढभाव तो हि वारु शोभे ॥६॥
सज्जनगड तें थोर प्रेमपूर । सत्रावांचे नीर तीर्थटाकी ॥७॥
धरुनि मी रंक सज्जोति दिवटी । दावीतसे लुटी सर्व सित्धी ॥८॥
आत्मारामसखा जालासे सगुण । करा हो भजन अखंडित ॥९॥
॥वोवी॥ दासविश्रामधाम विशाळ । पर्वत होय तो नाम मणिचूळ । स्वात्मानंददाता जाश्वनीळ । नांदतु जेथें भक्तांसह ॥१२२॥
इतिश्री श्रीरामकृपा तारक परमार्थ सोपा । राममय मानस । आनंदव्याख्या । सोनाजी चरित्र । अधिकार न पाहतां उपदेश । कथा प्रसंग । निरुपण प्रकरण येकसे येक ॥१०१॥
N/A
References : N/A
Last Updated : March 05, 2019
TOP