॥खंड॥ ११५

एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.


श्रीरामसमर्थ

॥पद॥ (राग आसावरी, धाट धन्य) ॥ धन्य रघोत्तम धन्य रघोत्तम धन्य रघोत्तमलीळा । भुवनकंटक राक्षस मारुनी फोडियल्या बंदिशाळा ॥धृ०॥
प्रजापाळक हा रघुनायक । ऐसा कदापि नाहीं । उद्वेग नाहीं चिंता नाहीं । काळ दुष्काळ नाहीं ॥१॥
व्याधी असेना रोग असेना । दैन्य वसेना लोका । वार्धिक्य नाहीं मरण नाहीं कांहीं च नाहीं शंका ॥२॥
सुंदर लोक सभाग्य बळाचे । बहु योग्य बहुत गुणाचे । विद्यावैभव धर्मस्थापना कीर्तीवंत भूषणाचे ॥३॥

॥वोवी॥ जे दीजे ते उणी उपमा । कैसा वर्णिजे श्रीरघोत्तमा । लीळा जयाची कैलासधामा । आवडोन गातसे अखंड ॥१॥
खेळे ब्रह्मयाचे हृदईं चरित्र । जे ऐकती सादर ऋषी मुनी पवित्र । जे सिरसा वंदितु सहस्त्रनेत्र । गाईले भवहर पाहा पद ॥२॥
सधरावरी जे दिसो लागत । नवलाख सांगणें काय अगत्य । सन्मुखी ठाकतां जगन्नाथ । प्राप्तीच्या फळश्रृती कासया ॥३॥
करित व्याख्यान हें पद पदासी । बोधीत सकृपें सिष्यजनासी । ध्यात गुरुनाम अखंड मानसीं । कल्याणदाता सदा सुखी ॥४॥
सिणोन व्यापारी मेळऊं धन । आळस न करिती सभाग्यजन । श्रीरामलीळा करुनि वर्णन । तेवि गुरुदास न धाती ॥५॥

॥अभंग॥ श्रीरामाची लीळा त्रिसत्य पावन । भक्ताचें जीवन सौख्यदाई ॥१॥
राक्षेसा मारुनीं देवा सुखी केले । प्रताप दाविले तिहीं लोकीं ॥२॥
प्रजासी पाळिले कौल दिल्ह्यापरी । वानिताति थोरी दिविजन ॥३॥
देवदेवोत्तम नाम रघोत्तम । परि आत्माराम निर्विकारी ॥४॥

॥वोवी॥ ऐसा प्रभु तो अच्युत अनंत । देखोन भूलला भक्तिभावात । लीळा दाविली ते जगीं अद्भुत । सगुणवेश धरुनी ॥६॥
हें जाणोन जिव्हाळा सद्भक्तजन । सांगत श्रीरामाचें महिमान । मना हो ह्मणतिलें तत्पदीं लीन । चिंता हराया ऐका कसें ॥७॥

॥श्लोक॥ बहु पीडिलें वाळिनें सुग्रिवातें ॥ [एकूण श्लो.५.करुणाष्टक ३१ वें पहा]

॥वोवी॥ दाउनि यापरी मनासि सोय । श्रीरामरुपीं जाले तन्मये । तरि ही आवडी पुरे न होय । लीळा थोरिव वानिती ॥८॥
अजन्म राम तो होता सगुण । लीळा तयाची देखोन पावन । वाखाणून घेतलें होऊनि धन्य । तत्समंधीं तदाश्रित ॥९॥

॥श्लोक॥सं०॥ धन्यायोध्या दशरथनृपा साच माता च धन्या । धन्यो वंशो रघुकुलपतेर्यत्र रामावतार: । धन्या वाणी कविवरमुखे रामनामप्रपन्ना । धन्यो लोक: प्रतिदिनमहो रामनाम श्रृणोति ॥१॥

॥अभंग॥ आहो प्राणीयानो जाणा कांहीं वर्म । सदां रामनाम धरा तोंडीं ॥१॥
श्रीरामसमंधीं पावले जो मान । तैसे तुह्मी धन्य व्हाल जगीं ॥२॥
आत्माराम सेखी होआल तुम्ही च । भूषण कीर्तिचे ल्याल स्वथा ॥३॥

॥वोवी॥ धन्य जे जाले करुन कमाई । भाव तरी ठेवा त्याचे पाई । वर्णोन तयाची लीळा नवाई । धरा तो हृदई सद्गुण ॥१०॥

॥अभंग॥ धन्य सूर्यवंश पुण्यपरायण । सर्वही सगुण समुदाव ॥च०॥९॥

॥वोवी॥ ऐसियापरी करीत वर्णन । सत्सिष्य दासाचाअ श्रीकल्याण । कांहीं च न इच्छितां मान पान धन । गुरुआज्ञा प्रमाण वर्तती ॥११॥
आतां ऐका हो कल्याणजी कथा । गुरुराजयांनीं निरोप देतां । राहोन सिरगावीं पुढे चालतां । लागला पंथ पंढरीचा ॥१२॥
दुष्काळाची जालीसे पीडा । धर्मा जन वदती माघारे मुरडा । गुरुभक्त संत ते सप्रेमहूडा । वेधुन बाहती धैर्यात ॥१३॥
पंढरीस निघतां कल्याणस्वामी । यात्रा मिळाली बहु समागमीं । भरवसा जयाचे अंतर्यामीं । पावोन पाळिती गुरुदाता ॥१४॥
भलत्या प्रसंगीं कांहीं समंध । पडो कां न वोहटे ज्याचा आनंद । तत्समई बोलिले हरषोन पद । श्रवण करा हो आवडीनें ॥१५॥

॥पद॥ (धाट साजणी, ग ऐसे चिन्ह कै ये०) बाईये ग मजला वेधु लागला सज्जनाचा । विजय जाला या सुमनाचा ॥ध्रु०॥
ज्याचे कीर्तीचा ठसा महिमा वर्णूं मी कैसा । तीर्थ वंदिती चरण शेषा ॥१॥
त्याचा चरणाची माती वंदिन मी दोही हातीं । मग मी पावेन निजपदप्राप्ती ॥२॥
त्याच्या दासाची दासी होईन मी त्याचे दासी । पतीतपावन भवभय नासी ॥३॥
नाम कल्याण ज्याची चुकवी संसार त्याची । वारी बोहरी या जन्माची ॥४॥

॥वोवी॥ वानोन गुरुराया यापरी हरुषें । मग गुजगुह्य कळविलें साधका ऐसें । गुरुकृपेंविन्हा प्राणियास । गतिदाय साधन आन नसे ॥१६॥

॥पद॥ (धाट राग कल्याण) ॥ साधवपाईरत कांहीं साधक ॥धृ०॥
निर्विकारी देव मोटा । त्याची प्रतिमा नाहीं उपमा ॥ साधुरुप पाहीं रत कांहीं ॥१॥
मायातीत तूं ब्रह्ममूर्ति आशारहितु । पाशारहितु रत कांहीं ॥२॥
मोक्षपाणी भवरिपु तो कल्याण जपतो निसिदिनीं रत कांहीं ॥३॥

॥वोवी॥ पदामाजील पाहोन प्रेम । गुरुसेवकाला वाटला संभ्रम । मिळाला सवें तो घेउनि स्तोम्‍ । पंढरीकडे चालिले ॥१७॥
सांगती तरी न दिसती नयन । परि चालवीत पुढें हुर्मुजी निशान । अश्वावरी स्वार होऊन । न पुसतां क्रमिती सुपंथ ॥१८॥
येक ते ह्मणती असतील डोळे । कर्तृत्वीं न राहती खोळंबले । येक ह्मणती हो महिमा न कळे । काय गुरुवरद असे कीं ॥१९॥
एवं डोळयाचें कर्तृत्व जितुक । त्यामाजीं न पडे कांहीं आटक । योग्यज्योतीचें कायस कौतुक । सबाह्य देखणें वर यासी ॥२०॥
अपणासमान होऊं पूजन । महंती कराया जाऊं कारण । समर्थानीं दाविलें विंदाण । निशि सर्व करुनी निमिष्य येक ॥२१॥
ऐसी असतां भक्तराज कथा । बोलती भलत्यांनीं भलती वार्ता । गुरुदातयानीं आज्ञा करितां । चारितु गोधना वनांत ॥२२॥
राममय जालें ते परिक्षूं समान । अमानित्व शांतीचें पाहूं साधन । करामत उर्मीचें करुं शोधन । किरातासि धाडिले सिष्यावरी ॥२३॥
मारुं धांवतां ते शस्त्र उपसोन । जाणोन राणीं चुकतील गोधन । दास्यार्थ तनु हे व्हावी ह्मणोन । सित्धिसाध्यासि आश्रईले ॥२४॥
कोणी पळाले होऊनि वाघ । जंबूक मार्जरा लांडगे काग । सर्प अस्वल वोखटे खग । पीडा निवारली गेले ते ॥२५॥
सायंकाळीं आश्रमास येतां । कां शांति न धरिली कां तनु आस्था । कां दृष्टि न फिरली राममय असतां । कां मस्ती धरिली हे सित्धीची ॥२६॥
ह्मणोइन श्रापितां जाला अंध । मग बाहतां किरात ते जाले सित्ध । सांगती यापरि परि कथानुवाद । गोरक्ष सिष्याचा असे पां ॥२७॥
ऐसी च वार्ता बनाऊं चांगली । दिसोन भाळाया भोळे मंडळी । लाविती येकाची अन्यत्रातळी । किं स्वमतें बनाविती कटाव ॥२८॥
मिळोन मानी पंडितवृंद । राजासि भाळविलें कटावबोधें । ह्मणती न वाचीजे हा दासबोध । नसे आधार श्रृती स्मृती ॥२९॥
आधीं च प्राकृती ग्रंथ निंद्य । पडतां वेडे चि होती सद्य । यास्तव दासाला पुसतो भेद । तूं मात्र आडवा न येई ॥३०॥
तंव कारकून ह्मणती सत्य हा बोल । मार्ग कोणता ही असावा निर्मळ । कां होईना ह्मणता भोळानृपाळ । समर्थापासीं पातले ॥३१॥
पाहोन ग्रंथ तो होता सन्मुखी । न पुसतां नेऊन टाकिले उदकीं । मग ह्मणती प्रतिष्ठा पाऊं लोकीं । नाहींतेक करिताती ॥३२॥
तंव ग्रंथ उसळोन आला पोहत । क्रोधावले ते गर्वी पंडित । सोडून गाठोडी आपुल्या हातें । पानें चोळा रे ह्मणती जळीं ॥३३॥
पाहती सरागें सोडुनि जेव्हां । श्रृत्या च भोवतीं दिसती तेव्हां । मग अवलोकूं लागले ग्रंथ अघवा । तो भक्ताभिमानी रघुवर्य ॥३४॥
श्लोकादि लिहीलासे स्वयें आधार । गळित जाला तैं अहंकार । स्तवस्तवों नमिले जोडूनि कर । स्वस्थळा गेली आज्ञासह ॥३५॥
कळतां वृतांतु दचकला नृपती । ह्मणे मी जालों बहु मंदमती । क्षमा करुन घेऊन पुढेंती । मग कोण्या ही पेचीं न गुंतला ॥३६॥
येकेक ग्रंथीं नाहीं श्लोक । याच असे हो ऐस कौतुक । काय कीं सांगणें हे असो हरिखें । गुरुपुत्रचरित्र अवधारा ॥३७॥
कल्याणकारी श्रीकल्याण । जातां सन्मार्गी यात्रा घेऊन । नानावेशें पवननंदन । भोजनसाहित्य पुरवीतसे ॥३८॥
देखोन विश्रांती छयाया तोय । उतरती राणीं वनीं निर्भय । होऊन तेथें ही बलभीम साह्य । नानापरीने संरक्षितु ॥३९॥
जातां पुढारी मांडल सांकड । हणुमंतनामा चोरटा बेरड । संगीक तयाचे असती द्वाड । पातले यात्रा लुटावया ॥४०॥
यात्राकरी ते भयभीत जाले । येकाडेसी येक लपों लागले । दुष्टांनीं जंव चौताळले । हाहाकार उठिला ॥४१॥
येक ह्मणती न वाचे प्राण । अपशकुनाच हे फळ पावण । आतां कायसा पुधें प्रयत्न । पंढरीनाथ कोपला ॥४२॥
तंव कल्याणस्वामी धीर गंभीर । गर्जिले न धरा हो भय अणुमात्र । सद्गुरु माझा करुणाकर न करील उपेक्षा वेळाईतु ॥४३॥
संगीं च राहतों मी ह्मणतीलें मात । करितील सुखी हो आह्मां त्रिसत्य । सांगोन भरंवसा ऐसा तयांत । मग गुरुराया आठवीलें ॥४४॥
करुन सद्गुरु नामोच्चारण । बेरडाकडे पाहिले कृपेनें । तो धरुन तात्काळी सत्‍भाव पूर्ण । साष्टांग पडला दंडवत ॥४५॥
ऊठरे ह्मणता जोडूनि कर । राहोन विनंती करी तो शूद्र । घेऊन आपुला जो परिवार । सुखरुप जावें दयाळा ॥४६॥
परावी यात्रा द्यावी सोडून । लुटितो तरि जी जीवमान राखून । मग कल्याणस्वामी बोलिले हांसून । शरण्या उपेक्षा न करी गुरु ॥४७॥
आस्छा धरुन आलास तूं ही । अनकूळ नसेल खर्चास गृहीं । तरि आह्मापासी असे जें कांहीं । घेऊन जाई गा सुखानें ॥४८॥
तो दर्शनभाषणपुण्यप्रतापें । भक्त चि जाला तो नसता तप । यात्रेकर वदती अयोध्याभूप । भक्तांकारण पावला ॥४९॥
मग बेरडांनीं विनवोन प्रेम । रम्यस्थानीं करवोन मोकाम । खर्चोन द्रव्यात पदार्थ उत्तम । निर्मवोन नैवेद्य करविला ॥५०॥
तीर्थप्रसादु सेऊनि भाव । दुर्गुण आपुले त्यजिला सर्व । समागमीं दिधला स्वसमुदाव । पंढरीस पावले सुखरुप ॥५१॥
इतर चोरांनीं करिती लाग । पाहोन तयाला होती दंग । लोहदंड क्षेत्रा पावऊन मग । नमोन पुसोनी गेले ते ॥५२॥
सहयात्रा उतरले वाळवंटींत । यात्रा संपादिलें यथाविध्युक्त । कीर्तन प्रियकरु पंढरीनाथ । जाणोन आरंभ करविलें ॥५३॥
कीर्तन करिती सिष्य वरिष्ट । दासकवन भरणा जया बहुपाठ । श्रोतेजन होते पाहत चि वाट । येऊन दाटले न बाहतां ॥५४॥
बोलती तरी अध्यात्मज्ञान । लक्षोन उपासना देती मान । अनेक ते दिव्यवचनें । देवभक्त जन संतुष्टलें ॥५५॥
श्रीगुरुआज्ञा धरोन हृत्पुटीं । येकेक ऊठती येकेकापाठीं । त्यामाजील सुवाक्या रत्नें गोमटीं । कर्णगुहांत ठेवा हो ॥५६॥

॥पद॥ धाट चल ( रे मना भेटु जा० ) हरिपदमकरंदी मानस हरिपद०॥धृ॥ पांगुळ परिमळ । घेऊन आळिकुळ लोघे सुगंधी ॥धृ०॥
प्रिय सकळ वन मीपण सुमन पंचक मानेना । मृद मनोहर सुंदर परि तो मधुकर थारेना ॥१॥
दास भजनसीळ प्रेमळदासाविरहित राहेना । विपरीत वचन विपरीत करणें तिळभरीं साहेना ॥२॥

॥पद॥ राग केदार धाट (हरीवीण०) तन मेरि रिझरी अज्यब सुरतरी ॥धृ०॥
खावे खलावे देवे दिलावे । सबघट सबज्यनमे भावे ॥१॥
तुज्यमे है ही मज्यमें है ही ॥ समज्यत कछुयेक है ही ॥२॥
देव न ज्यानु भगत न ज्यानु । अंतर ज्यानुरी ॥३॥

॥राग देसी॥ (धन्य धन्य ते०) नाटक नाटक हरि जगजीवनु हा ॥ वेधुनि गेला भेदुनि नयन तनमनु हा । वृंदावनीं मुरलीधर सुंदर देव पाहा । नटनाटयकळा सकळा विकळा रसरंग तो हा ॥धृ०॥
पट्टपीतांबर कट्ट किंकिणी हटवादी । चट करि रसमाखन सुरसगटवादी । निट निकट उत्धट लंपट वाजट शब्दवादी । जनकट विसंचुनि झटकरी हरि कार्यवादी ॥१॥
बहु भास हरि रसनास करि परि आवडतो । हरियोग बरा चि वियोग कदापि हि नावडे तो । सुंदर वेशकळा हरि पाहिजे तो ।
वरपुण्य अगाध असेल जरि तरि लाहिजेतो ॥२॥
द्वारके भीतरीं नाटक तो हरि राम जाला । ऐकोनि मारुती मनोगती वेग सीघ्र आला । राम हरिहर होऊनि सत्वर योग केला । रामदास देवभक्त मिळाले वियोग गेला ॥३॥

॥श्लोक॥ सकळ मंगळ मंगळदायका । विमळ नाम तुझें गणनायका । (एकूण श्लोक २० करुणाष्टक ७५ वें पहा)

॥वोवी॥ आरती होतां वाटिले प्रसाद । स्वस्थळासि गेले सद्भक्तवृंद । वानिती दासाची कीर्ति अगाध । आधि आधी उल्हासत ॥५७॥
रामदासबावा जंव येथें आले । बहुसंतांनीं सन्मानिलें । विठ्ठलदेव तो तयावेगळें । न राहिलें आसिजे परियंत ॥५८॥
राहवावया आणिखी समर्थाला । लक्षीत फिरती चहुंकडे मेळा । मार्गावरि ठेविलें पाहुं बहुताला । राखिती देउळीं सांगावया ॥५९॥
धन्य मुक्त योगीं रामदासभक्त । कवणाचें ही न येतां लक्षांत । घेऊन निरोपु देवासहित । भजन करित निघाले ॥६०॥
पद्मालयपैलाड दृष्टीस पडले । नमोन सकळांनीं आश्चिर्य मानिलें । हा कल्याणस्वामी सर्वज्ञ भले । गुरुहृद्गतीच ज्या ठाऊक ॥६१॥
येक ह्मणती मोठे विरक्त । अवतारीक हे जाणा सत्य । प्यावें तयाचे मुखीं कथामृत । ह्मणत स्तवित गेले ऐका पुढें ॥६२॥
न सांगवें कीर्तनवैभव । मुख्य पंढरीचा विठ्ठलराव । गुरुभक्तसख्याचा देखोन भाव । आपणासीं तिष्ठतु ॥६३॥
क्षुधा लागतां बहु बाळकासी । हिंडे आईच्या पदरापासीं । लाचावोन तेवी हृषीकेशी । कीर्तनरंगणीं उभा असे ॥६४॥
कल्याणस्वामीला प्रार्थिती संत । आर्तवंत आहों जगदीशसहित । तरि ऐकवा सत्कथा होऊं तृप्त । हो ह्मणोन ठाकले कीर्तन करुं ॥६५॥
पंढरीस आले जंव दाससमर्थ । संतोषपावाया देवद्विजभक्त । जें जें वानिलें तें गावोन समस्त । देवभक्तासि मानविलें ॥६६॥
गुरुरायाच्या पद्धतीप्रमाण । देवाधिदेवाचा निरोप घेऊन । वरसहित यात्रस्था स्वस्छळा धाडून । तुळजापुरासी पातले ॥६७॥
संपादूनिया यात्राविधान । तुळजामातेला संतोषऊन । राहोन सन्मुखी केलें स्तवन । ते हि पदांत अवधारा ॥६८॥

॥पद॥ (धाट सामर्थ्याच गाभा० । कल्याणकृत ॥ देविपर ) रघुविरवरदे वरमाते । दे वर सत्वर मम माते । अंतर विवरवी निगमातें । परतर पाववि उगमातें ॥धृ०॥
सुरसा नवरस रसदानी । नारद तुंबर वरदानी । फणिवरविधिहरसुखदानी । अखंडध्यानीं तव ध्यानीं ॥१॥
महिजळानळनिळव्यापक तूं । रजतमसात्विक रुपक तूं । भवभयभ्रम तम लोपक तूं । जनवनसज्जन दीपक तूं ॥२॥
सकळिक जननी जनमाया । काया माया मुळमाया । साधुमुनिजनउन्मनिया । हरिजनकल्याणें ऊपाया ॥३॥

॥वोवी॥ प्रत्यक्ष जगदंबा प्रगटोन तेथें । भूषणें वोपिलीं भक्तराजाते । जा न ह्मणवे हृदईहोता स्थित । नमोन पुढारी चालिले ॥६९॥
कल्याणस्वामीची अबाधित स्थिती । अचळवत केलेति आपुली वृत्ती । कवणाचे ही मना दुखो नेदीती । मग देवाला द्वेषिती कां सांगा ॥७०॥
गणपतीचें होता दर्शन । शारदांबेचे पाहतां स्थान । त्या त्या परीनें केलें स्तवन । सर्व देव प्रसन्न असती ॥७१॥

॥पद॥ (धाट, कल्याण राग ) ॥ नाम तुझें संकट वारी रे ॥धृ०॥ मंगळमूर्ती मंगलकीर्ती । मोरेश्वरा निर्धारी रे ॥१॥
सर्वारंभी मूलारंभी । चिंतामणि चिंता हारि रे ॥२॥
सकळ कार्य सित्धी आगमनिगमविधी । करिता कल्याण करी ॥३॥

॥कल्याण तद्वत ॥ ब्रह्मसुत माते वो वर दे दे ॥धृ०॥ सज्जन जीवनी । मुनिजन मोहनी । राघववरदा तूं वो वो ॥१॥
सकळीक त्रयलोक हरिहरादिक । जीवनकळा सकळा तूं वो वो ॥२॥
रामउपासक चिंतिती अंतरीं । विजई कल्याण करि तूं वो वो ॥३॥

॥वोवी॥ दर्शन शंभूचें जालें जेव्हां । तुष्टविलें स्तवनीं महादेवा । प्रेमभाव तो ध्यानास यावा । ह्मणोन लिहिलें हें पद ऐका ॥७२॥

॥पद॥ (धाट अनंत गुण त्या राघवाचे) हर हर हर सुखधामा । योगींद्र सुंदर जितकामा । सज्जनमुनि जनविश्रामा । रघुविरमानस आरामा ॥धृ०॥
सुरवरमंडन शुळपाणी । पिनाकपाणी शुभवाणी । अगणित महिमा पुराणी । प्रतापसिंधु गुणखाणी ॥१॥
गजमुख षण्मुख निज ताता । स्मरहर भवहर भवत्राता । परतरपावनपद दाता । भोळा शंकर हर ह्मणतां ॥२॥
काश अंबर निशाणी । दितीकुळनंदन घमशानी । अखंड राहे स्मशानीं । कविवर ह्मणती ईशानी ॥३॥
गिरिजावर गुरु सुख रासी । जनवनपावन पुण्यरासी । स्मरतां कर्पुर गौरासी । कल्याण कर दासासी ॥४॥

॥वोवी॥ स्तवित या परी तीर्थक्षेत्र पाहत । भक्तजनाला सुपथु दावित । प्रेमें सद्गुरुकीर्ती वानित । सिष्यवर्गसहित निघाले ॥७३॥
आठवतां चर्या गाती आनंद । घेती सिष्यांनीं लेहोन तें पद । व्याख्यान करिती कीर्तनीं विषद । सिकविती भाव आर्त्यासी ॥७४॥
शक्ति न होय ते ल्याहवया अवघीं । येक दों वचनें पडतील उपेगी । कीर्तिकुंदणाच्या कर्णुयुगीं । वस्तु भूषोन मिरवा हो ॥७५॥

॥पद॥ (धा०,दीनबंधुरे मि तूं ।) गाईला चि गावा राम गावा ॥धृ०॥
चकोर आवडे जीवा । चंद्रामृत निजठेवा । अनुदिनी करिती धांवा । वानिला चि वानावा नित्य नवा ॥१॥
चातका लागला हेवा । घनानंद भेटवा । अखंड सातवा आठवा । दिनबंधु ध्याईला चि ध्यावा ॥२॥
भावार्थ बळकट व्हावा । स्मर कल्याण जीवा । येथें कांहीं गोवा । नामामृत सेविलें चि सेवा ॥३॥

(स्वामि मा०) पाहा हो पाहा हो सय पाहा हो । संगातीतनिजसुख लाहा हो ॥धृ०॥
मीपण तूंपण सर्व मेळउनि गुणागुण । सद्गुरुचे पदी आधीं वाहा हो ॥१॥
अमळ विमळ ब्रह्म सर्वगत सदोदित । साक्षणीचा मूळ निरसा हा हो ॥२॥
श्रीगुरु कल्याणस्वामि पाववितो निजधामीं । मौन्यगर्भ शोधुनिया राहा हो ॥३॥

(धाटी, ज्यासि दिनबंधु नाम साजे०) ॥ कृपासिंधु सद्गुरुराजमूर्ती । तुझा पार न कळे वेदश्रुती । बोलों जाता ह्मणती नेति नेति । तुझ्या ध्यासें अनंत सित्ध होती ॥१॥
जयरामा आराम निजधामा । हरादिक चिंतिती तुज रामा । ब्रह्मानंद डुल्लती अंतर्यामा । काय जाणो मानवी तुझी सीमा ॥२॥
दीनानाथा हे थोर ब्रीद गाजे । तेणें मानसीं परमसुख माजे । गुरुस्वामी पातले हृदयसेजें । नाम कल्याण घोषताळी वाजे ॥३॥

॥वोवी॥ असो हें पातले डोंबगावासी । विश्राम वाटला तेथें मानसीं । नदीच्या पोटीं सद्गुणरासी । काळ कर्मित राहिले ॥७६॥
भिक्षा पुरविती आणोन सिष्यें । कवणा ही तेथें अटकाव नसे । देखोन स्वामीचे चाली नैराश्य । वश्य बहु जाले भाविक ॥७७॥
पाटील तो तिष्ठे सदां समोरी । दुरोन येताती थोर अधिकारी । परि सद्भक्ता नसे आशा तिळभरी । मुख्य भवारी प्रसन्न ॥७८॥
धन्य भक्तिचे थोर नवलाय । माहराजाचे नुचलती पाय । सुचविलें त्यावरी दास गुरुराय । वास्तव्य येथें करावें ॥७९॥
गावांत त्वरेनें मठस्थान करुनी । प्रार्थुनी गुरुदेवा सद्भक्तांनीं । राहविले गजरांनीं मठांत नेउनी । सादर चि असती सर्वदा ॥८०॥
उपासनाकार्या झोंबती भाव । करिती गुरुआज्ञे पर्व उत्सव । बाहोन नेती करुं गौरव । भक्तसिष्य लोकी येउनि ॥८१॥
जवळ परंडयामाजि सिष्य जाले । कितेकीं महंती कराया गेले । ठाई ठाई निस्पृहीं मठ ही केले । स्त्री शूद्रग्रहस्थ तरले बहु ॥८२॥

॥अभंग॥ धन्य डोंबगाव उदेलें हो दैव । जालें किं वास्तव्य योगीयाचें ॥१॥
धन्य तो मारुती धन्य सौख्य मठ । धन्य सीनातट सौख्यदाय ॥२॥
जेथें रामदास येउनी स्वमेव । सिष्यासि हा ठाव नेमियला ॥३॥
राहतां डोंमगांवीं डोंब डिंब हरे । विश्वासानें भरे प्रेमडोहो ॥४॥
डोंब कोणी होता विश्वासी धार्मिक । सर्वासी ठाऊक कीर्ति ज्याची ॥५॥
सिनारा पडिलें डोंबगांव नाम । लोकांनीं संभ्रमें बाहतां पूर्वी ॥६॥
मुख्य आत्माराम जेथें साहकारी । भक्त परोपरी सुखावती ॥७॥

॥वोवी॥ भरथावतारी हा कल्याण चतुर । जंव ऐकिला हरिमुखें श्रीरामचरित्र । अद्भुतकरणी अंजनीकुमर । केलेल सांगतां श्रीराम ॥८३॥
देवभक्ताच गुजमहिमान । साधुसंताच आनंद पावणें । आस्था होती हें लीहीन ह्मणोन । तो येथें पुरला हो मनोरथ ॥८४॥
काय पुण्याची होती सामोग्री । कोठें अवतरला कोणाच्या घरीं । ह्मणाल तरि ऐका वसो क्षणभरी । विरक्ता पाहिजे स्छळ किती ॥८५॥
भोगूर पटधारी पुण्यवंत । नाम जयाचें कृष्णाजीपंत । सुसौस्त्री जाला बाबाजी सुत । मग जाला वियोग स्त्रियेचा ॥८६॥
त्रासोन संसारीं जाला उदास । संपादिली यात्रा दोनी मानस । येऊनिया करविर क्षेत्रास । श्रीरामदेउळीं बैसला ॥८७॥
भजन करितो कीं सप्रेमभरें । तो बर्व्हाजीपंत सुभेदार । देवीदर्शना येतां सुमित्र । देखिला विरक्त जालासे ॥८८॥
नेऊन सदनाला धरितु मानस । प्रार्थूनि करितसे परामर्ष । धन्य दासाचा प्रथम सिष्य । बरावाजीपंत जाणता ॥८९॥

॥अभंग॥ मित्र व्हावा तरी ऐसा चि जाणता । न धरी अहंता हित साधी ॥१॥
कृत्रिम कपट गर्ज गोई नाहीं । न पाडी विषईं संशयांत ॥२॥
मांडता विपत्य राखी नानापरी । साटलोटावरी नाहीं दृष्टी ॥३॥
द्रव्य लालुचीनें नसे मित्रभेद । क्लेशकारी वाद खेद नाहीं ॥४॥
मायबापबंधु बहिणी दारापुत्र । थोर प्रीतिपात्र तयाहुनी ॥५॥
नुन्य तें नुच्चारी पैशुन्य न बोले । कहीं न कंटाळे पीडीतां ही ॥६॥
वाटेकरी करी स्वात्मानंदसुखा । पुण्यरासीसखा मित्रावत ॥७॥

॥वोवी॥ कन्या उपवरा होती भगिनी । ते अर्पिली विधीनें मित्रालागुनी । संसार करवितु नीट सदन करुनी । आपुल्यासमान मानानें ॥९०॥
रखुमाबाईचें निर्मळ मानस । संतानास्तव अंबेला करितां नवस । प्रथमपुत्र जाला नाम तयास । अंबाजी ऐसें ठेविलें ॥९१॥
नवसास पावला अत्रिपुत्र । दुजा दत्तोबा जाला कुमर । कन्या येक जाली तो अनुताप भरें । न सांगतां गेला पिता तो ॥९२॥
जाऊन कासीला जाला सन्यासी । सार्थकीं लाविला जन्म सायासी । मुलें ते राहिलीं मातुळापासी । तेथें पातले स्वामीनीं सिष्यास्तव ॥९३॥
अंबाजीचीं अक्षरें पाहून । पूर्वोत्तरीची वळखोन खूण । पुसोन सिष्याला चौघा नेऊन । उपदेशून तारिलें केलें सुखी ॥९४॥
अंबाजीपंत तो चि कल्याण । डोंबगांवी राहिले येऊन । परी सर्वदा हि सद्गुरुध्यान । लागोन प्रेमें आळविती ॥९५॥

॥पद धाट॥ (तो जाणावा निज सं०) ॥ नेति नेति श्रृति ह्मणती । पार न कळे तुझा किती ॥१॥
गुरुदेवदेवा हां हां ॥धृ॥ आगमनिगमगति शेष विशेष स्मृति । आकळ न कळे तुझी स्छिती ॥२॥
जीवन सज्जनाचें धाम कल्याणाचें ॥३॥

॥धा०॥ (रामरायाच दृढ लागो.) जय जय श्रीगुरुराया श्रीगुरुराया ॥धृ०॥
अजरामरा अलक्ष्य अपारा । वाहिन मी निजपदीं काय ॥१॥
नित्यानंदा नित्य परिपूर्णा । निरसी दुर्घट माया ॥२॥
सकळ चराचर मुनिवर सुरवरा चिंतिति तुझिया पाया । रित्धिसित्धी दासी होउनि मुक्ती तिष्ठती । पावावया तुझिया ठाया ॥४॥
कल्याण दासा हृदयनिवासा । भावितसे प्रेम छयाया ॥५॥

(धा०॥ सामर्थ्याचा गा०) ॥ शेष श्रमला ह्मणती नेति नेति । काय करुं मी स्तुती मानव मंदमती ॥१॥
धन्य सद्गुरु रामा मज न कळे तुजा महिमा । सिमा च होती नि:सीमा पुराण पुरुषोत्तमा ॥२॥
ब्रह्माविष्णुहर त्याहुनि परात्पर । विश्रांतीची थार मायेविण माहेर ॥३॥
सद्भाविकाला फळला । थोर लाभ जाला । अनुभव हा सज्जनाला । वाचें राम बोला ॥४॥
नाम ह्मणतां वाचें । पद लाभे स्वामी चें । धामचि कल्याणाचें । तपफळ जन्मांतरिचें ॥५॥

॥वोवी॥ स्तवीत यावरी ह्मणती भवहर । आह्मा अपराधियां केलें दूर । परि योगिनाथ मर्जी नाजुक फार । स्छितिगती इतरा न कळे ची ॥९६॥
सेवा करा हे न ह्मणती कधीं । कोण ऐसे पां अंतरवेधी । न धरितां ईलु ही आतां उपाधी । जाले उदासी अतिशय ॥९७॥
मोठया धैर्यानें मर्जि राखून । करवील कोण पां स्नान भोजन । बैसोन सन्निधीं पादसेवन । करीत सुखगोष्टी काढील ॥९८॥
कवणापासीं न देती झोळी । न देखो प्रीतीचा मागणार बळी । काननासि निघतां तये वेळीं । सांवरीत कोण जाईल ॥९९॥
अल्पबुद्धीचे होतां अपराधी । कोण नेऊन घालील पदीं । संतसाधूच्या मिळतां मांदी । तुष्टवील कोण न सांगतां ॥१००॥
प्रेमस्छितीचा येतां उद्गार । करितां त्वरेन कवनोच्चार । सर्वज्ञ कोणता संवे चि लिहिणार । जाणणार चिंतिल्या अर्थाते ॥१॥
गमत हो ऐसें माझिया मना । परि अद्भूत करणीचा सद्गुरु राणा । कवणास वोपिती किं वेशभूषणा । लीळा कवणा ही न कळे ची ॥२॥
आठवीत लीळा करिती तळमळ । धन्य सद्भक्तु कल्याण प्रेमळ । सिष्यजन होऊं प्रबुत्ध केवळ । नाना परीनें संरक्षिती ॥३॥
रात्रौ फिरफिरों पाहती तयांत । उठविती निजविती सांगती ग्रंथ । सांवरुन तयाचे ठेविती पदार्थ । पुरविती आर्त धरिती ते ॥४॥
सिकविती नाना कळा नीट । दाविती स्वहित परमार्थवाट । नेणो जयाला सिष्यजन सगट । गुरुरुप चि भासती ॥५॥

॥पद॥ (धाटी देव देवाचा श्रीराम अ० ) ऐका हो एका भाव हा निका ॥धृ०॥ वदुनि सिष्यजनाप्रति ब्रह्म । वाइट चिंतुनि न वदे वर्म ॥१॥
भासती गुरुला देव चि जेव्हां । सद्गतीपदवी पावती तेव्हां ॥२॥
ब्रह्मानंद वंदुनि पुटती । न भावि गुरुला नरतनुमूर्ती ॥३॥
परमार्थाची धरुनि वाट । किमपी न मनी त्रासुनि वीट ॥४॥
आत्माराम चि होउनि बोधें । गुरुदास्याचा ज्याला वेध ॥५॥

॥वोवी॥ हें आसो प्रबुत्ध ते होऊं भक्त । दासवचन सांगती वरद युक्त । न लेहववे ग्रंथीं वाक्य समस्त । येक दोन वचन अवधारा ॥६॥
अष्टाक्षरी । युक्ति नाहीं बुत्धि नाहीं । विद्या नाहीं वि०॥ श्लो०४॥

॥पद॥ (राग कानड धाट कष्ट करीती ज० मन विषयात०) कांहीं येक रुचि तो बरें । अरुचीनें मनभंग ॥धृ०॥
दूधतूप साखरमांडे । आलें निंबें दहीभात ॥१॥
भक्ष वादेन परमान्न प्रकारें । लेय पेय चोष्य खाद्य ॥२॥
मीत्र सखे यहीलोक परत्री आवडीने आलोलिक ॥३॥
अंतर राखे तो सुख चाखे । दास ह्मणे हें प्रमाण ॥४॥

॥वोवी॥ कल्याणस्वामी धन्य पद्महस्ती कृपा करितां चि द्रवोन चित्तीं । सवें चि त्या पाठीराखे मारुती । होती परमार्थी बहुयोग्य ॥७॥
शिवरामस्वामी आपचंदकर । जगन्नाथबावा थोर चतुर । रामचंद्रबावा धीर गंभीर । आण्णाजी बावा सात्विक ॥८॥
शिवरामबावा शंकरबावा । ऐसे जे राखिते परमार्थठेवा । या सारिखा जाला समुदाव बरवा । गुरुकृपा पूर्ण संपादुनी ॥९॥
मुळीं च गुरुदेवा न ठावा कपट । क्रिया सर्वानीं करिती चोखट । लाल गुरुचा जाणोन बळकट । सदां सावरीतु बलभीमा ॥११०॥
कोणी हो तेथें धरितां कृत्रिम । किमपी तयाचा न चाले उदिम । येकदां येक तो सिष्य चतुर परम । विचळोन भावार्था विसरला ॥११॥
उभेला असतां सन्निधानीं । तो पदार्थ आणी ह्मणतिलें गुरुधणी । डोळे न दिसती हे कल्पना धरुनि । नाहींच ह्मणतिल त्रिवार ॥१२॥
ऐकोन तयाचें कृत्रिम वाक्य । रागेजोनियां बोलिले देशिक । कां ह्मणाल तयाचा धुवोन कळंक । पुन्हां सन्मार्ग दावावया ॥१३॥
अरे कापटय कां करिसी खोटा । गुरुराज माझा दयाळ मोठा । सर्व देखण्याचा समग्र सांठा । साठविलें असती नयनांत ॥१४॥
अरे मूर्खा रे तोंड न दावी । पावसील सीक्षा उठोन जाई । हें ऐकोन धैर्य तें न थार हृदई । राणोमाळ पळाला ॥१५॥
प्रसादीक तो कैसा ही भला । सांगा जाईल कैसा नाडला । थेट चि पातला इंदुराला । बैसला सदृढ हरीपासी ॥१६॥
पाहोन तयाची दृढतरा भक्ती । अपेक्षीत माग रे ह्मणे मारुती । येरु विनवितु गुरुपदप्राप्ती । होय मज ऐसें करावें ॥१७॥
कल्याणास सांगूं जातां कपिवर । तुह्मी च कीजे ह्मणे उत्धार । तो गुरुकृपा वांछी सिष्यचतुर । गुरु वदे गुरु तुह्मी च कीं ॥१८॥
सेवटीं कल्याणा हरि वदे ऐक । समर्थगुरुला मान्य मम वाक्य । कां निष्ठुर होसी ह्मणतां हरिखें । विनविलें धाडा त्या झडकरी ॥१९॥
हें सिष्यास सांगता दुर्घटण साध्य । निघाला गुरुकडे होऊनि सावध । योग करुं पाहतां संतर्पणविध । तो प्रसाद गुरुचा पुरे ह्मणे ॥१२०॥
येकवीस दीन ते लोटले तपांत । पातला न ह्मणतां दिवसभरात । अधिक पात्र मांडतां सद्गुरुनाथ । सर्वासि वाटलें आश्चिर्य ॥२१॥
ससांग इकडे जालें वाढणें । तो शिष्य ही पातला सोंवळ्यानें । नमनांतीं पात्रावरि बैसऊन । तीर्थप्रसाद वोपिलें ॥२२॥
संकल्प उगऊं हरि तुष्टोन । संतर्पण करविलें होतें सर्वज्ञ । ससांग जाल्यावरी भोजन । विडा घेऊन बैसले ॥२३॥
तोषुनिया वदले देशिक । धन्य सिष्य हा विरक्त भाविक । मूळ आमुचें जें या जालें ठाऊक । परात्पर गुरु ज्या प्रसन्न ॥२४॥
वस्त्रभूषणवरदानयुक्त । देऊन धाडितां तो जाला महंत । येकदां येकाला विद्या प्राप्त । जाली तांबोल शेषानें ॥२५॥
येकदां येकाला पोटशूळ । उठोन करितां फार चि तळमळ । फिरवितां कृपेनें हातींची माळ । तात्काळ चि तो सुखावला ॥२६॥
अद्यापवरी तो असे दंडक । सादृश्य जंवरी होते देशिक । कवणा ही कवणीं न होत च दु:ख । ऐसें कृपाळु गुरुवर्य ॥२७॥
चौसिती सिष्य ते मुख्य मुख्य । स्त्रीशूद्र आगळे भोळे भाविक । गृहस्थ निस्पृही सित्ध साधक । जगदोत्धारक जाले भले ॥२८॥
पूर्णाधिकारी होती तयाला । धाडिले महंती करावयाला । आदरिले गुरुंनीं जेवि आपणाला । तैसे च अभर करिताती ॥२९॥
गुरुदत्त हें हुर्मुजी वसन । रंगीत सर्वांगीं देती प्रावर्ण । उदारपणानें वोपिती निशाण । एवं उपासनाप्रीत मोठी ॥१३०॥
येकदां चालत असतां मार्गी । थोर थोर पातले दर्शनालागी । विणा लपवा रे ह्मणतिलें वेगी । कां ठेवितील नाम हरिदास ॥३१॥
रामदासी हें नामाभिधान । प्राप्त होणार बहु सुकृतानें । नामपलटाचं न कीजे करणें । ह्मणोन पुढारी चालिले ॥३२॥
रामउपासक हो कां दुर्बळ । लेखिती तयाला रामसमतुल्य । धडु कां असेना गुरुभक्त प्रेमळ । जिवीचा जिव्हाळा त्या भाविती ॥३३॥
कोणी असो कांनिजभक्तिवान । ऐकतां मारुती संतर्पण । रामायणाचें करुं श्रवण । अव्हेर किमपी न करिती ॥३४॥
कैसि कां करीना कोणी कथा । नुन्यत्व बोलणें नाहीं सर्वथा । कहीं च न धरिती धनाची आस्था । साधुसंताला बहु मानिती ॥३५॥
अल्प कविनीं रामायण । करुन करवितां पढोन श्रवण । तेथें न काढितां नुन्यत्व वचन । देवऊन धनमान तुष्टविलें ॥३६॥
येकदां चैत्रीचे उत्सावदिनीं । जगन्नाथबावा शिष्य सद्गुणी । कृष्णासि दृष्टांतीं आणितां कीर्तनीं । शाहणा हा कवण रे ह्मणतिलें ॥३७॥
उत्साव कोणाचा दिवस कोणते । आपण कोणाचा कां कटावरीत । हे सद्गुरुमुखींची ऐकोन मात । पडताळून ह्मणतिलें पद ऐका ॥३८॥

॥पद॥ जगन्नाथबाबाचें ॥धा०॥ (काय उतराई होऊ०) दावा त्रिभुवनी कोणी सम त्या श्रीरामा रे ॥धृ०॥
कोणी पोहे आणी भाजीपत्राची आशा रे । कोणी पांडत्रयभूमीका इछा ग्रहवासा रे । कोणी भक्षुनि कुमरा कोणी निजमाता मारा । आणिखी त्या मामा रे ॥१॥
कोण्हाची विपरीत स्वरुप नेत्रा प्रिय नव्हती रे । जिव्हाग्री त्याची नाम कोणी न स्मरती रे । कोणा आजन्म फेरी धुंडावे ग्राम च्यारि । प्रारब्धमहिमा रे ॥२॥
कोण्ही पादत्रय श्रृंग च्यारी द्वय शीर रे । पाणी सप्त जा वहन बस्ता हे परी रे । नाहीं तो शीत स्वरुपीं अनुदिन तीव्र तापी । कैंची त्या सीमा रे ॥३॥
लीळाविग्रही स्वरुपे सच्चिद्धनगाभा रे । दृष्टी पाहता कोटी मदनाची शोभा रे । कमलानन कंजविलोचन । अंगीं संपन्नषड्गुण । स्मर त्या अभिरामा रे ॥४॥
जाणे शैल्यजा ना हो नामीची गोडी रे । दमुनी दशमुखा निर्जरकारागृह तोडी रे । ऐसा जगन्नाथजीचे कीर्तनामागें । शिवाजीबावा उठिले मग । कीर्तनीं तुंबळला अगाध रंग । पद येक दोन श्रवण करा ॥३९॥

॥पद॥ धा० कल्याण० ॥ नाचत गा वदनीं रघुवीर ॥धृ०॥ प्रेमभरें करताळ उसाळ । छंद जिभेरदनी ॥१॥
भाविक हे जन सज्जन श्रोती । न निघती काळकदनी ॥२॥
स्वरुप सुखालय कल्याणकारक । पावसी शिव सदनीं ॥३॥

॥धा० (कौसल्याबाई बोल गु०॥) राघवरायासमतुल्य देव नाहीं भुवनत्रैं ॥धृ०॥ तंदुळपोहे मुष्टि दोनी घेउनि । सुदामया लागुनी । दिधली नगरी ह्मणती जनी । विशेष करणी कैसी हे ॥१॥
ऋषिवर छेळितां पांडव राणी । धांवे ऐकत धावा करणी । करतळ पसरुनि ह्मणे बहिणी । घाली शेष शाकेचें ॥२॥
त्रिपांड भूमिका घेउनि वामन । वाटे अद्भुत जिंकी त्रिभुवन । सूतळराज्य बळीस देऊन । रक्षण तिष्ठत द्वारेसी ॥३॥
घेउनि देती उदंड देव । तैसा नव्हे राघवराव । नमनासाटि बिभीषण भाव । जाणोनि दिधलें राज्यातें ॥४॥
ज्याच्या नावें पर्वत रती । जडजीव कल्याणी रातती । ज्याचि किर्ती शिवादि गाती । रामभजनी निजनिष्ठा ॥५॥

॥वोवी॥ वानिलें यापरी भूजा रमणा । गुरुराया आवडे हे चि उपासना । कांहींच नेणती श्रीरामाविन्हा । परि सर्व देवासि मानिती ॥१४०॥
ऐसें बहुतांनीं केलें कीर्तन । श्रोतेनो येथें कराल अनुमान । दासादिकाचें टाकुनि वचन । स्वकवनाख्यान कां केलें ॥४१॥
तरि कल्याणदातया थोर संतोष । प्रौढदशाते पावतां सिष्य । सिष्यजनकवचनाचें ऐकों सौरस । आज्ञा होती हो आधीं च ॥४२॥
कल्याणस्वामीची प्रीत युक्ति बहु । सिष्यास सिकविलें नदींत पोहुं । न दिधलें कळा त्या कांहीं च राहूं । पूजाफळ घेऊं योजिती ॥४३॥
कल्याणस्वामी परम उदार । भोवतें मिळतां सिष्यजन चतुर । समर्थाचें सांगती चरित्र । ते सीकती गाती कीर्तनीं ॥४४॥
पद श्लोकादि बीर अभंग । वदोन कळविती रहस्य सांग । महंतीत कीर्तनी बुद्धिवादमार्ग । कथिले भवभंग जे कांहीं ॥४५॥
देवगंगेचे संपूर्ण आप । जेवि खर्चेल येक मुख माप । संतुष्ट पावया सेऊं स्वल्प । तीर्थ सेवा हो श्रोतेनो ॥४६॥

॥वचन॥ राजदरबारी पंडितांनीं पैशून्य बोलिले तेव्हां ॥

॥पद॥ धृवक ॥ उगवतां दिनमणी । आनंद नळणी । ढोकळा पारणी । न घडे न घडे ॥१॥
देखतां निशिपती चकोर तृप्त होती । परि वायसा पंगती न घडे० ॥२॥
स्वानंदयुक्त श्रव सोमकांत । गुंडयास सांगतां न० ॥३॥
कोकिळाचें गायनें सकळां समाधान । श्रोत्रमंदा मान । न०॥४॥
रत्नाचें परिक्षणें डोळसा चि लाहणें । तेथें गर्भांधा पाहणें ॥न०॥५॥
तैसें रामदासीं ब्रह्म स्वतसिद्ध येक । तेथें पाषांडाचा तर्क न घडे न घडे ॥६॥

॥वचन॥ संतसमुदाईं खटयाळ कां न तरले ह्मणुन पुसतां बोलिले ॥

॥पद॥ डफगाण॥ मैलागरीचि संगतीं खैर धामाड चंदन होती । परि ते वेळुवाची जाति नव्हे चंदन ॥१॥
सहजगुण त्या चंदना बुरस गुण त्या हिंगणा । तैसेम सज्जना आणि दुर्जना सहज गुण ॥२॥
सज्जन पदोपदीं निववी । दुर्जन पदोपदीं दु:ख दावी । ह्मणुनि आदरें करावी सज्जनसेवा ॥३॥
नको दुर्जनाचा वारा दु:ख होतसे उबारा । मज न्यावें जी सेजारा सज्जनाच्या ॥४॥
दास ह्मणे भल गाईल साधुसंतासी मानील । जैस क्षीर निवडल राजहंसी ॥५॥

॥वचन॥ तुळजापुरीं गोंधळांत गाईल ॥

॥पद॥ पायी च्यामरी । वेधू लागला छंदु लागला । भावें पाहतां देव लाधला ॥धृ०॥
येकला रे येकला रे । करि खटपट खोकला रे ॥१॥
बोलवितो चालवितो । दास ह्मणे जग हालवितो ॥२॥

॥वचन॥ राग कामोद ॥धा०॥ कारण पा० ॥ साजण सुजातीसी करितां संतोसी होसी । जळ हें सकळासि निववी रे ॥धृ०॥
अमृत लाधलें जरी अमर जिवातें करी । ते ही उणी सरी सज्जनाची रे ॥१॥
जयाचें सांगणें वाड पुरते जिवीचे कोडें । अमृतापरिस गोड संग रे ॥२॥
दु:ख तें सकळ जाये आनंद पोटीं न माये । तयासि उपमा काय द्यावी रे ॥३॥
रामदास ह्मणे संग साधूचा नव्हे वोरंग । चलेना अचळ अंतरंग रे ॥४॥

॥पद॥ राग हुशेनी) लोभें नाडिलें वासनाबंदीं पाडिलें ॥धृ०॥ कैंच ज्ञान कैंच ज्ञान । कैंच समाधान ॥१॥
कैंचि भक्ति कैंचा भाव । कैंचा देव आठवावा ॥२॥
कैंचा राम कैंचा दास । लागली आस ममतेची ॥३॥

॥वचन॥ पंढरपुरीं कीर्तनीं गाइले ॥

॥पद॥ (राग मारु साजी रे) मेरा जी यहरजीसु लागिया सही ॥धृ०॥
धुंदत धुंदत ईंतनी भईरी । चुकिसु चुकि रही रे ॥१॥
सुरिज्यनहार सकळघट है भगत कहे रे नही ॥२॥

॥वचन॥ कीर्तनी गाईले ॥

॥पद॥ (कपि सकळही प्रयाण काळी ॥) रे मी येत होतों तुझा तुजपासीं । पंथ क्रमिला बहुत सायासीं । चित्त उतावेळ तुझिये भेटिसी । ऐसें जाणवलें अभिमानमैंदासी रे रामा ॥१॥
अभिमानापासुनि सोडवावें । तुज न येता शरण कोणा जावें रे रामा ॥धृ०॥
येवढें संकटी आतां पावेल कोण । मज रे सोडिता नाहीं तुजवीण । तुज बोहतां बहुत जाला सीण । धाव धाव आतां न पाहे निर्वाण ॥२॥
मज रे सींह्याच्या पिल्याची बाळलीळा । देखुनि जंबुक मद केला आगळा । ऐसें जाणवलें श्रीरामदयाळा । रामदास केला अहंतेवेगळा रे रामा ॥३॥

॥वचन॥ सिष्यलोकांस व भाविकांस बुधिवाद ॥

॥श्लोक॥ आमकें चि नको वमकें तमकें । निजसारविचार करि गमकें । बहु छंद प्रबंद भला यमकें । चटकानटकोनि गुणी चमके ॥१॥
स्वप्न सरे विसरे नरप्राणी । तेल्लची लालुची वाटे सिराणी । थारे प्रपंच विसंच विसंचे । सीण करुनि कदापि न संचे ॥१॥

॥वचन॥ पराधेनपंचक॥

॥अभंग॥ सुंदर आळशाची बाईल । पुढें काय रे खाईल ॥१॥
ज्याचे वडील आळसी । कोण सीकवावें तयासी ॥धृ०॥
घरीं खाया ना जेवाया । नाहीं लेया ना नेसाया ॥२॥
यत्नी उदंड चि खाती । आळसी उपवासी मरती ॥३॥
दास ह्मणे सांगो काय । हा तो प्रगट उपाय ॥४॥

॥ऐसें कैसें रे भजन ॥ करिताती मूर्ख जन ॥१॥
गधडयास नमन केलें । तेणें थोबाड फोडिलें ॥धृ०॥
कुतर्‍यास पुजूं गेला । तेणें तेथें चि फाडिला ॥२॥
उंचनीच सारिखेचि । दास ह्मणे होते चीची ॥३॥

॥आमुचें वंशीं कैंचा राम । येक पीढीयेचें काम ॥१॥
रामदास्य आलें हाता । आवघा वंश धन्य आतां ॥धृ०॥
बाप लेकी उपार्जना । आह्मी लाधलों साधना ॥२॥
बंधु अभिळास टेकला । वाटा घेऊन भिन्न जाला ॥३॥
पोरें सकळा संकोचलें । येकट सुखी उधळलें ॥४॥
रामीरामदास स्छिती । पाहिजे वडिलाची रीति ॥५॥

॥श्लोक॥ अष्टाक्षरी मनें मनासी मीळणी । (श्लो. ५ तिसरा भाग स्फु. श्लोक ३६ पहा)

॥कळा कळाचि वीकळा । (श्लो. ५ तिसरा भाग स्फु० श्लो. ४० पहा)

॥वचन॥ रामघळींत येकांतमहिमा कथिले ॥

॥श्लोक॥ येकांत गुहा निर्वात जेथें । चर्चा करावी अद्वैत येथें । संसर्ग खोटा इतरा जनाचा । जयास नाहीं वर सज्जनाचा ॥१॥
सत्संगती ज्या नरासि नाहीं । तें भ्रांत प्राणी पडती प्रवाहीं । संदेह चित्तीं सहसा टळेना । सित्धांत साधूविण आकळेना ॥२॥

॥वचन॥ ताक पीउन गरीब बाईचेथें प्रशांशीले ॥

॥श्लोक॥ मला लागतां उष्ण मी कृष्ण जालों । परि सेवितां तक्र सूखें निवालों । महा तक्र स्वाधिष्ठ तो शक्र नेणें । तया मानवी जीव हा काय जाणे ॥१॥

॥वचन॥ कथाप्रशांश केलें ॥

॥श्लोक॥ कळींमाजिं भूमंडळीं सार आहे । हरिकीर्तनें दोष कोठें न राहे । पवित्रें चरित्रें रघुनायकाचीं । धरावीं मनीं आदरेंसी फुकाची ॥१॥
हरिकथा श्रवणें हरि सांपडे । सकळ सार कथा श्रवणीं पडे । परम दुल्लभ तें पाहणें घडे । अहंमता ममता मग वीघडे ॥२॥

॥वचन॥ रामवर्णन प्रताप ॥

॥श्लोक॥ देवा मंडण दैत्य खंडण उभा वक्रांग ठाणें रणीं । धाके चक्कित काळ थक्कित मनीं वर्षाव तारांगणीं । भूमि दंडळ सूर्यमंडळ रजें नि:शेष झांकोळलें । बाणीं जर्जर दैत्य निर्जर बळें कारागृहा फोडिलें ॥१॥

॥मारुतीजयंतींत बोलिलें स्त्रोत्र ॥

॥हनुमंता रामदूता । वायुपुत्रा महाबळी । ब्रह्मचारी कपीनाथा । विश्वंभरा जगत्पते ॥१॥
दानवारी कामांतका । शोकहारी दयानिधे । महारुद्रा मुख्यप्राणा । कुळमूर्ति पुरातना ॥२॥
वज्रदेही शोकहारी । भीमरुपा प्रभंजना । पंचभूत मूळमाया । तूं चि कर्ता सकळहि ॥३॥
स्छितिरुपें तूं चि विष्णु । संहारकापशुपते । परात्पर स्वयंजोती । नामरुपा गुणातीता ॥४॥
सांगतां वर्णितां येना । वेदशास्त्रा पडे ठक । शेष तो सीणला भारी । नेतिनेति पदास्मृति ॥५॥
धन्य अवतार कैसा हा । भक्तालागि परोपरी । रामकार्य उतावेळा । भक्तरक्षक सारथी ॥६॥
वारितो दुर्घटीं मोठीं । संकटीं धावतो त्वरें । दयाळा हा पूर्णदाता । नाम घेतां चि पावतो ॥७॥
धीर वीर रणीं मोठा । मागें न होय सर्वथा । उड्डाण अद्भुत ज्याचें । लंघिले समुद्राजळें ॥८॥
दाउनी लिखितां हाती । नमस्कारी सीतावरा । वाचितो सौमित्र आंगें । रामसुखें सुखावला ॥९॥
गर्जतो स्वानंदमेळीं । ब्रह्मानंद सकळ हि । अपार महिमा मोठा । ब्रह्मादिकासी ना कळे ॥१०॥
अद्भुत पुछे तें कैसे । भोवडी नभ पोकळी । फाकले तेज तें भारी । झांकिलें सूर्यमंडळ ॥११॥
देखतां रुप पैं ज्याचें । ठाण अद्भुत शोभलें । ध्वजांग ऊर्ध्व तो बाहो । वाम हस्त कटावरी ॥१२॥
कासिले हेम कासोटी । घंटा किंकिणी भोवत्या । मेखळे जडिले मुक्त । दिव्यरत्न परोपरी ॥१३॥
माथा मुकुट तो कैसा । कोटिचंद्रार्क लोपले । कुंडलें दिव्य ते कानीं । मुक्तमाळा विराजिती ॥१४॥
केशरें देखिलें भाळीं । मुख सुहास्य चांगलें । मुद्रिका शोभती बोटीं । कंकण कर मंडित ॥१५॥
चरणीचे वाजती अंदु । पदीं तोडर गर्जती । कैवारी नाथ दीनाचा । स्वामी कल्याणदायकु ॥१६॥
स्मरतां पाविजे मुक्ति । जन्ममृत्यासि वारितो । कांपती दैत्य ते ज्यासी । भुभु:कार देतां बळें ॥१७॥
पाडितो राक्षस नेटें । आपटी महिमंडळीं । सुमित्र प्राणदाता च । कपिकुळांत मंडणा ॥१८॥
दंडिली पाताळीं शक्ति । अहिमहि निर्दाळिले । सोडिले रामचंद्राला । कीर्ति ही भुवनत्रयीं ॥१९॥
विख्यात वृंद तो कैसा । मोक्षदाता चिरंजीव । कल्याण याचिया नामें । भूतपिशाच्च कांपती ॥२०॥
सर्प वृश्चिक स्वापदादि । वीषसीतनिवारिक । आवडीं स्मरतां भावें । काळ कृदांत कांपती ॥२१॥
संकटी विध्वंसितो बाधा । दु:ख दारिद्र नासती । ब्रह्मग्रहपीडा व्याधी । ब्रह्महत्यादि पातकी ॥२२॥
पुरवितो सकळ हि आशा । भक्तकामकल्पतरु । त्रिकाळ पठतां सोत्र इच्छिलें पाविजे जनीं ॥२३॥
परंतु पाविजे भक्ति । संदेह कांहीं धरुं नका । रामदासीं साहकारीं । सांभाळितो परोपरीं ॥२४॥

॥जनीं ते अंजनीमाता । जन्मली ईश्वरी तनु । तनू मनू तो पवनू । येक चि पाहतां दिसे । श्लो०११॥

॥बीर॥ हनुमंत जब जनकदुहिताके शुद्धि लीनकु गगनगर्भ दौरे तब कंठ गुर्गुर्गुर्गुर्गुर्गुरीत । नेत्र गर्गर्गर्गर्गर्गरीत । रोम थर्थर्थर्थर्थर्थरीत । पुछ झ्यारे । लंकानायक रावण घर्घर्घर्घर्घर्घर्घर्घरीत । वन दवर दवरत । सीताशोक हरत सुख बन झर्झर्झर्झर्झरीत तब उखारे । तब कटक खोच खोच खोच खोचित इंद्रजीत करी नगर ज्यारे । ज्याल झक्मक झमक झक्मकीत हेमलंक लखलखीत जय दास मिले तब कपी भुबभुबभुबभुब पुकारे ॥१॥

॥वोवी॥ कल्याणस्वामीची स्छिती ऐसी । न सोडिती साधक धर्मासी । गुरुस्तौत्य करिती अहिर्णिसी । करिती सिष्यासी आपणासम ॥४७॥
कांहीं दृढतेच देखतां चिन्ह । सवें चि वोपिती प्रसादमान । ब्रह्मभोजनाच उच्छिष्ठ काढणें । नेमिलें कृपेनें पाटिलाकडे ॥४८॥
सांगूं जातां येकेक महिमान । मज पामराच न पुरे वदन । मुख्य दातयाच आज्ञाप्रमाण । भजन दासाच करावया ॥४९॥
यास्तव प्रार्थोन श्रीरामजीला । वर्णू अपेक्षितों समर्थलीळा । प्रार्थना पुनरुक्ति हें चि श्रोतयाला । व्हा करा पावन श्रवणानें ॥५०॥

॥अभंग॥ समर्थसदनीं जालों मी नारद । कीर्तनाचा छंद लागो मनीं ॥१॥
नेणो मी गावया साहित्य हि नाहीं । सर्व संतापाईं विदित चे ॥२॥
कोणी कां होईना धरितां दुर्गुण । तया दंडविन लीळा हाती ॥३॥
सर्वत्राच्या घरीं नाहीं आटकाव । निर्वैरता भाव असतां कीं ॥४॥
मुख्य आत्माराम भक्तप्रियकर । त्याचेनि आधारें वर्तणुक ॥५॥

॥वोवी॥ दासविश्रामधाम ऊच सौध । जेथें भरलासे सर्व आनंद । देवदेव जो सहितभक्तवृंद । आत्माराम नांदतो ॥१५१॥

॥इति श्री श्रीरामकृपा । तारकपरमार्थ सोपा । कल्याणस्वामी पंढरियात्रादि करित डोंबगावीं येऊन राहिले । जन्मकथन विस्तार । कपटी सिष्य तरला । परमार्थ विभववर्णन खंड येकसेहे पंधरा ॥११५॥ जय जय राम ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP