मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५६११ ते ५६२०

जनांस शिक्षा अभंग - ५६११ ते ५६२०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५६११॥
सेवटासी जरी आलें । तरी झालें आंधळें ॥१॥
स्वहिताचा लेश नाहीं । दगडा कांहीं अंतरीं ॥२॥
काय परिसासवें भेटी । खापरखुंटी झालिया ॥३॥
तुका म्हणे अधम जन । अवगुणचि वाढवी ॥४॥

॥५६१२॥
दुर्जनाचें अंग अवघें चि सरळ । नर्काचा कोथळ सांटवण ॥१॥
खाय अमंगळ बोले अमंगळ । उठवी कपाळ संघष्टणें ॥२॥
सर्पा मंत्र चाले धरावया हातीं । खळाची ते जाती निखळ चि ॥३॥
तुका ह्मणे कांहीं न साहे उपमा । आणीक अधमा वोखटयाची ॥४॥

॥५६१३॥
गोविंदा वांचूनी वदे ज्याची वाणी । हगवण घाणी पिटपिट ते ॥१॥
मस्तक सांडूनी सिसफूल गुडघा । चार तो अवघा बावळ्याचा ॥२॥
अंगभूत ह्मणू पूजितो वाहाणा । ह्मणतां शाहाणा येइल कैसा ॥३॥
तुका ह्मणे वेश्या सांगे सवासिणी । इतर पूजनीं भाव तैसा ॥४॥

॥५६१४॥
कुतर्‍या ऐसें ज्याचें जिणें । संग कोणी न करीजे ॥१॥
जाय तिकडे हाडहाडी । गोर्‍हवाडीच सोइरीं ॥२॥
अवगुणांचा त्याग नाहीं । खवळे पाहीं उपदेशें ॥३॥
तुका ह्मणे कैंची लवी । ठेंग्या केंवी अंकुर ॥४॥

॥५६१५॥
लाडाच्या उत्तरीं वाढविती कळहे । हा तो अमंगळ जातिगुण ॥१॥
तमाचे शरीरीं विटाळ चि वसे । विचाराचा नसे लेश तो ही ॥२॥
कवतुकें घ्यावे लेंकराचे बोल । साहिलिया मोल ऐसें नाहीं ॥३॥
तुका ह्मणे काय उपदेश खळा । न्हाउनि काउळा क्षतें धुंडी ॥४॥

॥५६१६॥
विष्ठा भक्षी तया अमृत पारिखें । वोंगळचि सखें वोंगळाचें ॥१॥
नये पाहों कांहीं गोर्‍हवाडीचा अंत । झणी टाका संत दुर्जनापें ॥२॥
भेंसळीच्या बीजा अमंगळ गुण । उपजवी दरुषणें ॥३॥
तुका ह्मणे छी थू जया घरीं धन । तेथें तें कारण कासयाचें ॥४॥

॥५६१७॥
चाकरीवांचून । खाणें अनुचित वेतन ॥१॥
धणी काढोनियां निजा । करील ये कामाची पूजा ॥२॥
उचितावेगळें । अभिलाषें तोंड काळें ॥३॥
सांगे तरी तुका । पहा लाज नाहीं लोकां ॥४॥

॥५६१८॥
शादीचें तें सोंग । संपादितां राजा व्यंग ॥१॥
पाहा कैशी विटबंणा । मूर्खा अभाग्याची जना ॥२॥
दिसतें तें लोपी । झिंज्या वोढुनियां पापी ॥३॥
सिंदळी त्या सती । तुका ह्मणे थुंका घेती ॥४॥

॥५६१९॥
भक्त ह्मणऊनि वंचावें जीवें । तेणें शेण खावें काशासाठीं ॥१॥
नासिले अडबंद कौपीन ते माळा । अडचण राउळामाजी केली ॥२॥
अंगिकारिले सेवे घडे अंतराय । तया झाला न्याय खापराचा ॥३॥
तुका ह्मणे कोठें तगों येती घाणीं । आहाचे ही मनीं अधीरता ॥४॥

॥५६२०॥
गयाळाचें काम हिताचा आवारा । लाज फजितखोरा असत नाहीं ॥१॥
चित्ता न मिळे तें डोळां सलों येतें । असावें परतें जवळूनि ॥२॥
न करावा संग न बोलावी मात । सावधान चित्त नाहीं त्यासी ॥३॥
तुका ह्मणे दु:ख देतील माकडें । घालिती सांकडें उफराटें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP