मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५८६१ ते ५८७०

जनांस शिक्षा अभंग - ५८६१ ते ५८७०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५८६१॥
न करिती एकादशी । आल्या जागरा अलशी ॥१॥
पुढें कोठें ऐसा लाभ त्यागी उपाय सुलभ ॥२॥
भुक न साहे तहान । निद्रा नायके कीर्तन ॥३॥
तुका ह्मणे आहे त्यासी । नर्का जाणें अगत्यासीं ॥४॥

॥५८६२॥
वर्जिली पंढरीची वारी । ह्मणे म्यां केली मुलुखगिरी ॥१॥
ह्मणे यांतिल आलें त्यांत । मुर्खा नकळे स्वहित ॥२॥
नित्य कंटाळे स्नानासी । विळे पोहे एके दिशीं ॥३॥
दुधासाठीं गाईला मारी । गोग्रास ह्मशीला चारी ॥४॥
न करी वैश्वदेव उपासना । तुपभात वाढी श्वाना ॥५॥
हट्टें जेवी एकादशी । रागें उपवाशी एके दिशीं ॥६॥
श्राद्धापक्षा हेळणा करी । वर्षापिराची कंदूरी ॥७॥
तुका ह्मणे ऐशा लंडा । जेथें भेटे तेथें दंडा ॥८॥

॥५८६३॥
गाईला देखुनी बदबदां मारी । घोडयाची चाकरी गोड वाटे ॥१॥
सोइर्‍यास करी पाहुणेर बरा । कांडवी ठोंबरा संतांलागीं ॥२॥
पानें फुलें नेतो वेश्येला उदंड । ब्राह्मणासी खांड देखों नेदी ॥३॥
पर्वकाळमासीं न टाके सुपारी । वेंची राजद्वारीं । द्रव्यराशी ॥४॥
बाइलेच्या गोता आवडीनें पोसी । माता पितृव्यासी भुवंडीत ॥५॥
तुका म्हणे ऐसे पडती आघोरीं । आणि जाच करी यमराव ॥६॥

॥५८६४॥
डोळां भरे धुर । धन संपत्ती वेव्हार ॥१॥
अंगीं जाणिवेचा ताठा । घाली वयसेचा जेठा ॥२॥
डोळां पातलें पटल । दृष्टी झालीसे बेंबळ ॥३॥
तुका म्हणे भरे । आंगीं मदाचें कां वारें ॥४॥

॥५८६५॥
दैन्यवाणा दिसे संसारींचा दास । धरिला वेठीस बेगारिया ॥१॥
करितां श्रमेना कष्ट तेही नाना । किंचित मानिना दु:ख त्याचें ॥२॥
प्रपंच जयानें केला हा निर्माण । तयाचें चिंतन विसरला ॥३॥
विसरुनी देव कुळींचा हा धर्म । स्नान संध्या नेम त्याग केला ॥४॥
तुका म्हणे खुंट नयेची वळणा । कुचराचा दाणा शिजों नेणे ॥५॥

॥५८६६॥
अडवोनी लोकां दीन दुर्बळासी । व्याजी लेख त्यासी आठवडे ॥१॥
मासा भर आठां दिवसां पंधरा । मुदतीस दारा उभा ठाके ॥२॥
न देतां चित्त या शिव्यादेती तया । भगिनी या माया एकमेकां ॥३॥
करी बडबड तोंडापाशीं हात । एक एका देत गाळीयासी ॥४॥
तुका ह्मणे अंतीं यमाचे संगती । सोसुनी फजिती नर्की पडे ॥५॥

॥५८६७॥
पती सांडुनीयां गुरु करिती रांडा । कलियुगीं भांदा व्यभिचारिणी ॥१॥
नामाचा तो गुरु भोग त्या शरीरा । देती कीं दुर्धरा महादुष्टा ॥२॥
ताउनियां खांब भेटवील यम । जाणावे तें प्रेम रांडांलागीं ॥३॥
तुका म्हणे तया नरकाची स्थिती । सांपडल्या हातीं यमाचिया ॥४॥

॥५८६८॥
तयावरी माझी काय ब्रिदावळी । भ्रष्ट येच काळीं क्रियाहीन ॥१॥
आतां थुंका थुंका त्याचे तोंडावरी । निवालितां थोरी त्याग वांयां ॥२॥
बाइलेचा दास पितरां उदास । भीक भिकार्‍यास नेदी दारा ॥२॥
विद्याबळें वाद करुनियां छळी । आणिकांसी फळी मांडुनियां ॥४॥
तुका ह्मणे नटें दाऊनियां सोंग । लवों नेदी अंग भक्तिभावें ॥५॥

॥५८६९॥
सासुनें केली होती सुन । सासू गेली ती मरुन ॥१॥
सासू मेल्या रडे सुन । भाव अंतरींचा भिन्न ॥२॥
मोलें घातलें रडाया । डोळां असूम नाहीं माया ॥३॥
आशेसाठीं गुंतल्या बाया । तुका ह्मणे गेल्या वांयां ॥४॥

॥५८७०॥
सहजें आळस । वरी गुरुचा उपदेश ॥१॥
मग कैंची आडकाठी । त्यासी विटाळाची भेटी ॥२॥
नाचरावें कर्म । नव्हे उचित तो धर्म ॥३॥
तुका ह्मणे ते गाढव । घेती मनामागें धांव ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP