जनांस शिक्षा अभंग - ५७९१ ते ५८००
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५७९१॥
कथेसी बैसुनी संसाराच्या गोष्टी । चांडाळ तो दृष्टी नको येथें ॥१॥
चंचळ कराल अती खोडकरी । ते ही पापें थोरी नको येथें ॥२॥
तुका ह्मणे भोळे भाविकांचें पायीं । ठाव मज देईं पांडुरंगा ॥३॥
॥५७९२॥
मायबापें केली आस । झाला बायकोचा दास ॥१॥
मानी बायकोच्या बोला । सख्या भावासी अबोला ॥२॥
बायकोला धटीपटी । आईच्या सोंवळयाला गांठी ॥३॥
तुका ह्मणे ऐशा नरा । मोजुन माराव्या पैजारा ॥४॥
॥५७९३॥
निंदकाचें चित्त सदां निंदेवरी । रात्रंदिवस करी निंदा फार ॥१॥
निंदा न मिळे जरि करी तळमळ । पातकी चांडाळ दुराचारी ॥२॥
निंदकाचे तोंडीं साबणाची वडी । देहाची पासोडी शुद्ध केली ॥३॥
निंदक हा माझा कंठिंचा ताइत । केलें तेणें हित माझें सर्व ॥४॥
तुका ह्मणे थुंका त्याचे तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥५॥
॥५७९४॥
सखी ते मेहुणी टांचेंचे काळिज । सांगतसे गुज एकांताचें ॥१॥
बायलेचा भाऊ सखा तो मेहुणा । नेतसे भोजना आदरेसीं ॥२॥
बायलेची माय होय सखी मामी । साडी नेसा तुम्ही रेशमाची ॥३॥
पाठीचा बंधू वैरीच दिसतो । वांटा तो मागतो संपत्तीचा ॥४॥
पाठीची बहीण वैरीण दिसती । जाउंद्या परती सासर्याशीं ॥५॥
ऐसिया पुत्रांशि काय बा करावें । घाण्यासीं जुंपावें तुका ह्मणे ॥६॥
॥५७९५॥
शब्दानें सांगतां देव नये हाता । शब्दा त्या कथा वाउग्याची ॥१॥
मुखें जें बोलावें अंतरीं असावें । त्या देव स्वभावें जवळीच ॥२॥
मुखें बोले एक अंतरीं अनेक । वायां करी शोक तुका ह्मणे ॥३॥
॥५७९६॥
खर जो धूतला महा तीर्थामाजी । कदां नव्हे तो जी श्यामकर्ण ॥१॥
ऐसा खळा केला काय उपदेश । नव्हे तें मानस शुद्ध त्याचें ॥२॥
जैसें त्या सर्पासीं पाजीयेलें पीयूष । अंतरींचें वीष जाऊं नेणे ॥३॥
तुका ह्मणे क्षीरीं श्वानाचें भोजन । सवेंचि वमन होय जैसें ॥४॥
॥५७९७॥
उगीच गेलों पंढरपुरीला । घरीं ठाऊक नव्हतें मला ॥१॥
चंद्रभागेचें रेंदा पाणी । नाहीं प्यालों वोंगळ वाणी ॥२॥
गांवा भोंवतालें फिरावें । वेळे उपवासी मरावें ॥३॥
टाळ मृदंगाचें घाई । माझें कपाळ उठतें बाई ॥४॥
देऊळासी जातां । तोबे मारिताती हाता ॥५॥
तुका ह्मणे रांडलेका । जिकडे तिकडे खासी ठोका ॥६॥
॥५७९८॥
जेणें केली बहुत मात ॥ ह्मणुनि नामा तो जामात ॥१॥
आला जांवई ऐकोनी । सासु आनंदली मनीं ॥२॥
सांगे बहुता जनांसी । आणा चला जांवयासीं ॥३॥
पंक्ती ब्राह्मण नावडे । मोठें जांवयाचें कोडें ॥४॥
तुका ह्मणे चित्तीं । अंतीं रांडेची फजिती ॥५॥
॥५७९९॥
लाभावरी ठेवुनी चित्त । असत्य करी न्याय नीत ॥१॥
त्याचे पूर्वजां पतन । नरकीं किडे होती जाण ॥२॥
रजस्वला त्या सुंदरा । विटाळ पाजीला पितरां ॥३॥
तुका ह्मणे त्यासी । देवा मुक्ती कैसी देसी ॥४॥
॥५८००॥
हरिदासाचें हो घेतां दरशन । नरकासी हो जाणें उभयतां ॥१॥
मातेपरिस कथा वाड । घेतां भाड लाज नाहीं ॥२॥
घेतां देतां नरकवासी । उभयतांसी रवरव ॥३॥
तुका ह्मणे नये गांवा । जाती हावां धरोनियां ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 08, 2019
TOP