मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५८४१ ते ५८५०

जनांस शिक्षा अभंग - ५८४१ ते ५८५०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५८४१॥
क्षुधा तृषा कांहीं सर्वथा न पाहे । पाहावया जाय कोल्हाटयासी ॥१॥
कथेसी साक्षेपें पाचारिलें जरी । ह्मणे माझे घरीं नाहीं कोणी ॥२॥
बळात्कारें तरी आणिलें कथेसी । निद्रिस्त लोडासी टेंकोनियां ॥३॥
तुका ह्मणे त्याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥४॥

॥५८४२॥
पाषाणाचीं घरें होती । सर्व उपयोगी येती ॥१॥
देह अधमाचा गेला । वांयां हरीसी चुकला ॥२॥
पशू देह कामा येती । जगीं अधिकारें गती ॥३॥
तुका ह्मणे हरीविणें । जन्म व्यर्थ विटंबणें ॥४॥

॥५८४३॥
करोनियां स्नान झालासे सोंवळा । अंतरीच्या मळा विसरला ॥१॥
उदकांत काय थोडे ते पाषाण । जाताती धुवोन अखंडता ॥२॥
फुटोनियां निघे अंतरीं कोरडा । पाणी तया जडा काय करी ॥३॥
तुका ह्मणे नाहीं हरीस शोधिलें । त्याचें सर्व केलें व्यर्थ जाय ॥४॥

॥५८४४॥
आयुष्याची केली हाणी । झाला पुत्र दारा धणी ॥१॥
धनमद अंगीं भरे । जैसें माजलें कुतरें ॥२॥
जन्मवरी देव गुरु । केला तयांचा अव्हेरु ॥३॥
तुका ह्मणे बोलूं काय । शिणविली तेणें माय ॥४॥

॥५८४५॥
अभाविक वाहवले । गुरु दास पार झाले ॥१॥
गळां बांधिला पाषाण । अहंकार प्राक्तनानें ॥२॥
पूर्व संचिताचें बळ । तया नाठवे गोपाळ ॥३॥
तुका ह्मणे बुडणार । कैसा होईल तो पार ॥४॥

॥५८४६॥
गासी तरी एक विठ्ठलचि गाई । नाहीं तरी ठायीं राहे उगा ॥१॥
अद्वैतीं तों नाहीं बोलाचें कारण । जाणिवेचा श्रम करिसी वांयां ॥२॥
तुका ह्मणे किती करावी फजिती । लाज नाहीं चित्तीं निलाजरा ॥३॥

॥५८४७॥
झाला बायको आधीन । आज्ञा पाळी मनांतून ॥१॥
आज्ञा भंगितां किंचित । ताडनासी दावी लात ॥२॥
जैसा बाईल काबाडी । ओझें घालुनियां झोडी ॥३॥
सोडियेलें देवराया । तेव्हां गेला त्याची रया ॥४॥
तुका ह्मणे पूर्व पाप । भोगवित आपेंआप ॥५॥

॥५८४८॥
विंचू सर्प गुणवंत । दुजयास दु:ख देत ॥१॥
तत्क्षणीं प्राण हानी । तया होय पापखाणी ॥२॥
तेवि खळ आचरती । पावताती अधोगती ॥३॥
तुका ह्मणे नारायणा । नको दृष्टी या दुर्जना ॥४॥

॥५८४९॥
रजताचे परी खळ । मळ क्षाळिती सकळ ॥१॥
निंदा करिती संतांची । राशी होती पातकाची ॥२॥
बरे उपकारी होती । मरायासी कामा येती ॥३॥
भक्तांसाठीं निर्मियेले । खळ माझिया विठ्ठलें ॥४॥
तुका ह्मणे पापखाणी । हित गेले विसरोनी ॥५॥

॥५८५०॥
वृथा कष्टली जननी । नऊ मास वागवोनी ॥१॥
देवां पितरां निरास । झाली जन्मला कां ऊस ॥२॥
धरी फकीराचा संग । विळे घोंटीतसे भांग ॥३॥
सोकटीस जीवप्राण । ठेवी सर्व गुंडाळून ॥४॥
तुका ह्मणे हरीविण । भूमीभार तो जन्मून ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP