जनांस शिक्षा अभंग - ५७८१ ते ५७९०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५७८१॥
बाइले अधीन होय ज्याचें जिणें । तयाच्या अवलोकनें पडिजे द्वाड ॥१॥
कासया ते जंत जिताती संसारीं । माकडाच्या परी गारोडयांच्या ॥२॥
बाइलेच्या मना येईल तें खरें । अभागी तें पुरें बाइलेचें ॥३॥
तुका ह्मणे मेंग्या गाढवाचें जिणें । कुतर्याचें खाणें लगवगा ॥४॥
॥५७८२॥
दगडाच्या देवा बगाड नवस । बाईल कथेस जाउं नेदी ॥१॥
वेची धनरासी बांधलें स्मशान । दारीं वृंदावन द्वाड मानी ।
चोरें नागविला न करी त्याची खंती । परी द्विजा हातीं नेदीं रुका ।
करी पाहुणेर व्याह्याजांवयासी । आल्या अतीतासी पाठमोरा ॥३॥
तुका म्हणे जळो धिग त्याचें जिणें । भार वाही सीण वर्म नेणे ॥४॥
॥५७८३॥
दिवसा व्यापारचावटी । रात्री कुटुंबचिंता मोठी ॥१॥
काय करुं या मनासी । नाठवे कां हृषीकेशी ॥२॥
वेश्येपाशीं रात्रीं जागे हरिकीर्तनीं निद्रा लागे ॥३॥
तुका ह्मणे काय झालासी । वृथा संसारा आलासी ॥४॥
॥५७८४॥
पापिया चांडाळा हरिकथा नावडे । विषयालागीं आवडे गाणें त्याला ॥१॥
ब्राह्मणा दक्षणा देतां रडे रुका । विषयालागीं फुका लुटीतसे ॥२॥
वीतभरि लंगोटी नेदी अतिताला । खीरम्या देतो शाला भोरप्यासी ॥३॥
तुका ह्मणे त्याच्या थुंका तोंडावरि । जातो यमपुरी भोगावया ॥४॥
॥५७८५॥
धिग तो दुर्जन नाहीं भूतदया । व्यर्थ तया माया प्रसवली ॥१॥
कठिण हृदय तया चांडाळाचें । जो नेणें पराचें दु:ख कांहीं ॥२॥
आपुला हा माण तैसे सकळ लोक । न करी विवेक पशु जैसा ॥३॥
तुका ह्मणे सुखें कापीतसे गळे । आपुलिया वेळे रडतसे ॥४॥
॥५७८६॥
क्षुधा तृषा कांहीं सर्वथा नावडे । पहावया धांवे कोल्हांटासी ॥१॥
कथेसी साक्षेपें पाचारिला जरी । ह्मणे माझ्या घरीं कोणी नाहीं ॥२॥
बळात्कारें जरी आणिला कथेसी । निद्रा घे लोडेंसीं टेंकुनियां ॥३॥
तुका ह्मणे थुंका त्याच्या तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥४॥
॥५७८७॥
रामनामाविण तोंड । तें तो चर्मकाचें कुंड ॥१॥
दास नाहीं विठोबाचा । तो हा लेंक दो बापांचा ॥२॥
ज्यासी न आवडे पांडुरंग । तो हा जातीचा हो मांग ॥३॥
तुका ह्मणे त्याच दिवशीं । रांड गेली म्हारापाशीं ॥४॥
॥५७८८॥
धन्या आतां काय करुं । माझें तान्हूलें लेंकरुं ॥१॥
धन्या अवचित मरण आलें । मज कोणासी निरविलें ॥२॥
माझें दार नका पाडूं । त्याचें हात पाय तोडूं ॥३॥
एके हातीं धरली दाढी । घे कुर्हाडी दुजे हातीं ॥४॥
येरी घाव घालूं पाहे । तंव तो उठोनि उभा राहे ॥५॥
तुका ह्मणे अवघीं चोरें । सेखीं रामनाम सोईरें ॥६॥
॥५७८९॥
जळो जळो तें सकळ । उत्तम याती उत्तम कुळ ॥१॥
ज्याची वाणी अमंगळ । कान उंदिरचें बीळ ॥२॥
सोडुनियां त्या हरीस । करिती अनेक सायास ॥३॥
तुका ह्मणे पिशी । वांयां गेली कीर्ति ऐशी ॥४॥
॥५७९०॥
देउळासी जातां लाजसी गव्हारा । दासीचिया घरा पुष्पें नेसी ॥१॥
संतांसी देखोनी होसी पाठमोरा । दाशीचीया पोरा दाम देशी ॥२॥
संत मागे पाणी नेदी एक चूळ । दासीसी अंघोळ सारी पाणी ॥३॥
संतांसी देखोनी करीतो ढवाळ्या । दासीचिया चोळया धूतो भावें ॥४॥
तुका ह्मणे त्याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : April 04, 2019
TOP