जनांस शिक्षा अभंग - ५९११ ते ५९२०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५९११॥
रिकामटी नाहीं वाचाळ करितां । घडी त्या अनंता आठवीना ॥१॥
ह्मणावे तें काय तया मूर्खासवें । जें जें कां सांगावें परवडे ॥२॥
कळोनियां नेणे करीतों मी काय । पुढें कैसें होय न कळेचि ॥३॥
संचितसे जोडी पतनाची इच्छा । होईल अवस्था पुढें कैसी ॥४॥
तुका ह्मणे जाती ऐसे ते अघोरा । यमाच्या पैंजारा खाती शिरीं ॥५॥
॥५९१२॥
नाहीं भय धाक वडिलांचा मोळा । न करी चांडाळा काय ह्मणों ॥१॥
नाहीं तें अनुज्ञा वेदांची मर्यादा । अप्रमादी निंदा करीतसे ॥२॥
न करी स्वहित सांगितली मात । पुढें असे घात काळ पाश ॥३॥
पसरोनि मुख बैसला जवळी । पुढें तरी नळी चेपावया ॥४॥
तुका ह्मणे जैसा मत्स्यालागीं बक । अधम ते लोक ग्रासितसे ॥५॥
॥५९१३॥
अंगाच्या भोवणीं चावळे भलतें । न पाहे पुरतें मागें पुढें ॥१॥
भ्रमलें भ्रांतीनें ओस दाही दिशा । दिसताती फांसा भवमूळ ॥२॥
तारुण्याचा मद अंगीं भरे ताठा । अंतरींचा खोटा रंग दावी ॥३॥
मागें नेणें कांहीं न पाहीच पुढें । जानोनियां पुढें घात करी ॥४॥
तुका ह्मणे खातो अविचारी साच । यमा घरीं मोचे मोजोनियां ॥५॥
॥५९१४॥
करी दुर्जनांसी साह्य । दंड लोहे तोही हा ॥१॥
काय शिंदळीचा बाटा । संग खोटा खोटयाचा ॥२॥
येरा कांचणीस भेटे । आंगीं उठे तेथोनी ॥३॥
तुका ह्मणे कांपूं नका । पुढें देखा शिकवी ॥४॥
॥५९१५॥
जाया अलंकार । होती बुडउनी चोर ॥१॥
त्यासी ताडनाची पुजा । येणें घडे बर्या वोजा ॥२॥
अभिलाषी सुखें । अंतीं होती काळीं मुखें ॥३॥
तुका ह्मणे चोरा । होय भूषण मातेरा ॥४॥
॥५९१६॥
एकीं हट केला । देह अत्यंत पीडिला ॥१॥
देवा ठायीं भाव । संत मानितो अभाव ॥२॥
आपुल्याच बोलें । काय पुढें भांबावले ॥३॥
तुका ह्मणे तोंड । जाणविती तें कुंड ॥४॥
॥५९१७॥
नेणे पुढीलांची सोय । वळा न्याय जोडिती ॥१॥
काय सांगो ऐशा जना । अवगुणां न सोडी ॥२॥
करुनियां उग्र तप । सांची पाप नसतां ॥३॥
तुका ह्मणे अप्रमादी ॥ पडे बंदीं यमाच्या ॥४॥
॥५९१८॥
जाणे पापकर्म । करी अनाचारीं श्रम ॥१॥
काय प्रारब्धाची गती । स्वल्प सोपें न करिती ॥२॥
असत्य वचन । सदा बोलती दुर्जन ॥३॥
तुका ह्मणे वेगें जाय । नर्का दोषियाची माय ॥४॥
॥५९१९॥
आन एक तया घरीं । दोषां उरी नसेचि ॥१॥
नाहीं थोर सान परी । वर्ते येरी सारिखें ॥२॥
समब्रह्म ह्मणे मुखें । करी सुखें पापासी ॥३॥
तुका ह्मणे सांगों काय । नाहीं सोय धर्माची ॥४॥
॥५९२०॥
निगमांची आज्ञा शिरीं । निरंतरी अतीत ॥१॥
काय म्हणावें त्या मुढा । होत वेडा जाणोन ॥२॥
सत्य सुकृत त्यागुनी । दोष मनीं सांचिती ॥३॥
तुका ह्मणे माय । जातो हांवा नर्कासी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 10, 2019
TOP