सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन २६१ ते २८०
लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.
२६१
कृतं ममाप्रियं तेन येनायं निहतो मृधे ।
इति वाचा वदन् हस्तृन् पूजयेत रहोगत: ॥१२।१०२।३७॥
‘संग्रामांत ज्यानें ह्या योध्याचा वध केला असेल त्यानें माझें अप्रिय केलें’ असे उद्गार तोंडानें काढावे आणि अंतस्थ रीतीनें त्या शत्रूला ठार मारणार्यांचा गौरव करावा.
२६२
कृतवैरे न विश्वास: कार्यस्तिव सुहृध्यपि ।
छन्नं संतिष्ठते वैरं गूढोऽग्निरिव दारुषु ॥१२।१३९।४४॥
वैर करणारा मनुष्य जरी मूळचा मित्र असला तरी त्याजवर विश्वास ठेवूं नये. कारण, लाकडांत दडून राहिलेल्या अग्नीप्रमाणें वैर गुप्तपणें वसत असतें.
२६३
कृतार्थो भुञ्जते दूता:
पूजां गृह्णन्ति चैव ह ॥५।९१॥१८॥
चांगले दूत कामगिरी पार पाडल्यावरच आराम करतात आणि सत्कार स्वीकारतात.
२६४
कृती सर्वत्र लभते प्रतिष्ठां भाग्यसंयुताम् ।
अकृती लभते भ्रष्ट: क्षते क्षारावसेचनम् ॥१३।६।११॥
उद्योगी पुरुषाला वैभव प्राप्त होतें आणि त्याचा गौरव होतो. आळशी मनुष्य (वैभवापासून) भ्रष्ट होऊन, जखमेवर खारें पाणी शिंपडलें असतां होणार्या दु:खाचा अनुभव घेतो.
२६५
कृपणं विलपन्नार्तो जरयाभिपरिप्लत: ।
म्रियते रुदतां मध्ये ज्ञातीनां न स पूरुष: ॥९।५।३४॥
शरीर जरेनें व्यापलेलें आहे, व्याधिग्रस्त होऊन करुणपणें विलाप करितो आहे आणि आप्तस्वकीय भोंवतालीं बसून रडत आहेत अशा स्थितींत जो मरण पावतो तो पुरुष नव्हे.
२६७
के न हिंसन्ति जीवान् वै लोकेऽस्मिन् द्विजसत्तम ।
बहु संचिन्त्य इति वै नास्ति कश्चिदहिंसक: ॥३।२०८।३३॥
(धर्मव्याध म्हणतो) हे द्विजश्रेष्ठा, ह्या मर्त्यलोकांत जीवांची हिंसा कोण करीत नाहींत ? ह्याविषयीं पुष्कळ विचार केला असतां (असें दिसून येतें कीं) खरोखर मुळींच हिंसा न करणारा कोणीच नाहीं.
२६८
को हि जानाति कस्याध्य मृत्युलोको भविष्यति ।
युवैव धर्मशील: स्यात् अनित्यं खलु जीवितम् ॥१२।१७५।१६॥
आज कोणाचा मरणदिवस आहे हें कोण जाणूं शकेल ? (अर्थात् कोणीच नाहीं. ह्यासाठीं) मनुष्यानें तरुणपणींच धर्मपरायण व्हावें. कारण, जीवित हें खरोखर क्षणभंगुर आहे.
२६९
को हि नाम पुमाँल्लोके मर्षयिष्यति सत्त्ववान् ।
सपत्नान् क्रध्यतो दृष्ट्वा हीनमात्मानमेव च ॥२।४७।३२॥
आपल्या वैर्यांच उत्कर्ष होत आहे आणि आपण मात्र हीन स्थितींत आहों, असें पाहून खरोखर कोणता बाणेदार पुरुष तें सहन करील ?
२७०
कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त: प्रणश्यति ॥६।३३।३१॥
(श्रीकृष्ण म्हणतात) अर्जुना, माझा भक्त कधींही नाश पावत नाहीं हें तूं पक्कें समज.
२७१
क्रव्यादा अपि राजेन्द्र कृतघ्नं नोपभुञ्जते ॥१२।१७२।२४॥
(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) हे राजश्रेष्ठा, मांसभक्षक प्राणीसुध्दां कृतघ्नाला भक्षण करीत नाहींत.
२७२
क्लीबा हि वचनोत्तरा: ॥५।१६२।४४॥
नामर्द लोक नुसते बोलण्यांत शूर असतात.
२७३
क्लेशान्मुमुक्षु: परजात् स वै पुरुष उच्यते ॥२।४९।१३॥
शत्रूकडून होणारी पीडा दूर करण्यास जो झटतो त्यालाच पुरुष म्हणावें.
२७४
क्षताभ्दीतं विजानीयात् उत्तमं मित्रलक्षणम् ।
ये तस्य क्षतमिच्छन्ति ते तस्य रिपव: स्मृता: ॥१२।८०।१९॥
(राजावर) येणार्या संकटाची भीति वाटणें हें (राजाच्या) उत्तम मित्राचें लक्षण होय आणि जे त्याचा नाश इच्छितात ते त्या राजाचे शत्रुच होत.
२७५
क्षत्रधर्मं विदित्वाहं यदि ब्राह्मण्यमाश्रित: ।
प्रकुर्यां सुमहत्कर्म न मे तत्साधुसंमतम् ॥१०।३।२२॥
(अश्वत्थामा कृपाचार्यास म्हणतो) क्षत्रियाचा धर्म जाणत असून जर मी ब्राह्मणधर्माला अनुसरुन (शमदमादिक) मोठमोठीं साधनें करीत बसेन, तर तें माझें करणें सज्जनांना पसंत पडणार नाहीं.
२७६
क्षत्रियस्य मलं भैक्ष्यं ब्राह्मणस्याव्रतं मलम् ॥८।४५।२३॥
भिक्षा मागणें हें क्षत्रियाला लांछन आहे, व्रतादिकांचा त्याग करणें हें ब्राह्मणाला लांछन आहे.
२७७
क्षत्रियस्य महाराज जये वृत्ति: समाहिता ।
स वै धर्मस्त्वधर्मो वा स्ववृत्तौ का परीक्षणा ॥२।५५।७॥
(दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो) हे महाराजा, युध्दांत जय मिळविणें हा क्षत्रियाचा व्यवसाय ठरलेला आहे; मग त्यांत धर्म असो किंवा अधर्म असो. स्वत:च्या व्यवसायाची चिकित्सा करुन काय फायदा ?
२७८
क्षत्रियस्य विशेषेण हृदयं वज्रसंनिभम् ॥१२।२२।९॥
क्षत्रियाचें अंत:करण विशेषेंकरुन वज्रासारखें कठीण असलें पाहिजे.
२७९
क्षत्रियस्य सदा धर्मो नान्य: शत्रुनिबर्हणात् ॥४।२१॥४३॥
सदोदित शत्रूचें पारिपत्य करणें ह्याशिवाय क्षत्रियाचा दुसरा धर्म नाहीं.
२८०
क्षत्रियस्य हि धर्मोऽयं हन्यात् हन्येत वा पुन: ॥७।१९७।३८॥
एक तर मारावें, नाहीं तर मरुन जावें हाच क्षत्रियाचा धर्म.
N/A
References : N/A
Last Updated : March 21, 2022
TOP