मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ४४१ ते ४६०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ४४१ ते ४६०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


४४१
न द्वितीयस्य शिरसश् छेदनं विध्यते क्वचित् ।
न च पाणेस्तृतीयस्य यन्नास्ति न ततो भयम् ॥१२।१८०।२९॥
आपलें दुसरें डोकें कोणी कापील किंवा तिसरा हात तोडील अशी केव्हांही भीति नसते. कां कीं, जें मुळांतच नाहीं त्याची भीति मुळींच नसते.

४४२
न धर्म: प्रीयते तात दानर्दत्तैर्महाफलै: ।
न्यायलब्धैर्यथा सूक्ष्मै: श्रध्दापूतै: स तुष्यति ॥१४।९०।९९॥
(धर्म उंछवृत्तीच्या ब्राह्मणाला म्हणतो) बाबा रे, न्यायानें मिळविलेल्या आणि श्रध्देनें पवित्र झालेल्या थोडयाशा द्रव्याच्या दानानें धर्म जसा संतुष्ट होतो, तसा केवळ मोठें फळ देणार्‍या दानांनीं संतोष पावत नाहीं.

४४३
न धर्मपर एव स्यात् न चार्थपरमो नर: ।
न कामपरमो वा स्यात् सर्वान्सेवेत सर्वदा ॥३।३३।३३॥
मनुष्यानें केवळ धर्माचेंच अवलंबन करुं नये, एकटया अर्थाच्याच पाठीमागें लागूं नये आणि नुसत्या कामाकडेंही सर्व लक्ष देऊं नये. परंतु (धर्म, अर्थ व काम) ह्या सर्वांचें सर्वदा सेवन करावें.

४४४
न नित्यं लभते दु:खं न नित्यं लभते सुखम् ॥१२।२५।२३॥
कोणालाही नेहमींच दु:ख होत नाहीं, किंवा नेहमींच सुख होत नाहीं.

४४५
न निर्मुन्य: क्षत्रियोऽस्ति
लोके निर्वचनं स्मृतम् ॥३।२७।३७॥
ज्याला अपमानाची चीड येत नाहीं तो क्षत्रिय नव्हे, अशी लोकांत म्हणच आहे.

४४६
न पश्यामोऽनपकृतं धनं किंचित् क्वचिद्वयम् ॥१२।८।३०॥
(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) दुसर्‍याला यत्किंचित् ही उपद्रव न देतां कोणाला केव्हां कांहीं धन मिळाल्याचें आमच्या पाहण्यांत नाहीं.

४४७
न पूर्वे नापरे जातु
कामानामन्तमाप्नुवन् ॥१२।१७७।२२॥
पूर्वकाळचे किंवा दुसरे कोणतेही लोक इच्छेच्या अंतापर्यंत पोचले नाहींत.

४४८
न बाह्यं द्रव्यमुत्सृज्य सिध्दिर्भवति भारत ।
शारीरं द्रव्यमुत्सृज्य सिध्दिर्भवति वा न वा ॥१२।१३।१॥
(सहदेव युधिष्ठिराला म्हणतो) बाह्य द्रव्याचा त्याग केल्यानें सिध्दि प्राप्त होत नसते. शरीरांत राहणार्‍या (कामक्रोधादिविकाररुप) द्रव्याचा त्याग करुनही सिध्दि मिळेल का नाहीं हा प्रश्नच आहे.

४४९
न बुध्दिर्धनलाभाय न जाडयमसमृध्दये ।
लोकपर्यायवृत्तान्तं प्राज्ञो जानाति नेतर: ॥५।३८।३३॥
बुध्दि असली म्हणजे धन मिळतें असें नाहीं आणि बुध्दिमांद्य असलें म्हणजे दारिद्र्य येतें असेंही नाहीं. लोकव्यवहार हा चतुर पुरुषालाच समजतो, इतरांना नाहीं.

४५०
न बुध्दिशास्त्राध्ययनेन शक्यं
प्राप्तुं विशेषं मनुजैरकाले ।
मूर्खोऽपि चाप्नोति कदाचिदर्थान्
कालो हि कार्यं प्रति निर्विशेष: ॥१२।२५।६॥
काळ प्रतिकूल असतां नुसत्या बुध्दिमत्तेनें किंवा शास्त्राभ्यासानें मनुष्याला विशेष लाभ होणें शक्य नाहीं. उलट, एकादे वेळेस मूर्खालासुध्दां कार्यांत यश येतें. तस्मात् काळ हाच कार्यसिध्दीच्या बाबतींत सर्वांत महत्त्वाचा आहे.

४५१
न ब्रह्मचार्यधीयीत कल्याणीं न दुहेत गाम् ।
न कन्योव्दहनं गच्छेत् यदि दण्डो न पालयेत् ॥१२।१५।३७॥
जर दंडानें लोकांचें संरक्षण केलें नसतें, तर ब्रह्मचार्‍यानें अध्ययन केलें नसतें, सवत्सा धेनूनें दूध दिलें नसतें आणि मुलीनें विवाह करुन घेतला नसता.

४५२
न लोके दीप्यते मूर्ख: केवलात्मप्रशंसया ।
अपि चापिहित: श्वभ्रे कृतविध्य: प्रकाशते ॥१२।२८७।३१॥
लोकांत नुसत्या आत्मप्रौढीनें मूर्खाचें तेज पडत नाहीं. परंतु जो खरा खरा विद्वान आहे त्याला एकाद्या गुहेंत लपवून ठेविलें, तरी तो चमकल्याशिवाय राहणार नाहीं.

४५३
नवनीतं हृदयं ब्राह्मणस्य
वाचि क्षुरो निशितस्तीक्ष्णधार: ।
तदुभयमेतत् विपरीतं क्षत्रियस्य
वाड्नवनीतं हृदयं तीक्ष्णधारमिति ॥१।३।१२३॥
ब्राह्मणाचे हृदय लोण्यासारखें मऊ असतें, परंतु बोलण्यांत तीक्ष्ण धारेच्या पाजवलेल्या वस्तर्‍यासारखा तो कठोर असतो, क्षत्रियाच्या ह्या दोनही गोष्टी उलट असतात. म्हणजे बोलणें मृदु पण हृदय कठीण.

४५४
न विश्वसेदविश्वस्ते विश्वस्ते नातिविश्वसेत् ।
विश्वासाभ्दयमुत्पन्नं मूलान्यपि निकृन्तति ॥५।३८।९॥
अविश्वासू माणसावर विश्वास ठेवूं नये. विश्वासू मनुष्यावर देखील अति विश्वास टाकूं नये. कारण, विश्वास ठेविल्यामुळें जर कांहीं भय उत्पन्न झालें, तर तें आपलीं पाळेंमुळेंदेखील खणून काढतें.

४५५
न वै मानं च मौनं च सहितौ वसत: सदा ।
अयं हि लोको मानस्य असौ मौनस्य तद्विदु: ॥५।४२।४४॥
मान व मौन हीं सर्वदा एकत्र राहत नाहींत. हा लोक मानाचा असून परलोक मौनाचा आहे असें म्हणतात.

(अन्न, स्त्री, इत्यादि भोगांच्या ठिकाणीं जो अभिलाष त्याला ‘मान’ असें म्हणतात आणि ब्रह्मानंदसुखाच्या प्राप्तीचें जें कारण त्याला ‘मौन’ असें म्हणतात.)
४५६
न वै श्रुतमविज्ञाय वृध्दाननुपसेव्य वा ।
धर्मार्थौ वेदितुं शक्यौ बृहस्पतिसमैरपि ॥५।३९।४१॥
शास्त्र समजून घेतल्यांवाचून अथवा वृध्दांचा समागम केल्यावांचून धर्म व अर्थ ह्या दोन पुरुषार्थांचें ज्ञान होणें बृहस्पतीसारख्या बुध्दिमान् पुरुषांनाही शक्य नाहीं.

४५७
न वै सुखं प्राप्नुवन्तीह भिन्ना: ॥५।३६।५६॥
आपसांत फुटून राहणारांना जगांत सुख खचित प्राप्त होत नाहीं.

४५८
न शत्रुर्वशमापन्नो मोक्तव्यो वध्यतां गत: ॥५।३८।२९॥
ज्याचा अवश्य वध केला पाहिजे असा शत्रु हातांत सांपडला असतां सोडून देऊं नये.

४५९
न शत्रुर्विवृत: कार्यो वधमस्याभिकाड्क्षता ।
क्रोधं भयं च हर्षं च नियम्य स्वयमात्मनि ॥१२।१०३।८॥
शत्रूला ठार मारण्याची इच्छा करणार्‍यानें आपला शत्रु प्रगट करुं नये. (म्हणजे त्याच्याशीं उघड द्वेष करुं नये.) राग, भय व आनंद हीं आंतल्या आंत दाबून ठेवावीं.

४६०
न श्रेय: सततं तेजो न नित्यं श्रेयसी क्षमा ॥३।२८।६॥
सदोदित तीव्रपणा श्रेयस्कर नाहीं, तसेंच नेहमीं सौम्यपणाही कामाचा नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP