मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ९६१ ते ९८०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ९६१ ते ९८०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


९६१
सर्वो हि लोको नृपधर्ममूल: ॥१२।१२०।५६॥
सर्व लोकांना राजधर्म हा आधारभूत आहे.

९६२
सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् ।
सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृता: ॥६।४२।४८॥
(श्रीकृष्ण सांगतात) हे अर्जुना, स्वभावत: प्राप्त झालेलें कर्म सदोष असलें तरी, त्याचा त्याग करुं नये, कारण, अग्नि जसा धुरानें वेष्टिलेला असतो, तसा प्रत्येक कर्मांत कांहींना कांहीं दोष हा असतोच.

९६३
सहस्त्रशक्तिश्च शतं शतशक्तिर्दशापि च ।
दध्यादपश्च य: शक्त्या सर्वे तुल्यफला: स्मृता: ॥१४।९०।९७॥
ज्याच्याजवळ एक हजार (रुपये) आहेत त्यानें शंभर दिले किंवा ज्याच्यापाशीं शंभर आहेत त्यानें दहा दिले आणि (ज्याच्यापाशीं कपर्दिकही नाहीं) त्यानें यथाशक्ति नुसतें पाणी दिलें, तर ह्या तिघांस सारखेंच फळ मिळतें.

९६४
सहायबन्धना ह्यर्था: सहायाश्चार्थबन्धना: ।
अन्योऽन्यबन्धनावेतौ विनान्योऽन्यं न सिध्यत: ॥५।३७।३८॥
द्रव्य साहाय्यकर्त्यांवर अवलंबून असून साहाय्यकर्ते द्रव्यावर अवलंबून असतात. सारांश, परस्परांवर अवलंबून असलेल्या ह्या दोन गोष्टी परस्परांवांचून सिध्द होत नाहींत.

९६५
साड्गोपाड्गानपि यदि यश्च वेदानधीयते ।
वेदवेध्यं न जानीते वेदभारवहो हि स: ॥१२।३१८।५०॥
सर्व अंगें आणि उपांगें ह्यांसहित चारही वेदांचें ज्यानें अध्ययन केलें, परंतु वेदांनीं जाणावयाचें जें परमात्मतत्त्व तें ज्यानें जाणलें नाहीं, तो केवळ वेदग्रंथाचा भार वाहणारा होय.

९६६
सा भार्या या प्रियं ब्रूते स पुत्रो यत्र निर्वृति: ।
तन्मित्रं यत्र विश्वास: स देशो यत्र जीव्यते ॥१२।१३९।९६॥
जी प्रिय भाषण करते तीच भार्या, जो सुखाला कारण होतो तोच पुत्र, ज्याच्यावर विश्वास ठेवितां येतो तोच मित्र आणि ज्या ठिकाणीं उपजीविका होते तोच देश.

९६७
साम्याध्दि सख्यं भवति ।
वैषम्यान्नोपपध्यते ॥१।१३१।६७॥
कांहींतरी सारखेपणा असेल तेव्हां सख्य होतें; विषमता असेल तर तें होत नाहीं.

९६८
सायंप्रातर्मनुष्याणाम् अशनं वेदनिर्मितम् ।
नान्तरा भोजनं दृष्टम् उपवासी तथा भवेत् ॥१२।१९३।१०॥
मनुष्यांनीं सकाळसंध्याकाळ भोजन करावें, असा नियम वेदानें घालून दिलेला आहे. मध्यंतरीं कांहीं खाऊं नये, अशा रीतीनें जो राहतो तो उपवासीच असतो.

९६९
साहसोत्पतितानां च निराशानां च जीविते ।
न शक्यमग्रत: स्थातुं शक्रेणापि धनंजय ॥९।५८।१६॥
(श्रीकृष्ण म्हणतात) हे अर्जुना, जिवावर उदार होऊन साहसानें हल्ला करणार्‍यांच्या पुढें उभें राहण्याची इंद्राचीसुध्दां प्राज्ञा नाहीं.

९७०
सिंहस्य सततं पार्श्वे सिंह एवानुगो भवेत् ।
असिंह: सिंहसहित: सिंहवल्लभते फलम् ॥१२।११९।११॥
यस्तु सिंह: श्वभि: कीर्ण: सिंहकर्मफले रत: ।
न स सिंहफलं भोक्तुं शक्त: श्वभिरुपासित: ॥१२।११९।१२॥
सदोदित सिंहाच्या संनिध असणारा त्याचा अनुचर सिंहच बनतो. सिंह ज्याच्या बरोबर आहे तो स्वत: सिंह नसला तरी त्याला सिंहाप्रमाणेंच फळ मिळतें, परंतु जो स्वत: सिंह असूनही कुत्र्यांच्या जमावांत राहतो आणि सिंहाप्रमाणें कर्मफल मिळण्याची इच्छा करतो, त्याला कुत्र्यांच्या सहवासांत असेपर्यंत तसें फळ मिळणें शक्य नाहीं.

९७१
सुखं वा यदि वा दु:खं प्रियं वा यदि वाऽप्रियम् ।
प्राप्तं प्राप्तमुपासीत हृदयेनापराजित: ॥१२।२५।२६॥
सुख असो किंवा दु:ख असो, प्रिय असो अथवा अप्रिय असो जें जें म्हणून प्राप्त होईल त्याचा, अंत:करण खचूं न देतां स्वीकार करावा.

९७२
सुखं सांग्रामिको मृत्यु: ।
क्षत्रधर्मेण युध्यताम् ॥८।९३।५५॥
क्षत्रियधर्मानें युध्द करणारांना संग्रामांत आलेला मृत्यु सुखदायक होय.

९७३
सुखं सुखेनेह न जातु लभ्यं ।
दु:खेन साध्वी लभते सुखानि ॥३।२३४।४॥
(द्रौपदी सत्यभामेस सांगते) इहलोकीं सुखासुखीं सुख लाभणें कधींच शक्य नाहीं. दु:ख सोसल्यानेंच साध्वीला सुखप्राप्ति होत असते.

९७४
सुखं च दु:खं च भवाभवौ च
लाभालाभौ मरणं जीवितं च ।
पर्यायश: सर्वमेते स्पृशन्ति
तस्माध्दीरो न च हृष्येन्न शोचेत् ॥५।३६।४७॥
सुख आणि दु:ख, उत्कर्ष आणि अपकर्ष, लाभ आणि हानि, जगणें आणि मरणें हीं क्रमाक्रमानें सर्वांनाच प्राप्त होत असतात म्हणून शहाण्यानें त्यांविषयीं हर्षही मानूं नये आणि शोकपण करुं नये.

९७५
सुखं दु:खान्तमालस्यं ।
दाक्ष्यं दु:खं सुखोदयम् ॥१२।२७।३२॥
आळसांत (प्रारंभीं) सुख वाटतें पण त्याचा शेवट दु:खांत होतो, तत्परतेनें उद्योग करण्यांत (प्रथम) दु:ख वाटलें त्यापासून परिणामीं सुख होतें.

९७६
सुखं निराश: स्वपिति नैराश्यं परमं सुखम् ॥१२।१७४।६२॥
ज्यानें आशा सोडली त्याला सुखानें झोप येते. निराशेसारखें सुख नाहीं.

९७७
सुखमेव हि दु:खान्तं कदाचिद्दु:खत: सुखम् ।
तस्मादेतत् द्वयं जह्यात् य इच्छेच्छाश्वतं सुखम् ॥१२।२५।२४॥
सुखाचा अंत दु:खांतच होतो. उलट केव्हां केव्हां दु:खांतून सुखाचा उदय होतो. म्हणून ज्याला शाश्वत सुख हवें असेल त्यानें ह्या दोहोंचाही त्याग करावा.

९७८
सुखं मोक्षसुखं लोके न च मूढोऽवगच्छति ।
प्रसक्त: पुत्रपशुषु धनधान्यसमाकुल: ॥१२।२८८।५॥
खरें सुख म्हणजे मोक्षसुख. परंतु मूढ मनुष्याला हें समजत नाहीं. तो जगांत पुत्र, पशु ह्यांतच गुंतून राहतो आणि धन, धान्य इत्यादिकांतच गढून गेलेला असतो.

९७९
सुखस्यानन्तरं दु:खं दु:खस्यानन्तरं सुखम् ।
पर्यायेणोपसर्पन्ते नरं नेमिपरा इव ॥३।२६१।४९॥
(चाक फिरतांना) चाकाच्या धावेमध्यें एकामागून एक अरे येत असतात, त्याप्रमाणें सुखानंतर दु:ख आणि दु:खानंतर सुख आळीपाळीनें मनुष्यांना प्राप्त होत असतें.

९८०
सुखाब्दहुतरं दु:खं जीविते नास्ति संशय: ।
स्निग्धस्य चेन्द्रियार्थेषु मोहान्मरणप्रियम् ॥१२।२०५।६॥
आयुष्यांत सुखापेक्षां दु:खच पुष्कळ अधिक आहे ह्यांत संशय नाहीं. परंतु मोहानें इंद्रियांच्या विषयांच्या ठिकाणीं आसक्त होऊन राहिल्यामुळें मनुष्याला मरण अप्रिय वाटतें.

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP