६८१
मृतो दरिद्र: पुरुष: ॥३।३१३।८४॥
दरिद्री पुरुष जिवंतपणींच मेलेला असतो.
६८२
मृदं वै मन्यते पापो भाषमाणमशक्तिकम् ।
जितमर्थं विजानीयात् अवुधो मार्दवे सति ॥५।४।६॥
कोणी सौम्यपणे बोलूं लागला तर दुष्ट लोक त्याला दुर्बळ समजतात. सौम्यपणा असला म्हणजे मूर्खाला वाटावयाचें कीं आपला पक्ष सिध्द झाला.
६८३
मृदुना दारुणं हन्ति मृदुना हन्त्यदारुणम् ।
नासाध्यं मृदुना किंचित् तस्मात्तीव्रतरं मृदु ॥३।२८।३१॥
मृदुपणानें भयंकर शत्रूचा नाश करितां येतो आणि मृदुपणानें भयंकर नसलेल्या शत्रूचाही नाश करितां येतो. मृदुपणानें असाध्य असें कांहींच नाहीं. ह्यास्तव मृदुपणा हा वस्तुत: तीक्ष्णापेक्षांही तीक्ष्ण आहे.
६८४
मृदुरित्यवजानन्ति तीक्ष्ण इत्युद्विजन्ति च ।
तीक्ष्णकाले भवेत्तीक्ष्णो मृदुकाले मृदुर्भवेत् ॥१२।१४०।६५॥
(राजा) मऊपणानें वागणारा असला तर लोक त्याची अवज्ञा करितात आणि कठोरपणानें वागणारा असला तर लोक त्याला भितात. ह्यासाठीं कठोरपणें वागण्याची वेळ येईल तेव्हां कठोर व्हावें आणि मऊपणानें वागण्याची वेळ असेल तेव्हां मृदु व्हावें.
६८५
मौनान्न स मुनिर्भवति नारण्यवसनान्मुनि: ।
स्वलक्षणं तु यो वेद स मुनि: श्रेष्ठ उच्यते ॥५।४३।६०॥
मौनव्रत पाळलें म्हणजे कोणी मुनि होत नाहीं. किंवा अरण्यांत राहिल्यानेंही मुनि होत नाहीं. ज्यानें आत्मस्वरुप जाणलें तोच खरा मुनि होय.
६८६
य एव देवा हन्तार: ताँल्लोकोऽर्चयते भृशम् ॥१२।१५।१६॥
ठार मारणारे जे देव आहेत, त्यांनाच लोक अतिशय भजतात.
६८७
य: कश्चिदप्यसंबध्दो मित्रभावेन वर्तते ।
स एव बन्धुस्तन्मित्रं सा गतिस्तत्परायणम् ॥५।३६।३८॥
कसल्याही प्रकारचा संबंध नसतांही जो कोणी आपल्याशीं मित्रभावानें वागतो तोच आपला बंधु, तोच मित्र, तोच मार्ग आणि तोच मोठा आधार.
६८८
य: कृशार्थ: कृशगव: कृशभृत्य: कृशातिथि: ।
स वै राजन् कृशो नाम न शरीरकृश: कृश: ॥१२।८।२४॥
(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) हे राजा, ज्याच्यापाशीं द्रव्य नाहीं, गुरेंढोरें नाहींत, नोकर चाकर नाहींत आणि ज्याच्याकडे फारसे अतिथि येत नाहींत, तोच खरोखर कृश म्हटला पाहिजे. जो केवळ शरीरानें कृश तो खरोखर कृश नव्हे.
६८९
यच्च कामसुखं लोके यच्च दिव्यं महत्सुखम् ।
तृष्णाक्षयसुखस्यैते नार्हत: षोडशीं कलाम् ॥१२।१७४।४६॥
इहलोकीं विषयोभोगांपासून प्राप्त होणारें सुख आणि स्वर्गांतील उच्च सुख हीं दोनही सुखें वासनाक्षयामुळें प्राप्त होणार्या सुखाच्या सोळाव्या हिश्शाइतकीं देखील भरणार नाहींत.
६९०
यच्छक्यं ग्रसितुं ग्रस्यं ग्रस्तं परिणमेच्च यत् ।
हितं च परिणामे यत् तदाध्यं भूतिमिच्छता ॥५।३४।१४॥
ज्याचा घास घेतां येईल, खाल्ल्यावर जें पचेल व परिणामीं जें हितकर होईल तेंच अन्न कल्याणेच्छु पुरुषानें खाल्लें पाहिजे.
६९१
यतो धर्मस्ततो जय: ॥१३।१६७।४१॥
जिकडे धर्म तिकडे जय.
६९२
यत्करोति शुभं कर्म तथा कर्म सुदारुणम् ।
तत्कर्तैव समश्नाति बान्धवानां किमत्र ह ॥१२।१५३।४१॥
कोणीही जें चांगले कर्म करतो अथवा वाईट कर्म करतो, त्याचें फळ त्याचें त्यालाच भोगावें लागतें. ह्यांत त्याच्या नातलगांचा काय संबंध ?
६९३
यत्तु कार्यं भवेत्कार्यं कर्मणा तत्समाचर ।
हीनचेष्टस्य य: शोक: स हि शत्रुर्धनंजय ॥७।८०।८॥
(श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात) उद्दिष्ट साधण्यासाठीं जें करावयाचें तें करण्याच्या उद्योगाला लाग. अर्जुना, जो प्रतिकाराचा कांहीं उद्योग करीत नाहीं, त्याचा शोक हा शत्रुच होय.
६९४
यत्नवान् नावसीदति ॥१२।३३१।२॥
यत्न करणारा नाश पावत नाहीं.
६९५
यत्नो हि सततं कार्य: ततो दैवेन सिध्यति ॥१२।१५३।५०॥
सतत प्रयत्न करीत असावें; म्हणजे दैववशात् यश मिळेल.
६९६
यत्र दानपतिं शूरं क्षुधिता: पृथिवीचरा: ।
प्राप्य तुष्टा: प्रतिष्ठन्ते धर्म: कोऽभ्यधिकस्तत: ॥५।१३२।२८॥
पृथ्वीवर हिंडणारे क्षुधित लोक ज्या शूर दानपतीपाशीं आले असतां संतुष्ट होऊन पुढें जातात, त्याच्या धर्मापेक्षां कोणता धर्म अधिक आहे ?
६९७
यत्र धर्मो ह्यधर्मेण सत्यं यत्रानृतेन च ।
हन्यते प्रेक्षमाणानां हतास्तत्र सभासद: ॥५।९५।४९॥
ज्या सभेंत सभासदांच्या डोळ्यांदेखत धर्माचा अधर्मानें व सत्याचा असत्यानें खून केला जातो, त्या सभेंतील सभासदांना धिक्कार असो !
६९८
यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: ।
तत्र श्रीर्विजयो भूति: ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥६।४२।७८॥
(संजय धृतराष्ट्राला म्हणतो) जिकडे योगेश्वर कृष्ण, जिकडे धनुर्धारी अर्जुन, तिकडेच लक्ष्मी, विजय, अखंड वैभव आणि नीति हीं राहणार असें माझें मत आहे.
६९९
यत्र सूक्तं दुरुक्तं च समं स्यान्मधुसूदन ।
न तत्र प्रलपेत्प्राज्ञो बधिरेष्विव गायन: ॥५।९२।१३॥
(विदुर श्रीकृष्णांना म्हणतो) हे मधुसूदना, जेथें चांगलें बोलण्याचा किंवा वाईट बोलण्याचा उपयोग सारखाच होतो तेथें, बहिर्या लोकांमध्यें बसून गायन करणें गवयास योग्य नाहीं त्याप्रमाणें, शहाण्या पुरुषानें कांहींएक न बोलणें चांगलें.
७००
यत्र स्त्री यत्र कितवो बालो यत्रानुशासिता ।
मज्जन्ति तेऽवशा राजन् नध्यामश्मप्लवा इव ॥५।३८।४३॥
(विदुर धृतराष्ट्र राजाला म्हणतो) ज्यांच्यावर स्त्री किंवा लुच्चा मनुष्य किंवा अल्पवयी मुलगा अधिकार चालवीत असेल, ते लोक पराधीन होत्साते, नदींत बुडणार्या पाषाणमय होड्यांप्रमाणें नाश पावतात.