मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ३८१ ते ४००

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ३८१ ते ४००

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


३८१
धर्म एव हतो हन्ति
धर्मो रक्षति रक्षित: ॥३।३१३।१२८॥
आपण धर्माचा घात केला तर धर्मच आपलाच घात करतो आणि आपण धर्माचें रक्षण केलें तर धर्म आपलें रक्षण करतो.

३८२
धर्मं यो बाधते धर्मो न स धर्म: कुवर्त्म तत् ।
अविरोधात्तुअ यो धर्म: स धर्म: सत्यविक्रम ॥३।१३१।११॥
(ससाण्याच्या रुपानें आलेला इंद्र शिबि राजाला म्हणतो) ज्याच्या योगानें खर्‍या धर्माला बाध येतो तो धर्मच नव्हे, तो कुमार्ग होय. ज्याचा खर्‍या धर्माशीं विरोध येत नाहीं तोच धर्म.

३८३
धर्मं संहरते तस्य धनं हरति यस्य स: ।
ह्रियमाणे धने राजन् वयं कस्य क्षमेमहि ॥१२।८।१३॥
(भीष्म युधिष्ठिराला म्हणतो) जो ज्याचें द्रव्य हरण करतो त्यानें त्याच्या धर्माचाच उच्छेद केल्यासारखें होतें. राजा, आमच्या द्रव्यचा अपहार होऊं लागला तर आम्हीं कोणाला क्षमा करावी काय ?

३८४
धर्मं हि यो वर्धयते स पण्डितो
य एव धर्माच्च्यवते स मुह्यति ॥१२।३२१।७८॥
धर्माची जो वाढ करतो तोच पंडित. जो धर्मापासून च्युत होतो तो मोहांत सांपडला असें समजावें.

३८५
धर्मनित्यास्तु ये केचित् न ते सीदन्ति कर्हिचित् ॥३।२६३।४४॥
सदोदित धर्मानें जे वागतात त्यांचा कधींही नाश होत नाहीं.

३८६
धर्ममूल: सदैवार्थ: कामोऽर्थफलमुच्यते ॥१२।१२३।४॥
केव्हां झालें तरी अर्थप्राप्तीचें मूळ धर्म होय. काम (म्हणजे इष्टप्राप्ति) हें अर्थाचें फळ होय.

३८७
धर्मं पुत्र निषेवस्व सुतीक्ष्णौ च हिमातपौ ।
क्षुत्पिपासे च वायुं च जय नित्यं जितेन्द्रिय: ॥१२।३२१।४॥
(व्यास मुनि शुकाला सांगता) हे पुत्रा, तूं धर्माचरणानें वाग. नेहमीं जितेंद्रिय राहून कडक थंडी व ऊन, तहान व भूक, आणि प्राणवायु ह्यांना जिंक (म्हणजे सहन करण्यास शीक).

३८८
धर्मं पूर्वे धनं मध्ये जघन्ये काममाचरेत् ।
अहन्यनुचरेदेवम् एष शास्त्रकृतो विधि: ॥३।३३॥४०॥
दिवसाच्या पूर्वभागांत धर्मानुष्ठान, मध्यभागांत द्रव्यसंपादन व शेवटल्या भागांत विषयसेवन करावें. ह्याप्रमाणें प्रत्यहीं वागावें हा शास्त्रोक्त विधि आहे.

३८९
धर्मव्युच्छित्तिमिच्छन्तो येऽधर्मस्य प्रवर्तका: ।
हन्यव्यास्ते दुरात्मानो देवैर्दैत्या इवोल्बणा: ॥१२।३३॥३०॥
जे धर्माचा उच्छेद करुं पाहतात व अधर्माचा प्रसार करतात अशा दुरात्म्यांना देवांनीं महाभयंकर अशा दैत्यांना ठार मारिलें त्याप्रमाणें ठार मारावें.

३९०
धर्मश्च सूक्ष्मो निपुणोपलक्ष्य: ॥२।६७।३८॥
धर्म सूक्ष्म आहे. तो सूक्ष्मबुध्दीच्या लोकांनाच समजेल.

३९१
धर्मश्चार्थेन महता शक्यो राजन् निषेवितुम् ॥३।३३।४८॥
(भीम युधिष्ठ्राला म्हणतो) हे राजा, धर्माचें आचरण विपुल द्रव्याच्याच योगानें करतां येणें शक्य आहे.

३९२
धर्मस्य निष्ठा त्वाचारस् तमेवाश्रित्य भोत्स्यसे ॥१२।२५९।६॥
(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) धर्माचा आधार आचार होय. त्याचाच आश्रय केल्यावर तुला धर्माचें ज्ञान होईल.

३९३
धर्म: सत्यं तथा वृत्तं बलं चैव तथाप्यहम् ।
शीलमूला महाप्राज्ञ सदा नास्त्यत्र संशय: ॥१२।१२४।६२॥
(लक्ष्मी प्रल्हादास म्हणते) धर्म, सत्य, तसेंच सद्वर्तन, सामर्थ्य आणि मी ह्या सर्वांचें मूळ कारण शील हेंच होय ह्यांत संशय नाहीं.

३९४
धर्मापदेतं यत्कर्म यध्यपि स्यान्महाफलम् ।
न तत्सेवेत मेधावी न तध्दितमिहोच्यते ॥१२।२९३।८॥
धर्माला सोडून असलेलें कृत्य केवढेंही मोठें फळ देणारें असलें तरी तें शहाण्यानें करुं नये. कारण त्यापासून इहलोकीं खरें कल्याण होत नाहीं.

३९५
धर्माय राजा भवति न कामकरणाय तु ॥१२।९०।३॥
धर्मरक्षणासाठीं राजाची उत्पत्ति आहे, आपल्या इच्छा तृप्त करुन घेण्यासाठीं नव्हे.

३९६
धर्मार्थकामकुशलो धर्मार्थावप्यपीडयन् ।
धर्मप्रधानकार्याणि कुर्याश्चेति पुन:पुन: ॥७।१५१।३७॥
(द्रोणाचार्य दुर्योधनाला सांगतात) तूं धर्म, अर्थ व काम ह्यांविषयीं कुशल आहेस. परंतु, धर्म व अर्थ ह्या दोहोंसही धक्का न लागूं देतां धर्मप्रधान अशींच कृत्यें करीत जा हें मी तुला पुन: पुन: सांगतों.

३९७
धर्मार्थकामा: सममेव सेव्या
यो ह्येकभक्त: स नरो जघन्य: ।
तयोस्तु दाक्ष्यं प्रवदन्ति मध्यं
स उत्तमो योऽभिरतस्त्रिवर्गे ॥१२।१६७।४०॥
धर्म, अर्थ आणि काम ह्यांचें सेवन सारख्याच प्रमाणानें केलें पाहिजे. ह्यांपैकीं कोणत्याही एकावरच जो भर देतो तो मनुष्य निकृष्ट होय. सर्वांत श्रेष्ठ तोच कीं जो ह्या तीनही पुरुषार्थांमध्यें रममाण होऊन राहतो.

३९८
धर्मार्थौ धर्मकामौ च कामार्थौ चाप्यपीडयन् ।
धर्मार्थकामान् योऽभ्येति सोऽत्यन्तं सुखमश्नुते ॥९।६०।२२॥
धर्म व अर्थ, धर्म व काम, काम व अर्थ ह्यांचा एकमेकांशीं विरोध येऊं न देतां धर्म, अर्थ व काम ह्या तिन्हींचें जो सेवन करतो त्याला आत्यंतिक सुख प्राप्त होतें.

३९९
धर्मे चार्थे च कामे च मोक्षे च भरतर्षभ् ।
यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत् क्वचित् ॥१।६२॥५३॥
(वैशंपायन जनमेजय राजाला सांगतात) धर्माविषयीं, अर्थाविषयीं, कामाविषयीं आणि मोक्षाविषयीं ह्यांत (महाभारतांत) जें सांगितलें आहे तेंच इतर ग्रंथांत आहे. जें ह्यांत नाहीं तें कोठेंच नाहीं.

४००
धर्मेण राज्यं विन्देत धर्मेण परिपालयेत् ।
धर्ममूलां श्रियं प्राप्य न जहाति न हीयते ॥५।३४।३१॥
धर्मानें राज्य मिळवावें व धर्मानेंच त्याचें संरक्षण करावें. धर्मानें मिळविलेल्या राजलक्ष्मीचा त्याग करण्याचा प्रसंग येत नाहीं व तीही राजाला सोडून जात नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP