सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ७८१ ते ८००
लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.
७८१
ये दम्भान्नाचरन्ति स्म येषां वृत्तिश्च संयता ।
विषयांश्च निगृह्णन्ति दुर्गाण्यतितरन्ति ते ॥१२।११०।३॥
जे दांभिक आचरण करीत नाहींत, ज्यांची वृत्ति संयमशील आहे व जे विषयांना जिंकतात ते सर्व संकटांतून पार पडतात.
७८२
ये धनादपकर्षन्ति नरं स्वबलमास्थिता: ।
ते धर्ममर्थं कामं च प्रमन्थिन्ति नरं च तम् ॥५।७२।२४॥
स्वत:च्या बळाचा आश्रय करुन जे एकाद्या मनुष्याचें द्रव्य हिरावून घेतात, ते त्याचा धर्म, अर्थ व काम आणि तो मनुष्य ह्या सर्वांचा विध्वंस करतात.
७८३
येन खट्वां समारुढं परितप्येत कर्मणा ।
आदावेव न तत्कुर्यात् अध्रुवे जीविते सति ॥५।३९।२९॥
खाटेवर (मृत्युशय्येवर) पडल्यावर ज्या कृत्यामुळें पश्चात्ताप करण्याचा प्रसंग येईल असें कृत्य प्रथमत:च करुं नये. कारण जीवित क्षणभंगुर आहे.
७८४
ये न मानित्वमिच्छन्ति मानयन्ति च ये परान् ।
मान्यमानान्नमस्यन्ति दुर्गाण्यतितरन्ति ते ॥१२।११०।१९॥
जे सन्मानाची इच्छा करीत नाहींत, जे दुसर्यांना मान देतात आणि सन्मानास पात्र असलेल्यांना प्रणाम करितात ते संकटांच्या पार जातात.
७८५
ये यथा मां प्रपध्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ॥६।२८।११॥
(श्रीकृष्ण म्हणतात) जे मला जसे भजतात तसें फळ मी त्यांना देतों.
७८६
येऽर्था: स्त्रीषु समायुक्ता: प्रमत्तपतितेषु च ।
ये चानार्ये समासक्ता: सर्वे ते संशयं गता: ॥५।३८।४२॥
जीं कामें स्त्रिया किंवा झिंगलेला अथवा पतित मनुष्य ह्यांच्यावर सोंपविलीं गेलीं, तसेंच जीं कामें अनार्य मनुष्याकडे दिलीं गेलीं तीं सगळीं संशयांत पडलीं.
७८७
येषां त्रीण्यवदातानि विद्या योनिश्च कर्म च ।
तान् सेवेत् तै: समास्या हि शास्त्रेऽभ्योऽपि गरीयसी ॥३।१।२७॥
विद्या, कुल आणि आचरण हीं तीन ज्यांचीं शुध्द आहेत त्यांची संगत धरावी. खरोखर, त्यांचा समागम शास्त्राभ्यासापेक्षांही श्रेष्ठ होय.
७८८
येषां शास्त्रानुगा बुध्दि: न ते मुह्यन्ति भारत ॥१।१।२४४॥
(संजय धृतराष्ट्राला म्हणतो) ज्यांची बुध्दि शास्त्रानुसार चालते ते भांबावून जात नाहींत.
७८९
ये धि धर्मस्य लोप्तारो
वध्यास्ते मम पाण्डव ॥७।१८१।२८॥
(श्रीकृष्ण म्हणतात) हे अर्जुना, जे धर्म बुडविणारे असतील ते माझ्याकडून मारिले जाण्यास योग्य होत.
७९०
ये हि संस्पर्शजा भोगा दु:खखोनय एव ते ।
आद्यन्तवन्त: कौन्तेय न तेषु रमते बुध: ॥६।२९।२२॥
(श्रीकृष्ण म्हणतात) हे अर्जुना, इंद्रियांचा विषयांशीं संबंध घडल्यानें जे भोग उत्पन्न होतात ते खरोखर दु:खाचें माहेरघरच होत, त्यांना आदि असून अंतही असतो. त्यांच्या ठिकाणीं शहाणा पुरुष रममाण होत नाहीं.
७९१
योग: कर्मसु कौशलम् ॥६।२६।५०॥
योग म्हणजे कर्में करण्याचें कौशल्य. (कर्मफलाचा लेप न लागेल अशा रीतीनें निष्कामबुध्दीनें कर्में करणें.)
७९२
यो न दर्शयते तेज: क्षत्रिय: काल अगते ।
सर्वभूतानि तं पार्थ सदा परिभवन्त्युत ॥३।२७।३८॥
(द्रौपदी धर्मराजास म्हणते) हे कुंतीपुत्रा, समय प्राप्त झाला असतां जो क्षत्रिय आपलें तेज प्रकट करीत नाहीं त्याचा सर्व प्राणी नेहमीं अपमान करीत असतात.
७९३
योऽन्यथा सन्तमात्मानम् अन्यथा प्रतिपध्यते ।
किं तेन न कृतं पापं चौरेणात्मापहारिणा ॥५।४२।३७॥
जो आपले खरें स्वरुप एका प्रकारचें असतां, तें दुसर्या प्रकारचें भासवितो, त्या स्वत:चें खरें स्वरुप लपविणार्या चोरानें कोणतें पाप केलें नाहीं ?
७९४
यो मां प्रयतते हन्तुं ज्ञात्वा प्रहरणे बलम् ।
तस्य तस्मिन्प्रहरणे पुन: प्रादुर्भवाम्यहम् ॥१४।१३।१३॥
(काम म्हणजे अहंकार म्हणतो) एकाद्या आयुधांत (तपश्चर्यादि साधनांत) सामर्थ्य आहे असें समजून जो मला त्यानें मारण्याचा प्रयत्न करितो, त्याच्या त्या आयुधांतच मी पुन्हा उत्पन्न होतों. (तपश्चर्यादिकांचा अहंकार उत्पन्न होतो.)
७९५
यो यथा वर्तते यस्मिन् तस्मिन्नेव प्रवर्तयन् ।
नाधर्मं समवाप्नोति नचाश्रेयश्च विन्दति ॥५।१७८।५३॥
जो ज्याच्याशीं ज्याप्रकारें वागतो त्याच्याशीं त्या प्रकारें वागण्यांत कोणताही अधर्म घडत नाहीं आणि त्यापासून अकल्याणही होत नाहीं.
७९६
यो यस्मिञ्जीवति स्वार्थे पश्येत्पीडां न जीवति ।
स तस्य मित्रं तावत्स्यात् यावन्नस्याद्विपर्यय: ॥१२।१३८।१४०॥
जो जिवंत राहिला असतां स्वार्थाला बाध येणार नाहीं व आपले प्राण वांचतील असें ज्याला वाटत असेल त्याचा उलट स्थिति आली नाहीं तोंवरच मित्र असतो.
७९७
योऽरिणा सह संधाय सुखं स्वपिति विश्वसन् ।
स वृक्षाग्रे प्रसुप्तो वा पतित: प्रतिबुध्यते ॥१२।१४०।३७॥
जो शत्रूशीं तह केल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवून खुशाल झोपा काढतो तो झाडाच्या शेंडयावर झोपीं गेलेल्या मनुष्याप्रमाणें, पडल्यावरच जागा होतो.
७९८
यो विद्यया तपसा संप्रवृध्द: ।
स एव पूज्यो भवति द्विजानाम् ॥१।८९।३॥
जो विद्येनें व तपानें वृध्द झाला तोच द्विजांना पूज्य वाटतो.
७९९
यो हि तेजो यथाशक्ति न दर्शयति विक्रमात् ।
क्षत्रियो जीविताकाड्क्षी स्तेन इत्येव तं विदु: ॥५।१३४।२॥
जीवाच्या आशेनें जो क्षत्रिय यथाशक्ति पराक्रम करुन आपलें तेज प्रकट करीत नाहीं तो चोरच म्हटला पाहिजे !
८००
रक्षणं सर्वभूतानाम् इति क्षात्रं परं मतम् ॥१२।१२०।३॥
सर्व भूतांचें रक्षण करतो म्हणून क्षत्रियाला श्रेष्ठ समजतात.
N/A
References : N/A
Last Updated : April 01, 2022
TOP