अमृतानुभव - प्रकरण दुसरे आतां उपायन...

अमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.


प्रकरण दुसरे

आतां उपायनवसंतु । जो आज्ञेचा आहेव तंतु ।

अमूर्तचि मूर्तु । कारुण्याचा ॥१॥

आतां साधनकाननिं शोभे सदगुरु वसंतऋतु जैसा ।

आपण अमूर्त असुनी केवल कारुण्यमूर्ति निजदासा ॥१॥

अविद्येचें आडवें । भुंजीत जीवपणाचे भवे ।

तया चैतन्याने धांवे । कारुण्यें जो कीं ॥२॥

चैतन्य अविद्यावर्नि जीवपणें मत्त हो‍उनी भ्रमलें ।

जें त्या मुक्त कराया धांवे त्याचीं प्रणम्य पदकमलें ॥२॥

मोडूनि मायाकुंजरू । मुक्तिमोतियाचा वोगरू ।

जेवविता सद्‍गुरू । निवृत्ति वंदूं ॥३॥

मारुनि मायाकुंजर जेवावि जो मुक्तिमौक्तिकफलातें ।

वंदूं त्या श्रीसद्‍गुरु निवृत्तिच्या चारुपादकमलांतें ॥३॥

जयाचेनि अपांगपातें । बंध मोक्षपणीं आते ।

भेटे जाणतया जाणतें । जयापाशीं ॥४॥

ज्याच्या कृपाकटाक्षें बंधचि जो मोक्षरूप तो होतो ।

ज्याच्या सान्निध्यानें ज्ञाता ज्ञात्यासि जाउनी मिळतो ॥४॥

कैवल्यकनकाचिया दाना । जो न कडसी थोर साना ।

द्रष्ट्याचिया दर्शना । पाठाउ जो ॥५॥

कैवल्यकनकदानीं अधमोत्तमभेददृष्टी ज्या नाहीं ।

द्रष्ट्याचा अनुभवही होण्याला योग्य ठाव हा पाहीं ॥५॥

सामर्थ्याचोनि बिकें । जो शिवातेंहि गुरुत्वें जिंके ।

आत्मा आत्मसुख देखे । आरिसां जिये ॥६॥

गुरुमोक्षदशक्तिपुढें सांबाचेंही पडे गुरुत्व फिकें ।

आत्मसुखाचा अनुभव आत्म्याला दर्पणेंचि या फांके ॥६॥

बोधचंद्राचिया कळा । विखुरलिया येकवळा ।

कृपापुनीव लीळा । करी जयाची ॥७॥

सद्बोधमृगांककला चहुं बाजूंनीं जणूं पसरल्या ज्या ।

एकवटुनि त्या सगळ्या करि ज्याची पूर्णिमाकृपा सहजा ॥७॥

जो भेटलियाचसवें । पुरती उपायांचे धांवे ।

प्रवृत्तिगंगा स्थिरावे । सागरीं जिये ॥८॥

ज्याच्या दर्शनमात्रें धांव पुरे सर्व मुक्त्युपायांची ।

ज्याच्या प्रसादसागरिं गति स्थिरावे प्रवृत्तिगंगेची ॥८॥

जयाचेनि अनवसरें । द्रष्टा ले दृश्याचें मोहिरें ।

जो भेटतखेंव सरे । बहुरूप हें ॥९॥

ज्याची भेट न होतां पसरे द्रष्ट्यासमोर दृश्य जग ।

तो भेटतांचि सद्‍गुरु लय पावे हें विचित्र विश्व मग ॥९॥

अविद्येचें काळवखें । स्वबोधसुदिनें फांके ।

शिवतलें प्रसादर्कै । जयाचेनि ॥१०॥

ज्याच्या प्रसादरविच्या उज्ज्वलकिरणें अनाद्यविद्येचा ।

काळोख लुप्त हो‍उनि उगवे सुदिवस सदात्मबोधाचा ॥१०॥

जयाचेनि कृपासलिलें । जीव हा ठाववरी पाखाळे ।

जे शिवत्वहि वोविलें । आंगीं न लवी ॥११॥

ज्याच्या कृपाजळानें एथवरी शुद्ध होय कीं जीव ।

शिवपण मलिन म्हणोनी त्याचें कानीं न येउं दे नांव ॥११॥

राखों जातां शिष्यातें । गुरुपणही धाडिलें थितें ।

तरी गुरुगौरव जयातें । सांडीच ना ॥१२॥

ताराया शिष्यातें गुरुपण देखील सांडिलें ज्याणें ।

तरि त्याला नच सोडी गुरुगौरव अंगिं जें सहज बाणे ॥१२॥

एकपण नव्हे सुखास । म्हणूनि गुरुशिष्यांचें करूनि मिस ।

पाहणेंचि आपुली वास । पाहतसे ॥१३॥

एकत्वीं सुख नाहीं गुरुशिष्यांचें म्हणोनि करुनि मिष ।

अपणा पाही आपण सांडुनि अगदीं निमेष उन्मेष ॥१३॥

जयाचेनि कृपातुषारें । परतलें अविद्येचें महुरें ।

परिणमे अपारें । बोधमृतें ॥१४॥

ज्याच्या कृपातुषारें मागें हटते गती अविद्येची ।

तीच्या निवृत्तिनंतर जागा बोधामृता मिळे तीची ॥१४॥

वेद्या देतां मिठी । वेदकही सुये पोटीं ।

तर्‍ही नव्हेचि उसिटी । दिठी जयाची ॥१५॥

वेद्या भेटूं जातां वेत्ताही त्यांत होतसे लीन ।

त्याची दृष्टी तथापी नवीच होई कदापि उष्टी न ॥१५॥

जयाचेनि सावायें । जीव ब्रह्म‍उपर लाहे ।

ब्रह्मा तृणातळिं जायें । उदासें जेणें ॥१६॥

ज्याचें सहाय घेउनि होतो जीव क्षणामधें ब्रह्म ।

ज्याच्या औदासीन्यें विधिही होतो तृणापरिस अधम ॥१६॥

उपास्तिवेर्‍ही राबतया । उपायफळिं येती मोडोनियां ।

वरवंडले जयाचिया । अनुज्ञा कां ॥१७॥

ज्याच्या उपासनेनें केलेलीं साधनें सफल होती ।

ज्याच्या आज्ञेवांचुनि करितां होताति सर्व निष्फळ तीं ॥१७॥

जयाचा दिठिवा वसंत । जंव न रिघे निगमवनाआंत ।

तंव आपुलिये फळीं हात । न घेपतिही ॥१८॥

जंव न शिरे निगमवनीं गुरुदृष्टीचा वसंत रमणीय ।

तोंवरि साधकहस्ता प्राप्त कदा न स्वकीय फल होय ॥१८॥

पुढें दृष्टिचेनि आलगें । खोंचि कीं निवटी मागें ।

येवढ्या जैता नेघे । आपणपें जो ॥१९॥

नाहीं दृष्टिपुढें मुळीं दृश्यचि तेव्हां न खोचणें तेथें ।

दृश्या मागें सारुनि पुढें रिघे हेहिं शक्य नच त्यातें ॥१९॥

लघुत्वाचोनि मुदलें । बैसला गुरुत्वाचे सेले ।

नासुनि नाथिलें । सदैव जो ॥२०॥

अंगी लघुत्व घेउनि चढला जो या गुरुत्वपदवीला ।

जो भाग्यशालि म्हणवी मारुनि जी नाहिं त्या अविद्येला ॥२०॥

नाहीं ते जळीं बुडीजे । तैं घनवटें जेणें तरिजे ।

जेणें तर लियाही नुरिजे । कवणिया ठाई ॥२१॥

नसत्या जळांत बुडती त्यांतें तारी गुरुत्व घन ज्याचें ।

तरले जीव न उरती कोठेंही हे अगाध गुण गुरुचे ॥२१॥

आकाश हें सावेव । परि न बंधे आकाशाची हांव ।

ऐसें कोण्ही येक भरीव । आकाश जो ॥२२॥

या आकाशा अवयव असती परि जें ययाहुनी भिन्न ।

चैतन्यांबर केवळ भरींव हें तत्समान पोकळ न ॥२२॥

चंद्राऐसीं सुशीतळें । घडिलीं जयाचेनि मेळें ।

सूर्य जयाचेनि उजाळे । कडवसेनि ॥२३॥

ज्याच्या तेजें हिमकरप्रभृति ग्रह लाजती प्रभाशीत ।

ज्याच्या प्रतिबिंबाने आला प्रखर प्रकाश सूर्यांत ॥२३॥

जीवपणाचेनि त्रासें । यावया आपुलिये दशे ।

शिवही मुहूर्त पुसे । जया जोशियतें ॥२४॥

जीवपणाच्या त्रासें शिवही पावावया स्वकीय दशा ।

सुमुहूर्त हवा म्हणुनी नम्रपणें तो पुसे जया जोशा ॥२४॥

चांदणें स्वप्रकाशाचें लेइला द्वैतदुणीचें ।

तर्‍ही उघडेपण नवचे । चांदाचें जया ॥२५॥

जोत्स्नावस्त्र दुहेरी अंगावरि घेतलें जरी शशिनें ।

उघडेपणा तयाच्या अंगाचा जाइना अशा वसनें ॥२५॥

जो उघड कीं न दिसे । प्रकाश कीं न प्रकाशे ।

असतेपणेंचि नसे । कवणीकडे ॥२६॥

व्यक्त असोनी न दिसे प्रकाशही अप्रकाशसम आहे ।

अस्तित्वरूप असुनी पाहूं जातां गमे जणूं नोहे ॥२६॥

आतां जो तो इहीं शब्दीं । किती मेळऊं अनुमानाची मांदी ।

हा प्रमाणाहि वो नेदी । कोणाही मा ॥२७॥

जो तो या शब्दांनी त्या विषयीं तर्क किति करूं आतां ।

नोहे प्रमाण विषयचि कवण करी माप कल्पनातीता ॥२७॥

जेथ शब्दाची लिपी पुसे । तेणेंसीं चावळों बैसे ।

दुजयाचा रागी रुसे । एकपणा जो ॥२८॥

शब्दप्रवेश नाहीं जेथ तिथें बोलणें जया अवडे ।

द्वैतापत्तिभयानें एकत्वहि वाटतें जयासि कुडें ॥२८॥

प्रमाणांची परि सरे । तै प्रमेयचि आविष्करे ।

नवल मेचुं ये धुरे । नाहींपणाची ॥२९॥

जेथें समाप्त होती प्रमाणविध सर्व तेथ जो प्रकटे ।

एकत्व यापरी हें त्याचें त्यालाचि ते मनांत पटे ॥२९॥

कांहीं बाहीं अळुमाळ । देखे एखादे वेळ ।

तरी देखे तेही विटाळ । जया गांवीं ॥३०॥

अल्पहि कांहिं कदाचित् देखूं जातांचि देखणा लोपे ।

चिद्वस्तूच्या गांवीं द्रष्ट्याचा न तिळहि विटाळ खपे ॥३०॥

तेथें नमनें का बोलें । केउतीं सुयें पाउलें ।

आंगा लाउनि नाडिलें । नांवचि येणें ॥३१॥

नमनाचें वा स्तुतिचें पाउल या वस्तुमाजि केविं शिरे ।

नामस्मरण करावें तरि त्याही तिळहि एथ ठाव नुरे ॥३१॥

नाहीं आत्मया आत्मप्रवृत्ति । वाढवितां के निवृत्ति ।

या नामाची वायबुंथी । सांडिचि ना ॥३२॥

अपुल्या ठाई अपुली प्रवृत्ति नाहीं निवृत्ति मग कोठें ।

तरि हें नामाच्छादन सोडी ना फोल हें नवल मोठें ॥३२॥

निवर्त्य तंव नाहीं । मां निवर्तवी हा काई ।

तरि कैसा बैसे ठाई । निवृत्तिनामाच्या ॥३३॥

जेथें निवर्त्य नाहीं त्या आत्म्याठायिं काय निरसावें ।

नवल गमे मज तरि हें कैसा मिरवे निवृत्ति या नांवें ॥३३॥

परि सूर्यासि अंधकार । कैं जाला होता गोचर ।

तर्‍ही तमारि हा डगर । आलाचि कीं ॥३४॥

हा अंधकार कधिं तरि सूर्यानें देखिला असे काय ।

हें जरि अशक्य आहे नांव तमारी प्रसिद्ध जगिं होय ॥३४॥

तैसें लटिकें येणें रूढे । जड येणें उजिवडे ।

न घडे तेंही घडे । जयाचिया मावा ॥३५॥

तैसें ज्याची माया अघटित घटना करावया शक्त ।

मिथ्यावस्तू दावी सत्यत्वें करि जडही चेतनायुक्त ॥३५॥

हां गा मायावशें दाविसी । ते माइक म्हणोनि वाळिसी ।

अमाइक तंव नव्हसी । कवणाहि विषो ॥३६॥

दाविसि मायायोगें जें तें मायिक म्हणोनि वगळीसी ।

अससी स्वतां अमायिक विषय न वागदिकांसि तूं होसी ॥३६॥

शिवशिव सद्‍गुरू । तुजला गूढा काय करूं ।

एकाही निर्धारा धरूं । देतासि कां ॥३७॥

गूढ तुझे रूप गुरो अंत तुझा मज मुळींच लागेना ।

बुद्धी कुंठित होते युष्मद्विषयीं विचार करितांना ॥३७॥

नामें रूपें बहुवसें । उभारुनि पाडिलीं वोसें ।

परि सत्तेचेनि आवेशें । तोषलासि ना ॥३८॥

नामारुपा निर्मूनि पुनरपि तीं त्वांचि पाडिलीं ओस ।

केवळ सद्रूपत्वें बापा तूं पावलासि तृप्तीस ॥३८॥

जीव घेतलिया उणें । चालों नेणसी साजणें ।

भृत्य उरे स्वामिपणें । तेंहि नव्हे ॥३९॥

शिष्या प्रेम न दाविसि बा त्याचा घेतल्याविण प्राण ।

गुरुरूपें तो राहे असें म्हणूं तरि न तेंहि तुज सहन ॥३९॥

विशेषाचेनि नावें । आत्मत्वही न साहवे ।

किंबहुना न व्हावें । कोण्हीच यया ॥४०॥

स्पर्शापासुनि इतुका विशेषणाच्याहि राहसी अलग ।

अथवा आत्मत्वहि तव अंगा लागे न इतर काय मग ॥४०॥

राति नुरेचि सूर्या । नातरी लवण पाणिया ।

नुरोचि चेयिलिया । नीद जैसी ॥४१॥

सूर्यामधिं रात्र जसी पाण्यामाजी जसें लवण लीन ।

किंवा निद्रा जैसी जागरिं जाई जिवासि सोडून ॥४१॥

कापुरांचे थळिव । नुरेचि आगीची बरव ।

नुरेचि रूप नांव । तैसें यया ॥४२॥

तो जाइ कापुराचा दागीना जळुनि अनलिं कीं जेवीं ।

दुर्घट नामरूपाचा आहे ब्रह्मीं प्रवेश बा तेवीं ॥४२॥

याच्या हातां पायां पडे । तव वंद्यत्वें पुढें न मंडे ।

न पडेचि हा भिडे । भेदाचिये ॥४३॥

हाता पायां पडुनी विनवीला तरि न वंद्य कवणाला ।

एकत्व मोडण्याला भीड पडेना कुणाचिही गुरुला ॥४३॥

आपणाप्रति रवी । उदो न करी जेवीं ।

हा वेद्य नव्हे तेवीं । वंदनासी ॥४४॥

न करूं जाणे आपण अपुल्या अस्तोदया जसा सूर्य ।

तैसा वंद्य नव्हे हा वदन करुं पाहत्यासि गुरुवर्य ॥४४॥

कां समोरपण आपुलें । लहिजे कांहीं केलें ।

तैसें वंद्यत्व घातलें । हार‍उनि येणें ॥४५॥

किंवा येऊं न शके आपण अपुल्या समोर कोणीही ।

तैसें गुरुरायाचें दुर्घट वंद्यत्व जाहलें पाहीं ॥४५॥

आकाशाचा आरिसां । नुठी प्रतिबिंबाचा ठसा ।

हा वंद्य नव्हे तैसा । नमस्कारासि ॥४६॥

आकाशादर्शाच्या मध्यें प्रतिबिंब कीं नुठे जैसें ।

वंदन करणाला सद्‍गुरुवंदन असाध्य होइ तसें ॥४६॥

परि नव्हे तरी नव्हो । हें वेखासें कां घेवों ।

परि वंदितयाही ठावो । उरों नेदी ॥४७॥

वंदन असाध्य जरि तें असुं दे बा तें तसेंचि त्याविषयीं ।

अमुचा आक्षेप नसे परि येथें वंदिता नुरे पाहीं ॥४७॥

आंगौनि एकुणा झोलु । फेडितांचि तो बाहिरलू ।

कड फिटे आंतीलु । न फेडितांचि ॥४८॥

बा पदर कनवटीचा बाहेरिल फेडितांचि आंतिलही ।

सहजचि फिटे जसा तो गुरुवंदनिंही तसी स्थिता होई ॥४८॥

नाना बिंबपणासरिसें । घेऊनि प्रतिबिंब नासे ।

नेलें वंद्यत्व येणें तैसें । वंदितेनसीं ॥४९॥

प्रतिबिंब दर्पर्णीचें बिंबत्वा घेउनी जसें नासे ।

वंद्यत्व हरूनि नेलें गुरुरायें वंदित्यासहित तैसें ॥४९॥

नाहीं रूपाची जेथ सोये । तेथ दृष्टिचें कांहीचि नोहे ।

आम्हां फळले हे पाये । ऐसिया दशा ॥५०॥

रूपचि नाहीं जेव्हां दृष्टित्वहि दृष्टिचें तदा जाई ।

प्राप्त दशाही होतां या पायांची कृपा फळे पाहीं ॥५०॥

गुणा तेलाचिया सोयरिका । नर्वाहे दीपकळिका ।

ते कां होईल पुळिका । कापुराची ॥५१॥

योग घडे वातीचा तेलाशीं जैं देवा जळे तैंची ।

न तसा प्रकार जेव्हां गांठ पडे कर्पुरासि अग्नीची ॥५१॥

तया दोहों परस्परें । होय ना जंव मेळेरें ।

तंव दोहींचेंही सरे । सरसेंचि ॥५२॥

कापूर आणि अग्नी यांची अन्योन्य भेट जैं होई ।

तेव्हां उभयांचेंही तत्क्षणिं आयुष्य संपुनी जाई ॥५२॥

तेविं देखें ना मी ययातें । तंव गेलें वंद्य वंदितें ।

चेविलिया कां तें । स्वप्नींचे जेवीं ॥५३॥

पाहूं जातां गुरुतें तत्काळचि वंद्य वंदिते अटती ।

जागें होतां जैसे स्वप्नातिल लोपती युवा युवती ॥५३॥

किंबहुना इया भाखा । द्वैताचा जेथ उपखा ।

फेडूनियां स्वसखा । श्रीगुरु वंदिला ॥५४॥

काय बहुत बोलावें द्वैता निपटूनि सारूनी अगदीं ।

माझा सखा गुरू जो त्याच्या हें शीर्ष ठेविलें पादीं ॥५४॥

याच्या सख्याची नवाई । आंगी एकपणा ठाव नाहीं ।

आणि गुरुशिष्य दुवाळिही । पवाडु केला ॥५५॥

सद्‍गुरुच्या सख्याची काय वदावी नवाइ एकेक ।

ठाव नसुनि एकत्वा दावी गुरुशिष्ययुग्म कौतूक ॥५५॥

कैसा आपणयां आपण । दोंवीण सोइरेपण ।

हाचि याहुनि विलक्षण । नाहीं ना नोहे ॥५६॥

द्वैत नसोनि दुजेपण आपण अपणासि सोयरा होई ।

नाहींपण आहेपण उभयाविण तो असेचि बा पाहीं ॥५६॥

जग आघवें पोटीं माये । गगनायेवढा होउनी ठाये ।

की तेचि निशी साहे । नाहींपणाची ॥५७॥

ज्याच्या पोटीं माये सर्वहि जग गगनसदृश जो झाला ।

नाहींपणा प्रकशुनि नसल्यापरि जो सदा असे ठेला ॥५७॥

कां पूर्णते तरि आधार । सिधू जैसा दुर्भर ।

तैसा विरुद्धेयां पाहुणेर । ययाच्या घरीं ॥५८॥

आधार पूर्णतेला असुनी दुर्भर असेचि अंभोधी ।

तैसें ज्याच्या ठायीं वसती वस्तू विरुद्ध अविरोधी ॥५८॥

तेजा तमातें कांहीं । परस्परें निकें नाहीं ।

परि सूर्याच ठाई । सूर्याचि होति ॥५९॥

तेजातमामधें कधिं मैत्री जुळली असें कदा न घडे ।

सूर्यीं सूर्य असे परि तेणें सूर्यांत कांहिं नच बिघडे ॥५९॥

येक म्हणतां भेदें । तें कीं नानात्वें नांदे ।

विरुद्धें आपणयाविरुद्धें । होतील काई ॥६०॥

एकांतभेद बघतां नानात्वें एक वस्तु मात्र असे ।

जरि वस्तु एकमेकां विरुद्ध आत्म्याशिं तद्विरोध नसे ॥६०॥

म्हणूनी शिष्य आणि गुरुनाथ । या दों शब्दांचा अर्थ ।

श्रीगुरुचि परि होत । दोहों ठाईं ॥६१॥

म्हणुनी शिष्यगुरू या दो शब्दीं होय एकची अर्थ ।

गुरु मात्र अर्थ त्यांचा एक वसे गुरुचि दो ठिकाणांत ॥६१॥

कां सुवर्ण आणि लेणें । वसतें येकें सुवर्णें ।

चंद्र आणि चांदिणें । चंद्रीचि जेविं ॥६२॥

किंवा वसती एका सोन्यामधिं हेम आणि अलंकार ।

कीं चंद्र चांदणें या उभयांचें चंद्र मात्र एक घर ॥६२॥

ना कर्पूर आणि परिमळ । कापूरचि केवळ ।

गोडी आणि गुळ । गुळचि जेविं ॥६३॥

कर्पूर आणि परिमळ दोहोंचा अर्थ एक कापूर ।

कीं गूळ आणि गोडी दो शब्दीं एक गूळ हें सार ॥६३॥

तैसा गुरुशिष्यमिषें । हाचि एक उल्लसे ।

जरी कांहीं दिसे । दोनीपणें ॥६४॥

गुरुशिष्यमिषें तैसा एक निवृत्तीच सदगुरु राणा ।

यद्यपि शब्दीं भासे द्वैतापरि तोचि एक तुम्हि जाणा ॥६४॥

आरिसा आणि मुखीं । मी दिसें हें उखी ।

हे आपुलिये वोळखी । जाणे मुख ॥६५॥

आदर्शीं आणि मुखीं दोहोंमधि मीचि एकलें दृश्य ।

ऐसा अनुभव अपुला आपण घेतेंचे ज्यापरी आस्य ॥६५॥

पहा पां निरंजनीं निदेला । तो निर्विवाद एकला ।

परि चेता चेविविता जाला । दोनी तोचि ॥६६॥

निर्जन वनांत निजला जैं एकचि तेथ नाहिं नर दुसरा ।

जागृत होतां तेथें उठणारा तोचि जो उठविणारा ॥६६॥

जे तोचि चेता तोचि चेववी । तेंवि हाचि बुझे हाचि बुझावी ।

गुरुशिष्यत्व नांदवी । ऐसोनि हा ॥६७॥

उभयहि जैसा एकचि तेथें तैसा इथेंहि गुरुराणा ।

बोध करी गुरुरूपें शिष्यत्वें तोचि बोध घे जाणा ॥६७॥

दर्पणेंविण डोळा । आपुले भेटीचा सोहळा ।

भोगिता तरि लोळा । सांगतों हें ॥६८॥

अरशाविण जरि अपुल्या भेटीचा सोहळा नयन भोगी ।

तरि ही सदगुरुलीला । शब्दें होईल सांगण्याजोगी ॥६८॥

एवं द्वैतासी उमसों । नेदुनि ऐक्यासि विसकुसों ।

सोइरिकेचा अंतिसो । पोखितसे ॥६९॥

यापरि दुजेपणाला नेदुनि अवकाश भंग ऐक्याला ।

हो‍उं न देतां सद्‍गुरु पोषी गुरुशिष्ययोगसौख्याला ॥६९॥

निवृत्ति जया नांव । निवृत्ति जया बरव ।

जया निवृत्तीची राणीव । निवृत्तीची ॥७०॥

ज्याचें नांव निवृत्ती ज्याचें सौदर्य आणि ऐश्वर्य ।

होय निवृत्तीच असा निवृत्ति जो मूर्तिमंत गुरुवर्य ॥७०॥

वांचुनि प्रवृत्तिविरोधें । कां निवृत्तीचेनि बोधें ।

आणिजे तैशा वादें । निवृत्ति नव्हें ॥७१॥

ऐसा नव्हे निवृत्ती जो प्रतियोगी प्रवृत्तिचा होई ।

कीं अर्थ निवृत्तीचा जो तोही नव्हे निवृत्ति हा पाहीं ॥७१॥

आपणा देउनी राती । दिवसा आणि उन्नती ।

आणिका वारी निवृत्ति । नव्हे तैसा ॥७२॥

रात्र स्वतासि निरसुनि आणी उदयासि जेविं दिवसाला ।

तैसा प्रवृत्ति वारूनि स्वयें उरे हा निवृत्ति नव असला ॥७२॥

वोपसरयाचें बळ । घेऊनि मिरवे कीळ ।

तैसें रत्‍न नव्हे निखळ । चक्रवर्ती हा ॥७३॥

वाप दिल्यानें मिरवी तेजातें जें तसें न हा रत्‍न ।

हा स्वप्रकाश मणिचि करणें न लगेचि उजळिचा यत्‍न ॥७३॥

गगनही सूनि पोटीं । जैं चंद्राची पघळे पृष्टी ।

तैं चांदणें तेणें उठी । आंग जयाचें ॥७४॥

गगना घेउनि पोटीं चंद्राची चंद्रिका यदा पसरे ।

तैं तो अधिकचि शोभे चर्चुनि अंगा स्वकीय अमृत करें ॥७४॥

तैसें निवृत्तिपणासि कारण । हाचि आपणया आपण ।

घेयावया फुलचि जालें घ्राण । आपली द्रुती ॥७५॥

तैसा कारण सदगुरु निवृत्तितें आपुल्या स्वतां झाला ।

झालें घ्राण स्वतां जणुं पुष्पचि अपुला सुवास घेण्याला ॥७५॥

दिठी मुखाचिये बरवे । जरी पाठीकडून फावे ।

तैं आरिसे धांडोळावे । लागती काई ॥७६॥

दृष्टि जरी वदनातें मुरडुनि होई समर्थ बघण्याला ।

दर्पण मिळवायाचा व्यर्थ करावा प्रयत्‍न काशाला ॥७६॥

कीं राति हन गेलिया । दिवस हन पातलिया ।

काय सूर्यपण सूर्या । व्हावें लागे ॥७७॥

किंवा सारुनि मागें रात्रीला दिवस उगवला असतां ।

काय करावा सांगा प्रयत्‍न सूर्यै निजोदयाकरितां ॥७७॥

म्हणौनि बोध्य बोधोनि । घेपे प्रेमाणें साधुनि ।

ऐसा नव्हे भरवसेनि । गोसावी हा ॥७८॥

बोधासि बोध्य झालें प्रमाणयोगें कीं साधितां आलें ।

ऐसें रूप नव्हे हें सद्‍गुरुचें बोध मात्र जें उरलें ॥७८॥

ऐसें करणियावीण । स्वयं भजे निवृत्तिपण ।

तयाचे श्रीचरण । वंदिले ऐसें ॥७९॥

ऐसें असाध्य झालें कर्मानें जें स्वयंभु निवृत्तिपण ।

व्दैता अवधि न देतां नमिले म्यां रम्य साजिरे चरण ॥७९॥

आतां ज्ञानदेव म्हणे । श्रीगुरुप्रणामें येणें ।

फेडिली वाचा ऋणे । चौही वाचांची ॥८०॥

यापरि वंदोनीयां श्रीगुरुचरणासि चार वाणींचें ।

निःशेष फेडिलें ऋण परिसा हें वचन ज्ञानदेवाचें ॥८०॥

॥ द्वितीय प्रकरण समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP