प्रकरण आठवे
तैसें आमुचेनि नांवें । अज्ञानाचें ज्ञानही नव्हे ।
आम्हांलागीं गुरुदेवें । आम्हीचि केलों ॥१॥
अस्मद्रूप पहातां एथें अज्ञान वा नसे ज्ञान ।
आम्हां ठायीं आम्हिच गुरुरायें हीच दाविली खूण ॥१॥
परि आम्ही आम्हां आहों । तें कैसें पाहों जावों ।
तंव काय कीजे ठावो । लाजिजे ऐसा ॥२॥
द्रष्टेपणा गिळोनी ज्ञाप्ति उरे तीच आमुचें रूप ।
त्यातें पाहूं जातां बैसे लाजूनि चित्त गपचीप ॥२॥
हा ठावोवरी गुरुरायें । नादंविलो उवायें ।
जे आम्ही न समाये । आम्हांमाजीं ॥३॥
एथवरी श्रीगुरुंनीं प्रेमातिशयें अम्हांसि वागविलें ।
कीं अमुच्यामाजि अम्ही समावणेंही बहू कठिण झालें ॥३॥
अहो आत्मेपणीं न संटो । खसंवितीं न घसवटों ।
अंगीं लागलिया न फुटों । कैवल्यही ॥४॥
प्रत्यय मात्र चिदात्म्यामाजी प्रत्यय विशेष नच साहे ।
स्वज्ञाना भंग न ये कैवल्याही उणें किमपि नोहे ॥४॥
आमुची करवे गोठी । ते जालीचि नाहीं वाक्सृष्टी ।
आमुतें देखे दिठी । ते दिठीचि नव्हे ॥५॥
आम्हां वर्णी ऐसी वाणी झालीच नाहीं उत्पन्न ।
आम्हांतें देखाया समर्थ ऐसी जगांत दृष्टिहि न ॥५॥
आमुतें करूनि विखो । भोगूं सके पारखो ।
तैं आमुतें न देखो । आम्हीपणें ॥६॥
आम्हां विषय करूनी भोगायाला अम्हांसि शक्य नसे ।
प्रत्यय मात्र अम्ही जे ते आम्हां विषय होउं वद कैसे ॥६॥
प्रगटों लपों न लाहों । येथें नाहीं नवलावो ।
परी कैसेनिही विपावो । असणियाचा ॥७॥
आम्हांसि न प्रकटणें न लोपणेंही न हें नवल कांहीं ।
आम्ही सतत असोनी असण्याची किमपि नाहिं जाणिवही ॥७॥
किंबहुना श्रीनिवृत्ती । ठेविलों असों जिया स्थिती ।
तें काय देऊं हातीं । वाचेचिया ॥८॥
काय बहुत सांगावें आम्हांसी ठेविलें जया रीतीं ।
गुरुराय निवृत्तीनें ती वदण्या वाणिच्या न ये हातीं ॥८॥
तेथ समोर होआवया । अज्ञानाचा पाडु कासया ।
कोउतें मेलिया माया । होऊं पाहिजे ॥९॥
ऐशा स्थितींत कैसें अज्ञानाला समोर येण्याला ।
सामर्थ्य होय बालक मातृनिधनिं केंवि येइ जन्माला ॥९॥
अज्ञानाचा प्रवर्तु । नाही जया गांवाआंतु ।
तेथें ज्ञानाची तर्ही मातु । कोण जाणे ॥१०॥
नाहीं कधिं स्वप्नींही अज्ञानाचा प्रवेश ज्या गांवीं ॥
तेथें ज्ञानाचीही वार्ता कानीं कसी बरें यावी ॥१०॥
रात्रि म्हणोनि दिवे । पडती कीं लावावे ।
वांचोनि सूर्यासवें । सिणणें होये ॥११॥
अंधार पडे रात्रीं म्हणुनि दिवे लावणें पडे भाग ।
दिवसा लावूं जाता त्याचा नोहेचि कांहिं उपयोग ॥११॥
म्हणोन अज्ञान नाहीं । तेथेंचि गेलें ज्ञानही ।
आतां निमिषोन्मिषा दोहीं । ठेली वाट ॥१२॥
अज्ञानचि जरि नाहीं ज्ञानालाही नसे तिथें ठाव ।
उन्मेषनिमेषाची आतां अगदींच खुंटली धांव ॥१२॥
येर्हवीं तर्ही ज्ञान अज्ञानें । दोहींची अभिधानें ।
अर्थाचेनि अनानें । विप्लावलीं ॥१३॥
ज्ञानाज्ञान अशी कीं संज्ञा जरि भ्रांतिनें कुणीं दिधली ।
कल्पून अर्थभेदां नाना तीं असति साच विस्तरलीं ॥१३॥
जैसीं दंपत्यें परस्परें । तोडूनि पालटिलीं शिरें ।
पालटु नाहीं तेथें सरे । दोहींचे जिणें ॥१४॥
तोडुनि शिरें डसविलीं दंपत्याचीं परस्परांलागीं ।
तरि रूप न पालटतां प्राणाचा अंत होय उभयांगी ॥१४॥
कां पाठीं लाविला होये । तो दीपुचि वायां जाये ।
दिठी अंधारें पाहे । तैं तेचि वृथा ॥१५॥
पाठीकडेस कोणी लावी जरि दीप जाइ तो वायां ।
पाहे जी अंधारा ती दृष्टी निरुपयोगी देखाया ॥१५॥
तैसें निपटून जें नेणिजे । तें अज्ञानशब्दें बोलिजे ।
आतां सर्वही जेणें सुजे । तें अज्ञान कैसें ॥१६॥
अगदींच नेणणें जें त्या म्हणणें योग्य होय अज्ञान ।
परि हें विश्वचि जेणें भासे अज्ञान त्या म्हणे कोण ॥१६॥
ऐसें ज्ञान अज्ञाना आलें । अज्ञान ज्ञानें गेलें ।
ये दोन्हीही वांझौलें । दोन्ही जालीं ॥१७॥
अज्ञानशब्दपटलें आलें ज्ञानप्रकाशिं आवरण ।
तेणें होति निरर्थक अभिधानें ज्ञान आणि अज्ञान ॥१७॥
आणि जाणे तोचि नेणे । नेणे तोचि जाणे ।
आतां कें असणें जिणें । ज्ञानाज्ञाना ॥१८॥
जाणें असें म्हणे जो तो नेणे नेण मी असें ज्याला ।
वाटे तोचि ज्ञानी, उभयांचा लोप यापरी झाला ॥१८॥
एवं ज्ञानाज्ञानें दोन्हीं । पोटीं सूनी अहनीं ।
उदैला चिद्गगनीं । चिदादित्यु हा ॥१९॥
ज्ञानाज्ञाना दोनी ग्रासुनियां जेंवि सूर्य दिनरजनी ।
चैतन्यभानु उगवे नित्य नवा स्वप्रकाश चिद्गगनीं ॥१९॥
॥ प्रकरण ८ वें समाप्त ॥