अमृतानुभव - प्रकरण चवथे आतां अज्ञान...

अमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.

प्रकरण चवथे

आतां अज्ञानाचेनि मारें । ज्ञान अभेदें वावरे ।

नीद मारुनि जागरें । नांदिजे जेंवि ॥१॥

ज्ञान अभेदें राही अज्ञानातें समूळ निरसून ।

जागृति नांदे जैसी सुषुप्त्यवस्थेसि ठार मारून ॥१॥

कां दर्पनाचा निघाला । ऐक्यबोध पहिला ।

मुख भोगी आपला । आपणचि ॥२॥

किंवा मुखासमोरिल एकिकडे दर्पणासि सारूनी ।

मुख भोगी तें जैसें अपणामधिं ऐक्यबोध परतोनी ॥२॥

ज्ञान जियातियापरी । जगीं आत्मैक्य करी ।

तैं सुरिया खोंचे सुरी । तैसें जालें ॥३॥

एकात्मकता तैसी जगदात्म्याचीच ज्ञान हें दावी ।

टोंची सुरीस सुरि जशि उपमा ही योग्य त्या गमे घ्यावी ॥३॥

लावि आंत ठाऊनि कोपट । तो साधी आपणया सगट ।

कां बांधला चोरट । मोटेमाजी ॥४॥

बसुनी आंत घराला लावुनि अग्नी स्वतांसि जाळितसे ।

किंवा मोटेमाजी चोर जसा बांधिला स्वतां गिंवसे ॥४॥

आगी पोतासाचेनि मिसें । आपणपें जाळिलें जैसें ।

ज्ञानाज्ञाननाशें । तैसें जालें ॥५॥

कीं कापुरासि जाळुनि अपणासह शांत होइ अग्नि जसा ।

अज्ञानातें निरसुनि नुरेच हा आत्मबोधही तैसा ॥५॥

अज्ञानाचा टेंका । नसतांही ज्ञानाधिका ।

फांके जव उपखा । आपुला पडे ॥६॥

अज्ञानाचा टेंका जोंवरि तोंवरिच बोध हा मिरवी ।

झळके अधिकाधिक तो जोंवरि अस्तासि जाया बोधरवी ॥६॥

दशा ही ते निमालिया । येणें जे उवाया ।

तें केवळ नाशावया । दीपाचे परी ॥७॥

अधिकचि वाढत जाई दीप जयांतील संपलें तेल ।

ऊर्जित दीपदशाही कारण नाशासि जेविं होईल ॥७॥

उठणें कीं पडणें । कुचभाराचें कोण जाणे ।

फाकणें कीं सुकणें । जाउळाचें ॥८॥

उत्थान किं पतनचि हें कुचभाराचें न कोणिही नेणे ।

जातीपुष्पाचेंही कठिण समजणें विकास कीं सुकणें ॥८॥

तरंगाचें रूपा येणें । तयाचि नांव निमणें ।

कां विजूचें उदैजणें । तोचि अस्तु ॥९॥

उत्थान तरंगाचें होतें तंव नाशही दिसे त्याचा ।

कीं नयना वाटे जो झाला तो उदय अस्तचि विजेचा ॥९॥

तैसें पिऊनि अज्ञान । तंववरी वाढे ज्ञान ।

जंव आपुलें निधन । निःशेष साधे ॥१०॥

पिउनी अज्ञान तसें पावतसे वृद्धि तोंवरी ज्ञान ।

जोंवरि पावतसे तें पूर्णत्वें अंतिं आपुलें निधन ॥१०॥

जैसें कल्पांतींचें भरितें । स्थळजळा दोहींतें ।

बुडविल्या आरौतें । राहूंचि नेणे ॥११॥

प्रळयजळाचें भरतें बुडवुनि दोनी स्थळा जळाला तें ।

भिन्न न राहूं नेणे उदकपणें एक करुनि दोघांतें ॥११॥

कीं विश्वाही वेगळ । वाढे जैसें सूर्यमंडळ ।

तैं तेज तम निखळ । तेंचि होये ॥१२॥

किंवा तेज रवीचें वाढे अत्यंत गगनिं सर्वकडे ।

व्यापुनि दिसे तदा त्या दोनींचा भेद दृष्टिला न पडे ॥१२॥

नाना नीद मारूनी । आपणपें नरोनी ।

जागणें ठाके होऊनी । जागणेंचि ॥१३॥

किंवा निद्रा मारुनि जागृति जी मागुती निखळ उरते ।

जागृति हें नांव तिला शोभेना जागणेंचि केवल तें ॥१३॥

तैसें अज्ञान ओटोनियां । ज्ञान येतें उवाया ।

ज्ञाना ज्ञान गिळूनियां । ज्ञानचि होये ॥१४॥

अज्ञानातें निरसुनि ज्ञाना उत्कर्ष होतसे जेव्हां ।

त्यासि उतार पडोनी ज्ञानचि केवल उरे तसें तेव्हां ॥१४॥

ते वेळीं पुनिवा भरे । ना आवसां सरे ।

ते चंद्रींचि उरे । सतरावी जेवीं ॥१५॥

भरपुर पूर्णिमेला ना अवसेला सरे चंद्रकला ।

ती सतरावी जेवीं ज्ञानकलाही तसी असे विमला ॥१५॥

कां तेजांतरें नाटोपे । कोणे तमें न सिंपे ।

ते उपमेचें जाउपें । सूर्याचि होये ॥१६॥

दुसर्‍या तेजानें जो होई तेजस्वि जो तमें न मळे ।

ऐशा त्या सूर्याला उपमा सूर्याविणें दुजी न जुळे ॥१६॥

म्हणोनि ज्ञानें उजळे । कां अज्ञानें रुळे ।

तैसें नव्हे निर्वाळें । ज्ञानमात्र जें ॥१७॥

तेंवि ज्ञानें उजळे अज्ञानेंकरुनि लुप्त जें होई ।

ऐसा नव्हेचि आत्मा निरपेक्षचि बोध मात्र तो पाहीं ॥१७॥

परि ज्ञानमात्रें निखळें । तेंचि कीं तया कळे ।

कायी देखिजे बुबुळें । बुबुळा जेविं ॥१८॥

जें ज्ञानमात्र निर्मळ त्याला त्याणेंचि केविं जाणावें ।

स्वेतर वस्तू साक्षी बुबुळानें बुबुळ केविं देखावें ॥१८॥

आकाश आपणंया रिघे । कायि आगी आपणयां लागे ।

आपुले माथां ओळघे । आपण कोण्ही ॥१९॥

अंबरि अंबर कैसें शिरूं शके अग्निला कसा अग्नी ।

लागे स्वमस्तकावरि चढुनि बसाया समर्थ नच कोणी ॥१९॥

दिठी आपणयां देखे । स्वाद आपणयां चाखे ।

नाद आपुलें आइके । नादपण ॥२०॥

नाद कसा नादाला ऐके, दृष्टी स्वतां कसी देखे ।

स्वादचि कीं स्वादाला अपुल्या आपण कसा बरें चाखे ? ॥२०॥

सूर्य सूर्यासि विवळे । कां फळ आपणयां फळे ।

परिमळ परिमळें । घेपत असे ॥२१॥

सूर्य प्रकाशि सूर्या केविं कसें फळ फळासि येईल ।

परिमळ हूंगायाला परिमळ कैसा समर्थ होईल ? ॥२१॥

तैसें आपणयां आपण । जाणतें नव्हे जाण ।

म्हणोनि ज्ञानपणेंवीण । ज्ञानमात्र जें ॥२२॥

तैसा चिद्रुप आत्मा समर्थ नोहे स्वतांसि जाणाया ।

तो ज्ञानमात्र म्हणुनी न च तदपेक्षा स्वयं प्रकाशाया ॥२२॥

आणि ज्ञान ऐसी सोये । ज्ञानपणेंचि जरी साहे ।

तरी अज्ञान हेंही नोहे । ज्ञानपणेंचि ॥२३॥

जो ज्ञानरूप आत्मा तो जाणाया जरी हवें ज्ञान ।

तें ज्ञान नामधारी आम्ही म्हणतों तयासि अज्ञान ॥२३॥

जैसें तेज जें आहे । तें आंधारें कीर नोहे ।

मा तेज तर्‍ही होये । तेजासि कायि ॥२४॥

जें तेज निखळ आहे कधिंही अंधार नच शिवे त्यातें ।

मग तेजासी देणें तेज असें नांव व्यर्थची दिसतें ॥२४॥

तैसें असणें आणि नसणें । हें नाहीं जया होणें ।

आतां मिथ्या ऐसें येणें । बोलें गमे ॥२५॥

आहेपण नाहींपण उभयहि ज्याला न लागती शब्द ।

ऐसें म्हणतां येई त्याला शून्यत्व ये असा वाद ॥२५॥

तरि कांहीं नाहीं सर्वथा । ऐसी जरी व्यवस्था ।

तरी नाहीं हे प्रथा । कवणासी पां ॥२६॥

याचें उत्तर ऐका जरि म्हणतां सर्वथा नसे कांहीं ।

तरि कांहीं नाहीं असि कवण्या ज्ञानें कळे स्थिती बा ही ॥२६॥

शून्य सिद्धांतबोध । कोण सत्ता होय सिद्ध ।

नसतां हा अपवाद । वस्तूसी जो ॥२७॥

जरि वस्तूची सत्ता नसती जीला न आदि ना अंत ।

कवणाच्या सत्तेनें शून्य असा होय सिद्ध सिद्धांत ॥२७॥

माल्हवितां दिवे । माल्हविता जरी मालवे ।

तरी दीप नाहीं हें फावे । कोणासि पां ॥२८॥

दीपा मालविणारा जरि दीपासह मुळींच मालविला ।

तरि दीप नष्ट झाला ऐसी ख्याती कळेल कवणाला ॥२८॥

कीं निद्रेचेनि आलेपणें । निदेलें तें जाय प्राणें ।

तरी नीद भली हें कोणें । कोणासी पां ॥२९॥

किंवा निजला असतां झाला जरि सुप्त नर गतप्राण ।

तरि त्या सुप्तिसुखाची सांगा कवणासि होय आठवण ॥२९॥

घट घटपणें भासे । तद्भंग भंगे आभासे ।

सर्वथा नाहीं तैं नसे । कोणें म्हणावें ॥३०॥

घट भासे असतांना फुटला जैं भग्न तो असा भासे ।

नाहिंच जैं तो तेव्हां कवण म्हणे सर्वथा नसे ऐसें ॥३०॥

म्हणोनि कांहीं नाहींपण । देखतां नाहीं नोहे आपण ।

नोहूनि असणेंनयावीण । असणें जें ॥३१॥

म्हणुनी जेणें भासे नाहींपण तो नव्हेचि तों शून्य ।

असण्यावांचुनि आहे ऐसा अनुभव जयासि तो धन्य ॥३१॥

परि आणिका का आपणियां । न पुरे विषो होआवया ।

म्हणोनि नसावया । कारण कीं ॥३२॥

आत्मा कधीं स्वतांला किंवा दुसर्यासि तो विषय नोहे ।

यालागीं तो आहे ऐसें म्हणण्या न बुद्धिला साहे ॥३२॥

जो निरंजनीं निदेला । तो आणिकीं नाहीं देखिला ।

आपलाही निमाला । आठव तया ॥३३॥

निर्जन वनांत निजला तो नर कोणीच देखिला नाहीं ।

झोंपीं गेलों ऐसी त्याची त्याला नसेचि अठवण ही ॥३३॥

परि जीवें नाहीं नोहे । तैसें शुद्ध असणें आहे ।

हें बोलणेंही न साहे । असे नाहींचें ॥३४॥

परि तो जिवंत नाहीं ऐसें नोहे तसेंचि हें शुद्ध ।

वस्तूचें रूप असे असण्या नसण्याविणें असे सिद्ध ॥३४॥

दिठी आपणया मुरडे । तें दिठीपणही मोडे ।

परी नाहीं नोहे फुडें । जाणचि ते ॥३५॥

दृष्टी जेव्हां परते स्वतांकडे ती पदार्थ नच पाहे ।

परि ती नाहीं ऐसें म्हणों नये देखणें तिचें आहे ॥३५॥

कां काळा राहे काळवखा । तो आपणा ना आणिकां ।

न चोजवे तरि असिकां । हा मी बाणे ॥३६॥

किंवा मनुष्य काळा स्वतांसि दुसर्‍यासि वा दिसत नाहीं ।

तरि तत्सत्ता सिद्धचि मी आहें या ध्वनीवरुनि पाहीं ॥३६॥

तैसें असणें का नसणें । हें कांहींचि माणुसवाणें ।

नसोनि असणें । ठायें ठावो ॥३७॥

तैसें असणें नसणें त्या न शिवति हीं विशेषणें दोनी ।

तरि न त्यजितां अपुली सत्ता तो राहतो निजस्थानीं ॥३७॥

निर्मळपणें आपुला । आकाशाचा संच विराला ।

तो स्वयें असे पुढिला । कांहीं नाहीं ॥३८॥

निर्मलरूपें राहे यद्यपि आकाश आपुल्या ठायीं ।

पाहतया लोकांना पोकळ म्हणुनी जणूं मुळिंच नाहीं ॥३८॥

कां आंगीं कीं निर्मळपणीं । हारपलिया या पोखरणी ।

हें आणिकवांचूनि पाणी । सगळेंचि आहे ॥३९॥

जैसें शुष्क सरोवरिं शुष्कोदक अन्य दृष्टिला न दिसे ।

परि तें अपुल्या ठायी पुर्वीं जैसें तसेंचि असे ॥३९॥

आपणा भाग तैसें । असणेंचि जें असे ।

आहे नाहीं ऐसें । सांडूनियां ॥४०॥

तैसें असणें नसणें सांडुनि दो भाव आपणामाजी ।

केवळ अस्तित्वानें राहे चिद्रूप आपुल्या तेजीं ॥४०॥

निदेचें नाहींपण । आणि निमालियाही जागरण ।

असिजे कां नेण कोण । न हो‍ऊनि जैसें ॥४१॥

निद्रेचें नसतेपण जागृतिचा भाव विसरूनी गेला ।

या संधीतिल जी स्थिति समजे जो अनुभवी असे त्याला ॥४१॥

कां भूमि कुंभ ठेविजे । तै सकुंभता आपजे ।

तो नेलिया म्हणिजे । तेणेंवीण ॥४२॥

भुमिस सकुंभ म्हणती तिजवरती ठेवितां जसा कुंभ ।

तेथुनि उचलुनि नेतां म्हणती भूमीस त्या जन निकुंभ ॥४२॥

परी दोन्ही हे भाग । न शिवती भूमीचें अंग ।

ते वेळीं भूमि तैसें चांग । चोख जे असणें ॥४३॥

परि हे भाव उभयही कधिंही शिवती न भूमिभागाला ।

तैसे असणें नसणें उभयहि शिवती न शुद्ध रूपाला ॥४३॥

॥ प्रकरण चौथें समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP