प्रकरण दहावे
परी गा श्रीनिवृत्तिराया । हातातळीं सुखविलें तुयां ।
तरी निवांतचि मियां । भोगावें कीं तें ॥१॥
ऐका निवृत्तिराया अनुपम सुख आणुनी करतळांत ।
या पामरा दिलें जें भोगावें तें निरंतर निवांत ॥१॥
परी महेशें सूर्याहातीं । दिधली तेजाची सूती ।
तया भासा अंतर्वर्ती । जगचि केलें ॥२॥
सूर्याहातीं देवें तेजाची केवढी दिली खाण ।
परि त्या योगें जगता लाधे सहज प्रकाश परिपूर्ण ॥२॥
चंद्रासी अमृत घातलें । तें तयाचि कायि येतुलें ।
कीं सिंधु मेघा दिधलें । मेघाचि भागु ॥३॥
चंद्रांत अमृत भरलें जें देवें काय तें तया पुरतें ।
कीं मेघा जें पय दे त्याच्या साठींच काय सागर ते ॥३॥
दिवा जो उजिवडु । तो घराचाचि सुरवाडु ।
गगनीं आथी पवाडु । तो जगाचाचि कीं ॥४॥
दीपाची जी दीप्ती पडे घरांतिल जनासि उपयोगी ।
अवकाश अंबरीं जो झाला आधार तो जगालागीं ॥४॥
अगाधें हीं उचंबळती । ते चंद्रींचि ना शक्ती ।
वसंतु करी तैं होती । झाडांचे दानीं ॥५॥
येइ समुद्रा भरती ती शशिशक्तीमुळें नव्हे काय ।
फलपुष्पें तरु देती त्याला कारण वसंत ऋतु होय ॥५॥
म्हणोनि हें असंवर्य । हें दैविकेचें औदार्य ।
वांचूनि स्वातंतर्य । माझें नाहीं ॥६॥
यास्तव सदगुरुपासुनि आलें हें थेट थोर औदार्य ।
एरविं या मूढाच्या हातुनि होईल केंवि हें कार्य ॥६॥
आणि हा एवढा ऐसा । परिहारु देऊं कायसा ।
प्रभुप्रभावविन्यासा । आड ठाऊनि ॥७॥
जरि हें उघडचि कीं या ग्रंथाच्या मी अशक्त निर्माणीं ।
परिहार द्या कशाला प्रभुसामर्थासि आड येवोनी ॥७॥
आम्हीं बोलिलों जें कांहीं । तें प्रकटचि असे ठाईं ।
मा स्वयंप्रकाशा काई । प्रकाशावें बोलें ॥८॥
जें बोलिलों अम्ही तें सिद्धचि आहे न तद्विषयिं शंका ।
जो स्वप्रकाश आहे तो आहे उक्ति ही वदूंच नका ॥८॥
नाना विपायें आम्ही हन । कीजे तें पां मौन ।
तरी काय जनीं जन । दिसतें ना ॥९॥
किंवा मौन जरि अम्हीं धरिलें तरि वस्तु लोपली काय ।
प्रच्छन्न असुनि पूर्वीं मत्कथनें काय ती प्रकट होय ॥९॥
जनातें जनें देखतां । द्रष्टाचि दृश्य तत्त्वतां ।
कोण्ही न होनि आइता । सिद्धांत हा ॥१०॥
पाहे जनासि जन ज उभयहि द्रष्टेचि दृश्य मग नाहीं ।
साधाया नलगे हा आहे सिद्धांत आयता पाहीं ॥१०॥
ययापरौतें कांहीं । संविद्रहस्य नाहीं ।
आणि हें तया आधींही । असतचि असे ॥११॥
एथवरी ज कथिलें न उरे कांहीं रहस्य त्यापरतें ।
आहेचि सिद्ध मुळिंचें यावरि जें कथन फोल सर्वहि तें ॥११॥
तर्ही ग्रंथप्रस्तावो । न घडे हें म्हणों पावो ।
तरी सिद्धानुवाद लाहों । आवडी करूं ॥१२॥
ऐसें म्हणुं जरि न घडे ग्रंथप्रस्ताव बैसतां मौनें ।
तरि म्यां कां न करावा सांगा सिद्धानुवाद अवडीनें ॥१२॥
पढियंतें सदा तेंची । परी भोगीं नवी रुची ।
म्हणोनि हा उचितुची । अनुवादु सिद्धु ॥१३॥
प्रिय वस्तू तीच जरी तरि तीचा भोग देइ अधिक रुची ।
यास्तव उचित कथा ही आहे सिद्धानुवादविषयींची ॥१३॥
या कारणें मियां । गौप्य दाविलें बोलोनियां ।
ऐसें नाहीं आपसया । प्रकाशुचि ॥१४॥
गुह्य असें जें एथें शब्दें म्यां दाविलें असें नाहीं ।
आहे स्वयंप्रकशचि प्रकाश त्याचा पड न वदतांही ॥१४॥
आणि पूर्ण अहंता वेठलों । सैंघ आम्हीच दाटलों ।
मा लोपलों ना प्रकटलों । कोणा होऊनी ॥१५॥
आतां एकाकित्वें अहंपणें दाटलों आम्ही भारी ।
आम्हां न लोपलें कीं प्रकटहि होणें नसेचि अवधारीं ॥१५॥
आपणया आपणपें । निरूपण काय वोपे ।
मा उगेपणें हरपे । ऐसें आहे ॥१६॥
आतां निरूपणा मी कवणा अंर्पू दुजें नसे जेथें ।
अथवा मौनचि धरिलें तरि तेणें काय हानि मम होते ॥१६॥
म्हणोनि माझी वैखरी । मौनाचेंही मौन करी ।
हे पाणियावरी मकरी । रेखिली पां ॥१७॥
म्हणुनी माझी वाणी मौनाचेंही निवांत मौन धरी ।
याउपरि बोलणें जें तें उदकीं रेखिली जसी मकरी ॥१७॥
एवं दशोपनिषदें । पुढारीं न ढाळती पदें ।
देखोनि बुडी बोधें । येथेंचि दिधली ॥१८॥
एथें दशोपनिषदें थकुनि पुढें टेंकती न पाऊल ।
बोधेंहि बुडी देतां त्याचीही स्तब्ध होइ चाऊल ॥१८॥
ज्ञानेदेवो म्हणे श्रीमंत । हें अनुभवामृत ।
सेऊनि जीवन्मुक्त । हेंचि होतु ॥१९॥
श्रीज्ञानेश्वर म्हणती अनुभवपीयूष मधुर श्रीमंत ।
सेवुनि मुक्त अहंपण विसरुनि राहोत होउनी अमृत ॥१९॥
मुक्ति कीर वेल्हाळ । अनुभवामृत निखळ ।
परि अमृताही उठी लाळ । अमृतें येणें ॥२०॥
अनुभवरूपामृत हे सिद्धाचें होय मोक्ष सुख खास ।
सर्वामृतवदनाही पाणि सुटे या बघूनि अमृतास ॥२०॥
निशींचा चंद्र होये । परी पुनीवे आनु आहे ।
हें कां मी म्हणो लाहें । सूर्यदिठी ॥२१॥
जरि नित्य चंद्र उगवे तच्छोभा वेगळीच पुनिवेची ।
जरि दृष्टि नित्य देखे तरि सूर्योदयिं अधीक शक्ति तिची ॥२१॥
प्रिया सावयिली होये । तैं अंगिंचें अंगीं न समाये ।
येर्हवीं तेथेंचि आहे । तारुण्य कीं ॥२२॥
जैसा तारुण्याचा भर आंतचि संचला वसे अंगीं ।
तो पसरे बाहिरही जेव्हां तरुण प्रियेसि आलिंगी ॥२२॥
वसंताचा आला । फळीं फुलीं आपला ।
गगनाचिया डाळा । पेलती झाडें ॥२३॥
वृक्ष अरण्यीं नित्यचि पल्लवफलपुष्पयुक्त जरि असती ।
तरि तेच वसंतागमिं जैसे फैलावुनी गगनिं जाती ॥२३॥
ययालागीं हें बोलणें । अनुभवामृतपणें ।
स्वानुभूति परिगुणें । वोगरिलें ॥२४॥
तैसीं अमृतानुभवग्रंथद्वारें मदीय हीं वचनें ।
स्वानुभवें सुरसानें भरित जणूं वाढिलींचि पक्वान्नें ॥२४॥
आणि मुक्त मुमुक्षु बद्ध । हे तंववरी योग्यताभेद ।
अनुभवामृतस्वाद । विरुद्ध जंव ॥२५॥
हा मुक्त हा मुमुक्षु बद्धचि हा दिसति तंव असे भेद ।
जोंवरि नाहिं मिळाला चाखाया अनुभवामृतस्वाद ॥२५॥
गंगावगाहना आली । पाणीयें गंगा जाली ।
कां तिमिरें भेटलीं । सूर्या जैसीं ॥२६॥
गंगास्नाना आलें जें पय तें जेंवि होइ गंगाची ।
किंवा तम भेटाया जातां सूर्यासि होइ तें रविची ॥२६॥
नाहीं परिसाची कसवटी । तंववरीच वानियाच्या गोठी ।
मग पंधरावयाच्या पाठीं । बैसावें कीं ॥२७॥
जंव न कसवटी परिसीं तोंवरि हा प्रश्न हीण कीं शुद्ध ।
परिसकसा जें टिकलें तें शुद्धचि हेम मग नुरे भेद ॥२७॥
तैसें जया अखरा । भेटती गाभारां ।
ते वोघ जैसे सागरा । आंतु आले ॥२८॥
मिळताति अक्षरें जैं स्वगर्भ जो त्या अकार वर्णासी ।
तैं अक्षरत्व होणें, मिळतां ओघत्व जेविं सिंधूसी ॥२८॥
जैशा अकारादि अक्षरा । भेटती पन्नासही मात्रा ।
तैसें या चराचरा । दुसरें नाहीं ॥२९॥
पन्नास जशा मात्रा मिळताती अक्षरा अकारादी ।
तैसें चराचरीं या दुसर्याला मागण्या नसे अवधी ॥२९॥
तैसी तये ईश्वरीं । अंगोळि नुरेचि दुसरी ।
किंबहुना सरोभरीं । शिवेंसींचि ॥३०॥
तैसी अंगुलि दुसरी अमृतानुभवेश्वराभिधानी या ।
न पडेचि शिवाविण या उपमा अढळे न दूसरी द्याया ॥३०॥
म्हणोनि ज्ञानदेवो म्हणे । अनुभवामृतें येणें ।
सणु भोगिजे सणें । विश्वाचेनि ॥३१॥
श्रीज्ञानदेव म्हणती विश्व सुखद अनुभवामृतें येणें ।
होवोत तुष्ट सज्जन ब्रह्मानंदीं निमग्न तत्पानें ॥३१॥
॥ प्रकरण १० वें समाप्त ॥