अमृतानुभव - प्रकरण नववे आतां आमोद स...

अमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.

प्रकरण नववे

आतां आमोद सुनास जालें । श्रुतीसी श्रवण रिघालें ।

आरिसे उठिले । लोचनेंसी ॥१॥

परिमळ नासिक झाला शब्दाला रूप येइ कानाचें ।

नेत्रचि अरसा झाला गमन घडे विषय देशिं नमनाचे ॥१॥

आपुलेनि समीरपणें । वेल्हावती विंजणे ।

कीं माथेचि चांफेपणें । बहकताती ॥२॥

पवनचि पंखा होता नाहीं अपेक्षाचि भिन्न पंख्याची ।

चंपक होता मस्तक माळाया गरज नाहीं सुमनांची ॥२॥

जिव्हा लोधली रसें । कमळ सूर्यपणें विकाशे ।

चकोरचि जैसे । चंद्रमा जाले ॥३॥

जिव्हा रसत्व पावे सुर्याचें रूप येइ कमलाला ।

चंद्रचि चकोर होतां कवण पुसे मग रसा रावेस शशिला ॥३॥

फुलेंचि जालीं भ्रमर । तरुणीचि झाली नर ।

जालें आपुलें शेजार । निद्राळूचि ॥४॥

फूलचि झाले मधुकर तरुणी झाली तसीच तरुण नर ।

किंवा निद्नाळू नर झाला अपुलें स्वतांचि शेजार ॥४॥

चूतांकुर जाले कोकिळ । आंगचि जालें मळपानिळ ।

रस जाले सकळ । रसनावंत ॥५॥

झाले चूतांकुर पिक, मलयानिल जाहला स्वतःअंग ।

स्वस्वाद घ्यावयासी रसना फुटल्या रसासि सर्वांग ॥५॥

दिठीवियाचा रवा । नागरु इया ठेवा ।

घडिला का कोरिवां । परि जैसा ॥६॥

दृष्टीपुढें दिसे जें तिमिर विविधसें मनोहराकार ।

तेथें दृश्य द्रष्टा उभयहि दृष्टिच न त्याहुनी इतर ॥६॥

तैसें भोग्य आणि भोक्ता । दिसे आणि देखता ।

हें सरलें अद्वैता । अफुटामाजी ॥७॥

त्यापरि भोक्ता आणी भोग्य द्रष्टा तसेंचि दृश्य जग ।

हीं युग्में अव्दैतीं पावति लय जें अभेद्य एक बघ ॥७॥

सेवंतीपणा बाहेरी । न निगतांचि परी ।

पांती सहस्त्रवरी । उपलविजे ॥८॥

शेवति पुष्पाआंतचि सहस्त्रशा फुलति पाकळ्या तरि तें ।

सगळें पुष्यचि म्हणवी तैसें चिन्मात्र एक जें दिसतें ॥८॥

तैसें नवां नवां अनुभवीं । वाजतां वाधावी ।

अक्रियेच्या गांवीं । नेणिजे तें ॥९॥

तैसे नवे नवे जरि होती व्यवहार विविध मुक्ताचे ।

विधिला जरि अनुसरला मोडेना अक्रियत्व कधिं त्याचें ॥९॥

म्हणोनि विषयांचेनि नांवें । सुनी इंद्रियांचे थवे ।

सैंघ घेती धावे । समोरही ॥१०॥

विषयोन्मुख होवोनी इंद्रियसमुदाय जाइ त्याजकडे ।

परि त्या निजसुखगोडी कळल्यानें विषयभोक्‍तृता न घडे ॥१०॥

परि आरिसा दिठी शिवे । तंव दिठीसी दिठी फावे ।

तैसें जालें धावे । वृत्तिचे या ॥११॥

दर्पणतल शिवताक्षणिं दृष्टी परतोनि येइ दृष्टिवरी ।

त्यापरि विषयावरि मन जातां निजधामिं येइ माघारी ॥११॥

नाग मुदी कल्लोळ कंकण । त्रिलिंगीं भेदली खूण ।

घेतां तर्‍ही सुवर्ण । घेइजे कीं ॥१२॥

नाग मुदी आणि कंकण लिंगत्रय शब्दिं जरि दिसे भिन्न ।

एकचि घेणाराच्या दृष्टीनें त्रिविध वस्तु न सुवर्ण ॥१२॥

वेंचून आणूं कल्लोळ । म्हणोन घापे करतळ ।

तेथें तरी निखळ । पाणीचि फावे ॥१३॥

पाहुनि अफाट सागरिं जललहरी त्यांसि उचलुनी घेतां ।

घेणाराच्या जैसें उदकाविण किमपि तें न ये हाता ॥१३॥

हातापासीं स्पर्शु । डोळ्यांपासीं रूपसु ।

जिव्हेपासी मिठांशु । कोण्ही एकु ॥१४॥

स्पर्श कराला समजे निजविषयस्वाद जाणते रसना ।

वर्ण श्वेत असे जो कापुरिं तो विषय होतसे नयना ॥१४॥

तर्‍ही परिमळापरौतें । मिरवणें नाहीं कापुरातें ।

तेवीं बहुतांपरी स्फुरतें । तेंचि स्फुरे ॥१५॥

कर्पूरांत तथापी तत्त्व सुगंधाविणें दुजें नाहीं ।

तैसें नाना परिनें स्फुरतें चिन्मात्र एकची पाहीं ॥१५॥

म्हणोनि शब्दादि पदार्थ । क्षोत्रादिंचे हात ।

घ्यावया जेथ । उजू होती ॥१६॥

यास्तव शब्दस्पर्शादिक विषयाशीं घडेल संयोग ।

क्षोत्रादि इद्रियांचा तेव्हां होता गमे पहा भोग ॥१६॥

तेथें संबंधु होय न होय । तंव इंद्रियांचें तें नोहे ।

मग असतेंचि आहे । संबंधु ना ॥१७॥

परि संबंध तयशीं होतो तंव इंद्रियें विषयभोगीं ।

अत्यासक्त न होतां राहति होवोनि मग्न निजरंगीं ॥१७॥

जिये पेरीं दिसती उंसीं । तियें लाधती कीं रसीं ।

कांति जेवीं शशीं । पुनिवेचिया ॥१८॥

जीं जीं उसांत दिसती पेरें तितुकीं रसांतही असती ।

किंवा कला सकलही संचित राकाशशीकधें होती ॥१८॥

पडिलें चांदावरी चांदिणे । समुद्रीं जालें वरिषणें ।

विषयां करणें । भेटती तैसीं ॥१९॥

हो‍उनि वृष्टि समुद्रीं कीं चंद्री चांदणें पडुनि जोडे ।

जो अर्थ तोचि इंद्रियाविषयांच्या भेटिनेंहि पदरिं पडे ॥१९॥

म्हणोन तोंडाआड पडे । तेंचि वाचा वावडे ।

परि सामाधि न मोडे । मौनमुद्रेची ॥२०॥

म्हणुनी तोंडा येई तैसा उच्चार होय वाणीचा ।

बिघडे नाचि तथापी लेशहि तेणें समाधि मौनाचा ॥२०॥

व्यापाराचे गाडे । मोडतांही अपाडें ।

अक्रियेचें न मोडे । पाउल केंही ॥२१॥

चाले असंख्य बाहिर व्यापाराची जरी घडामोड ।

तरि अंतरी तयाच्या लवही अक्रियपणा न ये बिघड ॥२१॥

पसरूनि वृत्तिचीं वावें । दिठी रूपातें दे खेवे ।

परि साचाचेनि नांवें । कांहींच न लभे ॥२२॥

पसरूनियां वृत्तीचे बाहू रूपासि दृष्टि कंवटाळी ।

परि वस्तुत्वें त्याच्या हाता किमपी न येइ त्या वेळीं ॥२२॥

तमातें घ्यावया । उचलूनि सहस्त्र बाहिया ।

शेवटीं रवि इया । हाचि जैसा ॥२३॥

अंधार घ्यावयाला पसरुनि अपुल्या सहस्त्र बाहूंला ।

तरणी धांवे तंव त्या हातीं आपण स्वतांचि सांपडला ॥२३॥

स्वप्नींचिया विलासा । भेट इन इया आशा ।

उठिला तंव जैसा । तोचि मा तो ॥२४॥

स्वप्नांतिल तरुणीला आलिंगायासि ऊठला तरुण ।

तंव एकलाचि आपण देखे तेथें दुजें नसे कवण ॥२४॥

तैसा उदैलया निर्विषयें । ज्ञानी विषयी हों लाहे ।

तंव दोन्ही न होनि होये । काय नेणों ॥२५॥

विषयप्राप्ती झाल्या ज्ञानी होतो क्षणामधीं विषयी ।

तंव तो विषय नव्हे ना विषयीही वस्तुमात्रची पाहीं ॥२५॥

चंद्र वेंचूं गेला चांदिणें । तंव वेचिलें काय कोण ।

विऊनि वांझे स्मरणें । होती जैसीं ॥२६॥

चंद्र प्रवृत्त झाला वेंचाया चांदणें जरी अपुलें ।

तरि काय वेचिलें वद वीउनि वंध्यात्व मानसीं उरलें ॥२६॥

प्रत्याहारादि अंगीं । योगें अंग टेंकिलें योगीं ।

तो जाला इये मार्गी । दिहाचा चांदु ॥२७॥

चित्तनिरोध करोनी योगी जन प्रत्यहार जो करिती ।

दिन शशिसम निष्फल तो तेणें अक्रियपणा नये हातीं ॥२७॥

येथ प्रवृत्ति वोहटे जिणें । अप्रवृत्तिसी वाधावणें ।

आतां प्रत्यङ्‍मुखपणें । प्रचारु दिसे ॥२८॥

जसजसि प्रवृत्ति होई कमी तसि तसि निवृत्तिही अधिक ।

हो‍उनि सहजचि त्याची चाले अंतर्मुखेंचि वर्तणुक ॥२८॥

द्वैतदशेचें आंगण । अद्वैत वोळगे आपण ।

भेद तंव तंव दुण । अभेदासी ॥२९॥

द्वैतपणें जें दिसतें अद्वैतचि तत्त्वदृष्टिला वाटे ।

जंव जंव भेद प्रकटे अधिकचि अद्वैत अंतरीं भेटे ॥२९॥

कैवल्याही चढावा । करित विषयसेवा ।

जाला भृत्यु भज्य कालोवा । भक्तिच्या घरीं ॥३०॥

विषयोपभोग ज्याचा जिंकी मोक्षासिही निजानंदें ।

भज्यभजक जोडीही ऐक्यानें भक्तिच्या घरीं नांदे ॥३०॥

घरामाजीं पायें । चालितां मार्गुही तोचि होये ।
ना बैसे तरी आहे । पावणेंचि ॥३१॥

पायीं चालत असतां अपुल्या घरीं तोचि मार्गही होई ।

अथवा स्वस्थ बसे जरि तरि तेथें पोंचलाचि तो पाहीं ॥३१॥

तैसें भलतें करितां । येथें पाविजे कांहीं आतां ।

ऐसें नाहीं न करिता । ठाकिजेना ॥३२॥

कर्म हवें तें करितां तेणें प्राप्तव्य त्या नसे कांहीं ।

अथवा कांहिं न करितां बसला म्हणतां नये उगा तैंही ॥३२॥

आठ‍उ आणि विसरु । तयातेंहि घेऊं नेदी पसरु ।

दशेचा विव्हारु । असाधारणु ॥३३॥

विसर न होइ विसरतां आठवितांही न होय आठवण ।

ऐशा अतर्क्य मुक्तस्थितिचें करणें अशक्य निर्वचन ॥३३॥

जाली स्वेच्छाचि विधि । स्वैर जाला समाधी ।

दशे ये मोक्षऋद्धि । बैसों घापे ॥३४॥

स्वेच्छाचि विधी ज्याला झाला स्वच्छंद वर्तनसमाधी ।

ऐशा दशेंत शोभे मुक्ताची पूर्ण मोक्षसंसिद्धी ॥३४॥

जाला देवोचि भक्तु । ठावोचि जाला पंथु ।

होऊन ठेला एकांतु । विश्वचि हें ॥३५॥

देवचि झाला पूजक गांवचि गंतव्य जाहला पंथ ।

ऐशा मुक्त नराला सर्व त्रिभुवनचि होइ एकांत ॥३५॥

भलतेउतेनि देवें । भलतेन भक्त होआवे ।

बैसला तेथें राणिवे । अकर्मु हा ॥३६॥

ईश्वर हो‍उनि रहटे भक्त कदाचीत हो‍उनी वागे ।

बाध न येइ तथापी त्याच्या अक्रियपणासि त्या योगें ॥३६॥

देवाचिया दाटणी । देउका जाली आटणी ।

देशकाळादि वाहाणी । येईच ना ॥३७॥

सर्वत्र देव भरला केंवि तिथें देउळा उरे ठाव ।

मग देशकाल कैचें त्याचें उरलें नसे किमपि नांव ॥३७॥

देवीं देवोचि न माये । मा देवी के अन्वयो आहे ।

तेथ परिवारु बहु ये । अघडता कीं ॥३८॥

देवाच्या पूर्णत्वीं देवत्वा मावण्या नसे ठाव ।

कवण पुसे मग देविस परिवाराचें नको मुळिच नांव ॥३८॥

ऐसियाही स्वामिभृत्यसंबंधा । लागीं उठली श्रद्धा ।

तैं देवोचि नुसधा । कामविजे ॥३९॥

ऐशा दशेंतही जरि मन इच्छी भज्यभजकताभावा ।

अद्वैतदेविं एका भक्तीचा सोहळा करुनि घ्यावा ॥३९॥

अवघिया उपचारा । जपध्यान निर्धारा ।

नाहीं आन संसारा । देवेंवीण ॥४०॥

उपचार सर्व आतां श्रवण मनन ध्यान भजन पूजादी ।

एका देवावांचुनि दुसरें कांहींच नाहीं उपरोधी ॥४०॥

आतां देवातेंचि देवे । देववरी भजावें ।

अर्पणाचेनि नांर्वे । भलतिया ॥४१॥

आपण ईश्वर व्हावें त्याला भजण्यासि भक्तही व्हावें ।

उपचार स्वतां हो‍उनि अर्ध्यादिक सर्व त्यासि अर्पावें ॥४१॥

देव देउळ परिवारु । कीजे कोरूनि डोंगरु ।

तैसा भक्तीचा वेव्हारु । कां न व्हावा ॥४२॥

देउळ देव तयाच्या परिवारासहित कोरिले जेंवी ।

एकाचि पर्वतामधिं भक्तीची परि न कां तसी व्हावी ॥४२॥

पाहें पां अवघेया । रुखा रुखचि यया ।

परि तोही दुसरिया । विस्तारे जेंवी ॥४३॥

शाखा पल्लव पुष्पें दृष्टीला भिन्न भिन्न जरि दिसती ।

त्या सर्वांसि मिळोनी वृक्ष असी जेंवी होय विख्याती ॥४३॥

अहो मुगीं मूग मात्र जैसें । घेतां न घेतां नवल नसे ।

केलें देवपणे तसें । दोहींपरी ॥४४॥

मौनव्रता मुक्यानें धरिलें अथवा जरी न धरिलेंही ।

तरि त्यांत भेद नाहीं भजभजक तेंवि भिन्न नच पाहीं ॥४४॥

अखतांची देवता । अखतींचि असे न पूजितां ।

मा अखतीं काय आतां । पुजों जावीं ॥४५॥

कीं देव तांदुळाचा पुजिला वाहूनि अक्षता त्याला ।

तरि अधिक काय केलें आहे त्याचाचि पुर्विं बनवीला ॥४५॥

दीप्तीचीं लुगडीं । दीपकळिके तूं वेढी ।

हें न म्हणतां तें उघडीं । ठाके काई ॥४६॥

बाई दीपज्योती उघडी कां नेस दीप्तिचें लुगडें ।

या उपदेशापूर्वीं तीचें होतें किं काय वपु उघडें ॥४६॥

कां चंद्रातें चंद्रिका । न म्हणिजे तूं लेकां ।

तर्‍ही तो असिका । तियाचि कीं ना ॥४७॥

प्रावरण चंद्रिकेचें घे ऐसें चंद्रम्या न म्हणतांही ।

तो होय चांदण्याच्या वस्त्रें वेष्टीत सर्वदा पाहीं ॥४७॥

आगीपण आगीं । असतचि असे अंगीं ।

मा कासयालागीं । देणें न देणें ॥४८॥

अथवा अनलाअंगीं स्वाभाविक उष्णता सदा असते ।

मग ती देणें नलगे द्यावी तरि सांग केधवा नसते ॥४८॥

म्हणोनि भजतां भजावें । मा न भुजतां काय नव्हे ।

ऐसें नाही स्वभावें । श्रीशिवुचि असे ॥४९॥

यास्तव केल्यानेंची भजन घडे सोडितांचि न घडे तें ।

ऐशी नव्हे दशाही भज्यभजक दोनही शिवचि जेथें ॥४९॥

आतां भक्ति अभाक्ति । जालें ताट एके पातीं ।

कर्माकर्माचिया वाती । माल्हाऊनियां ॥५०॥

आतां भक्ति अभक्ती दोहोंमधला विरोध नच उरला ।

कर्माकर्मज्योती निमती जैं बोध येइ उदयाला ॥५०॥

म्हणोनि उपनिषदे । दशे येती निंदे ।

निंदाचि विशदें । स्तोत्रें होती ॥५१॥

यास्तव उपनिषदाचीं वचनें निंदाचि आवघीं झालीं ।

अथवा निंदापर जी स्तुतिपाठक होइ तीच वचनाली ॥५१॥

नातरी निंदास्तुति । दोन्हीं मौनासाठीं जातीं ।

मौनीं मौन आथी । बोलतां बोलीं ॥५२॥

निंदा असो स्तुति असो मौनासाठींच उभयही असती ।

मौनीं मौनचि ठेलें बोलत असतांहि नाहिं वचनोक्ती ॥५२॥

घालितां अव्हासव्हा पाय । शिवयात्राचि होती जाय ।

शिवा गेलियाही नोहे । केंही जाणें ॥५३॥

शिवयात्रा सहज घडे भलत्या सलत्याहि मार्गिं पद पडतां ।

गमन न घडे कुठेंही बुद्धिपुरःसर शिवालया जातां ॥५३॥

चालणें आणि बैसक । दोन्ही मिळोनि एक ।

नोहे ऐसें कौतुक । इये ठाईं ॥५४॥

मागीं चालो अथवा बैसा दोनी मिळोनि एक असे ।

ऐसीं विरुद्ध युग्में वसती एकत्र यांत नवल नसे ॥५४॥

येर्‍हवीं आडोळलिया डोळा । शिवदर्शनाचा सोहळा ।

भोगिजे भलते वेळां । भलतेणें ॥५५॥

जेथें दृष्टी जाई शिवदर्शनसोहळा मिळे तेथें ।

केव्हांही कवण्याही देशीं त्याविण न पाहि अन्यातें ॥५५॥

ना समोर दिसे शिवुही । परी देखिलें कांहीं नाहीं ।

देवभक्ता दोहीं । एकुचि पाडु ॥५६॥

अथवा समोर असुनी शिव त्याच्या दिसत नाहीं नयनाला ।

भक्तचि ईश्वर होतां एकत्वीं भेद जाइ विलयाला ॥५६॥

आपणचि चेंडु सुटे । मग आपणयां उपटे ।

तेणें उधळतां दाटे । आपणपांचि ॥५७॥

चेंडु हतांतुनि सुटला असतां आपणचि भूमिला अदळे ।

तेथुनि उठे स्वतांची परतुनि वेगें पुन्हां हतासि मिळे ॥५७॥

ऐसी जरी चेंडूफळी । देखिजे का एके वेळीं ।

तरीं बोलिजे हे सरळ । प्रबुद्धाची ॥५८॥

ऐसा चेंडुफळीचा खेळ कधीम कुणिं असेल देखीला ।

तरि मुक्त वर्तनाची करितां येईल कल्पना त्याला ॥५८॥

कर्माचा हातु नलगे । ज्ञानाचेंही कांहीं न रिघे ।

ऐसीचि होतसे अंगें । उपास्ति हे ॥५९॥

कर्माचा स्पर्श जिथें नोहे ज्ञानप्रवेश शक्य नसे ।

ऐसी सिद्धदशेंतिल उपासनेची अपूर्व रीत असे ॥५९॥

निफजे ना निमे । अंगें अंग घुमे ।

सुखा सुख उपमे । देववेल यया ॥६०॥

नाहीं भज्यभजकता उपस्तिला या न आदि ना अंत ।

भोगी सूख सुखातें उपमा नाहींच यासि जगतांत ॥६०॥

कोण्ही एक अकृत्रिम । भक्तीचें हें वर्म ।

योगज्ञानादि विश्राम । भुमिका हे ॥६१॥

काय विलक्षण आहे अकृत्रिम पाहिं भक्तिचें वर्म ।

या सिद्ध भूमिकेवरि घेताति ज्ञानयोग विश्राम ॥६१॥

अंगें कीर एक जाले । परि नामरूपाचे मासले ।

होते तेही आटले । हरिहर येथें ॥६२॥

चिन्मात्र सर्व एकचि परि त्यामधिं भिन्न भिन्न नामरूपें ।

जीं दिसति हरिहरांची तीं सारीं ग्रस्त झालिं चिद्रूपें ॥६२॥

अहो अर्धनारीनटेश्वरें । गिळीत गिळीत परस्परें ।

ग्रहण जालें एकसरें । सर्वग्रासें ॥६३॥

पुरुष प्रकृती दोघे परस्परांतें गिळावया जाती ।

तंव बोधमात्र उरला सर्व जग ग्रासिलें तया अंतीं ॥६३॥

वाच्यजात खाऊनि । वाचकत्वही पिऊनि ।

ठाकली निदैजोनि । परा येथें ॥६४॥

मक्षुनि वाच्य सकलही शेवटिं तें वाचकत्वही पिउनी ।

वाणी परा निराश्रित निद्रावश हो‍उनी पडे शयनीं ॥६४॥

शिवा शिवा समर्था स्वामी । येवढीये आनंदभूमी ।

घेपें दीजे एकें आम्हीं । ऐसें केलें ॥६५॥

शिव शिव गुरो समर्था एवढि आनंदभूमिका दिधली ।

देण्या घेण्या तत्सुख शक्ति आम्हां देउनीं कृपा केली ॥६५॥

चेतचि मा चेवविलें । निदैलेंचि निदविलें ।

आम्हींचि आम्हां आणिलें । नवल जी तुझें ॥६६॥

त्वां जागृतासि केलें जागृत आणि निद्रितासि निजवीलें ।

नवल किती वर्णावें आम्हां तुम्हीं स्वतांसि भेटविलें ॥६६॥

आम्ही निखळ मा तुझे । वरी लोभें म्हणसी माझे ।

हें पुनरुक्त साजे । तृंचि म्हणोन ॥६७॥

आहोंत सर्वथा अम्हि तुझेचि परि त्यावरी म्हणसि माझे ।

आम्हां लोभानें तूं तव पुनरुक्ती तुलाचि ही साजे ॥६७॥

कोण्हाचें कांहीं न घेसी । अपुलेंही तैसेंचि न देसी ।

कोण जाणे भोगिसी । गौरव कैसें ॥६८॥

कवणाचेंही कांहीं नच घेसी आपुलेंहि नेदीसी ।

कवणाही परि न कळे गौरव कैसें स्वकीय भोगीसी ॥६८॥

गुरुत्वें जेव्हडा चांगु । तेव्हडाचि तारुनि लघु ।

गुरु लघु जाणे जो पांगु । तुझा करी ॥६९॥

अससी श्रेष्ठ गुरुत्वें जितुका तितुकाचि तूं लघू होसी ।

लघुगुरुपण हें जाणे तो आहे पात्र जो तव कृतिसी ॥६९॥

शिष्या देतां वांटे । अद्वैताचा समो फुटे ।

तरी काह्या होती भाटें । शास्त्रें तुझीं ॥७०॥

शिष्यासि बोध देतां अद्वैताचें समत्व जरि मोडे ।

वस्त्वैक्यस्तवनानें उपनिपदा भाटपण सहज जोडे ॥७०॥

किंबहुना दातारा । मी तूं याचा संसारा ।

बेंचून होसी सोयरा । तेणेंचि तोषें ॥७१॥

काय बहुत सांगावें तुज ऐसा नाहीं देखिला दाता ।

मीतूपणासि दवडुनि होसि सखा सोयरा पिता माता ॥७१॥

॥ प्रकरण ९ वें समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP