एका खुराड्यात काही कबुतरे होती. त्यांना मारून खावे या उद्देशाने एक घार त्या खुराड्याभोवती फार दिवस घिरट्या घालून कंटाळली, पण एकही कबुतर तिच्या हाती लागले नाही. मग तिने एक युक्ती केली. ती मोठ्या संभावितपणे कबुतरांजवळ गेली व त्यांना म्हणाली, 'अहो, माझ्यासारख्या बळकट व शूर पक्ष्याला जर तुम्ही आपला राजा कराल तर ससाणे नि तुमचे शत्रू यांच्यापासून मी तुमचे रक्षण करीन.' ससाण्याकडून होणार्या त्रासाला कबुतरे इतकी कंटाळली होती की त्यांनी घारीचे म्हणणे लगेच मान्य केले व तिला आपल्या खुराड्यात राहायला जागा दिली. पण दररोज ही घार खुराड्यातल्या एका कबुतराला मारून खाते, असे त्यांच्या लवकरच लक्षात आले व विचार न करता ह्या दुष्ट पक्ष्याला घरात जागा दिल्याबद्दल त्यांना फार पश्चात्ताप झाला.
तात्पर्य - एका शत्रूपासून रक्षण व्हावे म्हणून दुसर्या शत्रूचे साहाय्य घेणे मूर्खपणाचे होय.