एके दिवशी काही घुबडे, वटवाघुळे आणि इतर दिवाभीते एका दाट सावलीच्या झाडावर बसून आपल्या शेजार्यापाजार्यांस यथेच्छ शिव्या देत होते. शेवटी त्यांनी सूर्याची निंदा करण्यासही कमी केले नाही. ते म्हणू लागले, 'हा सूर्य फार त्रासदायक, उद्धट आणि विनाकारण लोकांच्या उठाठेवी करणारा आहे.' त्यांचे हे बोलणे ऐकून सूर्य त्यांना म्हणाला, 'बाबांनो, जो मी तुम्हा सर्वांना एका क्षणात जाळून टाकण्यास समर्थ आहे त्या माझी तुम्ही अशी निंदा करावी, याचे मला आश्चर्य वाटते. पण मी तुमच्या बडबडीकडे बिलकुल लक्ष न देता, पूर्वी सारखाच यापुढेही तापत राहणार, याबद्दल तुमची खात्री असूं द्या.'
तात्पर्य - मूर्ख व हटवादी लोकांच्या बडबडीकडे लक्ष देऊन शहाणे लोक आपले काम सोडत नाहीत.