कुंपण घातलेल्या एका कुरणात एक मेंढ्यांचा कळप चरत होता. धनगर एका झाडाखाली पावा वाजवत बसला होता व त्याचे कुत्रे झोपी गेले होते. अशा वेळी भूकेने अर्धमेला झालेला एक लांडगा कुंपणाच्या फटीतून आत डोकावतो आहे असे एका करडाने पाहिले. तेव्हा ते त्याला म्हणाले, 'अरे, तू येथे काय करतो आहेस ?' लांडगा म्हणाला, थोडसं कोवळं गवत यथेच्छ खाऊन वर झर्याचं स्वच्छ पाणी पिणं यासारखं उत्तम भक्ष्य व पेय नाही. हे दोनही पदार्थ तुला नेहमी मिळतात. तुझं भाग्यचं मोठ ! ज्या पदार्थांसाठी मी इतकी धडपड करतो ते तुला आयते मिळालेले पाहून मला मोठा आनंद होतो. कारण आपल्या नशिबी नाहीतरी निदान दुसर्याचे सुख पाहून तरी आनंद मानावा असे सत्पुरुषांचे वचन आहे.'
हे पांडित्य पाहून करडू म्हणाले, 'नुसतं थोडसं गवत व पाणी यांच्यावर तू आपला निर्वाह करीत असता तू मांसभक्षक आहेस असा गवगवा लोकांनी करावा हे चांगलं नाही. यापुढे आपण दोघेही भावासारखे वागू व एकाच ठिकाणी चरत आनंदानं राहू !' इतके बोलून ते मूर्ख व अनुभव नसलेले करडू कुंपणाच्या फटीतून बाहेर आले व लगेचच त्या दुष्ट लांडग्याच्या भक्ष्यस्थानी पडले.
तात्पर्य - लबाडी व ढोंगीपणा याबद्दल ज्याची प्रसिद्धी आहे, अशा माणसाच्या बोलण्यास भुलून त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे आपला जीव धोक्यात घालणे होय.