कोटि अन्नसंतर्पण । पुरे एकचि कीर्तन ॥१॥
नगरद्वारीं लाविला टिळा । दिलें आवतण सकळां ॥२॥
अठरा वर्ण एके ठायीं । वाढी विठ्ठल रखुमाई ॥३॥
नलगे खरकटें हात धुणें । अभेद हरीचीं कीर्तनें ॥४॥
श्रवणद्वारें घेती ग्रास । सदा सोंवळे हरिचे दास ॥५॥
आपण जेउनि जेववि लोकां । संतर्पण करितो तुका ॥६॥