होईजे आपण वचनें उदार । संतुष्ट ईश्वर होय तेणें ॥१॥
शुद्ध सत्वाऐसें संकल्पाचें फळ । पिकलें रसाळ मधुरसें ॥२॥
वचनीं मधुर जिव्हा लागे गोड । तेणें होय वाड भोगी तया ॥३॥
बीजाळ नसतां स्वादें घडे तृप्ति । कृष्णार्पण होती शुद्ध भाव ॥४॥
तुका म्हणे अर्पा भाव विश्वंभरी । सफळ संसारी जन्म तेव्हां ॥५॥