जयदेव, जयदेव, जय दक्षिणकेदारा
श्रीजमदग्नी महामुनि, जय परमोदारा ॥धृ०॥
दर्भ, कमंडलु, कुंडलमंडित रवलेशा
श्रीरत्नाचलनिलया अमृतवल्लेशा
ज्योतिर्लिंगा, भंगा, संगा, अक्लेशा
शरणागततापत्रय नुरविसि लवलेशा ॥१॥
यज्ञोपवीत धारण रुद्राक्षमाळा
सन्निध ऋद्धी, सिद्धी, ऋतुराजबाळा
चंदनबिल्वसमीधाघृत होमशाळा
सुवर्णमंडपतोरण नवरंगमाळा ॥२॥
जमदग्नि रेणुकासुपुत्रोत्यर्थ
वसती सिंहाद्रिवरी भक्ताप्रीत्यर्थ
देती भुक्ती, मुक्ती, चारिहि पुरुषार्थ
प्रसन्न जाहल्या करतिल काय न समर्थ ॥३॥
तूं महा-तेजोमय रवि, क्रोधानळहंता
अक्रोधचि झालासि अमृतकरमहंता
न कळे तव महिमा मुळमायेच्या कान्ता
दर्शनमात्रें वारिसि भवभय-आकांता ॥४॥
बंधू राम, पिता तूं, माता एकविरा
या त्रिपुटीनें हरल्या सहस्त्रानेकविरा
केला पामर आमर अंध, मुका, बहिरा
विष्णूदासा दिधला परमामृत विहिरा ॥५॥