जनक म्हणाला
मी अन्तहीन महासमुद्र आहें, त्यांत विश्वरुपी नाव आपल्या आपणच वायूनें डोलत आहे. मला त्याबद्दल असहिष्णुता नाहीं. ॥१॥
माझ्या अंतहीन महासमुद्रांत जगरुपी लाट स्वभावतः उठो वा नाहींशी होवो, त्यामुळें मी वाढतही नाहीं किंवा घटतही नाहीं. ॥२॥
माझ्या अंतहीन महासागरावर संसार हा कल्पनामात्र आहे. मी अत्यंत शांत आहें, निराकार आहें; आणि आतां हेंच माझें आश्रयस्थान आहे. ॥३॥
आत्मा विषयांत नाहीं आणि विषय त्या निरंजन आत्म्यांत नाहींत. अशा प्रकारें मी अनासक्त, स्पृहामुक्त आहें व त्यामुळेंच त्यांचें आश्रयस्थान आहें. ॥४॥
अहो, मी चैतन्यमात्र आहें. संसार इन्द्रजालाप्रमाणें आहे. त्यामुळें न कांहीं मिळविण्याजोगें आहे, न कांहीं टाकण्याजोगे आहे. ॥५॥