अष्टावक्र म्हणाला
हे जनक, एखाद्या गोष्टीचा अभाव असणें किंवा तिची प्राप्ति या गोष्टी स्वभावतः होत असतात. असें जाणून यांकडे साक्षीवृत्तीनें पाहाणारा विकाररहित व क्लेशरहित झालेला पुरुष सहज सुखानें शांत राहात असतो. ॥१॥
सर्वांना निर्माण करणारा या जगांत फक्त ईश्वर आहे. ही सर्व त्याचीच लीला आहे, असें निश्चयपूर्वक जाणून जो आशारहित होऊन, सर्वांचाच प्रभुकृपा म्हणून स्वीकार करतो तो कशांतच आसक्त न होतां शांत भावानें असतो. ॥२॥
कालेंकरुन दैवानें आपत्काल व संपदा येत असतात, हें ज्याला पक्कें ठाऊक आहे तो कशाचीही इच्छा किंवा कशाचेंही दुःख न करतां स्वस्थेंद्रिय व नित्य संतुष्ट असा राहातो. ॥३॥
सुख आणि दुःख, जन्म व मरण हीं दैवयोगानें प्राप्त होतात असें निश्चयानें जाणणारा पुरुष, सहजप्राप्त कर्मांचा बोजा न वाटूं देतां तीं करतो पण कशांतच आसक्त होत नाहीं. ॥४॥
चिंतेमुळें संसारदुःख निर्माण होतें हें ज्यानें स्वतःवर ठसवून घेतलें आहे त्याला कशाचीच इच्छा राहात नाहीं व तो चिंतारहित, सुखी व शांत असतो. ॥५॥
मी शरीर नाहीं, हा देह माझा नाहीं, मी ज्ञानस्वरुप बोधरुप-साक्षी आहें,असा बोध आत्मगत झालेला पुरुष केलेल्या व न केलेल्या कर्मांचें स्मरण करीत नाहीं---मनांत घोळवत नाहीं, त्यामुळें कैवल्यांतच त्याचा निवास असतो. ॥६॥
ब्रह्मापासून गवतापर्यंत सर्वत्र मीच आहें अशी अनुभूति प्राप्त केलेला व सर्व रुपांत सामावलेला संकल्परहित, शुद्धस्वरुप, शांत, लाभालाभरहित पुरुष आत्मानंदांत परिपूर्ण असतो. ॥७॥
या आश्चर्यमय विश्वाच्या ठिकाणीं वासनारहित, आत्मबोधास्वरुपांत वावरणार्या पुरुषाला, सर्वत्र हरिरुपाचीच अनुभूति येत असल्यानें, दुःखरुप अनुभवास न येतां तो शान्तिस्वरुपानेंच असतो. ॥८॥