जनक म्हणाला
जो पुरुष स्वभावानें शून्यचित्त आहे तो प्रारब्धकर्मानुसार आलेले विषय भोगतो. पण जसा गाढ झोपलेल्या माणसानें, उठवण्यांत आल्यानें, त्या झोपेचा पगडा असतांनाच सांगितलेलें काम करावें, त्याच प्रकारें हानिलाभाचा विचार न करतां अलिप्त व साक्षी राहून तीं कर्में करतो. ॥१॥
जनक म्हणतो कीं, शून्यचित्त झाल्यामुळें माझ्या विषयभावना मावळल्या आहेत. पूर्णात्मदर्शी अशा माझी विषयभोगांची इच्छा नष्ट झाल्यानें आतां माझें धन कुठलें ? मित्र कुठलें ? शास्त्रांचा अभ्यास कुठला ? आणि निदिध्यासनादिक कुठें उरलें ? माझी तर कशाबद्दलच आस्थाबुद्धि राहिली नाहीं. ॥२॥
साक्षी पुरुष व परब्रह्म पारमात्म्याचा बोध होऊन सार्या आशा मावळल्या, बंधनें गळून पडलीं व मोक्षाचीही कामना शिल्लक राहिली नाहीं. ॥३॥
विकल्पशून्य अंतःकरणाच्या निभ्रांत पुरुषाच्या अवस्थेंत स्वच्छंदानें वावरणार्या, त्या मुक्त पुरुषाला त्याच मुक्त अवस्थेला पोहोंचलेला मुक्तपुरुषच जाणतो. ॥४॥