अष्टवक्र म्हणाला
जेव्हां मन कांहीं इच्छितें, कांहीं विचार करतें, कांहीं स्वीकारतें, कांहीं टाकतें, दुःखी होतें किंवा सुखी होतें, तेव्हां बंधन निर्माण होतें. ॥१॥
जेव्हां मन कशाची इच्छा करीत नाहीं, चिंता करीत नाहीं, सोडीत नाहीं किंवा हवें हवें असें करीत नाहीं, सुखी किंवा दुःखी होत नाहीं, तेव्हां मुक्तीच असते. ॥२॥
जेव्हां मन कुठल्याही दृष्टीनें विषयांत गुंततें तेव्हां बंध निर्माण होतो आणि जेव्हां मन सर्व विषयांपासून अनासक्त होतें तेव्हां मोक्ष असतो. ॥३॥
जेव्हां ’मी’ नसेल तेव्हां मोक्ष, जेव्हां ’मी’ असेल तेव्हां बंध; अशा मतीला जो उपलब्ध झाला---यांत स्थिरावला, त्याला मग ही इच्छा, हा स्वीकार, हा त्याग असें होत नाहीं.॥४॥