अष्टवक्र म्हणाला
वैरीरुप काम व अनर्थानें भरलेल्या अर्थांचा त्याग कर आणि त्या दोघांच्या कारणरुप धर्माचाही त्याग करुन तूं सर्वांची उपेक्षा कर. ॥१॥
मित्र, शेत, धन, घर, स्त्री, भाऊबंद इत्यादि सर्व संपत्तीला तूं स्वप्नाप्रमाणें किंवा इन्द्रजालाप्रमाणें समज, कारण ते सर्व तीन-पांच दिवसांचेच असतात. ॥२॥
जेथें जेथें वासना निर्माण होईल तेथें तेथें संसार आहेअ असें समज. परिपक्व वैराग्याचा आधार घेऊन तृष्णा-वासनाहीन हो. ॥३॥
तृष्णा हाच बंध आहे, व तिचा नाश हा मोक्ष आहे. संसारात अ-संग होण्यानेंच निरंतर आत्म्याची प्राप्ति व तुष्टि होते. ॥४॥
तूं एक शुद्ध चैतन्य आहेस, संसार जड व असत् आहे. अविद्याही असत् आहे---एवढें जाणल्यावर आणखी जाणून घ्यायची काय जरुरी आहे ? ॥५॥
तुझें राज्य, पुत्रपौत्र, शरीर आणि सुख जन्मोजन्मीं नष्ट होत आलीं आहेत----जरी तूं त्यांच्यावर आसक्त बनला होतास. ॥६॥
अर्थ, काम, पुण्यकर्मसुद्धां तूं खूप करुन चुकला आहेस. तरीसुद्धां या संसाररुपी जंगलांत मनाला शांति मिळाली नाहीं. आतां तरी शांत बस. फक्त साक्षी हो. ॥७॥
किती जन्म तूं शरिरानें, मनानें व वाणीनें श्रमपूर्ण व दुःखपूर्ण कर्में केलींस ? (तरीसुद्धा उत्पातरुपी संसारांत मनाला थोडासुद्धां विश्रांतीचा क्षण मिळाला नाहीं--तेव्हां) आतां तरी निदान साक्षी राहा. कर्ता राहूं नकोस. ॥८॥