वैदिकस्तान्त्रिको मिश्र, इति मे त्रिविधो मखः ।
त्रयाणामीप्सितेनैव, विधिना मां समर्चयेत् ॥७॥
वेदींचे मंत्र वेदींचें अंग । वेदोक्त माझी पूजा साङग ।
या नांव गा ’वैदिक’ मार्ग ।; आगमप्रयोग तो ऐक ॥५७॥
आगममंत्र आगमचि अंग । माझी आगमोक्त पूजा साङग ।
या नांव गा ’तांत्रिक’ मार्ग ।; मिश्रप्रसंग तो ऐक ॥५८॥
वेदींचे मंत्र तंत्रींचें अंग । एवं मिश्रित उभय भाग ।
माझी पूजा निपजे साङग । ’मिश्र’ मार्ग या नांव ॥५९॥
हे त्रिविधविधि पूजा साङग । तो जाण माझा ’त्रिविध’ याग ।
येणें मी संतोषें श्रीरंग । पार्श्वदेशीं साङग सपरिवार ॥६०॥
ऐसें माझें त्रिविध भजन । जेथ ज्याची श्रद्धा पूर्ण ।
त्या विधीं करितां पूजन । मज तृप्ति समान भावार्थें ॥६१॥
भावार्थें जें माझें पूजन । तेणें मी संतृप्त जनार्दन ।
हा आगमोक्त यज्ञ संपूर्ण । त्रिविध लक्षण समसाम्यें ॥६२॥
वैदिकादि त्रिविध गती । पूजितां तृप्त मी श्रीपती ।
पूजाधिकाराची स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥६३॥