उपगायन्गृणन्नृत्यन्कर्माण्यभिनयन्मम ।
मत्कथाः श्रावयन् श्रृण्वन्, मुहूर्त क्षणिको भवेत् ॥४४॥
ज्ञान ध्यान उपासकता । हे गौण जाण सर्वथा ।
देव भावाचा भोक्ता । भावें तत्त्वतां देव भेटे ॥३२॥
ध्यानीं तुटलिया निजमन । करावें माझें नामस्मरण ।
कां माझ्या गुणांचें श्रवण । आदरें जान करावें ॥३३॥
करितां हरिगुणयशश्रवण । तेणें सुखावे अंतःकरण ।
सुखें सुखावोनि आपण । स्वयें हरिकीर्तन करावें ॥३४॥
निर्लज्ज नटाचे परी । हरिरंगणीं नृत्य करी ।
हावभावकटाक्षकुसरी । अभिनयो धरी कर्माचा ॥३५॥
गोवर्धन उद्धरण । अंगें दावावें आपण ।
कां मांडूनियां दृढ ठाण । त्र्यंबकभंजन दावावें ॥३६॥
पूतनाप्राणशोषण । कुवलयाचें निर्दळण ।
दावूनि मल्लमर्दन । हरिकीर्तन करावें ॥३७॥
नवल प्रेमाचा उद्बोध गद्यपद्यनामप्रबंध ।
भुजंगप्रयातादि अगाध । गाती स्वानंद स्तुतिस्तोत्रें ॥३८॥