श्रद्धयोपाहृतं प्रेष्ठं, भक्तेन मम वार्यपि ॥१७॥
भूर्यप्यभक्तोपहृतं, न मे तोषाय कल्पते ।
गन्धो धूपः सुमनसो, दीपोऽन्नाद्यं च किं पुनः ॥१८॥
माझ्या ठायीं अतिप्रीतीं । श्रद्धायुक्त अनन्य भक्तीं ।
भक्त ’भावें’ जळ अर्पिती । तेणें मी श्रीपति सुखावें ॥४९॥
तो जळबिंदु यथासुखें । म्यां मुखीं झेलिजे आदिपुरुखें ।
तंव भक्तभावाचेनि हरिखें । मी सुखरुप सुखें सुखावें देख ॥१५०॥
माझें त्रैलोक्यासी सुख । ऐसा मीही सुखरुप देख ।
त्या मज होय परम संतोख । भाविकांचें उदक सेवितां ॥५१॥
त्या जळबिंदूचिया साठीं । रमा नावडे गोमटी ।
ब्रह्मा जन्मला माझे पोटीं । तोही शेवटीं नावडे ॥५२॥
भाविकांचेनि उदकलेखें । मज वैकुंठही जालें फिकें ।
शेषशयनींचीं निद्रासुखें । त्यांचींही तुकें उतरलीं ॥५३॥
भाविकांच्या उदकापुढें । मज आणिक कांहीं नावडे ।
तेथही गंधादि पूजा जोडे । नैवेद्य चोखडे रसयुक्त ॥५४॥
ते पूजेचिये सुखप्राप्ती । उपमा नाहीं त्रिजगतीं ।
ऐसा भाविकांचिये भक्तीं । मी श्रीपती सुखावें ॥५५॥
भावें करितां भगवद्भक्ती । ’मी कृतकृत्य झालों निश्चितीं’ ।
ऐशिया निश्चयें जो भावार्थी । त्याचेनि जळें संतृप्ति मज होय ॥५६॥
येर जो अभक्त दंभस्थितीं । जीवीं द्रव्याशा बाह्य विभक्ती ।
लौकिकप्रतिष्ठेपुरती । माझी भक्ति जो मिरवी ॥५७॥
ऐशिया अभक्ताचिया स्थितीं । छत्र चामर गजसंपत्ती ।
मज अर्पितांही अभक्तीं । सुखलेश चित्तीं उपजेना ॥५८॥
क्षीरसागर निवडी राजहंस । तेथ निसूं दीधला कापुस ।
तेवीं अभक्तभजनीं संतोष । मी हृषीकेश पावेना ॥५९॥
कागाची गायनकळा । जेवीं तोषेना किन्नर शाळा ।
तेवीं अभक्ताची भजनलीला । माझी चित्कळा तोषेना ॥१६०॥
जेवीं रजस्वलेचें । पक्वान्न । उत्तम परी तें अतिहीन ।
तेवीं अभक्तांचें भजन । कदा जनार्दन स्पर्शेना ॥६१॥
ज्या भजना नातळे नारायण । ऐसें जें अभक्तांचें भजन ।
तेणें भजनें जनार्दन । अणुमात्र जाण तोषेना ॥६२॥
एवं भक्ताभक्तभजनमार्ग । दावूनि अधिकाराचे भाग ।
आतां समूळ पूजामार्ग । साङग श्रीकृष्ण सांगत ॥६३॥