सुदर्शनं पाञ्चजन्यं गदासीषुधनुर्हलान् ।
मुसलं कौस्तुभं मालां, श्रीवत्सं चानुपूजयेत् ॥२७॥
अण्वी जीवकळेसी ’देहावरण’ । सिंहासनीं ’शक्त्यावरण’ ।
सुदर्शनादि आयुधावरण’ । आपुलीं आपण हरि सांगे ॥५५॥
सतेज धार सुदर्शन । शंख शोभे पांचजन्य ।
नंदक तो खडग जाण । गदा गहन कौमोदकी ॥५६॥
शाङर्ग धनुष्य अतिसबळ । सुवर्णपुंखें बाण सरळ ।
हल आणि मुसळ । आयुधें प्रबळ पूजावीं ॥५७॥
या आठही भुजा सायुधा सरळा । कंठीं कौस्तुभ वनमाळा ।
कांसे कशिला पिंवळा । घनसांवळा शोभत ॥५८॥
ब्रह्मण्यदेव रमानाथ । ब्राह्मणाचा चरणघात ।
हृदयीं अलंकार मिरवत । शोभा अद्भुत तेणें शोभे ॥५९॥
चिद्रत्नांच्या अळंकारीं । गुण काढोनियां बाहेरी ।
वोविली वैजयंती कुसरी । ते हृदयावरी रुळत ॥२६०॥
यापरी साळंकार सायुध । शंखचक्रपद्मेसीं अगाध ।
ऐसा शोभला स्वयंबोध । नारदादि संनिध तिष्ठती सदा ॥६१॥
यापरी साळंकार सायुध । पूज्य पूजोनियां गोविंद ।
मग पूजावे पार्षद । ऐक विशद सांगेन ॥६२॥